मार्लेश्वर - एक गूढ अनुभूती (Photos-travellifejourneys)
अक्षररंग

मार्लेश्वर - एक गूढ अनुभूती

मार्लेश्वर हे कोकणातील अत्यंत जागृत शिवस्थान आहे. येथील उंच कड्यावरून कोसळणारा भव्य धबधबा आणि गगनभेदी डोंगर निसर्गाचे रौद्र रूप प्रकट करतात. या ठिकाणी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

मार्लेश्वर हे कोकणातील अत्यंत जागृत शिवस्थान आहे. येथील उंच कड्यावरून कोसळणारा भव्य धबधबा आणि गगनभेदी डोंगर निसर्गाचे रौद्र रूप प्रकट करतात. या ठिकाणी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते.

कल्पना करा, तुमच्या सभोवती उंच उंच गगनाला भिडणारे डोंगर आहेत. पावसात चिंब चिंब भिजून हिरव्या रंगात पार हरवून गेले आहेत. त्यांच्या डोक्यावर करड्या ढगांची दाटी झाली आहे. झाडीत पांढरे पांढरे धुके अडकलेले दिसत आहे. तुम्ही या डोंगराच्या अगदी जवळ उभे आहात. पायथ्याला लागूनच. आणि मान वर करून डोंगरांचे अक्राळविक्राळ पण मोहक रूप पाहत आहात. एक चांगला गडगडाट होतो आणि पावसाला सुरूवात होते. डोंगरांच्या अंगाखांद्यावरून शुभ्र धारा वाहू लागतात. वाहते धबधबे वातावरणातील शांतता भेदत आवाज करत अजून जोरदारपणे कोसळू लागतात. पाऊस असा कोसळतो की तुमच्याकडची छत्रीच मोडून जाते. तुम्ही पावसात भिजत राहता आणि डोळे विस्मयाने निसर्गदेवतेचे रौद्र रूप पाहत असतात. स्वतःला विसरू लावणारे पावसाळ्याचे हे गूढगंभीर रौद्र रूप मी पाहिले रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणी मार्लेश्वरला. साक्षात भगवान महादेवाचे सानिध्य जिथे जाणवते, जिथे शिवतत्त्वाची जवळून प्रचिती येते असे हे तीर्थक्षेत्र आहे.

रत्नागिरीपासून साधारण 60 किमी वर असणारे हे नेत्रसुखद ठिकाण. मी भर पावसाळ्यात या ठिकाणी गेले होते आणि निसर्गाचे असे रौद्र दर्शन घडले होते.

देवरूख शहर सोडल्यावर डाव्या बाजूचे वळण घेतले. हिरवळीने व्यापलेली दृश्य पाहत, दुर्गम गावातून प्रवास करत मार्लेश्वरकडे जायचा अंतिम टप्प्यात असणारा प्रवास सुरू झाला. अतिशय कमाल परिसर. कधी भातशेती दिसायची, कधी जंगलातून जाणारा वळणावळणाचा रस्ता लागायचा. लालपरी रस्त्यावरील पाणी उडवत जायची. अनेक सुंदर मनोहारी दृश्य या रस्त्यावरून जाताना दिसत होती. पाहूनच मन उल्हासित होऊन गेलं होतं.

शेवटच्या टप्प्यात गाडी डोंगरांच्या कडेने जात होती. डोंगरांचे अक्राळविक्राळ रूप पाहताक्षणीच जाणवलं; आता इथून पुढचे प्रत्येक दृश्य फुलाच्या पाकळीप्रमाणे नाजूक नसणार आहे. महारुद्रासारखे असणार आहे. कमानीतून गाडीने आत प्रवेश केला आणि मार्लेश्वर मंदिराकडे जायच्या पायऱ्यांपाशी पोहोचले. गाडी पार्क करण्यासाठी तिथे सुविधा आहे आणि पूजेचे साहित्य देणारी दुकानेही आहेत. गर्दी पुष्कळ होतीच तिथे पण वातावरणात असणारी गंभीरता मला जास्त जाणवत होती. गर्दी गजबज अंगावर येत नव्हती.

पायऱ्या चढायला सुरूवात केली. खरतर एक डोंगरच चढून आपण जात असतो. त्यामुळे एका बाजूला उंचापुरा कडा असतो आणि त्यावरून पाण्याचे ओहोळ वाहत असतात. दुसऱ्या बाजूला खोल दरीतून पाण्याचा प्रवाह उसळत वाहत असतो. निसर्गाची ही विविध रूपे पहातच आपण मंदिराच्या दिशेने पायऱ्या चढत जात असतो. या पायऱ्या लहानमोठे अगदी सहज चढू शकतील अशाच. साधारण 15 ते 20 मिनिटे चालल्यावर मार्लेश्वर मंदिराच्या प्रांगणात पोहोचले.

इथे आल्यावर खरंतर कळतं की आपण काय दुर्गम जागी पोहोचलो आहोत ते! सभोवतालचे दृश्य पाहूनच नजर भिरभिरते. या प्रांगणात उभं राहिलं की उजव्या आणि डाव्या बाजूचे दोन डोंगर एकमेकांना भिडलेले दिसतात. या दोन्ही डोंगरावरून पाण्याच्या शेकडो शुभ्र धारा वाहत असतात. पण हे दोन डोंगर जिथे भिडतात तिथे पांढराशुभ्र भलामोठा धबधबा जोरदार कोसळत असतो. साधारण 200 फुटांवरून कोसळत असेल. या धबधब्याचे नाव आहे धारेश्वर. मार्लेश्वर या धबधब्यासाठीही प्रसिद्ध आहे. बारामाही आहे हा धबधबा. पावसाळ्यात अगदी बेभान कोसळतो आणि उन्हाळ्यात अगदी बारीक धारा होते. माघ महिन्यात या धारेखाली स्नान करता येते. धार्मिक महत्व आहे या स्नानाला. आपल्याला या धबधब्याचा केवळ एकच टप्पा दिसतो पण त्याच्यावरती अजून सात टप्पे आहेत. डाव्या बाजूच्या डोंगरावर चढले की हे टप्पे पाहता येतात. खडतर ट्रेक करत जावे लागते. त्या डोंगराला लिंगाचा डोंगर म्हणतात. शंकराच्या जटेतून गंगा अवतरली आहे, असेच वाटते हा धबधबा पाहताना. आणि खरच पावसाळ्याच्या या चार महिन्यात सृष्टीवर भगवान शिव अवतरतात आणि राज्य करतात अशी मान्यता आहे. त्यांच्या तत्वाची जाणीव ही अशा निसर्गाच्या गूढ गंभीर रूपातून होत राहते.

आता उजव्या बाजूच्या डोंगराच्या कपारीत स्थान आहे मार्लेश्वरांचे. एका अरुंद मुखाच्या गुहेत प्रवेश होतो. डोंगराच्या एकप्रकारे पोटात असतो आपण. गुहेतील या मंदिरात दुसरा कुठलाही कृत्रिम प्रकाश नाही. दिव्याच्या मंद सोनेरी उजेडात पिंडीचे दर्शन होते. हे दर्शन घेणं विलक्षण अनुभव होता. यातील एक पिंडी आहे मार्लेश्वरांची आणि दुसरी आहे मार्लेश्वरांचे बंधू मल्लिकार्जुन यांची. या पिंडी स्वयंभू आहेत. गुहेच्या मागे कपारीत सापांचे वास्तव्य आहे. पण त्यांचा उपद्रव झाल्याची घटना ऐकिवातही नाही. 2 ते 3 मिनिटे गुहेत मिणमिणत्या उजेडात, देवाच्या सहवासात असतो आपण. दर्शन घेऊन गुहेतल्या गूढ गंभीर वातावरणातून भारावल्या चित्ताने बाहेर येतो.

हे मंदिर सापडण्याची एक कथा वाचनात आली. शिलाहार राजवटीला उतरती कळा लागली. या भागात परकीय आक्रमणे झाली.पैशाच्या आणि वर्चस्वाच्या लोभापायी लोकांचे जीव जाऊ लागले. हे मार्लेश्वराना असह्य झाले. गावातून त्यांनी कडेकपारीकडे प्रयाण केले. शिवभक्तीत लीन असणाऱ्या एका चर्मकाराच्या मदतीने ते कडेकपारीत ध्यानस्थ होण्यासाठी गेले. शोध घेऊनही देव सापडले नाहीत. गावावर नंतर संकटे कोसळली. गावातील सावंत साळुंखे मंडळींनी सर्व जातीजमातीतील लोकांना एकत्र आणून परकीय आक्रमकांना हुसकावून लावले. जिथे हा संग्राम झाला, शत्रूंना मारलं गेलं ती जागा ‘मारलं’ या नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे गावातील लोक एकोप्याने, सदाचाराने राहू लागले.

1800 च्या सुमारास आंगिवलीचे सरदार आणेराव साळुंखे शिकारीसाठी या कडेकपारीत आले. त्यांना एक श्वापद गुहेत जाताना दिसले.त्याच्या पाठोपाठ ते गुहेत गेले आणि त्यांना शिवपिंडी दिसल्या. आणि हाच आपला मार्लेश्वर असे सरदारांना जाणवले. ही पुनर्भेटीची घटना घडली मकर संक्रांतीला. त्यामुळे इथे त्यादिवशी मोठा उत्सव असतो. शिवाय साखरपा गावातील गिरिजादेवी म्हणजे देवी पार्वतींचा विवाह मार्लेश्वरांसोबत होतो. फार उत्सवी वातावरण असते तेव्हा.

आता गावचे नाव मारळ असे आहे. मारळ गावाचे दैवत मार्लेश्वर अशी या स्थानाची ख्याती आहे. मार्लेश्वरला एकदा गेलं की वारंवार जायची ओढ लागतेच. कितीही पाऊस असू दे मन मार्लेश्वरकडे धावतेच. धारेश्वर धबधब्याची सुंदरता, मार्लेश्वरांच्या गुहेतील गूढ गंभीर वातावरण, गगनभेदी डोंगर, निसर्गाचे रौद्र रूप हे सारे मनाचा ताबा घेतातच. आता पावसाळा सुरू होईल. मार्लेश्वरला एकदा जाऊन याच.

  • अंतर - देवरुखपासून १२ किमी. रत्नागिरीपासून 50 ते 60 किमी.

  • जवळचे बसस्थानक - रत्नागिरी, देवरुख

  • जवळचे रेल्वेस्थानक - संगमेश्वर.

  • स्वतःच्या गाडीने मंदिरापर्यंत पोहोचता येतं. पार्किंगची व्यवस्था आहे.

  • देवरूखजवळ निवासाची सोय आहे. मंदिराच्या जवळ नाश्ता करण्यासाठी स्टॉल्स आहेत.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gm

Mumbai : पावसाळ्यात मेट्रो सज्ज; MMRDA ची एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित

लातूरला नांगराच्या औताला पत्नीला जुंपले; आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकऱ्याची हतबलता

Mumbai : पालिकेची बेस्टला ५०० कोटींची मदत; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला बेस्ट दिलासा

MIDC कर्ज उभारणी अधिकारात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य