यशाचा खरा मंत्रः धावपळ की संतुलन? प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

यशाचा खरा मंत्रः धावपळ की संतुलन?

यशाच्या आंधळ्या शर्यतीत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य पणाला लावणाऱ्या आधुनिक जीवनशैलीचा वेध प्रस्तुत लेखात घेतला आहे. निखळ आनंदासाठी तुलनात्मक स्पर्धा नाकारून, जीवनात विश्रांती आणि संतुलनाचे गणित मांडणे हाच यशाचा खरा मंत्र...

नवशक्ती Web Desk

साधक-बाधक

अक्षय वाटवे

यशाच्या आंधळ्या शर्यतीत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य पणाला लावणाऱ्या आधुनिक जीवनशैलीचा वेध प्रस्तुत लेखात घेतला आहे. निखळ आनंदासाठी तुलनात्मक स्पर्धा नाकारून, जीवनात विश्रांती आणि संतुलनाचे गणित मांडणे हाच यशाचा खरा मंत्र...

आजच्या जगात यशाची शर्यत इतकी तीव्र झाली आहे की अनेकांना वाटते, 'जर मी थांबलो तर मागे पडेन.' सोशल मीडिया, स्पर्धात्मक शिक्षण, करिअरच्या अपेक्षा आणि सततच्या तुलनांमुळे अनेकजण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त दिसत असले, तरी आतून पूर्णपणे थकलेले, चिंताग्रस्त किंवा उदास असतात.

यशाची पारंपरिक व्याख्या बहुतेकदा बाह्य यशाशी जोडली जाते. उच्च पदवी, मोठी नोकरी, आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा किंवा स्पर्धेत पहिले येणे वगैरे... मात्र तुलना हीच याचा पाया किंवा मूलाधार असते. याची बीजे बालपणात पेरली जातात. कोणापेक्षा तरी अधिक गुण मिळवणे, कोणापेक्षा तरी चांगले चित्र काढणे, गाणे, नृत्य किंवा वादन सादर करणे वगैरे सर्व काही... कला, कौशल्य किंवा बुद्धिमत्तेची चुणूक ही याच कसोटीवर यशस्वी व्हावी लागते.

म्हणजे यशाची निश्चिती तुलना आणि स्पर्धेच्या आधारे होते का ? बहुतांश याचे उत्तर 'हो' असेच आहे. 'जिंकणे म्हणजे यशस्वी होणे' असे सोपे गणित बालपणापासून आपल्यावर बिंबवले गेले आहे.

खरंतर जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती, खिलाडू वृत्ती, संयम, सामर्थ्य अशी काही जीवनकौशल्ये आत्मसात करता यावीत, हेच या स्पर्धांचे प्रयोजन असायला हवे; मात्र तसे न होता या स्पर्धा दिवसेंदिवस गळेकापू बनतायत, मृत्यूचा सापळा बनतायत. खरंतर विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरच ही धोक्याची घंटा वाजू लागली होती, मात्र आपल्यापैकी कोणीच त्याकडे तितक्या गांभीर्याने पाहिले नाही. त्याचे दुष्परिणाम आपल्याला आज व्यक्तिगत पातळीवर आणि जागतिक पातळीवर सार्वजनिक स्वरूपातही पाहायला मिळतायत.

जागतिक पातळीवर, OECD आणि WHOच्या अहवालांनुसार यशाची व्याख्या आता 'human flourishing 'कडे वळत आहे. OECD च्या Health at a Glance 2025 मध्ये म्हटले आहे की, मानसिक आरोग्य नसल्यास उत्पादकता आणि शैक्षणिक यश दोन्ही प्रभावित होतात. एका व्यक्तीचे यश समाजासाठी उपयुक्त असावे, पण त्यासाठी स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बळी देणे योग्य नाही. हे मानसिक स्वास्थ्य हरवू लागले की आपोआप जगण्यातील निरर्थकता आणि तोचतोचपणा वाढू लागतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळी धावपळ सुरू होते आणि त्यातून अधिक तणावाची परिस्थिती निर्माण होते. या संदर्भात जगभरात वेळोवेळी संशोधनेही झाली आहेत.

WHO नुसार, जगभरात १ अब्जाहून अधिक लोक मानसिक आरोग्याच्या समस्या अनुभवतात. मानसिक आजार उपचार करणे स्वस्त असते, पण आरोग्य व्यवस्था त्याकडे दुर्लक्ष करतात. OECD च्या अहवालानुसार, मानसिक आजारामुळे GDP च्या ४% पर्यंत नुकसान होते. वेगवेगळ्या वेबसाइट्स तपासल्या किंवा अगदी ChatGPT ला प्रश्न विचारले तर माहितीचा प्रचंड साठा तुमच्यासमोर रिता होईल, पण प्रत्यक्ष कृतीचं काय ?

मला प्रामाणिकपणे असे वाटते की, एकूणच आयुष्यात अधूनमधून किंचित 'पॉज' घेऊन, "काय रे बाबा मना ! सगळं ठीक चाललंय ना?" असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा. असा प्रश्न विचारण्याची फुसरत आपल्याला आहे ? त्याचे उत्तर नकारार्थी आले तर स्वीकारण्याची क्षमता आपल्यात आहे? नाही. आपल्यापैकी ९० टक्के लोकांत ही क्षमता नाही. मुळात त्यांना ती विश्रांती घेण्याची मुभाच नाही. सतत कुठेतरी पोहोचायची, काहीतरी मिळवायची घाई... यात शहरी मंडळींचे वेगळे प्रश्न, ग्रामीण भागात वेगळे प्रश्न. काही व्यक्तिगत, काही सामाजिक. उत्तरे शोधण्याचा प्रयत्न फारच क्षीण.

आता येत्या महिन्याभरात यंदाच्या पावसाला सुरुवात होईल. तुम्ही-आम्ही काय करू? पहिल्या पावसाच्या धारा ओंजळीत धरून त्याचे फोटो/व्हिडीओ काढण्याची धावपळ करू. मग तिथून पुढे सुरू होईल डिजिटल ट्रॅपचा खेळ. तोपर्यंत पाऊस पडून, पाणी साचून, मातीचा गंध पसरून सुकून जाईल आणि आपण? आपण आपल्या मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करत राहू... २०१३ पासून सोशल मीडियाचा हा विळखा इतका आवळत चालला आहे की, अक्षरशः आपला जीव घुसमटू लागला आहे. हे निव्वळ करमणूक किंवा मनोरंजनाचे साधन उरलेले नाही, तर त्या तुमच्या प्रोफाईलवरून तुमची किंमत ठरू लागली आहे.

तुम्ही कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर कसे वावरताय, कोणती डिजिटल सर्टिफिकेट्स आहेत, त्यावरून तुमचे पॅकेज ठरणार आहे; ठरते आहे. एवढेच काय, एखाद्या डॉक्टरने किती पेशंटवर चांगले उपचार केले, यापेक्षा त्याच्या Instagram चॅनलवर किती views आहेत, यावरून डॉक्टरची निवड केली जाऊ लागली आहे !

स्वतःचे यश मोजणे ही एक बाजू झाली. समोरच्याचे यश मोजत राहणे ही दुसरी बाजू, तिसरी बाजू इतरांच्या यशाशी, सुखाशी, सुबत्तेशी तुलना करत राहणे आणि चौथी व अतिशय घातक बाजू म्हणजे- हे सर्व घडत असताना या पाठीमागे कार्यरत असलेल्या भांडवली बाजारपेठेचे बळी ठरणे.

कोविड काळात नेटफ्लिक्सच्या संदर्भात एक विधान गाजले होते की, 'आमची स्पर्धा तुमच्या झोपेशी आहे.' वर्तमानकाळाचे भीषण भविष्य या एका वाक्यात सामावलेले आहे. सामान्य माणूस कशात लोटला जातो आहे, याची त्याला किंचितही कल्पना नाही. एवढेच काय, तर तो अगदी रुग्णालयात दाखल होताना किंवा अगदी शेवटचा श्वास घेतानाही एक सेल्फी काढून पोस्ट करेल किंवा रील शूट करेल. हे सारे घडते आहे, कारण आपल्याला 'नकार' देता येत नाही. अगदी रोजच्या व्यवहारात किंवा कामकाजात आपल्या वरिष्ठांना किंवा समोरच्या व्यक्तीला द्यायचा नकार नव्हे, तर आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा विचार करून एखादी जोखीम पत्करण्याला नकार देणे आपल्याच्याने होत नाही. कारण आपल्याला समोर आलेली प्रत्येक बाब जोखीम किंवा जबाबदारी न वाटता 'संधी' वाटते किंवा संधी आहे असे भासवलेही जाते. बालपणापासून आपल्याला फारसे निवडीचे स्वातंत्र्य शिकवले नसल्याने इथे निवडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नकार द्यायची मानसिकता नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अशा नवनव्या आव्हानांचा ताण वाढत जातो.

माझ्यावर कधी अशी नकार देण्याची वेळ येणार असेल, तर मी नाक्यावर जाऊन रिक्षा थांबवतो. तो रिक्षावाला रिक्षा थांबवून मी जे ठिकाण सांगेन तिथे, "नही जायेगा!" असे ठसक्यात सांगून भुर्रकन रिक्षा घेऊन निघून जातो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जी पराकोटीची तुच्छता आणि आवाजात जो कमालीचा आत्मविश्वास असतो ना, त्यातला १% मी उसना घेतो आणि पटकन माघारी येऊन ज्याला नकार द्यायचाय त्याला देऊन टाकतो. (खरं तर या सगळ्या रिक्षावाल्यांनी नकार कसा द्यावा याची एक हस्तपुस्तिकाच काढायला हवी, त्या बदल्यात आपण त्यांना मराठी धडा शिकवू- कदाचित त्यालाही ते नकारच देतील.) जाऊ दे, फार विषयांतर नको. मुख्य मुद्दा 'नकारा'चा आहे. तर तो देता यायला हवा. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, आव्हाने स्वीकारण्याची क्षमता वाढते. वेळीच या सगळ्याकडे अतिशय गंभीरपणे बघण्याची गरज आहे. कारण आरोग्य नीट राहिले तर चार पावसाळे जास्त पाहू शकू. सुखी संसारात चार वर्षे अधिक जगता येतील. कुटुंब, मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर थोडा काळ अधिक सुखात घालवता येईल... मग जाता जाता बाजारात आलेल्या लेटेस्ट गाण्यावर एखादं रील करून पोस्ट करता येईल. पण त्यासाठी दोस्तहो, काळ-काम-वेगाबरोबर स्वास्थ्य आणि संतुलनाचेही गणित घातले पाहिजे.

लेखक, अभिवाचक akshay.watve@gmail.com

कोकण हापूसची आवक वाढली; दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा

जप्त केलेल्या नोटा उंदरांनी कशा कुरतडल्या? सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य

के. कविता यांचा नवा राजकीय पक्ष; 'तेलंगणा राष्ट्र समिती' नावाने वडिलांनाच दिले आव्हान

सिंधुदुर्गातील 'MH-०७' क्रमांकाच्या वाहनांना टोल नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्हावासीयांना दिलासा

ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त