मरणचिंतन
जगदीश काबरे
परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय मुलांमध्ये बौद्धिक क्षमता प्रखर असते, परंतु जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण अपुरे असते. म्हणूनच परदेशात अपार्टमेंट शेअर करताना जेव्हा साफसफाईची जबाबदारी सामायिक करावी लागते, तेव्हा तणाव निर्माण होतो.
भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांची एक मोठी विसंगती म्हणजे आपण शिक्षणाला दिलेले सर्वोच्च स्थान आणि त्याचवेळी जीवनकौशल्यांकडे केलेले दुर्लक्ष. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात ही विसंगती अधिक ठळकपणे दिसून येते. एखादा विद्यार्थी न्यू जर्सी, कॅलिफोर्निया किंवा टेक्साससारख्या अमेरिकेतील राज्यात मास्टर्ससाठी प्रवेश मिळवतो, तेव्हा त्याच्या कुटुंबात अभिमानाचे वातावरण असते; पण त्या अभिमानाच्या सावलीत एक मूलभूत प्रश्न हरावून जातो, तो म्हणजे हा विद्यार्थी स्वतःचे दैनंदिन आयुष्य स्वतंत्रपणे सांभाळू शकतो का? स्वच्छता, शिस्त, सामूहिक जबाबदारी, श्रमाचे मूल्य आणि स्वावलंबन यांसारख्या गुणांचा अभाव असेल, तर त्याचे उत्कृष्ट अकॅडमिक शैक्षणिक यशदेखील अपुरे ठरते. परदेशात घर भाड्याने देणाऱ्या व्यवस्थापकांनी भारतीय मुलांबद्दल व्यक्त केलेली निरीक्षणे ही केवळ काही व्यक्तींची मते नसून ती एका व्यापक सामाजिक मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. हा प्रश्न केवळ बाथरूम साफ करण्याचा नाही; तो भारतीय मुलांच्या सामाजिक घडणीतल्या पोकळीचा प्रश्न आहे.
भारतीय समाजात श्रमाचे मूल्य असमान पद्धतीने वितरीत झालेले आहे. जातिव्यवस्थेच्या छायेत शारीरिक श्रमाला कनिष्ठत्व जोडले गेले आणि बौद्धिक श्रमाला श्रेष्ठत्व. शिक्षण हे सामाजिक प्रगतीचे साधन ठरले, पण त्याच वेळी घरकाम, स्वच्छता, भांडी घासणे, कचरा वर्गीकरण करणे यांसारख्या कामांकडे ‘हे आमचे काम नाही” अशा दृष्टिकोनातून पाहिले गेले. परिणामी, मुलांच्या संगोपनात ‘तू फक्त अभ्यास कर” ही आज्ञा एक प्रकारची संस्कारपद्धती बनली. आई स्वतः सगळी कामे करते, कधी घरकामासाठी बाई असते आणि मुलाला केवळ अभ्यासाच्या खोलीत बसवले जाते. हा संस्कार मुलाच्या मनात एक अदृश्य संदेश कोरतो की, घरात श्रम करणे हे त्याचे काम नाही. हा संदेश इतका खोलवर रुजतो की तो परदेशात गेल्यावरही त्याच्या वृत्तीत त्याला बदल करणे कठीण जाते. मानसशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर बालपणात मिळालेली कामांपासूनची मोकळीक ही पुढे जाऊन ‘learned helplessness”च्या एका वेगळ्या स्वरूपात परिवर्तित होते. मुलाला कधीही झाडू हातात घ्यावा लागला नाही, कधी स्वतःचा कपडा धुवावा लागला नाही, कधी बाथरूम धुण्याचा आणि भांडी घासण्याचा अनुभव नाही; त्यामुळे त्याच्या मेंदूत त्या क्रियांबद्दलची सवय, कौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित होत नाही. कौशल्य हे केवळ बौद्धिक प्रशिक्षणाने येत नाही; ते पुनरावृत्ती, प्रत्यक्ष कृती आणि उत्तरदायित्वातून येते. परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय मुलांच्या बाबतीत बौद्धिक क्षमता प्रखर असते, परंतु जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण अपुरे असते. म्हणूनच परदेशात अपार्टमेंट शेअर करताना जेव्हा साफसफाईची जबाबदारी सामायिक करावी लागते, तेव्हा तणाव निर्माण होतो. हा तणाव केवळ कामाच्या विभागणीचा नसतो; तो आत्मप्रतिमेचा असतो. ‘मी इतका हुशार, मग मी बाथरूम का साफ करू?” असा अचेतन प्रश्न त्याच्या मनात उठतो.
यामध्ये लिंगभेदाचाही मोठा वाटा आहे. मुलींना आजही अनेक घरांत उद्या सासरी जाऊन तग धरता यावे म्हणून घरकाम शिकवले जाते, तर मुलांना त्यापासून मुक्त ठेवले जाते. परिणामी, मुली स्वावलंबी होतात आणि मुलगे परावलंबी. हा विरोधाभास आधुनिक शिक्षणाच्या दाव्यांना छेद देतो. आपण समानतेची भाषा करतो, पण व्यवहारात मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देतो. परदेशात जेव्हा अपार्टमेंट मॅनेजर भारतीय मुलींना सहज जागा देतात आणि मुलांबाबत संकोच व्यक्त करतात, तेव्हा तो केवळ व्यक्तिगत अनुभव नसतो; तो भारतीय कुटुंबातील लिंगाधारित संगोपनाचा परिणाम असतो. सामाजिक स्तरावर पाहिले तर भारतीय समाजात ‘प्रतिष्ठा’ ही संकल्पना अनेकदा बाह्य यशाशी जोडलेली आहे. विदेशात प्रवेश, उच्च वेतनाची नोकरी, परदेशी विद्यापीठाची पदवी इ., पण प्रतिष्ठेचा एक मूलभूत घटक म्हणजे दैनंदिन वर्तन. स्वच्छता, सामूहिक जागेचा आदर, वेळेवर कचरा बाहेर ठेवणे, शेजाऱ्यांचा विचार करणे, हे सगळे सभ्यतेचे निकष आहेत. जेव्हा एखादा भारतीय विद्यार्थी हे पाळत नाही, तेव्हा त्याच्या वैयक्तिक प्रतिमेबरोबरच देशाची प्रतिमाही मलीन होते. ‘ते खूप हुशार आहेत, पण स्वच्छता राखत नाहीत” असे वाक्य परदेशात रूढ झाले, तर तो एक सामाजिक ठसा बनतो. हा ठसा मिटवणे नंतर कठीण जाते.
पालकांचे चुकणे नेमके कोठे आहे? पहिली चूक म्हणजे मुलाच्या वेळेचे अतिसंरक्षण केले जाते. घरातील अभ्यासाबरोबरच त्याचा प्रत्येक क्षण ट्युशन, क्लासेस, स्पर्धा परीक्षांची तयारी यामध्ये गुंतवला जातो. घरकाम करण्यासाठी वेळच दिला जात नाही. दुसरी चूक म्हणजे श्रमाला कमी लेखणे. ‘तू डॉक्टर होणार आहेस, तुला भांडी घासायची गरज नाही” असे वाक्य मुलाच्या मनात श्रमांविषयी तुच्छता निर्माण करते. तिसरी चूक म्हणजे जबाबदारीचे हस्तांतरण न करणे. किशोरवयात मुलाला स्वतःची खोली स्वच्छ ठेवण्याची सक्ती नसते; आईच ती साफ करते. यामुळे मुलामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होत नाही. चौथी चूक म्हणजे उदाहरणाचा अभाव. वडील घरकामात सहभाग घेत नाहीत, तर मुलाला कोणता आदर्श मिळणार? मग यावर उपाय काय? प्रथम, घरात श्रमांचे लिंगनिरपेक्ष विभाजन झाले पाहिजे. मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान प्रमाणात घरकामाची जबाबदारी द्यायला हवी. दुसरे, स्वच्छता राखणे हे काम नसून आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे, हे शिकवले पाहिजे. तिसरे, परदेशात जाण्याच्या किमान सहा-आठ महिने आधी मुलाला स्वयंपाक, धुणी, भांडी, बाथरूम साफ करणे, कचरा वर्गीकरण, बिल भरणे यांची सवय लावली पाहिजे. चौथे, पालकांनी स्वतःचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. घरकाम करणे म्हणजे दर्जा कमी होणे नव्हे; उलट ते स्वावलंबनाचे लक्षण आहे.
मानसिक स्तरावर हा बदल आत्मसन्मानाशी जोडला पाहिजे. जो स्वतःची जागा स्वच्छ ठेवतो, तो इतरांच्या जागेचा आदर करतो. जो स्वतःचा कचरा स्वतः हाताळतो, तो समाजातील संसाधनांचा जबाबदारीने वापर करतो. अशा व्यक्तीमध्ये सहजीवनाची क्षमता वाढते. परदेशातील बहुसांस्कृतिक वातावरणात ही क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. विविध देशांतील विद्यार्थी जेव्हा एकत्र राहतात, तेव्हा सांस्कृतिक भिन्नता अपरिहार्य असते; पण स्वच्छता आणि शिस्त ही सार्वत्रिक मूल्ये आहेत. त्यात कमी पडल्यास संघर्ष निर्माण होतो. भारतीय मुलांच्या मानसिकतेचे विश्लेषण करताना आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो तो म्हणजे पालक आणि त्याच्यात मुरवलेले अतिरिक्त अवलंबित्व. घरात सर्व सोयी उपलब्ध असल्यामुळे मुलाला निर्णय घेण्याची आणि अंमलबजावणीची सवयच लागत नाही. परदेशात गेल्यावर अचानक सर्व जबाबदाऱ्या त्याच्यावर येतात. हा संक्रमणकाल अनेकदा तणावपूर्ण ठरतो. काही विद्यार्थी यशस्वीरीत्या जुळवून घेतात; पण काहीजण मानसिकदृष्ट्या गोंधळतात. त्यांना स्वच्छतेचे नियम, कचरा व्यवस्थापनाची पद्धत, सामूहिक जीवनातील शिष्टाचार समजत नाहीत. परिणामी, त्यांच्याबद्दल नकारात्मक दृष्टी निर्माण होते.
या सगळ्या प्रक्रियेत ‘देशाचे प्रतिनिधित्व’ ही भावना महत्त्वाची आहे. परदेशात राहणारा प्रत्येक विद्यार्थी अनौपचारिक राजदूत असतो. त्याचे वर्तन, त्याची शिस्त, त्याची स्वच्छता, हे सर्व त्याच्या देशाबद्दलची प्रतिमा तयार करतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ वैयक्तिक नसून राष्ट्रीय आहे. भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशाची प्रतिमा काही व्यक्तींच्या वर्तनावर अवलंबून राहू नये; पण वास्तवात तसे घडते हे खरे. शेवटी, हा प्रश्न दोषारोपाचा नाही; तो आत्मपरीक्षणाचा आहे. आपण आपल्या मुलांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आपण तयार करतो, पण जीवनाच्या मूलभूत कौशल्यांमध्ये त्यांना सक्षम करतो का? आपण त्यांना प्रतिष्ठेची भाषा शिकवतो, पण श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे शिकवतो का? जर उत्तर नकारार्थी असेल, तर बदलाची सुरुवात घरापासूनच करावी लागेल. स्वच्छता, श्रम, शिस्त आणि सामूहिक जबाबदारी या मूल्यांची बीजे बालपणात पेरली, तर परदेशात जाऊन भारतीय विद्यार्थ्यांबद्दल कोणीही ‘ते हुशार आहेत, पण स्वच्छता राखत नाहीत’ असे म्हणण्याचे धाडस करणार नाही. त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय समाजाची प्रतिष्ठा उंचावेल.
jetjagdish@gmail.com
(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)