शीतपेटीतून जेव्हा जाग येते...उत्कंठावर्धक विज्ञानकथांचा संग्रह 
अक्षररंग

शीतपेटीतून जेव्हा जाग येते...उत्कंठावर्धक विज्ञानकथांचा संग्रह

विज्ञानकथा हा साहित्यप्रकार पाश्चिमात्य साहित्यात साधारणपणे अठराव्या शतकात अस्तित्वात आला. मराठीत विज्ञान कथा लेखन साधारण १९५० च्या दशकात सुरू झाले. माध्यमिक शिक्षणात विज्ञानाला मिळालेले महत्त्व, हे ह्या अनुकूल परिस्थितीचे एक कारण होते.

नवशक्ती Web Desk

रसास्वाद

डॉ. संजय जोशी

विज्ञानकथा हा साहित्यप्रकार पाश्चिमात्य साहित्यात साधारणपणे अठराव्या शतकात अस्तित्वात आला. मराठीत विज्ञान कथा लेखन साधारण १९५० च्या दशकात सुरू झाले. माध्यमिक शिक्षणात विज्ञानाला मिळालेले महत्त्व, हे ह्या अनुकूल परिस्थितीचे एक कारण होते. दूरचित्रवाणीसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा आणि त्यावरील विज्ञान कथात्मक कार्यक्रमांच्या लोकप्रियतेचाही ह्या संदर्भात उल्लेख करता येईल. याच दरम्यान मराठी विज्ञान परिषेदेने दरवर्षी विज्ञान कथालेखनाची स्पर्धा सुरू केली हेही एक महत्त्वाचे कारण विज्ञान कथालेखनाच्या प्रसारासाठी पोषक ठरले. जयंत नारळीकर ह्यांसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलीय भौतिकी विज्ञानकथा लिहू लागल्यामुळे ह्या लेखन प्रकाराला मराठीत एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांनीही त्यांच्या अतिशय रंजक शैलीतील कथांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विज्ञानातील विविध संकल्पना पोहोचवण्याचे मोलाचे काम केले आहे आणि अजूनही करत आहेत. या व्यतिरिक्त लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डी. व्ही. जहागीरदार, विश्वेश्वर सावदेकर, शुभदा गोगटे, अरुण मांडे, जी. के. जोशी, मेघश्री दळवी, बिपीन देशमाने, सुनील विभुते असे अनेक लेखक उत्तम विज्ञानकथा लिहीत आहेत.

या यादीत आता आश्वासक भर पडली आहे ती क्षितिज देसाई या तरुण लेखकाची. त्यांचा ‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते...’ हा नवाकोरा विज्ञान कथासंग्रह ठाण्यातील ‘सृजनसंवाद प्रकाशन’तर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. लेखक क्षितिज देसाई हे व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. म्हणजेच त्यांना विज्ञानाची एक शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. त्यांचा हा कथासंग्रह वाचकाला एका अद्भुत विश्वाची सफर घडवून आणतो.

या संग्रहात एकूण आठ वेगवेगळ्या आशयांच्या कथा आहेत. यातील ‘ब्ल्यूबेरीचं ब्रेसलेट’ या पहिल्याच कथेतली नायिका मंगळ ग्रहावर कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंत्राटदाराचे भ्रष्ट व्यवहार चतुराईने उघडकीस आणते. असे असले तरी लेखक वाचकाला शेवटाकडे चकीत करतो. ‘ओरिगामीचं ओबडधोबड ऑर्किड’ या कथेत सरकारातील चार प्रमुख मंत्र्यांचे दहशतवाद्यांकडून होणारे संभाव्य अपहरण टाळण्यासाठी त्या मंत्र्यांचे ‘क्लोन्स’ म्हणून यंत्रमानवांच्या चार हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या जातात आणि त्यांना अंतराळात पाठवण्यात येते. त्यांचे पुढे अपहरण होते की नाही... वगैरे भाग कथेत रंजकपणे वर्णन केला आहे. या कथेत त्यांनी ‘कलेक्टिव्ह कॉन्शनेस’ या संकल्पनेचा आधार घेतला आहे. कोविडच्या साथीचा संदर्भ घेऊन ‘इंडेक्स पेशंट’ नावाची भन्नाट कथा या संग्रहात समाविष्ट आहे. जी वाचताना वाचक टाइमलाइनमधून नकळतपणे प्रवास करतो.

कथासंग्रहाचे शीर्षक असलेली कथा ‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते...’ ही मानवाला आपले तारुण्य चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘क्रायोजेनेसीस’ या तंत्रज्ञानावर आधारित अतिशय रंजक कथा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही विकसित झाली तरीही मानवीय भावभावनांना समजणे व त्यातील बदलांचे अचूक आकलन होणे अवघड असल्याचे ही कथा वाचताना जाणवते.

आध्यात्माचा देखावा रचून भाविकांना आभासी दुनियेत नेणाऱ्या साधूचा पर्दाफाश विज्ञानाच्या सहाय्याने कसा होतो हे ‘देही देवाचा वास’ या कथेत लेखकाने शिताफीने उलगडून दाखवले आहे, तर ‘रपबोनॅप’ या कथेत एका कंपनीचा सुरक्षारक्षक तिथले यंत्रमानव चोरून नेतो आणि त्यांना परत करण्यासाठी खंडणीची मागणी करतो याचे रंजक वर्णन आहे. आत्ताच्या आधुनिक युगात विकसित झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानावर आधारित कथादेखील रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. ‘बुद्धी आणि बळ’ या शेवटच्या कथेत बुद्धिबळाच्या खेळाला तंत्रज्ञानाची जोड देत प्रतिस्पर्ध्याच्या चाली ओळखण्याच्या स्मार्टनेसचा गैरवापर दर्शवला असला तरी अखेर विजय सत्याचाच होतो हेही लेखकाने त्यात बिंबवले आहे.

विख्यात विज्ञान कथालेखक ह्युगो झेबाक यांच्या मते, ‘विज्ञान कथेला वैज्ञानिक सत्याचे अधिष्ठान तर हवेच, पण त्याचबरोबर त्या लेखकाला कल्पनेच्या आधारे भविष्यकाळाचा अचूक वेधही घेता आला पाहिजे. विज्ञान कथा वाचकाच्या मनाची पकड घेणारी असली पाहिजे, पण त्याचबरोबर रोचक स्वरूपात ज्ञान देणारी आणि प्रबोधनपर असली पाहिजे.’ क्षितिज देसाई यांचा ‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते’ हा कथासंग्रह या कसोटीवर खरा ठरतो.

पुस्तक निर्मितीच्या बाबतीत तडजोड न करण्याचा आग्रह ‘सृजनसंवाद प्रकाशन’चे संपादक गीतेश शिंदे यांचा नेहमीच असतो. उत्तम छपाई, बांधणी व व्याकरणदृष्ट्या निर्दोषत्वास हेही पुस्तक अपवाद नाही. सरदार जाधव यांनी सर्व कथांना साकारलेली समपर्क रेखाचित्रे व मुखपृष्ठ हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य होय. ज्येष्ठ विज्ञानलेखक डॉ. बाळ फोंडके यांनी या पुस्तकाची ‘पाठराखण’ केली असून युवा लेखक क्षितिज देसाई यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असल्याचे त्यातून जाणवते.

  • शीतपेटीतून जेव्हा जाग येते

  • लेखक : क्षितिज देसाई

  • प्रकाशक : सृजनसंवाद

  • पृष्ठे : १०४

  • मूल्य : ₹ २५०

  • पुस्तकासाठी संपर्क : ९८२०२७२६४६

sanjay.joshi1958@gmail.com

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग