समाजचिंतन
जगदीश काबरे
लोकशाही, समता आणि न्याय यांच्या नावाने उभ्या राहिलेल्या सामाजिक चळवळी आज एका सूक्ष्म पण धोकादायक अंतर्विरोधाला सामोऱ्या जात आहेत. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या या चळवळींच्याच आत वारसाहक्क आणि व्यक्तिकेंद्री प्रवृत्ती डोकावू लागल्याने त्यांच्या मूळ तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
आजच्या काळात लोकशाही, समता आणि न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या विविध सामाजिक चळवळी स्वतःच एका गंभीर अंतर्विरोधात अडकत चालल्या आहेत, अशी स्थिती दिसून येते. सामाजिक चळवळ म्हणजे काय तर शोषितांचा आक्रोश, वंचितांची हाक आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा लढा. पण आज या चळवळींच्या गाभ्यातच एक नवा रोग घर करू लागला आहे- वारसाहक्काचा रोग. ज्या चळवळींनी परंपरेतील अन्यायकारक वारसा हक्क, सत्तेचे केंद्रीकरण, जातीय व वर्गीय विशेषाधिकार यांना विरोध करून स्वतःची उभारणी केली, त्या चळवळींच्याच अंतर्गत आता वारसाहक्काचे बीज रुजत आहे. राजकारण किंवा चित्रपट क्षेत्रात ‘नेपोटिझम’ म्हणून ओळखली जाणारी प्रवृत्ती आता सामाजिक चळवळींमध्येही शिरकाव करत असल्याचे संकेत दिसत आहेत. ही बाब केवळ एक अपघाती घटना नसून ती व्यापक सामाजिक-सांस्कृतिक संरचनेशी जोडलेली आहे आणि म्हणूनच तिचे चिकित्सक विश्लेषण करणे अत्यंत आवश्यक ठरते.
भारतातील प्रत्येक मोठ्या सामाजिक चळवळीची उभारणी ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीने केली असली, तरी ती टिकवून धरण्याचे काम केले ते अनेक अनामिक कार्यकर्त्यांनी. या कार्यकर्त्यांनी कधी पैशाची अपेक्षा केली नाही, कधी प्रसिद्धीची हाव धरली नाही. ग्रामीण भागात, झोपडपट्ट्यांत, दुर्गम आदिवासी वाड्यांत जाऊन त्यांनी काम केले. त्यांच्या हातांवर फोड आले, पण तोंडावर कधी माध्यमांचा कॅमेरा फिरला नाही. आज मात्र एखाद्या प्रस्थापित सामाजिक नेत्याच्या मुलाने किंवा मुलीने फक्त एखाद्या कार्यक्रमात भाषण केले की, दुसऱ्या दिवशी त्याची मुलाखत प्रकाशित होते. त्यांचे विचार समाजमाध्यमांवर व्हायरल होतात. हे कशामुळे घडते? याचे एकच उत्तर आहे- वारशाची जादू आणि माध्यमांची बेजबाबदारी.
राजकारणात एखाद्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी सहजपणे नेतृत्वाच्या भूमिकेत येते, चित्रपट क्षेत्रात प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांना पहिल्याच चित्रपटात मुख्य भूमिका मिळते, ही बाब आता इतकी सामान्य झाली आहे की समाजाने ती जवळजवळ स्वीकारली आहे. परंतु सामाजिक चळवळींबाबत परिस्थिती वेगळी असायला हवी होती. कारण या चळवळींचा पाया हा समतेवर, गुणवत्तेवर आणि संघर्षाच्या अनुभवावर आधारित असतो. येथे ‘कोणाचा मुलगा’ किंवा ‘कोणाची मुलगी’ हा प्रश्न गौण असायला हवा आणि ‘कोणी काय काम केले’ हा प्रश्न केंद्रस्थानी असायला हवा. पण प्रत्यक्षात जे घडताना दिसते ते या आदर्शाच्या पूर्णतः विरोधात आहे. काही ठिकाणी असे दिसते की चळवळीतील प्रस्थापित नेते, कार्यकर्ते किंवा विचारवंत यांच्या पुढील पिढीला आपोआपच प्रसिद्धी मिळू लागते. विशेषतः ते मेल्यानंतर त्यांच्या वारसांनी तोपर्यंत स्वतः काही विशेष कार्य केले नसतानाही त्यांना सहजगत्या माध्यमांमध्ये लेखनाची संधी मिळते, त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात, चर्चासत्रांमध्ये बोलावले जाते आणि त्यांना अचानकपणे उर्जितावस्था प्राप्त होते. याउलट, अनेक वर्षे तळागाळात काम करणारे, संघर्षातून आलेले, चळवळीला खऱ्या अर्थाने आधार देणारे कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित राहतात. ही विषमता केवळ अन्यायकारक नाही, तर ती चळवळीच्या आत्म्यालाच बाधा आणणारी आहे.
या प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. प्रिंट मीडिया असो किंवा दृकश्राव्य माध्यमे असोत, त्यांची प्राथमिकता अनेकदा गुणवत्ता, वाचकसंख्या यापेक्षा प्रेक्षकसंख्या किंवा टीआरपीकडे असते. त्यामुळे ते अशा व्यक्तींना पुढे आणतात ज्यांची ‘ओळख’ आधीपासूनच तयार असते. एखाद्या प्रसिद्ध कार्यकर्त्याचा मुलगा किंवा मुलगी असल्यामुळे त्या व्यक्तीची ‘ब्रँड व्हॅल्यू’ तयार झालेली असते आणि माध्यमांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे ते जाणीवपूर्वक अशा वारसांना पुढे करतात. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म आणि सातत्यपूर्ण होणारी असते की काही काळानंतर ती सामान्य वाटू लागते. परंतु या प्रक्रियेचा समाजावर होणारा परिणाम मात्र अत्यंत गंभीर असतो. एकीकडे चळवळीत तळागाळात काम करणारे कार्यकर्ते बाजूला पडतात, त्यांच्या अनुभवाला, त्यांच्या विचारांना वाचा फुटत नाही आणि दुसरीकडे वारस म्हणून पुढे आलेल्या व्यक्तीचे विचारच चळवळीचे अधिकृत प्रतिनिधित्व करू लागतात. यामुळे चळवळीचे वास्तव आणि तिचे सार्वजनिक प्रतिमान यामध्ये मोठी दरी निर्माण होते. चळवळ ही हळूहळू जनआंदोलन न राहता एका कुटुंबाची मालमत्ता बनू लागते. हीच प्रक्रिया पुढे जाऊन संस्थानीकरणाकडे नेते. जेव्हा एखादी चळवळ काही विशिष्ट व्यक्ती किंवा कुटुंबांभोवती फिरू लागते, तेव्हा ती लोकशाही स्वरूप गमावते आणि घराणेशाहीच्या संस्थानामध्ये रूपांतरित होते. येथे निर्णय प्रक्रियेवर मोजक्या लोकांचा ताबा राहतो, नव्या कल्पनांना वाव मिळत नाही आणि अंतर्गत लोकशाही संपुष्टात येते. परिणामी, चळवळ हळूहळू निष्प्रभ होऊ लागते.
या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘प्रतीकात्मकता’ आणि ‘वास्तव’ यामधील फरक लक्षात घेतला जात नाही. अनेकदा वारसांना पुढे आणताना त्यांच्या ‘ओळखी’चा वापर केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या महान कार्यकर्त्याचा मुलगा असल्यामुळे त्याला आपोआपच त्या कार्यकर्त्याच्या विचारांचा वारसदार मानले जाते. परंतु विचारांचा वारसा हा केवळ रक्ताच्या नात्याने मिळत नाही; तो कृतीतून, अभ्यासातून आणि संघर्षातून निर्माण करावा लागतो. हा मूलभूत फरक दुर्लक्षित केला जातो आणि त्यामुळे एकप्रकारचे ‘प्रतीकात्मक राजकारण’ निर्माण होते.
यामुळे चळवळींच्या मूलभूत उद्दिष्टांवरही परिणाम होतो. जेव्हा नेतृत्वाची निवड गुणवत्ता आणि कार्याच्या आधारे न होता वारसाहक्काच्या आधारे होते तेव्हा चळवळींची दिशा बदलते. अशा चळवळी अधिकाधिक ‘प्रतिमा’ आणि ‘प्रसिद्धी’ यावर केंद्रित होतात आणि वास्तविक प्रश्नांपासून दूर जातात. अशा परिस्थितीत चळवळींची धार कमी होते आणि त्या सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक न राहता ‘नियंत्रित’ होऊ लागतात.
एखाद्या दलित चळवळीत, महिला हक्क चळवळीत, धर्म सुधारणा चळवळीत किंवा पर्यावरण चळवळीत दशकानुदशके काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता असतो. त्याने हजारो लोकांच्या समस्या सोडवलेल्या असतात, अनेक लढे दिलेले असतात, अनेकदा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवलेली असते. पण त्याचे नाव कोणाला माहीत नसते. कारण त्याच्या घरात प्रसिद्ध बाप नव्हता. त्याच्याजवळ वारशात मिळालेले नाव नव्हते. मग माध्यमे त्याच्याकडे का येतील? कारण टीआरपीसाठी तो उपयुक्त नाही. हे एकप्रकारचे माध्यमजनित भेदभावाचे राजकारण आहे, जे चळवळीच्या आतमध्येच वर्गभेद निर्माण करते. त्यातील एक वर्ग असतो प्रकाशझोतातील आणि दुसरा अंधारातील. यातून निर्माण होणारा दुसरा गंभीर परिणाम म्हणजे जेव्हा एखाद्या वारसाला माध्यमांमध्ये सतत झळकवले जाते, तेव्हा त्या वारसाच्या मनात एक खोटा आत्मविश्वास निर्माण होतो. त्याला वाटते की माझ्यात खरोखरच असे काही आहे, जे इतरांपेक्षा वेगळे आहे. पण प्रत्यक्षात त्याच्याकडे जे आहे ते म्हणजे केवळ एक प्रसिद्ध नाव आणि माध्यमांनी दिलेले व्यासपीठ. या खोट्या आत्मविश्वासातून तो चळवळीत नेतृत्वाचा दावा करू लागतो. मग चळवळीत खऱ्या कार्यकर्त्यांचा आणि या वारसाचा संघर्ष सुरू होतो. अनेकदा या संघर्षात वारसा जिंकतो, कारण त्याच्यामागे माध्यमांचे बळ असते. खरा कार्यकर्ता मात्र पराभूत होऊन चळवळीपासून दुरावतो. हे म्हणजे चळवळीला आतून पोखरण्यासारखे आहे.
या समस्येचा विचार करताना माध्यमांच्या भूमिकेची सखोल चिकित्सा करणे आवश्यक आहे. माध्यमे स्वतःला ‘चौथा स्तंभ’ म्हणवून घेतात आणि लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. परंतु जर त्यांची निवड प्रक्रिया केवळ टीआरपीवर आधारित असेल, तर ते स्वतःच लोकशाहीला कमजोर करत आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यांनी जाणीवपूर्वक तळागाळातील कार्यकर्त्यांना, नवीन विचारांना आणि अप्रसिद्ध पण प्रभावी काम करणाऱ्या लोकांना व्यासपीठ द्यायला हवे, अशा लोकांचा शोध घ्यायला हवा. याचबरोबर चळवळीतील अंतर्गत आत्मपरीक्षणही आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनीही स्वतःला विचारले पाहिजे की आपण नकळतपणे या वारसाहक्काच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन तर देत नाही ना? अनेकदा ‘भावनिक’ कारणांमुळे आपण एखाद्या नेत्याच्या कुटुंबीयांना विशेष वागणूक देतो. परंतु ही भावनिकता दीर्घकालीन दृष्टीने चळवळीला हानीकारक ठरू शकते. त्यामुळे व्यक्तिपूजा टाळून विचारांचा प्रसार करण्याची गरज आहे. म्हणून चळवळींमध्ये नेतृत्वाची निवड पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने व्हावी, माध्यमांनीही आपल्या निवडीसाठी काही स्पष्ट निकष ठरवावेत आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाच्या आधारे संधी मिळावी. तसेच, नव्या पिढीला संधी देताना ‘वारस’ या ओळखीपेक्षा ‘कार्यकर्ता’ या ओळखीला प्राधान्य दिले पाहिजे. शेवटी, हा प्रश्न केवळ चळवळींचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या मूल्यव्यवस्थेचा आहे. जर समाजानेच ‘ओळख’ आणि ‘वारसा’ यांना गुणवत्ता आणि कार्यापेक्षा अधिक महत्त्व दिले, तर कोणतीही चळवळ प्रवाहपतीत होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे व्यापक स्तरावर मूल्यपरिवर्तनाची गरज आहे. शिक्षण, माध्यमे आणि सामाजिक संवाद यांच्या माध्यमातून ‘गुणवत्ता’, ‘परिश्रम’ आणि ‘समता’ या मूल्यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे.
एकंदरीत पाहता, सामाजिक चळवळींमध्ये वाढत चाललेला वारसाहक्काचा कल हा अत्यंत चिंताजनक आहे. तो चळवळींच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारा आहे आणि त्यांना ‘संस्थान’ बनवण्याची क्षमता ठेवणारा आहे. त्यामुळे या प्रवृत्तीची वेळेत दखल घेऊन तिच्यावर कठोर टीका आणि चिकित्सा करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. अन्यथा, ज्या चळवळींनी अन्यायाविरुद्ध लढा दिला, त्या स्वतःच अन्यायाच्या नव्या रूपाचे केंद्र बनतील आणि ही शोकांतिका टाळता येणार नाही.
लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com