(Photo-@i4utravels)
अक्षररंग

नर्मदेच्या तीरावरचे महेश्वर

नर्मदेच्या पवित्र तीरावर वसलेले महेश्वर हे इतिहास, अध्यात्म आणि शांततेचा सुंदर संगम आहे. इथले घाट, मंदिरे आणि सात्विक वातावरण मनाला आत्मशोधाच्या प्रवासाला घेऊन जातात आणि निसर्गाशी संवाद साधण्याची संधी देतात.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

नर्मदेच्या पवित्र तीरावर वसलेले महेश्वर हे इतिहास, अध्यात्म आणि शांततेचा सुंदर संगम आहे. इथले घाट, मंदिरे आणि सात्विक वातावरण मनाला आत्मशोधाच्या प्रवासाला घेऊन जातात आणि निसर्गाशी संवाद साधण्याची संधी देतात.

महेश्वरला पर्यटक येतात ते जास्तीकरून एक दिवसासाठी. तिथे चार-पाच तास रेंगाळून पुन्हा इंदूरकडे प्रयाण करतात. पण महेश्वर हे अनुभूती घेण्याचे स्थळ आहे. दोनचार दिवस राहून तिथल्या सात्विक वातावरणात गढून जावे. इथला सकाळ-संध्याकाळचा प्रहर तर आपल्याला स्वतःशी संवाद साधायला लावतो. आत्मशोध घ्यायला लावतो. आणि विशेष म्हणजे, कितीही गजबज असली तरी समोर शांत संथ वाहणारी नर्मदामैया दिसली की, मनावर शांततेचे राज्य पसरू लागते.

महेश्वर म्हणजे पूर्वीचे माहिष्मती. वेद, पुराण, उपनिषदात महेश्वरचे वर्णन आलेले आहे. हैहयवंशी राजा सहस्रार्जुन यांची महेश्वर राजधानी होती. फार पूर्वीपासून इथे अनेक राजसत्ता होऊन गेल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीही आपली राजधानी याच महेश्वरमध्ये वसवली. महेश्वर म्हणजे जिथे भगवान शिवाचा महादेवाचा वास आहे आणि खरच तिथे असंख्य शिवालय आहेत. म्हणून या ठिकाणाला गुप्तकाशी म्हणूनही ओळखतात अशी माहिती मिळाली. अशी ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक, धार्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या महेश्वरमध्ये थांबून कोणती कोणती ठिकाणे बघायची ते तुम्हाला सांगते.

महेश्वर किल्ला- नर्मदेच्या महेश्वर घाटावर शिल्पकला ठसवत, सुंदर सज्जे दर्शवत उभा असलेला हा महेश्वर किल्ला- अहिल्या किल्ला म्हणूनही ओळखला जातो. साधारण २० पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याचे भलेमोठे प्रवेशद्वार दिसते. तिथून आत गेल्यावर तर किल्ल्याचे मोठाले प्रांगण पाहून भूरळ पडते. प्रवेशद्वाराच्या एका बाजूला कृष्णाच्या विविध छटा शिल्पांतून दाखवणारा कृष्णपाठ साकारला आहे. एका बाजूला सुंदर महिरपी असणारा सज्जा आहे. तिथून नर्मदामैयाचे सुंदर दर्शन घडते.

अहिल्येश्वर मंदिर- किल्ल्याच्या प्रांगणातून काही पायऱ्या चढल्यावर एक भलेमोठे, उंचेपुरे मंदिर दिमाखात उभे असलेले दिसते. अहिल्याबाईंच्या सुनेने म्हणजेच कृष्णाबाई यांनी हे मंदिर अहिल्याबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधले असे म्हणतात. मंदिराचे शिखर, त्याची भव्यता तसेच मंदिरामधील खांबांवर असणारी शिल्पकला मोहवून टाकते. मंदिराच्या ओट्यावर तर रांगोळी, मेहेंदी, वास्तुशास्त्र यांतील चिन्हांची कलाकुसर एका चौकटीत शिल्पांमधून दाखवली आहे. इथल्या प्रवेशद्वारावर असणारे गणपती बाप्पा तर आवर्जून पहावेत.

विठोजी होळकर छत्री- अहिल्येश्वर मंदिराच्या समोर विठोजी होळकर यांची छत्री आहे. तुकोजीराव होळकर यांचे पुत्र विठोजी होळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही छत्री बांधण्यात आली. या छत्रीवर चारी बाजूने साकारलेली हत्तींची शिल्पे म्हणजेच गजपट्टी बघण्यासारखी आहे. अगदी बारीक कलाकुसर, सुरेख झरोखे, सज्जे तिथे आहेत. षटकोनी आकारात साकारलेली, शिल्पमंडीत असणारी ही विठोजी होळकर यांची छत्री आल्या आल्या नजरेत भरते.

अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा- राजवाडा म्हटले की एक दिमाखदार दृश्य दिसते पण अहिल्याबाईंचा राजवाडा त्यांच्याप्रमाणेच शालीन, साधा आणि न्यायप्रिय आहे याची जाणीव राजवाडा बघताना होते. तीन बाजूने लाकडी खांबांचा व्हरांडा आणि मध्ये मोठा चौक आहे. तिथे तुळशीवृंदावन आणि कारंजा आहे. या व्हरांड्यातच सभा भरायची. पांढऱ्याशुभ्र गादीवर बसून अहिल्याबाई कामकाज करायच्या. तिथे ही गादी, अहिल्याबाईंची मूर्ती आणि होळकर साम्राज्याचे राजचिन्ह आहे. तिथले संग्रहालय जरूर बघा. होळकर घराण्याची साम्राज्याची माहिती तिथे दिली जाते शिवाय शस्त्रसंग्रह पाहता येतो. राजवाड्याच्या बाजूला त्यांचे देवघरही आहे. २० किलो सोन्याचा पाळणा, टाक पाहून थक्क व्हायला होते. अहिल्याबाईंनी सुरू केलेले कोटीलिंगार्चन अजूनही तिथे सुरू आहे.

रेवा सोसायटी- महेश्वर प्रसिद्ध आहे महेश्वरी साड्यांसाठी. अहिल्याबाई होळकरांनी भारतातल्या विविध भागातून विणकरांना बोलावून महेश्वरी साड्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले. रेवा सोसायटीमध्ये अजूनही महेश्वरी साड्यांची निर्मिती, विक्री सुरू आहे. कित्येक विणकर इथे काम करतात. सदैव हातमागाचा आवाज कानावर पडत असतो.

या साड्यांमध्येही अहिल्याबाईंची शालीन छबी प्रतीत झालेली जाणवली. किल्ल्यावर जी कलाकुसर आहे, नक्षीकाम आहे तेच नक्षीकाम साड्यांवर धाग्यांमधून साकारले आहे. चटई, फुले, नर्मदेच्या लाटा साडीच्या काठावर साकारल्या आहेत. किल्ल्यामध्येच ही रेवा सोसायटी आहे.

सहस्रार्जुन मंदिर आणि काशीविश्वनाथ मंदिर - महेश्वर हे मंदिरांसाठी ख्यातनाम आहे. राजवाडा बघून झाला की तिथून दोन मिनिटे अंतरावर ही मंदिरे आहेत. रावणाला चीतपट करून बंदी करून ठेवणाऱ्या सहस्रार्जुन या राजाधिराजांचे मंदिर तिथे आहे. तिथे ११ अखंड दीप कित्येक वर्षे तेवत आहेत. या मंदिराला राजराजेश्वर मंदिर म्हणून ओळखतात. कार्तवीर्य अर्जुन राजाने प्रभू दत्तात्रेयांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले. दत्तात्रेयांनी कार्तवीर्य अर्जुनाला सहस्रबाहूवर म्हणून दिले. आपल्या शौर्याने त्यांनी समस्त पृथ्वीवर राज्य केले. राजांमध्ये ईश्वरीय स्थान त्यांना मिळाले. म्हणून त्यांना राजराजेश्वर सहस्रार्जुन या उपाधीने ओळखले जाते. माहिष्मतीची निर्मिती सहस्रार्जुन राजांनी केली अशी माहिती मिळाली. त्यामुळे महेश्वरला आलात तर हे मंदिर बिलकुल चुकवू नका.

तिथून जवळच काशीविश्वनाथ मंदिर आहे. भलीमोठी शिवपिंडी तिथे आहे. अहिल्याबाईंनी या मंदिराची निर्मिती केली म्हणतात. इथून नर्मदामैयाचे खूप सुंदर दर्शन घडते. दर्शन घेत भगवान महादेवांची आराधना करणं ही सुंदर अनुभूती आहे.

महेश्वरचे घाट आणि नर्मदा आरती- नर्मदेच्या तीरावर दगडात खणखणीत बांधलेले हे महेश्वरचे घाट. इथून सूर्योदय-सूर्यास्त अप्रतिम दिसतो. या प्रहरी या घाटांवरून फेरफटका मारायचा, तिथल्या पायऱ्यांवर बसायचं आणि सोनेरी प्रकाशात तेजस्वी दिसणारी नर्मदामैया बघायची. हे रूप पाहताना अगदी गहिवरून येते. इथे महेश्वर घाट (अहिल्या घाट), मातंगेश्वर घाट, फणसे घाट असे अजून बरेच घाट आहेत. अहिल्याबाईंचे दहनस्थळही याच घाटावर आहे. अनेक राजघराण्यांतील सन्माननीय सदस्यांच्या छत्री तिथे आहेत. प्रत्येक घाटावर जागोजागी शिवलिंग आहेत.

संध्याकाळी साधारण ७.४५ ला घाटावर नर्मदामैयाची आरती होते. ही आरती बघणे बिलकुल चुकवू नका. नर्मदाअष्टकम आणि नर्मदादेवीच्या आरतीने घाट दुमदुमत असतो. नर्मदामैयाची पूजा, धुपारती, पंचारती, फुलांची उधळण पाहताना आपसुक तिथले भक्तिमय सात्विक वातावरण हवेहवेसे वाटते.

महेश्वरमध्ये अजून बरीच मंदिरे आहेत. नदीच्यामध्ये असलेले बाणेश्वर मंदिर, जालेश्वर, कालेश्वर मंदिर आवर्जून बघा. महेश्वरपासून सात किमीवर असणारे सहस्रधारा स्थळ तर नक्की बघा. असंख्य दगडांवरून झोकून देत नर्मदेचा प्रवाह रौद्र रूपात वाहताना दिसतो. इथे रिक्षाने जाता येते, शिवाय बोटीनेही जाता येते. तिथले एकमुखी दत्तमंदिरही प्रसिद्ध आहे. सूर्यास्तावेळी बोटीतून एक छान सैर करून या.

म्हणून म्हणते इतकी सारी अद्भूत,पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली स्थळे महेश्वरमध्ये आहेत. एका दिवसात बघून जावे असे हे स्थळ नाहीच. चार दिवस रहावे आणि इथल्या वातावरणात गढून जावे असे हे ठिकाण आहे. मी स्वतः तीन दिवसांचा मुक्काम ठरवला होता पण ६ दिवस तिथेच राहिले. काही ठिकाणे अशी असतात जिथून पाय निघत नाही, तसेच हे महेश्वर आहे.

  • पुणे बाय रोड - ५२५ किमी

  • मुंबई बाय रोड - अंदाजे ५३५ किमी

  • इंदाैरकडे जाणारी ट्रॅव्हल्स निवडायची. तिथून धामनोदमध्ये उतरायचे. बस किंवा रिक्षाने पाऊण तासात महेश्वरमध्ये पोहोचता येते. शिवाय इंदाैर-ओंकारेश्वरवरून डायरेक्ट बसेसही महेश्वरसाठी आहेत.

  • जवळचा एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन- इंदाैर

  • भेट देण्यासाठी उत्तम काळ- ऑक्टोबर ते मार्चचा मध्य.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

Mumbai : कचरा टाकणाऱ्या ठिकाणी CCTVची नजर; बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे सक्त निर्देश

राज्यात १२ नवीन डायलिसिस केंद्रे; किडनी रुग्णांना दिलासा

केंद्रीय शाळांसाठी मोफत सरकारी जागा; राज्य सरकारचा निर्णय

AIचा वापर आणि रोजगार... दोन्हीही वाढणार; राज्याचे कृत्रिम बुद्धिमता धोरण जाहीर, ५ वर्षात १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगाराचे ध्येय

ठाकरे गटाची दानवेंना उमेदवारी, काँग्रेस संतप्त; विधानपरिषद निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे