

कल्याण-डोंबिवली परिसरात ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून महानगर गॅस लिमिटेड (MGL) चे कर्मचारी असल्याचे भासवून दोन महिलांची सुमारे ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
APK फाईल डाउनलोड केली अन्...
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलांना एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. त्या व्यक्तीने स्वतःला गॅस वितरण कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. गॅस संबंधित माहिती अपडेट करण्याच्या नावाखाली त्याने महिलांना त्यांच्या मोबाईलवर एक एपीके (APK) फाईल डाउनलोड करून फॉर्म भरायला सांगितला.
त्या महिलांनी सांगितलेल्या सूचनांनुसार फाईल डाउनलोड करून फॉर्म भरला. त्यानंतर, काही वेळातच त्यांच्या खात्यातून रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही रक्कम अंदाजे ४ लाख रुपये असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.
या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर घडली घटना
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील काही भागांमध्ये LPG सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याच्या बातम्यांदरम्यान ही फसवणूक उघडकीस आली आहे.
नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. आज सकाळी सानपाडा परिसरात काही नागरिक पहाटे ३ वाजल्यापासून गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गॅस एजन्सीबाहेर रिकामे सिलिंडर घेऊन मोठ्या प्रमाणात नागरिक रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.
हॉटेल उद्योगावरही परिणाम
गॅस टंचाईचा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावरही होत आहे. असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट (AHAR) चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले की, शहरातील १६ हजार रेस्टॉरंटपैकी सुमारे २० टक्के रेस्टॉरंट्स मंगळवारपर्यंत बंद झाली होती, तर बुधवारी हा आकडा ३५ टक्क्यांपर्यंत वाढला.
तसेच, रायगड जिल्हा आणि नवी मुंबईतील २० टक्क्यांहून अधिक हॉटेल्सनी ११ मार्चपर्यंत कामकाज बंद केले, अशी माहिती समोर आली आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या मते, काही ठिकाणी गॅस सिलिंडर काळ्या बाजारात सुमारे ३,००० रुपयांपासून विकले जात आहेत, जे नेहमीच्या दरापेक्षा जास्त आहेत. हॉटेल संघटनांनी प्रशासनाला त्वरित गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, अन्यथा हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.