जगतवारी
मेधा आलकरी
पृथ्वीवरील सर्वात मोठी प्रवाळभित्ती असलेली ग्रेट बॅरियर रीफ ही निसर्गाने घडवलेली एक अद्वितीय कलाकृती आहे. रंग, रूप आणि सागरी जीवसृष्टीच्या अफाट वैविध्यामुळे ती जगभरातील पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते.
अंतराळातून दिसणारी एकमेव सजीव गोष्ट कोणती?’ या प्रश्नाचं उत्तर मी छातीठोकपणे ‘कुठलीच नाही’ असं नकारार्थीच दिलं असतं. मात्र हा माझा ठोकताळा अगदीच चुकीचा निघाला. त्याचं होकारार्थी उत्तर आहे -ग्रेट बॅरियर रीफ! ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पूर्व तटाला, क्वीन्सलँडच्या किनारपट्टीला समांतर, २३०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची ही प्रवाळ भित्तिका (coral reef) म्हणजे अवकाशातून दिसणारा चमत्कारच! हा काही एक सलग बांध नाही. ९०० बेटांच्या समूहावरील ३००० स्वतंत्र रीफ्सने ही ग्रेट बॅरियर रीफ बनली आहे. बऱ्याच जणांचा असा समज असतो की कोरल म्हणजे रंगबेरंगी दगड किंवा वनस्पती; परंतु कोरल हे कोट्यावधी लहान जीव एकत्र येऊन बनतात. त्या जीवांना म्हणतात ‘पॉलीप्स’. हे जीव समुद्रातील कॅल्शियम कार्बोनेट शोषून स्वतःभोवती चुनखडीचे कडक कवच तयार करतात. जेव्हा हे मृत होतात तेव्हा त्यांच्या कवचावर नवीन पॉलीप्स वाढतात. हजारो वर्षं या जन्ममृत्यूच्या चक्रातून गेल्यामुळे ही कोरल्सची अथांग भित्तिका तयार झाली आहे. आपल्या दागिन्यात जडवलेली लाल शेंदरी रंगाची पोवळी कोरेलियम जातीच्या पॉलीप्सने सोडलेल्या स्त्रावामुळे बनतात. अर्थात ही इतकी शास्त्रीय, भौगोलिक माहिती तिथे जाण्यापूर्वी आम्हाला अजिबात नव्हती. आमच्यासाठी होती ती ‘निमो’ माशाची नगरी! ‘फाइंडिंग निमो’ हा नितांत सुंदर ॲनिमेटेड सिनेमा पाहिला, तेव्हाच समुद्राखालच्या या खजिन्यात आमचं मन कैद झालं होतं.
रीफला जाण्यासाठी मुक्काम करावा लागतो ‘केन्स’ या छोटेखानी गावात. रीफवरील समुद्रसफरीला नेणाऱ्या इतक्या कंपन्या होत्या की नक्की कोणती निवडावी या संभ्रमात असतानाच ‘सनलव्हर्स क्रुझर’च्या पत्रकातलं एक वाक्य मला खूपच भावलं. त्यात म्हटलं होतं ‘आमचा रीफ आम्हाला खूप आवडतो आणि आम्ही तो मिरवतोही खूप. तुमच्यासमोर तो उलगडून ठेवायला आम्हाला खूप आवडेल.’ तलम, गर्भरेशमी पैठणी अलगद उलगडून समोर ठेवणारा विक्रेता आठवला आणि मग आपसूकच त्याची निवड झाली.
समुद्रात दीडशे किलोमीटर दूर असल्यामुळे रीफला पोहोचायला बोटीनं दोन-अडीच तासांचा प्रवास करावा लागतो. आमची बोट अद्ययावत आणि वातानुकूलित होती. कर्मचारी सगळे हसतमुख आणि तत्पर. ऑस्ट्रेलियात पर्यटन हा व्यवसाय म्हणून खूप प्रगत झालेला आहे. या पर्यटन संस्था आपल्या कामामुळे अशी काही जादू करतात की, पर्यटक परततो तो आनंदात, कृतकृत्य होऊनच! सुरुवातीला थोडी अवाजवी वाटणारी ट्रीपची किंमत परतीला एकदम ‘वसूल’ वाटू लागते. बोटीवरील प्रवासात गाईडने आम्हाला रीफबद्दल, तिथे करण्यात येणाऱ्या, स्नॉर्कलिंग, स्कुबा डायविंग, सी वॉक आणि हेलिकॉप्टर राईड अशा विविध ॲक्टिव्हिटीजची माहिती दिली. निमोचं घर बघायची जबरदस्त मनीषा होती मनात; पण स्कुबा आणि स्नॉर्कलिंगचा ‘स’ही ऐकला नव्हता उभ्या जन्मात! आता काय करावं? बोटीवर आमच्यासारख्या नवख्यांसाठी स्नॉर्कलिंगचा गाईडेड टूर होता म्हणताना लगेच आम्ही त्यात आपलं नाव नोंदवलं. सी वॉक करताना अंतराळवीरांसारखे हेल्मेट घालून चंद्रावर नाही तरी समुद्राच्या पृष्ठभागाखाली आपण तरंगत चालणार आहोत या कल्पनेनं मोहरून जाऊन त्यातही सहभागी होण्याचं ठरवलं. आज काहीतरी वेगळाच अनुभव गाठीशी बांधणार होतो आम्ही. स्नॉर्कलिंगमध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत आतली दुनिया पाहायची होती आणि सी वॉकमध्ये एक पाऊल पुढे जाऊन माशांशी हस्तांदोलन करायचं होतं.
रीफ असलेल्या जागेवर एका नांगरलेल्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उतरलो. सराईत लोक स्नॉर्कलिंगच्या नळ्या तोंडात धरून आणि पायाला फिन्स लावून पटापट पाण्यात उतरले. आम्ही मात्र काठाशी डुबक्या घेत राहिलो. स्नॉर्कलिंगच्या वाकड्या नळीचं बूच अचूकपणे तोंडात धरण्याची एक सोपी पद्धत आहे. आ करून बूच तोंडात धरायचं, ई म्हणत दातांमध्ये पकडायचं आणि ऊ म्हणत ओठांच्या चंबूनं त्याला झाकून टाकायचं. आम्ही पाण्याबाहेर राहणाऱ्या नळीतून येणारी हवा तोंडावाटे आत घेत श्वासोच्छ्वास कसा चालू ठेवायचा याचं घोटून घेतलेलं प्रात्यक्षिक प्रत्यक्षात उतरवण्याच्या प्रयत्नाला लागलो. तेवढ्यात स्नॉर्कलिंगच्या गाईडनं एक मोठी रबरी रिंग आणली. त्याला धरून आणि गाईडरूपी परमेश्वरावर पूर्ण भरवसा टाकून आम्ही त्या प्लॅटफॉर्मचा खांब सोडून भर समुद्रात पाय मारू लागलो. गाईडची माहिती कानांनी ऐकायची, डोकं पाण्यावर तरंगत ठेवायचं आणि इलास्टीकने घट्ट बांधलेल्या गॉगलमधून खाली पाहत राहायचं, या सूचनांचं पालन करत पुढे जात होतो. जसजसं दूर जायला लागलो तसतसे पाण्यात कोरल्स दिसू लागले. हिरवे, निळे, जांभळे, कधी घट्ट मोळी बांधल्यागत तर कधी मश्रुमसारखे, काही ब्रोकलीच्या आकाराचे तर काही मानवी मेंदूसारखे, काही तर फ्लॉवरपॉटमध्ये सजवल्यासारखे. कोरल्स स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत. त्यांच्या पेशींच्या आत राहणारं सूक्ष्म शेवाळं (Algae) जे अन्न तयार करतात त्यातला काही भाग कोरल्सना मिळतो. बदल्यात ते त्यांना राहायला सुरक्षित जागा देतात. गंमत म्हणजे कोरल्सना जो रंगबेरंगी साज मिळतो तो या शेवाळामुळेच. समुद्राचं तापमान वाढलं तर हे कोरल्स चक्क त्यांना बाहेर ढकलून देतात. मग स्वतः पांढरे फट्टक पडले तरी बेहत्तर! मधूनच आम्हाला गाईडने महाकाय असे जिवंत शिंपले दाखवले. ते आपलं कवच उघडून बसले होते, आ वासल्यागत. त्याच्या आतसुद्धा निळे, जांभळे रंग. इथेही रंगांची उधळण करणारं शेवाळंच! हे महाकाय शिंपले असतात. त्यांचा व्यास एक मीटर इतका विशाल असू शकतो. पुढे गेलो तर इवल्या इवल्या चकाकत्या माशांचे थवे लागले. आमच्या अंगाला चाटून पुढे जात होते. गाईडने आता आम्हाला अथांग निळाई असलेल्या हृदयाच्या आकाराच्या डोहापाशी आणलं. तिथं आम्हाला भेटली कासवं. इतकी सुंदर, जणू गोंदवलेल्या पाठी. डोहाला वळसा घालून निघालो आणि अचानक आम्हाला आमचा लाडका निमो दिसला. अगदी सिनेमात दिसतो तस्साच! अमिताभला जवळून पाहिल्यावर होईल इतका आनंद मला त्याला पाहून झाला. निमोचं खरं नाव क्लाऊन फिश किंवा ॲनीमोने फिश.
समुद्राच्या पाण्यातील प्रवाहावर फुलांसारखा डोलणारा ॲनीमोने आणि निमो यांचं एक अजब नातं आहे. ॲनीमोने हासुद्धा कोरल्ससारखा प्राणीच आहे; परंतु तो आपल्याभोवती कवच तयार करत नाही. ॲनीमोनेच्या पाकळ्या इतर माशांना विषारी डंख करतात, मात्र निमोला आपल्या कुशीत खेळवतात. त्यामागचं वैज्ञानिक कारण असं की निमोच्या शरीरावर विशिष्ट प्रकारच्या द्रवाचा थर असतो. त्यामुळे त्या विषारी सुया त्याच्या त्वचेपर्यंत पोहोचतच नाहीत.
सी वॉकचा सरंजाम जरा जास्त होता. बोटीखाली पंधरा ते वीस फुटांवर पूर्णपणे पाण्यात बुडवलेला एक प्लॅटफॉर्म बनवला होता. त्यावर दोन्ही बाजूंना रेलिंग होतं. सर्वप्रथम अंगाला घट्ट बसणारा वेटसूट चढवला. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगण्यासाठी आपल्याला लागते हवा भरलेली रबरी रिंग. इथे मात्र उलटा कारभार! पाण्यात बुडावं म्हणून तुमच्या कमरेला शिसं भरलेला पट्टा बांधण्यात येतो आणि नेहमीसारखा नाकाने श्वास घेता यावा म्हणून डोक्यावर ठराविक दाब असलेलं विशिष्ट हेल्मेट चढवलं जातं. हेल्मेटचा आणखी एक फायदा म्हणजे चेहऱ्यावर पाणी येत नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूस फिरणारी मत्स्यसंपत्ती आपल्याला आरामात न्याहाळता येते. रेलिंगला धरून अंतराळवीरासारखं थोडं तरंगत चालत असतानाच ‘माओरी व्रासे’ जातीचा एक मोठ्ठा मासा माझ्या अगदी जवळ आला. मी थोडी दचकलेच. पण तो मात्र आपलं वाटोळं डोकं गरगर फिरवत माझा जुना मित्र असावा तसा जवळ आला आणि स्वतः न घाबरता आणि मलाही न घाबरवता माझ्या अंगाला चाटून गेला. ‘आमच्या सागरगृही तुमचं स्वागत आहे’ असं म्हणाला असावा का तो? त्याच्या चेहऱ्यावरील सुंदर निळ्या-हिरव्या रंगांच्या रेषांचं जाळं न्यूझीलंडच्या माओरी आदिवासी जमातींच्या चेहऱ्यावरील गोंदवलेल्या नक्षीसारखं दिसतं म्हणून त्याला माओरी हे नाव पडलं. बरोबर चालत असलेला गाईड म्हणाला, हा रीफमधील सर्वात लाडका आणि ‘सेलिब्रिटी’ मासा आहे. शरीराने अवाढव्य असला तरी स्वभावाने मात्र हा मजेशीर आहे. इथे त्याला लाडाने ‘वॅली’ म्हणून संबोधतात. त्याच्या डोळ्यांच्या वर एक मोठा उंचवटा असतो. तो उंचवटा अगदी नेपोलियन बोनापार्टच्या प्रसिद्ध टोपीसारखा दिसतो. म्हणून याला ‘नेपोलियन व्रासे’ही म्हणतात.
गाईडनं टाकलेला खुराक मटकावण्यासाठी त्याने तोंड उघडलं आणि बरोबर चालणाऱ्या फोटोग्राफरनं तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला. वॅली नुसता मनोरंजनासाठी येणारा मासा नव्हे; तर तो विषारी प्राण्यांचा काळ आहे. कोरलाना भक्ष्य करून रीफ नष्ट करण्याच्या मागावर असलेल्या ‘क्राऊन ऑफ थॉर्न्स’ स्टारफिशला आणि इतर विषारी जीवांना खाऊन सहज पचवतो. रीफचा रक्षणकर्ताच तो! रिगल एंजल नावाचा एक लडिवाळ मासा त्याच्या अंगावरील पिवळ्या, हिरव्या पट्ट्यांमुळे उठून दिसत होता. त्याच्याबद्दल एक अजबच माहिती कळली. जन्मतःच हा चटकदार निळ्या रंगाचा असतो आणि त्याच्या अंगावर रंगीत पट्टे उमटले की त्याला ‘शिंग फुटली’ म्हणतात. निमो आणि वॅली वंश टिकवण्याची गरज पडली तर चक्क आपलं लिंग बदलतात ही तर फारच आश्चर्यजनक माहिती होती. निमोच्या जगात मातृसत्ताक पद्धत! जन्मतः सगळे नरच, समूहातील फक्त एकच सर्वात मोठा मासा विकसित होऊन मादी बनतो. कर्मधर्मसंयोगाने ती मरण पावली तर सर्वात मोठा नर लिंगबदल करून मादी होतो आणि अंडी घालतो. वॅलीच्या जगात निमोच्या अगदी उलट स्थिती. समूहातील देखणा नर त्यांचा राजा. तो मरण पावला की ताकदवान मादी नर बनून त्याची जागा घेते. लिंग बदलताच तिचा रंग अधिक चमकदार होतो आणि कपाळावरील उंचवटा मोठा होतो. जणू राजाचा मुकुट! पाणकासवाची तर आणखीनच न्यारी तऱ्हा! अंडी घालायला वाळूवर जाणाऱ्या मादीने जर २७ अंश सेंटीग्रेडच्या तापमानात अंडी उबवली तर ती मादी, कमी तापमानात नर.
मासे, कोरल्स, कासवं आणि शिंपले यांची ही रंगीत दुनिया पाहून मनात विचार आला- ये कौन चित्रकार है!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com