शुष्क तरीही जिवंत... (Photo-@britannica)
अक्षररंग

शुष्क तरीही जिवंत...

वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर वाळू, उंट आणि रखरखतं ऊन उभं राहतं. पण जगात बर्फाचं, मिठाचं आणि अनेक अद्भुत प्राणी-वनस्पतींनी गजबजलेलं वाळवंटही आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर वाळू, उंट आणि रखरखतं ऊन उभं राहतं. पण जगात बर्फाचं, मिठाचं आणि अनेक अद्भुत प्राणी-वनस्पतींनी गजबजलेलं वाळवंटही आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

आपल्या पृथ्वीवरील जमिनीपैकी सुमारे एक पंचमांश भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. पृथ्वीवरच्या सातही खंडामध्ये वाळवंटं आहेत. सर्वसाधारणपणे वाळवंट म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येते ती इकडे तिकडे पसरलेली वाळू, त्यातल्या वाळूच्या टेकड्या, क्वचितच कुठेतरी दूर दिसणारी खजुराची झाडं आणि अशा कोरड्या, शुष्क प्रदेशातून जाणारा उंटांचा काफिला हेच दृश्य नजरेसमोर येतं. पण वाळवंटं फक्त उष्ण हवामानाच्याच प्रदेशांपुरती मर्यादित नाहीत तर शीत कटिबंधातही आहेत. अगदी आपल्या पृथ्वीच्या तळाशी असलेला आणि कायम बर्फाने झाकलेला भूभाग म्हणजेच ‘अंटार्क्टिका’ हा सुद्धा कोल्ड डेझर्ट म्हणजे शीत वाळवंट म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर जगभरातील सगळ्या वाळवंटांमध्ये सर्वात मोठं वाळवंट अशीही अंटार्क्टिकाची ओळख आहे. बर्फाने व्यापलेला भाग असूनही अंटार्क्टिकाला वाळवंट का म्हणतात? तर ज्या भूभागावर वर्षभरात १० ते १२ इंचांपेक्षाही कमी पाऊस पडतो त्याला वाळवंट म्हटलं जातं. त्यामुळेच जगात हवामानानुसार शीत वाळवंटं आणि उष्ण वाळवंटं पाहायला मिळतात. आपल्या देशात या दोन्ही प्रकारची वाळवंटं आहेत. भारताच्या उत्तरेतील काराकोरम रांगा ते हिमालयाच्या रांगा यामध्ये विसावलेला लडाखचा भाग शीत वाळवंट आहे, तर भारतातील राजस्थान या राज्याचा तीन पंचमांश भाग व्यापणारे ‘थरचे वाळवंट’ हे उष्ण वाळवंट आहे. शीत वाळवंटामध्ये वर्षातले सहा ते आठ महिने जमिनीवर बर्फाचा थर पसरलेला असतो, तर उष्ण वाळवंटात जमिनीवर वाळूचा थर असतो. मात्र जगातील एक वाळवंट असंही आहे जिथे वाळूऐवजी मिठाचा थर पसरलेला आहे. दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया या देशात, हजारो वर्षांपूर्वी या भागातील मोठमोठी सरोवरे आटल्याने ‘सालार डे युयुनि’ हे मिठाचं वाळवंट ११,९९५ फुटांवर तयार झालं. आठ मीटर जाडीचा मिठाचा थर इथल्या जमिनीवर पसरलेला आहे. अशा मिठाच्या वाळवंटाचं एक रूप आपल्याला भारतातील ‘कच्छच्या रणात’ बघायला मिळतं. व्हाइट रण म्हणूनच हे वाळवंट प्रसिद्ध आहे. मात्र पावसाळ्यात इथे पाऊस पडतो, हे पाणी पुढे बाष्पीभवनामुळे आटून जातं आणि मागे वाळूवर मिठाचा थर सोडून जातं. जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण वाळवंटांची यादी करायची झाली तर अरेबियातील वाळवंट, अराल्कम, गोबी, सहारा, थर, सालार डे युयुनी, अटाकामा ही नावे घ्यावी लागतात. वाळवंट शीत हवामानातले असो किंवा उष्ण हवामानातले अत्यंत विषम हवामान, पाण्याचे दुर्भिक्ष हे सगळीकडेच पाहायला मिळते. मात्र अशा प्रतिकुल हवामानातही वाळवंटात प्राणी आणि वनस्पती तग धरताना दिसतात. शिवाय दोहा, बगदाद, कैरो, दुबई, लिमा, जैसलमेर, बाडमेर, भुज, बिकानेर अशी अनेक शहरे वाळवंटात वसलेली आहेत. रुक्ष, ओसाड दिसणारी वाळवंटं प्रत्यक्षात चांदी, सोने, युरेनियम, झिंक, लोह अशा खनिजांनी, नैसर्गिक तेल आणि वायू तसेच खनिज मीठ (सैंधव मीठ) यांनी समृद्ध असतात.

वाळूच्या टेकड्यांनी व्यापलेल्या, पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटातील प्राणी म्हटल्यावर सगळ्यांना सर्वात आधी आठवतो तो ‘उंट’. वाळवंटातील जहाज म्हणून प्रसिद्ध असलेला उंट मुळात वाळवंटातला प्राणी नाही. उत्तर अमेरिकेत जन्माला आलेले उंटाचे पूर्वज पुढे स्थलांतर करत, स्वतःमध्ये बदल घडवत आशिया खंडात आले आणि इथल्या वाळवंटांमध्ये विसावले. उंटाच्या कातडीच्या रंगापासून ते बंद करता येणाऱ्या नाकपुड्यांपर्यंत सगळे अवयव त्याला वाळवंटात सुखा-समाधानाने राहता येईल असं घडलं आहे. पण उंटाबरोबरच वाळवंटात राहणाऱ्या सस्तन प्राण्यांची यादी वैशिष्ट्यपूर्ण आहे. जगातील सर्वात मोठं उष्ण वाळवंट असलेल्या सहारा वाळवंटात सुमारे ७० जातींचे सस्तन प्राणी आढळतात. त्यामध्ये उंदरासारख्या जर्बिलपासून ते हरणांच्या प्रकारांपर्यंत वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या वाळवंटांमध्ये पाहायला मिळतात. आपल्या लांबलचक, शिंगांनी आणि पांढऱ्याशुभ्र रंगानं लक्ष वेधून घेणारा मरुभूमीचा निवासी म्हणजे ‘अरेबियन ओरॅक्स’. मध्य पूर्वेतील वाळवंटी भागातच आढळत असल्याने याला ‘अरेबियन’ म्हणणं स्वाभाविकच होतं. मात्र हे देखणं हरिण त्याच्या नैसर्गिक परिसरातून ७०च्या दशकात पूर्णपणे नामशेष झालं होतं. माणसांनी आधुनिक साधनांनी केलेल्या शिकारीमुळे निसर्गाच्या पटावरील एक महत्त्वाचा प्राणी कायमचा पुसला गेला होता. ही चूक नंतर या प्राण्यांचे बंदिवासात प्रजनन करून सुधारण्यात आली. आता मध्य पूर्वेतील वेगवेगळ्या ठिकाणांवर मिळून सुमारे हजार एक अरेबियन ओरॅक्स त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे फिरताना पाहायला मिळतात. कळपाने राहणारी ही वाळवंटातली हरणं दिवसा विश्रांती घेतात. स्वभावाने आक्रमक नसल्याने एकाच भागात दोन किंवा तीन कळप गुण्यागोविंदाने राहतात. गवत, खुरट्या वनस्पती-त्यांची फळे, कंद खाऊन राहणारी ही हरणे अनेक आठवडे पाण्याशिवाय राहू शकतात. अगदी दूरच्या प्रदेशात पडलेल्या पावसाचा त्यांना अंदाज येतो आणि मग तिथे उगवलेल्या ताज्या वनस्पती खाण्यासाठी ते तिकडे पळ काढतात. तीव्र उन्हाळ्यात तग धरताना ही हरणं दिवसा सावलीत पडून राहतात आणि रात्रीच अन्न शोधतात. दिवसा आपल्या शरीराचं तपमान बाहेरच्या उष्णतेनं ते वाढू देतात, ज्यामुळे शरीरातले पाणी धरून ठेवायला मदत होते. रात्रीच्या थंड हवेत शरीराचे तपमान पूर्ववत होते. वाळवंटातच आढळणारा ‘अरेबियन वूल्फ’ हा लांडगा या हरणांचा एकमेव शिकारी आहे.

वाळवंट म्हणजे पाण्याचा अभाव, मात्र तरीही या मरुभूमीत चक्क एक प्रकारचे कासव आढळते. ज्या उत्तर अमेरिकेत उंटाचा जन्म झाला, तिथल्याच वाळवंटी प्रदेशात ‘गोफर टॉर्टोइज’ हे कासव आढळतं. कासवांमध्ये जमिनीवरची आणि पाण्यातली (टॉर्टोइज आणि टर्टल) असे दोन प्रकार असतात. त्यातील जमिनीवरच्या कासवांच्या वर्गातील हे कासव कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोमधील वाळवंटी भागात पाहायला मिळतं. जमिनीत खोलवर बिळ खोदण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे कासव आपल्या आयुष्यातील ८०% काळ त्या बिळातच काढतं. हे कासव सहा ते नऊ फूट खोल बिळ खोदत असल्याने त्या बिळाच्या आश्रयाला वाळवंटातील किमान ३०० जातींचे प्राणी येऊन राहतात. वाळवंटात बिळ खोदणं सोपं जावं अशीच त्यांच्या पायाची रचना असते, त्याचे मागचे पाय जाडसर, हत्तीच्या पायांसारखे असतात, तर पुढचे पाय पसरट असतात आणि दोन्ही पायांना तीक्ष्ण नख्या असतात. पाय रुंद असल्याने त्यांना वाळवंटात चालणं सोपं जातं, कारण त्यामुळे त्यांच्या शरीराचं वजन चारही पायांवर समान विभागलं जातं आणि पाय वाळूत फसत नाहीत. वाळवंटातील पाण्याच्या दुर्भिक्षावर उपाय म्हणून निसर्गाने या कासवांना मोठ्या आकाराचे आणि खास प्रकारचे मूत्राशय दिले आहे. या मूत्राशयात ही कासवे आपल्या वजनाच्या ४०% इतक्या प्रमाणात नायट्रोजन वेस्ट, युरिया, युरिक असिड आणि पाणी साठवू शकतात. गरज लागते तेव्हा यातूनच ही कासवं पाणी पुन्हा मिळवतात. जेव्हा परिसरात पाणी उपलब्ध असते तेव्हा ही कासवं भरपूर पाणी पिऊन आपल्या मूत्राशयात साठवून ठेवतात आणि फक्त नायट्रोजन वेस्ट बाहेर टाकतात.

वाळवंटातील जीवसृष्टी वैविध्यपूर्ण आहे. फक्त सस्तन प्राणीच नव्हे तर रेप्टाइल्स, उभयचर, पक्षी आणि वनस्पतींनी ते समृद्ध आहे. शुष्क वाळवंटातील या अनोख्या जीवसृष्टीबद्दल पुढच्या लेखात आणखी माहिती जाणून घेऊया.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

मुंबईत 'कॅच द कल्प्रीट ऑन कॅमेरा' मोहीम सुरू; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन

Mumbai : हुंडाबळी, आत्महत्या घटल्या; मात्र, छळाच्या घटनांमध्ये झाली वाढ

प्रवाशांचे सामान, दागिने चोरीचे प्रमाण वाढले; मुंबई विमानतळावरील पोलिसांचे तपासाचे आव्हान कायम

भाजपच्या सर्वच नगरसेवकांची कानउघाडणी; सभागृहातील गदारोळ, सत्ताधारी-विरोधक संघर्ष

राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला! सपकाळ यांची टीका