विचारपान
ॲड. जाई वैद्य
लिव्ह इन रिलेशनशिप हा गंभीरपणे विचारपूर्वक घेण्याचा निर्णय आहे हे तरुणाईपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. तुम्ही ज्या कुणाबरोबर राहाताय त्या व्यक्तीची लिव्ह इन विषयीची मानसिकता आणि विचार सारखे असावेत. पण ते काळानुसार बदलणार नाहीत याची खात्री कशी देता येईल. दोघांपैकी एकाचं आकर्षण संपलं आणि दुसऱ्याचं आकर्षण अधिक वाढलं, एकाचं मत लग्न करावं वा मूल होऊ द्यावं असं असेल आणि दुसऱ्याचं नसेल तरी खूप मानसिक ताण आणि समस्या निर्माण होऊ शकतात.यातून आत्महत्या वा खून झाल्याच्या घटनाही आहेत. साहचर्यातून उद्भवणाऱ्या समस्या जोडप्यातील फक्त एका व्यक्तीपुरत्या मर्यादित राहात नाहीत हे लक्षात घेणं गरजेचं असतं.
कायदा हे समाजात बदल घडवून आणण्याचे आणि नियंत्रणाचे प्रमुख साधन आहे. पण त्याचबरोबर कायदा कालानुरूप प्रवाही आणि अर्थपूर्ण राहाण्यासाठी समाजातील बदल टिपून त्यांना आपल्या आवाक्यात आणणे याबाबतीत कायद्याला सतत सजग राहावे लागते. समाजातील नवनवीन बदल नवीन कायदे करुन किंवा न्यायालयांच्या माध्यमातून कायद्याच्या वापराची, अर्थांची व्याप्ती वाढवून कायद्याच्या कक्षेत आणता येतात. सद्य लेखासही सर्वोच्च न्यायालयाचा असाच एक निर्णय कारणीभूत ठरला आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (स्वेच्छा साहचर्य) राहाणाऱ्या दांपत्यासही हुंडाबळीचे ४९८-अ कलम लागू होऊ शकते असा निर्णय आल्याने नव्याने चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहता हा निर्णय या विषयावरचा काही एकमेव किंवा पहिलाच निर्णय नाही. याहीअगोदर लिव्ह इन रिलेशनशिपविषयी असे न्यायालयीन निर्णय आलेले आहेत. विशेषत: घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ पारित झाल्यानंतर त्यातील 'पीडित महिला' या व्याख्येसोबत 'विवाहसदृश नाते' (रिलेशनशिप इन नेचर ऑफ मॅरेज), 'सामायिक घर' (शेअर्ड हाऊसहोल्ड) या व्याख्यादेखील एकत्रित आणि व्यापक अर्थाने वापरल्यामुळे त्यांत लिव्ह इन रिलेशनशिपचा देखील समावेश होत असल्याचे विविध न्यायालयीन निर्णयातून स्पष्ट केले गेले आहे. अशा विविध निर्णयांचा अभ्यास केला तर कायद्यातील तरतुदींतून ज्या अर्थाने लिव्ह इन रिलेशनशिप समजली जाते तो अर्थच बदलत चालला आहे असे वाटू लागले आहे.
एखादं घर एकत्रितपणे भाड्याने घेऊन राहाणारे सहकर्मी आणि स्वेच्छेने साहचर्याच्या अपेक्षेने एकत्र राहाणारी जोडपी यापैकी कशाला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणायचे हे ठरते ते त्यातील साहचर्याच्या अपेक्षेमुळे. लिव्ह इन म्हणजे केवळ एका घरात राहाणं आणि खर्च वाटून घेणं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर त्यात साहचर्याची अपेक्षा आहे, सामायिक आयुष्य जगणं, सुखदुःख वाटून घेणं आणि शारीरिक संबंधही अध्याहृत आहेत. कायदा लिव्ह इन रिलेशनशिपचा अर्थ लावण्याच्या भानगडीत पडेस्तोवर या संबंधांकडे मुक्त (काही प्रमाणात स्वैर) शारिरीक संबंध ठेवण्याची सोय आणि त्यामुळे भयंकर अनैतिक अशा अर्थाने पाहिले जात होते. हवं तेव्हा, हवं तितका काळ आणि नातं टिकेल तोवर एकत्रित राहायचं आणि नाही पटलं तर कोर्ट कचेरी कायदा वगैरे न करता चालू लागायचं इतका सोपा अर्थ असलेली ही नाती जसजशी समाजात सर्वमान्य होऊ लागली, त्यातील अनैतिकतेचा बाऊ जसजसा कमी झाला तसतसे कायद्याला लिव्ह इन रिलेशनशिचा 'कॉग्निझंन्स' घेणं अनिवार्य होऊ लागलं हे स्पष्ट आहे. आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या भानगडीत कायदा मधे आल्यामुळे या नात्यातली 'गंमतच' संपली असे तरुणाईचे मत झाले तर नवल नाही.
शेवटी तरुण मंडळी लिव्ह इनमध्ये राहाणं का निवडतात याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण असतं ते कायद्याच्या कचाट्यात न सापडता साहचर्याचा अनुभव घेणं. मग तात्कालिक प्रेमासाठी/शारिरीक मोहासाठी असो वा लग्न करण्यापूर्वी जोडीदार योग्य आहे की नाही हे तपासून पाहाण्यासाठी असो. मुख्य मुद्दा कायद्याच्या कचाट्यात न सापडणे हा होता. वैवाहिक जीवनाचा आनंद तर मिळवायचा पण वैवाहिक जीवनाच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि कर्तव्यपालनातून सुटका करून घ्यायची असं मज्जानू लाईफ अशा अर्थाने लिव्ह इन रिलेशनशिपकडे आता पाहाता येणार नाही हे आता स्पष्ट होत आहे. स्वेच्छेच्या साहचर्य नात्यातील फसवणूक, छळ, भरणपोषणाची जबाबदारी आणि कर्तव्य आता कायद्याच्या कक्षेत येऊ शकतात हे विविध न्यायालयीन निर्णयातून अधिकाधिक ठोसपणे स्पष्ट होत आहे.
सामाजिक स्वास्थ्याच्या अनुषंगाने पाहता हे स्वेच्छा साहचर्य नातेसंबंध कायद्याने नियंत्रित करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य आणि स्वैर आचरण (निव्वळ शारीरिक संबंध या अर्थी मर्यादित नाही तर मनाला येईल तसे वागणे या अर्थी हा शब्दप्रयोग इथे वापरला आहे) यात फरक असतो तो आपल्या कृती आणि निर्णयांची जबाबदारी घेणं आणि त्यांचे भले बुरे परिणाम स्विकारणं याचा. एकीकडे 'सज्ञान' 'प्रौढ' झाल्यामुळे स्वेच्छा साहचर्याचा निर्णय घेण्याचा अधिकार बजावायचा पण त्याच्या परिणामांची जबाबदारी नाकारायची हे प्रौढत्वाचे वा सज्ञानतेचे लक्षण नाही. कायदा स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार मानत असला तरी त्या स्वातंत्र्याच्या परिणामांची जबाबदारी घेणं हे मूलभूत कर्तव्यही मानतो. स्वैर आचरण कायद्यास मान्य नाही.
थोडक्यात काय तर लिव्ह इन रिलेशनशिप हा गंभीरपणे विचारपूर्वक घेण्याचा निर्णय आहे हे तरुणाईपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. तुम्ही ज्या कुणाबरोबर राहाताय त्या व्यक्तीची लिव्ह इन विषयीची मानसिकता आणि विचार सारखे असावेत. पण ते काळानुसार बदलणार नाहीत याची खात्री कशी देता येईल. दोघांपैकी एकाचं आकर्षण संपलं आणि दुसऱ्याचं आकर्षण अधिक वाढलं, एकाचं मत लग्न करावं वा मूल होऊ द्यावं असं असेल आणि दुसऱ्याचं नसेल तरी खूप मानसिक ताण आणि समस्या निर्माण होऊ शकतात.यातून आत्महत्या वा खून झाल्याच्या घटनाही आहेत. साहचर्यातून उद्भवणाऱ्या समस्या जोडप्यातील फक्त एका व्यक्तीपुरत्या मर्यादित राहात नाहीत हे लक्षात घेणं गरजेचं असतं. मानसशास्त्राच्याही दृष्टीने एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या व्यक्तींच्या साहचर्यातून त्याबद्दल विवाह, प्रेम, आपुलकी याविषयी असंवेदनशीलता देखील वाढीस लागू शकते. अशा अनेक कारणांमुळे वाटतं तेवढं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहाणं सोपं नाही. एखादा लिव्ह इन रिलेशनशिप करार करुन मग एकत्र राहाणं हा त्यावर उपाय होऊ शकतो का तर हा काही रामबाण (फुलप्रूफ) किंवा सर्वार्थाने प्रभावी उपाय म्हणता येणार नाही. खरं सांगायचं तर मानवी भावना आणि कौटुंबिक नाती याबाबतीत एका ठराविक मर्यादेपलीकडे कुठलाही कायदा अक्षरशः हतबल वा प्रभावहीन ठरतो. त्यामुळे आपला संवैधानिक स्वातंत्र्य आणि स्वयंनिर्णयाचा मूलभूत अधिकार तारतम्याने वापरणे योग्य. तस्मात्....शहाणे भव ! हे खरे.
लेखिका या नामांकित विधिज्ञ आहेत