खरी निर्माती 
अक्षररंग

खरी निर्माती

कोकणातील ग्रामीण स्त्री म्हणजे फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नाही, तर शेती, माती, संस्कृती आणि शाश्वत जीवनाची खरी जननी आहे.

नवशक्ती Web Desk

कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे

कोकणातील ग्रामीण स्त्री म्हणजे फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नाही, तर शेती, माती, संस्कृती आणि शाश्वत जीवनाची खरी जननी आहे. माऊली, सातेरी, अन्नपूर्णा अशा अनेक रूपांत ती आपल्या जगण्याला आकार देत असते. मातृसत्ताक व्यवस्थेच्या मुळाशी उभी असलेली ही स्त्री भातलावणीपासून परसबागेतील पोरसू जपते, गावठी पदार्थ बनवते आणि संपूर्ण कोकणच्या जगण्याला नैसर्गिक शाश्वतता प्रदान करते.

ती शाळेत फार शिकलेली नसते, पण जगण्याच्या युनिव्हर्सिटीची ती खरी टॉपर असते. तिच्या अनुभवातून, कष्टातून आणि साध्या जीवनातून ती आयुष्याचे मोठे धडे शिकवत असते. मी आमच्या पिढीतला सगळ्यात जास्त शिकलेला मुलगा. इंजिनिअरिंग म्हणजे काय, स्पर्धा म्हणजे काय याचा तिला कदाचित गंध नसेल; पण जगणं काय असतं हे तिला खोलवर ठाऊक आहे.

व्यवस्थेने त्यांच्या कष्टमय जीवनाला 'गरिबी' ठरवलं. त्यामुळे मुलांनी मोठं व्हावं, त्यांनी जगलेलं कठीण जीवन मुलांच्या वाट्याला येऊ नये, अशी तिचीही इतर आईंसारखी स्वप्नं होती. त्यामुळे Engineering पूर्ण करून मी गावात परत येऊन "मला इथेच लोकांसाठी आणि निसर्गासाठी काम करायचं आहे" असं सांगितलं, तेव्हा तो तिच्यासाठी एक मोठा धक्का होता. कारण मी पुन्हा त्याच जीवनशैलीकडे वळत होतो, ज्याला समाज गरीब म्हणत होता. पण मला त्यातच इकॉलॉजिकल लिव्हिंग- पर्यावरणपूरक, समाधानी आणि शाश्वत जीवनशैली दिसत होती आणि याच प्रवासात माझी आई माझ्यासाठी प्रेरणा बनली. मी लोकांसमोर जी जीवनशैली मांडत होतो, ती खरंतर माझी आई आणि तिच्यासारख्या असंख्य ग्रामीण स्त्रिया अनेक वर्षांपासून जगत होत्या. नकळत ती माझी मार्गदर्शक बनली.

मी तिचं जीवन 'डॉक्युमेंट' रूपात तयार करायला सुरुवात केली आणि त्यातूनच मला 'रानमाणूस' ही ओळख मिळाली. तिच्या हातचं अन्न, शेतीशी असलेलं नातं, निसगांशी असलेली जवळीक आणि कमी साधनांत समाधानाने जगण्याची कला- याच माझ्या विचारांचा पाया ठरल्या.

माझ्या कॉलेजच्या काळात आईला कॅन्सर झाला होता. उपचारानंतर गेली दहा वर्ष ती ठणठणीत जगते आहे. हे तिच्या शाश्वत आणि नैसर्गिक जीवनाचंच फळ म्हणावं लागेल. तिच्या जगण्याने आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक आणि आशादायक बनला.

आईसाठी मी काही महागड्या गोष्टी घेऊ शकलो नाही. पण जेव्हा मी शेतात पिकवलेली भाजी, तांदूळ, मिरच्या, काजू, आंबे तिच्यासाठी घेऊन जातो, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, तो कोणत्याही श्रीमंतीपेक्षा मोठा असतो. कारण तिच्यासाठी प्रेम हे पैशांत नसून मातीशी जोडलेल्या जगण्यात आहे.

तिने मला फक्त जन्म दिला नाही, तर जगायलाही शिकवलं- शाश्वत, समाधानी, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जगणं. ती अन्नपूर्णा आहे, ती माऊली आहे आणि या सुंदर कोकणाची खरी निर्मातीही तीच आहे.

पदपथांवरील 'आरे' स्टॉलवरही हातोडा; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत BMC करणार कारवाई; मुंबईतील १६०३ स्टॉलधारकांवर टांगती तलवार

तुकाराम मुंढे 'इफेक्ट'मुळे सलग दूध संकलनात घट; तीन महिन्यांत सव्वा लाख लिटरची घट, भेसळखोरांनी घेतला धसका

आयआयटी मुंबईच्या ६२० संशोधकांना PHD; एकाच शैक्षणिक वर्षात गाठला संशोधनातील ऐतिहासिक टप्पा

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार