मिस्टर झेसो 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

मिस्टर झेसो

ही कथा आहे एका गोलमटोल मुलाची... ज्याला कॅच धरता येत नव्हता; पण एक दिवस त्याने असा कॅच पकडला, की एका चिमुकल्याचा जीवच वाचला.

नवशक्ती Web Desk

कथा

ईशान पुणेकर

ही कथा आहे एका गोलमटोल मुलाची... ज्याला कॅच धरता येत नव्हता; पण एक दिवस त्याने असा कॅच पकडला, की एका चिमुकल्याचा जीवच वाचला.

मिस्टर झेसो? झेसो म्हणजे? हा कुठल्या भाषेतला शब्द? त्याचा अर्थ? तर त्याचं झालं होतं असं-

गल्लीतल्या पोरांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. सदानकदा तेच. सगळी दहा-बारा वर्षांची पोरं. त्यामध्ये सुदेशही. गुटगुटीत, गोबऱ्या गालांचा. त्याची एक गंमतच होती. गब्दुल असूनही तो फिल्डिंग भारी करायचा; पण कॅच मात्र सोडायचा. एखादा कॅच धरला तर नशीब.

उन्हाळ्याची सुट्टी संपायला आली होती. आता एक रंगतदार स्पर्धा व्हायलाच हवी होती आणि ती म्हणजे पलीकडच्या गल्लीतल्या मुलांशी क्रिकेटची मॅच. त्या मॅचला खूप महत्त्व होतं. भारत-पाक मॅचच जणू!

थोडीशी वळवाची सर येऊन गेली होती. विचित्र उकडत होतं. पण पोरांना काय त्याचं? त्यांचा आरडाओरडा चालू होता. मॅच सुरू झाली होती आणि संपायलाही आली होती. सुदेशच्या टीमने आधी बॅटिंग घेतली होती. त्यांच्या ९३ धावा झाल्या होत्या. आता पलीकडच्या टीमची बॅटिंग होती आणि आता अखेरची ओव्हर होती. विसावी. त्यात शेवटचा बॉल अन् पलीकडच्या टीमच्या ९० धावा झाल्या होत्या. जिंकायला त्यांना चारच धावा पाहिजे होत्या. एक चौकार आणि सुदेशची टीम घरी.

अन्या बाॅलिंगला होता. समोर पद्या बॅट घेऊन. साऱ्या पोरांचे श्वास रोखलेले. अन्या अस्वस्थ. त्याने डोक्यावरची लाल टोपी वाकडी केली. बॉल सावरला आणि टाकला. पद्याने बॅट उचलली. ठाप्प! थेट सिक्सरच! पण नाही- बॉल जिथे पडणार होता त्याच्या पलीकडे सुदेश होता. नेमका तोच? पण तो पळाला होता, बॉलच्या दिशेने. बॉल जोरात खाली आला. पोरांचे तर डोळेच मोठे झालेले. आता सुदेश कॅच धरणार, पद्या आऊट आणि गल्लीमधून त्यांची टीमदेखील आऊट!

पण तो सुदेश होता. म्हणजे? माहितीये तुम्हाला. झालंच! त्याने झेल सोडला. बापरे! पोरं काय ओरडली त्यावेळी. वाट लागली होती. समोरची पोरं नाचत होती. नाचणारच ना. समोरच्या टीमच्या हातातली मॅच त्यांनी अश्शी ओढून नेली होती. सुदेशने एक कॅच सोडला होता आणि स्वतःची टीम हरवली होती. टीम नाराज होती. सुदेशवर तर जास्तच. बरोबरच होतं त्यांचं. तुम्हाला काय वाटतं?

सुदेशचा मूड पार गेला होता. त्याच्यामुळे टीम हरली म्हणून.

त्यांच्या टीममध्ये एक पोरगा होता. अरुण नावाचा. दुसऱ्यांना नावं ठेवायला एक नंबर. त्याने सुदेशला नाव ठेवलं मिस्टर झेलसोडे! आणि ते नाव इतकं फेमस झालं म्हणताय. त्यात पोरं आणखी वात्रट. कोणी त्याला मिस्टर झेलसोडे म्हणत, तर काही नुसतंच सोड्या म्हणत, तर काही पोरं त्याचं लघुरूप करायचे आणि त्याला मिस्टर झेसो असं म्हणायचे. आता तुम्हाला कळलं असेल, मिस्टर झेसो हा शब्द कसा आला ते? पण खरं तर असे मिस्टर झेसो सगळ्याच टीममध्ये असतात.

सुदेशला खूप वाईट वाटलं. नंतर टीमने त्याला खेळायला घेतलंच नाही. कित्ती वाईट! पण किती दिवस? …

त्या दिवशी रविवार होता. दुसऱ्या दिवसापासून शाळा सुरू. गरम होत होतं. घामघाम नुसता. तरी पोरं मजेत क्रिकेट खेळत होती. सुदेश तिकडे गेला; पण खेळायला नाही. फक्त बघायला.

त्याच्या डोक्यात एकच विचार होता. उद्या शाळा सुरू झाली की शाळेतले मित्र भेटतील. ते आपल्याला खेळायला घेतील. मग मैदानावर पुन्हा क्रिकेट. आपण कॅच धरण्याची प्रॅक्टिस करू या.

पोरांचा खेळ रंगात आला होता. अन्याने बॅट उचलली अन् तो अचानक ओरडला- भीतीने! त्याचं लक्ष एका वेगळ्याच गोष्टीकडे गेलं होतं.

हे सगळं काही क्षणात घडलं होतं. त्याने बॅट उचलली, त्याला काही दिसलं, तो घाबरला, घाबरून ओरडला, त्याला बॉल लागला, तरी त्याचं लक्ष बॉलकडे नव्हतंच. त्याने डोक्यावरची लाल टोपी वाकडी केली. पण त्याला दिसलं होतं तरी काय?

दुसऱ्या मजल्यावरच्या एका बाल्कनीमध्ये एक चिमुरडा होता. दोन-अडीच वर्षांचा. अंगात एक केशरी टी-शर्ट घातलेला. त्यावर एक जपानी कार्टूनचं चित्र. पोरांचं खेळणं-ओरडणं बघून तो बाल्कनीत आला होता. पोरांची गंमत पहायला. नीट दिसत नाही म्हणून तो स्टूलवर चढला होता. ते त्याच्या आईने तिथं चुकून ठेवलेलं. कपडे वाळत घालताना आतून आणलेलं. स्टूलच्या उंचीमुळे तो कठड्याच्याही वर झाला होता. स्वारी खुश होती. पोरांचा आरडाओरडा बघून त्याने टाळ्या वाजवल्या. त्यावेळी अन्याने त्याच्याकडे पाहिलं होतं. त्याला भीती वाटली होती.

आणि त्या मुलाचा तोल गेला. तो खाली पडला. बापरे! काय भयानक दृश्य होतं ते. काळजाचा ठोका चुकवणारं. ते पाहून अन्या ओरडला होता. सगळ्या पोरांचं लक्ष तिकडेच गेलं होतं. ते दृश्य पाहून ते भीतीने आ वासले होते.

सुदेशचं लक्ष बॅटिंग करणाऱ्या अन्याकडे होतं अन् त्याच्या नजरेकडे. अन्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, भीतीदायक झाले. तसं त्याने त्याच्या नजरेच्या दिशेने पाहिलं होतं. त्याच्या नजरेने तो पडणारा मुलगा टिपला. तो एक भारी फिल्डर होता…. त्याने पटकन एक जोरदार झेप टाकली. जणू काही ऋषभ पंतच आणि त्या पडणाऱ्या पोराला त्याने हवेतच धरलं.

पण त्या धक्क्याने तो खाली पडला. छोट्या त्याच्या अंगावर. पण नशीब काही झालं नव्हतं. थोडंसं लागलं होतं. ते तर खेळतानाही लागतं, तेवढं. भुरभुऱ्या केसांचा तो छोट्या आता मात्र रडू लागला होता. त्याचे गोरे गाल फुगले होते.

त्या पोराची आई वरून खाली पळतच आली. तिने पोराला छातीशी धरलं. ती रडत होती, पोराचे पापे घेत होती आणि सुदेशकडेही पहात होती. तो तर जणू देवदूतच ठरला होता.

तो त्या दिवशीचा हिरो होता. अख्ख्या गल्लीचा! त्याला कधी नीट कॅच धरता येत नसे. पण त्या दिवशी पठ्ठ्याने काय कॅच धरला होता. एक नंबर! खूप महत्त्वाचा कॅच. त्याने एक जीव वाचवला होता.

अरुणने त्याचं नाव त्यामुळे मिस्टर झेप ठेवलंय. त्याने झेप टाकून पोराला धरलं म्हणून नाही; तर झेप म्हणजे झेलपकडे! कसं वाटतंय आता? मिस्टर झेसोचं मिस्टर झेप हे नाव?

आणि तुम्हालाही हे नाव आवडलं असेलच. पण आवडलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण आता पोरांनी सुदेशला टीममध्ये परत घेतलंय खेळायला अन् तो त्यामध्येच खुश आहे. त्याचा आत्मविश्वास वाढलाय आता तो भारीच कॅच धरतो.

ज्येष्ठ साहित्यिक

Bip499@hotmail.com

मध्यपूर्वेतील तणाव वाढला; अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणचा बहरीन-कुवेतवर प्रतिहल्ला

भिवंडीत भीषण अग्नितांडव! मुंबई-नाशिक महामार्गावरील टायर व लाकडी पॅलेटच्या गोदामाला आग, Video

Mumbai : सात टक्के पाणी शिल्लक; धरणातील पाणीसाठा तळ गाठतोय; पावसाची ओढ कायम

रेशनकार्डवरील नावाद्वारे कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही! दिवाणी न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : 'जे. जे.'ची स्थिती पाहता पालिकेने सावध होण्याची गरज; पालिका विरोधी पक्षनेत्यांची सूचना