मॉन्टेनेग्रो! ऍड्रियाटिक समुद्राची नववधू 
अक्षररंग

मॉन्टेनेग्रो! ऍड्रियाटिक समुद्राची नववधू

पर्वत, समुद्र, इतिहास आणि सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ म्हणजे मॉन्टेनेग्रो! ऍड्रियाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या छोट्याशा देशात निसर्गाची अनेक मोहक रूपं पाहायला मिळतात. कोटोरपासून स्वेटी स्टीफनपर्यंतची ही सफर म्हणजे डोळ्यांना सुखावणारी आणि मनाला भुरळ घालणारी अनुभवयात्रा.

नवशक्ती Web Desk

जगतवारी

मेधा आलकरी

पर्वत, समुद्र, इतिहास आणि सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ म्हणजे मॉन्टेनेग्रो! ऍड्रियाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या छोट्याशा देशात निसर्गाची अनेक मोहक रूपं पाहायला मिळतात. कोटोरपासून स्वेटी स्टीफनपर्यंतची ही सफर म्हणजे डोळ्यांना सुखावणारी आणि मनाला भुरळ घालणारी अनुभवयात्रा.

यना आणि चार्ल्सच्या परिकथेत शोभणाऱ्या विवाहानंतर त्यांच्याबद्दल प्रसिद्ध होणारी अगदी छोटीशी बातमीसुद्धा आम्ही कुतूहलापोटी वाचत असू. मधुचंद्रासाठी त्यांनी ऍड्रियाटिक समुद्रातील एक निवांत बेट निवडलं होतं -स्वेटी स्टीफन. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या मॉन्टेनेग्रो या पूर्व युरोपातील देशाला भेट दिली तेव्हा आम्ही आवर्जून हे बेट पाहण्यास गेलो.

युद्धानंतर युगोस्लाव्हियाचे तुकडे पडून जे स्वतंत्र देश तयार झाले त्यातला मॉन्टेनेग्रो हा एक. १३८१२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या, पर्वतराजींनी व्यापलेल्या आणि लडिवाळ ऍड्रियाटिक समुद्राचं सान्निध्य असलेल्या या प्रदेशाला जोड आहे तेथील भरभक्कम ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीची. देश -विदेशी पर्यटकांच्या मजेत सुट्टी घालवायच्या ज्या ज्या व्याख्या आहेत त्यात अगदी चपखल बसणारं हे ठिकाण. अथांग समुद्र, स्वच्छ ऊन,(वर्षाला सरासरी अडीचशे दिवस.

युरोपच्या मानाने खूपच) ताज्या मासळीचा आहार आणि सोबतीला वारुणी. या देशात असलेल्या अशा ११७ समुद्रकिनाऱ्यांवर एका दिवशी तीन लाख पर्यटक सामावू शकतात.

आमचा पडाव होता ‘बुडवा’ या किनारपट्टीवरील छोटेखानी गावात. (या नयनरम्य जागेसाठी हे विपरीत अर्थाचे नाव बहुदा तनासाठी नसून मनासाठी असावं.) या समुद्राच्या सौंदर्यात मन खरंच बुडून जातं. गडद निळ्या पाण्यात मध्येच हिरवट झाक, अक्राळ-विक्राळ नाही; तर शांत प्रेमळ लाटा, झुळझुळणारं शीतल वारं आणि पाणी मात्र कोमट. कधी नव्हे ते समुद्रस्नानासाठी उतरलो. शरीराचा भार समुद्राला बहाल केला. त्यानेही अगदी अलगदपणे उचलून धरलं. निरभ्र आकाशाकडे पाहत पाठीवर तरंगत राहण्याचा तो अनुभव मनाला अगदी ताजंतवानं करून गेला. समुद्राचं पाणी इतकं नितळ की वाटायचं पार तळ दिसतोय.

मनसोक्त डुंबून झाल्यानंतर बोटीने फेरफटका मारण्यासाठी सज्ज झालो. पाण्याच्या सतत माऱ्याने आणि लाव्हाच्या उफाळण्यामुळे डोंगरात तयार झालेल्या असंख्य कपाऱ्या पाहिल्या. जवळपासच्या छोट्या छोट्या बेटांभोवती फिरून आलो. आदल्या दिवशी पायी चालत पालथं घातलेलं जुनं शहर समुद्रातून खूप छान दिसत होतं. भिंतीचा कोट, चर्चचा मनोरा, किल्ल्याची इमारत, एका खडकावर असलेला कमनीय स्त्रीचा पुतळा, पर्वतांच्या उतरणीवर वसलेली लाल चुटुक कौलांची सुबक घरं, मावळत्या सूर्याचा पिवळा संधिप्रकाश, कातरवेळ, हुरहुरणारं मन आणि कंठातून निघालेली ‘ओ माझी रे’ ची लकेर.. यापेक्षा अधिक सुंदर काही असेल?

माझ्या मनीच्या या प्रश्नाला दुसऱ्या दिवशी प्रत्युत्तर मिळालं. कोटोरचा उपसागर! माऊंट लव्सेनच्या कुशीतून वरखाली जाणाऱ्या रस्त्यांनी वळणं घेत निलगिरी आणि पामच्या राईतून आम्हाला ‘सेटीने’ या प्राचीन राजधानीच्या शहरामार्गे कोटोरकडे प्रयाण करायचं होतं. कोटोरचा उपसागर हा जगातील तीस उत्कृष्ट बे व्ह्यू मधील एक आहे आणि युनेस्कोच्या वारसा यादीतही त्याला स्थान आहे. टर्कीच्या सुलतानाने हा प्रांत आपल्या ताब्यात घेण्यापूर्वी म्हणजे १८४२ पासून सेटीनेला राजधानीच्या शहराचा मान होता. आताची मॉन्टेनेग्रोची राजधानी आहे पोडगोरीका. त्या काळातील एक जुनं चर्च, एक मॉनेस्ट्री आणि राजवाडा तेथे अजून उभा आहे. राजवाड्यात आता मॉन्टेनेग्रोचं नॅशनल म्युझियम आहे. देशाचा मला फारसा ज्ञात नसलेला इतिहास इथे उलगडून ठेवलेला आढळला. इथल्या मॉनेस्ट्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुर्कांनी ती पाडली, नवी उभी राहिली. पुन्हा पाडली, पुन्हा बांधली. पहिला पीटर या मॉन्टेनेग्रोच्या अध्यात्मिक अधिशहाचे अवशेष इथे जपून ठेवले आहेत. त्या काळी धार्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेली ही वास्तू ! राजा आणि प्रजेचे सगळे बरे-वाईट निर्णय इथेच घेतले जात. सेटीनेहून निघालो आणि पुन्हा माउंट लव्सेनच्या अंगाखांद्यावरून वळणं घेत फिरू लागलो. सागरतीर गाठायचा म्हणजे आमच्या गाडीने डोंगरावरून खाली उतरायला हवं होतं; पण उताराचं नावच नाही. एकामागून एक चढण चढतोय. गाडी उंचच उंच चालली होती.

ड्रायव्हरला इंग्रजी जेमतेमच येत होतं. थोड्या वेळाने मला वाटायला लागलं की, बहुदा त्याची ऐकण्यात चूक झाली असावी. अगदीच धीर सुटायची वेळ आली; तेव्हा त्याच्या खांद्याला हात लावून त्याला थांबवत, इंग्रजीचे मोजके आणि ढोबळ शब्द सावकाशपणे उच्चारत आणि ठळक हातवारे करत सांगितलं,” बाबारे, आमचं गंतव्यस्थान कोटोर बे आहे.” तो आपला मान होकारार्थी हलवत “नो प्रॉब्लेम, गो कोटोर” म्हणत सफाईदारपणे गाडी हाकत राहिला. शंकेनं ग्रासलेलं मन बाहेरच्या सृष्टिसौंदर्यातही रमेना. आणि मग अचानक मरगळलेल्या मनाला एक जोरदार आचका बसला. गाडीवाल्याने ‘खाली बघा’ अशी खूण करत सराईतपणे गाडी डोंगरावरील रस्त्याच्या कडेला उभी केली. खालचं दृश्य पाहिल्यावर तोंडाने वासलेला आ मिटेचना. एक हात हृदयावर एक कानावर.. हे दृश्य पृथ्वीतलावरचं आहे? की स्वर्गातलं? केवळ अद्भुत ! उंच डोंगरमाथ्यावरून दिसत होता कोटोरचा निळाशार उपसागर ! सखे सोबती वाटावीत अशी त्यातली दोन मानवनिर्मित दगडी बेटं, त्यातील एकावर उभं असलेलं ‘लेडी ऑफ द रॉक्स’ हे चर्च, कडेकडेने असलेली कौलारू घरं, आणि राखणदार वाटावा असा सेंट जॉन हा ऐतिहासिक किल्ला. एखाद्या चित्रात शोभावं इतकं सुंदर रुपडं ! उगाच नाही त्याला ‘ऍड्रियाटिकची लावण्यवती नववधू’ म्हणत. कड्यावरून वळणं घेत घेत आमची गाडी आता समुद्राच्या दिशेनं खाली खाली जाऊ लागली. ते अद्भुत दृश्य आमच्याशी जणू लपंडाव खेळत होतं. शेवटी गाडी कोटोर गावात शिरली. एकेकाळी नदीचा प्रवाह जिथून वाहायचा त्या दरीत सागराचं पाणी शिरून कोटोरचा हा नयनरम्य उपसागर तयार झालाय. लव्सेनच्या गगनचुंबी शिखरांचं सौंदर्य जवळून निरखता यावं म्हणून जणू समुद्रानं वाट वाकडी केली असावी. जवळजवळ तीस किलोमीटर जमिनीत शिरलेला हा उपसागर त्या विशिष्ट उंचीवरून अप्रतिम दिसतो. कविहृदयास भावला की शब्दात प्रकटतो आणि चित्रकाराला आवडला की रंगात उतरतो. शास्त्रज्ञांना तो सतत प्रेरणा देत असतो आणि पर्यटकांना निर्भेळ आनंद ! या जागेवर चहुबाजूंनी मिलनाची साद ऐकू येते. आकाशाला गवसणी घालणारा मिलनोत्सुक सागर .. अभूतपूर्व !

कोटोरची स्वर्गभूमी सोडून समुद्राच्या कडेकडेने स्वेटी स्टीफनकडे निघालो. पहिल्याच दिवशी बुडवाच्या समुद्रकिनाऱ्यावरून आणि दुसऱ्या दिवशी नौकाविहारातून घेतलेलं त्या राजेशाही बेटाचं, त्यावरील त्या सप्ततारांकित रिसॉर्टचं लोभसवाणं दर्शन मनात ठसलं होतं. पूर्वी ही स्थानिक मच्छीमारांची वसाहत होती. साठ आणि सत्तरच्या दशकात एका धनिकाने ते पूर्ण बेटच विकत घ्यायचा मनसुबा रचला आणि तिथे सर्व आधुनिक सुखसोयीनीं परिपूर्ण असं एक प्रतिष्ठित रिसॉर्ट अमीर उमरावांसाठी बांधलं. पहाडाच्या कुशीत, निळ्या समुद्रावर तरंगत सूर्यस्नान करत असलेलं ते बेट अप्रतिम दिसतं. वाळूच्या एका अरुंद रस्त्याने हे मूळ भूमीशी जोडलेलं आहे. लाल कौलारू टप्पे असलेल्या ऐतिहासिक वाटाव्यात अशा इमारती, गुलाबीसर वाळूचा किनारा आणि चहूबाजूला असलेला निळाशार समुद्र या बेटाला खचितच रोमँटिक बनवतो. शाही जोडप्यानं त्यांचा शाही हनिमून साजरा करायला ही जागा सर्वतोपरी यथार्थ म्हणावी अशीच! मावळत्या सूर्याच्या साक्षीनं स्वेटी स्टीफनचं दर्शन घेत असताना मनात भावभावनांचं नृत्य चालू होतं. पक्षी बनून त्या वास्तूवरून घिरट्या घालाव्यात या मनातल्या इच्छेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. त्याच बरोबर आज मासोळी बनून निळ्याभोर समुद्रात सुरकांडी मारावीशी वाटत होती. सायंप्रकाशात सोन्यासारखं चमकावं असं वाटत असतानाच एका क्षणी अचानक सारी गात्रं शिथिल झाली. वाटलं या क्षणी निर्विकल्प बनून जावं.

सकाळी सेटीनेच्या राजवाड्यात काही कवींची पुस्तकं चाळत असताना एका कवीने रविराजाला उद्देशून लिहिलेल्या ओळी आठवल्या. तो म्हणतो, “अरे मावळत्या दिनकरा, हे अप्रतिम ओसंडतं सौंदर्य सोडून रोज संध्याकाळी घरी जाण्याचं धैर्य तू कुठून आणतोस रे?”

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू