अक्षररंग

चांगुलपणाचे स्त्रोत

अंधार कमी करण्याचा एकच सोपा मार्ग आहे या जगात. तो म्हणजे मनातल्या छोट्या छोट्या उजेडांना ओळखणं. आपल्या आजूबाजूला किती चैतन्याचं चांदणं दडलेलं असतं! पण आपण मोठे होतो तसं, त्या चमकणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहणं कमी करतो.. म्हणूनच आपण खूप काही गमावतो.

नवशक्ती Web Desk

आनंदाचे झाड

युवराज माने

अंधार कमी करण्याचा एकच सोपा मार्ग आहे या जगात. तो म्हणजे मनातल्या छोट्या छोट्या उजेडांना ओळखणं. आपल्या आजूबाजूला किती चैतन्याचं चांदणं दडलेलं असतं! पण आपण मोठे होतो तसं, त्या चमकणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहणं कमी करतो.. म्हणूनच आपण खूप काही गमावतो.

आज शाळेत आल्यानंतर मला एक खूप सुंदर प्रसंग दिसला. सातवीतली आमची पायल पहिलीतल्या एका छोट्या लेकराच्या पायातील बुटाची लेस बांधत होती. तो छोटू खूप वेळ तगमगत होता, पण लेस बांधता येत नव्हती. ते पाहून पायल शांतपणे त्याच्याकडे गेली आणि तिने प्रेमाने लेस बांधून दिली.

क्षणभर मी तिथेच थबकलो.

किती गोड असतात ही लेकरं! त्यांच्यात चांगुलपणा अगदी ओसंडून वाहत असतो.

शाळेतल्या दिवसाचा आनंद सोहळा सुरू झाला तेव्हा मी तो प्रसंग मुलांसमोर ठेवला. सर्वांनी टाळ्या वाजवत पायलचं कौतुक केलं. मग माझ्या मनातलं जुनंच कुतूहल जागं झालं- “लेकरांच्या डोक्यात आता ‘चांगुलपणा म्हणजे काय?’ हा प्रश्न सुरू असेल का?”

मी विचारलं, “आपल्या पायलच्या चांगुलपणासारखा अजून कुठे कुठे चांगुलपणा दिसतो तुम्हाला? सांगा बरं!” आणि मग जणू काही घंटा वाजली. लगेच छोटे मेंदू कामाला लागले. तापलेल्या तव्यावर फुटणाऱ्या चण्यांसारखी उत्तरं फुटू लागली. आयेशा हात वर करून म्हणाली, “गुरुजी, आमची गाय खूप गोड आहे. छान दूध देते. कोणालाही दूध काढू देते. सगळे म्हणतात, ही गाय फार शांत! मला तर तिच्यात खूप चांगुलपणा दिसतो.”

नम्रता म्हणाली, “आमचा मामा खूप छान कपडे शिवतो. त्याच्याकडे खूप लोक येतात. तो कधीच कोणाला नाही म्हणत नाही.”

चतुर तर उत्साहाने उभी राहिली आणि म्हणाली, “आमच्या जांबाच्या झाडाला खूप जांब लागलेत. रोज खूप पक्षी येतात. आम्हालाही ते झाड जांब देतं. मला खूप आवडतं ते झाड!”

खुशी उठली आणि म्हणाली, “गुरुजी, माझी आजी कोणतीही भाजी अशी बनवते ना…सुगंधच पसरतो! सगळ्यांना तिचं जेवण आवडतं. माझी आजी खूप चांगली.”

सचिन शांतपणे म्हणाला, “माझी आई रांगोळी, मेहंदी खूप छान काढते. कुठं कार्यक्रम असला की सगळे तिलाच बोलवतात.”

अंजूला तिच्या वडिलांचं कौतुक सांगायचंच होतं, “माझे बाबा छान शेती करतात. झाडं लावायला त्यांना खूप आवडतं. ते म्हणतात- ‘झाड लावणं म्हणजे पुण्य.’ हाही चांगुलपणाच ना.”

कोमलने मृदू हसत सांगितलं, “माझे आजोबा गावात सगळ्यांना मदत करतात. कोणाचं काही अडलं, तर तेच पुढे धावतात. मला ते पाहून फार भारी वाटतं, गुरुजी!”

मनीषा म्हणाली, “माझ्या ताईंमध्ये किती तरी चांगले गुण आहेत. तिला गाणं, नृत्य, रांगोळी, मेहंदी, चित्र… सगळं येतं! मलाही तसंच व्हायचं आहे.”

स्वाती म्हणाली, “माझा दादा तर भारी! कबड्डी, खो-खो, पोहणं, सायकल सगळं येतं त्याला आणि तो आम्हा सगळ्यांशी प्रेमानेच बोलतो.”

एक एक करून मुलं बोलत राहिली…त्यांच्या डोळ्यातून जाणवलं - चांगुलपणा म्हणजे फक्त मोठी मोठी कामं नाहीत. मनातला प्रकाश कुणाला वाटला की तोच चांगुलपणा.

काही लेकरं लाजत होती, पण हळूहळू तीही बोलायला लागली. या चर्चेतून त्यांना एक मोठी गोष्ट कळली- चांगुलपणाचे स्त्रोत दूर कुठे नसतात; ते आपल्या घरात, गल्लीत, गावात… अगदी आपल्या लोकांमध्येच असतात.

शेवटी मी लेकरांना एक मजेशीर गृहपाठ दिला. त्यांना सांगितलं, “तुमच्या घरातल्या, गल्लीतल्या किंवा गावातल्या लोकांचं निरीक्षण करा. त्यांच्यातले चांगले गुण शोधा आणि त्यांच्या नावासमोर टिपून ठेवा.”

गृहपाठ ऐकून मुलं तर खुश!

चांगुलपणा शोधण्याचा खेळच जणू सुरू झाला आणि मला मनोमन वाटलं, लेकरांच्या डोळ्यातून जग पाहिलं की ते अधिक कळतं. चांगुलपणा कधी दूर नसतो, तो नेहमीच आपल्या अगदी जवळ उभा असतो.

प्रयोगशील शिक्षक

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड

'कॅबला उशीरा झाला, म्हणून...'; गोव्याच्या नाइट क्लबमधील अग्निकांडातून थोडक्यात बचावलेल्या युवकाने सांगितली आपबिती

Goa Nightclub Fire Update : गोव्यातील ‘बर्च’ नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी ५ जणांना अटक; आगीचा नवा व्हिडीओ आला समोर