दिवाळी अंक २०२६ : दिवाळी अंकांची गंगाजळी 
अक्षररंग

दिवाळी अंक २०२६ : दिवाळी अंकांची गंगाजळी

भारतीय पातळीवर पहिला दिवाळी अंक म्हणजे १९०९ साली प्रकाशित झालेला का. र. मित्र संपादित ‘मासिक मनोरंजन’ हा अंक मानला जातो. तेव्हापासून आजतागायत अव्याहतपणे दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत. त्यातील स्थित्यंतरे टिपणे हे एका व्यक्तीने आणि एका लेखात करणे अशक्यप्राय आहे. मात्र, त्याचा विचार करता काही कण आणि क्षण सापडले, ते म्हणजेच हा लेख.

नवशक्ती Web Desk

रवीप्रकाश किरण

भारतीय पातळीवर पहिला दिवाळी अंक म्हणजे १९०९ साली प्रकाशित झालेला का. र. मित्र संपादित ‘मासिक मनोरंजन’ हा अंक मानला जातो. तेव्हापासून आजतागायत अव्याहतपणे दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत. त्यातील स्थित्यंतरे टिपणे हे एका व्यक्तीने आणि एका लेखात करणे अशक्यप्राय आहे. मात्र, त्याचा विचार करता काही कण आणि क्षण सापडले, ते म्हणजेच हा लेख.

एखाद्या विस्तीर्ण नदीचे पात्र पाहिल्यानंतर तिचा उगम कुठून झाला असेल, असा प्रश्न पडू नये, तशीच आज आपल्याकडे दिवाळीच्या निमित्ताने जे काही बरे-वाईट दिवाळी अंक प्रकाशित होतात, ते पाहून ही भावना मनात येते. एवढी प्रदीर्घ परंपरा असलेली ही प्रथा भारतीय पातळीवरची एकमेव अशी आहे. याचे निर्विवाद श्रेय दिवाळी अंक ही कल्पना रुजवणारे ‘मासिक मनोरंजन’चे सर्वेसर्वा काशिनाथ रघुनाथ मित्र यांच्याकडे जाते. ‘मित्र’ या आडनावामुळे दिवाळी अंकाची शताब्दी साजरी होत असतानाही भल्याभल्यांचा गैरसमज झाला. त्यातील एक गैरसमज म्हणजे हे मित्र बंगाली होते. पण त्यांचे मूळ नाव काशिनाथ रघुनाथ आजगावकर (१८७१-१९२०) असे होते. बंगाली भाषेवरील प्रेमापोटी त्यांनी ‘मित्र’ हे आडनाव धारण केले होते.

दुसरा गैरसमज म्हणजे त्यांनी ‘मासिक मनोरंजन’च्या दिवाळी अंकाची प्रेरणा बंगालमधील दुर्गापूजा उत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या दुर्गापूजा विशेषांकांवरून घेतली होती! पण तसे नसून, ही संकल्पना त्यांना अमेरिकेतील नाताळ विशेषांकांवरून सुचली होती.

अशा चुकीच्या कल्पना कोणाच्या डोक्यातून निघाल्या, हे सांगणे कठीण आहे. पण त्याला द. भि. कुलकर्णी यांच्यासारखा जाणता माणूसदेखील फशी पडला, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे माझी त्यांच्याशी वादावादी झाली होती.

त्याबाबतचा मुद्दा असा होता की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केल्यानंतर त्यातून प्रेरणा घेऊन बंगाली लोकांनी सार्वजनिक दुर्गापूजा सुरू केली आणि त्यानंतर दुर्गापूजा विशेषांक सुरू झाले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केला, त्याच दरम्यान का. र. मित्र यांनी ‘मासिक मनोरंजन’ सुरू केले (१८९५) आणि १९०९ साली नाताळ विशेषांकांवरून प्रेरणा घेऊन दिवाळी अंक सुरू केला होता. याचाच अर्थ मराठी दिवाळी अंकाचा आणि दुर्गापूजा विशेषांकाचा काहीही संबंध नाही, हे स्पष्ट आहे. पण आमच्याच लोकांना हे माहीत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा तीच चुकीची माहिती सांगितली जाते. त्याला काय करावे?

तेव्हा दिवाळी अंकाचे जनक का. र. मित्रच आहेत. त्यांचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. विशेष म्हणजे त्यावेळी ‘मासिक मनोरंजन’ प्रस्थापित झालेले होते. पण वाचकांना सतत नवीन नवीन गोष्टी द्यायच्या, या ध्यासातून मित्र यांनी दिवाळी अंकाची कल्पना प्रत्यक्षात आणली. अखेरच्या श्वासापर्यंत तो त्यांचा ध्यास होता. पहिला दिवाळी अंक हा व्यक्तिचित्र विशेषांक होता. एक रुपया किंमत असलेला हा अंक ‘मासिक मनोरंजन’च्या वार्षिक वर्गणीदारांना विनामूल्य उपलब्ध करून दिला गेला होता.

मित्र यांची दिवाळी अंकाच्या बाबतीतली दृष्टी इतकी दूरगामी होती की, आजही थोडाफार फरक सोडता त्यांनी घालून दिलेल्या घडीपलीकडे आजचा अंकदेखील गेलेला नाही! अगदी कॅसेटवरचे, व्हिडीओवरचे आणि आता तर ‘एआय’ युगातील दिवाळी अंक येत आहेत, तरीसुद्धा! दिवाळीत पहिली पणती आपल्या पूर्वसुरींच्या स्मरणार्थ लावतो. त्यावेळी दिवाळी अंकाच्या जनकाची, म्हणजे का. र. मित्र यांची आठवण समस्त मराठी वाचनप्रेमींनी ठेवायची ती त्यासाठीच.

दिवाळी अंकाची कल्पना इतकी अभिनव होती की, तिचे स्वागत जरूर झाले. मात्र, तिचे अनुकरण करणारे फारच थोडे, किंबहुना जवळजवळ नाहीतच. कारण हे करणे सोपे नव्हते. मात्र, हे देखील तितकेच खरे की, पहिले महायुद्ध झाले, दुसरे महायुद्ध झाले. अवर्षण आणि दुष्काळ हा तर आमच्या पाचवीलाच जणू पुजलेला. अशा कुठल्याही संकटाचा दिवाळी अंकांच्या प्रकाशनावर फारसा परिणाम झाला नाही.

जणू कुळाचार असावा, या दृष्टीने दिवाळी अंक प्रकाशित होत राहिले. अगदी पुढील काळात कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतही आपल्याकडे दिवाळी अंक प्रकाशित झाले, म्हणजे पाहा! सुरुवातीच्या काळात ‘यशवंत’, ‘रत्नाकर’, ‘प्रतिभा’, ‘वागेश्वरी’, त्यानंतर ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’, ‘स्त्री’, ‘मौज’, ‘वसंत’ असे एकेक दिवाळी अंक येत गेले. त्यातून दिवाळी अंकांचा एक स्वतंत्र वाचकवर्ग तयार झाला. या मांदियाळीत स्वतंत्रपणे आपले दिवाळी अंक म्हणून अस्तित्व प्रकर्षाने जाणवून दिले ते ‘दीपावली’ वार्षिकाने! संपादक होते रॉय किणीकर आणि दीनानाथ दलाल. किणीकरांकडे साहित्यिक बाजू होती आणि दलाल यांनी सजावटीची सर्व बाजू सांभाळली. विशेष म्हणजे या अंकात दलाल यांची स्वतंत्र, नयनरम्य रंगीत चित्रे होती. त्यांची वाचकांना इतकी भुरळ पडली की, लोकांनी ती स्वतंत्रपणे जपून ठेवली.

दलाल यांची ही जादू पाहून लगेचच रघुवीर मुळगावकर यांनीदेखील ‘रत्नदीप’ आणि पुढे ‘रत्नप्रभा’ नावाचे दिवाळी अंक काढले. त्यांची धाटणी मात्र ‘दीपावली’ डोळ्यांसमोर ठेवूनच होती. पुढे दलाल यांनी ‘दीपावली’ मासिक चालवले. मात्र, दलाल यांच्यानंतर मासिक बंद पडले. पण विशेष म्हणजे जयवंत दळवी यांच्या प्रेरणेने केशवराव कोठावळे यांनी ‘दीपावली’ दिवाळी अंकाची धुरा सांभाळली आणि आजतागायत तो सुरू आहे.

‘दीपावली’ नावाच्या दिवाळी अंकाची कल्पना मांडणारे संपादक रॉय किणीकर हे जातिवंत संपादक होते. त्यांनी वेळोवेळी ‘धरती’सारख्या दिवाळी अंकाचे संपादन केले. त्यांच्या कर्तृत्वाचा स्वतंत्र अध्याय सांगावा लागेल. पण अंक काढण्याची त्यांची कसोशी किती असावी? त्यांचे अखेरचे दिवस होते. मृत्यू जणू दारात उभा राहिलेला. पण त्यांनी इच्छा काय व्यक्त करावी? ‘त्या परमेश्वराने अजून एक वर्ष द्यावे!’ त्यांचा मुलगा म्हणाला, ‘आता कशाला?’ तेव्हा किणीकर म्हणाले, ‘मुलांसाठी एक दिवाळी अंक संपादित करावासा वाटतोय.’

जातिवंत संपादक यालाच म्हणतात!

या दिवाळी अंकांची महती किती सांगावी तेवढी कमीच. एक हकीकत थोडक्यात सांगतो. दिवाळी अंक वेळेत काढायचा म्हणजे लगीनघाई. शेवटच्या घटकेपर्यंत लेखकांचे साहित्य येते की नाही याची चिंता. अशीच परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा अंकाशी संबंधित व्यक्ती आपल्याकडे काम करणाऱ्या एका चुणचुणीत तरुणाला म्हणाली, ‘एरव्ही तू छान गप्पा मारतोस. आता तेच उतरवून काढ. म्हणजे दिवाळीसाठी सोडलेली पहिली पाने भरून निघतील.’

हे नाट्य रंगवत बसत नाही; पण त्या लेखकाने कागदावर काळे-पांढरे केले. अंक वेळेत पूर्ण झाला. आयत्यावेळी लिहिलेल्या त्या तरुणाच्या लेखनाचे खूपच कौतुक झाले आणि पुढे तो खूप मोठा लेखक झाला. कोण तो लेखक? विजय तेंडुलकर! एका दिवाळी अंकाने एका लेखकाचा जन्म झाला. अशा कितीतरी हकिकती दिवाळी अंकांच्या इतिहासात लपून राहिलेल्या आहेत. प्रत्येकाची तऱ्हा वेगवेगळी. आपल्या पु. ल. देशपांडे यांनी तर म्हटले आहे की, मौज, शिरीष, साधना, सुगंध, किर्लोस्कर या अंकांतून एकेक वीट घेऊन ही ‘बटाट्याची चाळ’ बांधून झाली.

मराठी साहित्याची सुंदर उभारणी करण्यात वेगवेगळ्या दिवाळी अंकांतील वेगवेगळ्या लेखकांच्या साहित्याचा हातभार नव्हे, तर लेखनाधार कारणीभूत झालेला आहे.

‘धनुर्धारी’ दिवाळी अंकाचे मोठे आकर्षण होते ते वसंत लाडोबा महापरकर यांचे भविष्य! त्याचीच परिणती म्हणजे पुढे अनेक दिवाळी अंकांत भविष्य देण्याची प्रथा सुरू झाली. काही नामवंत ज्योतिषी त्यात लिहू लागले, तर काही ज्योतिषी दिवाळी अंकांमुळे प्रसिद्ध झाले. त्याचे सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे जयंत साळगावकर. आधी त्यांचा ‘शब्दरंजन’ दिवाळी अंक होता. मग ‘कालनिर्णय’ सुरू झाले, जे आजही नव्या पिढीने उत्तमरीत्या चालू ठेवले आहे. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे मग संपूर्ण दिवाळी अंक ज्योतिष या विषयाला वाहिलेले प्रकाशित होऊ लागले. ‘ग्रहांकित’, ‘ग्रहसंकेत’ आदी अंक त्याची उदाहरणे आहेत.

तोच प्रकार आरोग्याच्या बाबतीतही झाला. दिवाळी अंकांत आरोग्यविषयक लेख येत होते. पण संपूर्ण अंक या विषयाला वाहिलेला पहिला दिवाळी अंक म्हणजे ‘शतायुषी’. आता तर ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’, ‘घरचा वैद्य’, ‘डायबेटिक मित्र’ असेही अंक निघतात.

महिलाविषयक अंकांमध्ये ‘माहेर’, ‘मिळून साऱ्याजणी’ यांचा समावेश होतो.

अलीकडे गडकिल्ले, ट्रेकिंग या विषयांवरही अंक निघू लागले आहेत. त्यामध्ये ‘किल्ला’, ‘दुर्ग’ असे अंक आहेत.

दिवाळी अंकाची सर्व मदार लेखकावरच असते, हे वेगळे सांगायला नको. पण वेगवेगळ्या लेखकांकडून लेखन मिळवून दिवाळी अंक काढणे हे मोठे जिकिरीचे काम असते. या व्यापतापाला वैतागून संपादक शंकरराव कुलकर्णी एका लेखकाला म्हणाले की, ‘असा कोणी हरीचा लाल आहे का, जो संपूर्ण अंक मला लिहून देईल?’ तेव्हा त्यांच्यासमोर बसलेला लेखक म्हणाला, ‘तो हरीचा लाल तुमच्यासमोर बसलेला आहे.’ त्याप्रमाणे त्या लेखकाने विविध प्रकारचे लेखन करून तो सगळा मालमसाला शंकररावांपुढे ठेवला देखील! आता या अंकाचे नाव काय ठेवायचे, असा प्रश्न आला. शंकररावांनी त्या लेखकाच्याच नावाने नामकरण करून टाकले - ‘बुवा’! एकाच लेखकाच्या वेगवेगळ्या साहित्याने नटलेला हा पहिला दिवाळी अंक आणि अर्थातच लेखक होते वि. आ. बुवा.

हीच प्रथा पुढे शंकररावांनी चंद्रकांत काकोडकर यांच्या बाबतीत सुरू ठेवली. या दिवाळी अंकाचे नाव ठेवले ‘चंद्रकांत’. या अंकात एकट्या चंद्रकांत काकोडकर यांच्या चार-पाच कादंबऱ्या असतात!

याचेच अनुकरण पुढे श्रीकांत सिनकर (अंकाचे नाव ‘श्रीकांत’), चंद्रकांत काकोडकर (अंकाचे नाव ‘काकोडकर’), नन्ना आचार्य (अंकाचे नाव ‘नन्ना’) अशा कितीतरी लेखकांच्या बाबतीत झाले. किती हकिकती सांगाव्या! महाग्रंथ व्हावा इतक्या त्या आठवणी आहेत. (प्रकाशक हवा आहे!...) असो.

हे सांगताना आठवते, एक वर्षी बहुधा विजय तेंडुलकरांनी एक जाहिरात लिहिली होती. त्यात म्हटले होते - दिवाळी अंक सुमारे ३०० निघतात (ही संख्या वक्तिगणिक बदलू शकते...). त्यात काही वाचनीय असतात. काही मननीय असतात. काही प्रेक्षणीय असतात. काही नुसतेच असतात आणि काही असून नसल्यासारखे असतात.

हे दिवाळी अंकांच्या बाबतीत कायमस्वरूपी वाक्य ठरावे...

गोविंदाग्रजांचे बोल आहेत -

जे जे ज्या समयी मनात भरले
स्वच्छंद नाना स्थळी
ते ते त्या समयी जपून धरता
ही होत गंगाजळी

दिवाळी अंकांच्या बाबतीत माझीही हीच भावना आहे. अगदी काल, आज आणि उद्याही! खरे दिवाळी अंकांचे वाचक माझ्याशी सहमत होतील...

सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा! त्यांना दिवाळी अंकांचा वाचनानंद लाभो. नव्हे, लाभेलच!

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित