अक्षररंग

आईच्या ओंजळीतून सुरु होणारी शाळा

अक्षरांच्या आधी मुलाला जगणं शिकवणारी पहिली शाळा म्हणजे आईचं कुशीतलं विश्व. तिच्या कष्टात, मायेच्या स्पर्शात आणि न बोललेल्या स्वप्नांतच लेकराच्या भविष्यातला उजेड दडलेला असतो.

नवशक्ती Web Desk

शिक्षणगुज

युवराज माने

अक्षरांच्या आधी मुलाला जगणं शिकवणारी पहिली शाळा म्हणजे आईचं कुशीतलं विश्व. तिच्या कष्टात, मायेच्या स्पर्शात आणि न बोललेल्या स्वप्नांतच लेकराच्या भविष्यातला उजेड दडलेला असतो.

मुलाचं शिक्षण नेमकं कुठून सुरू होतं? शाळेच्या पहिल्या घंटेतून? पाटीवरील पहिल्या अक्षरातून? की शिक्षकांच्या पहिल्या शिकवणीतून? नाही…

मुलाचं शिक्षण सुरू होतं आईच्या कुशीतून. जिथे अक्षर नसतं, पण अर्थ असतो… जिथे पुस्तक नसतं, पण अनुभव असतो… जिथे शाळा नसते, पण जगण्याची शिकवण असते… विशेषतः तांडा, आदिवासी पाडा, वाडी-वस्तीवरची आई -ती तर शिक्षणाची नोंद न झालेली पहिली विद्यापीठच असते. ती अक्षरशः निरक्षर असू शकते, पण जीवनाच्या विद्यापीठातून पदवी घेतलेली असते. ती मुलाला ‘अ’ शिकवत नाही, पण ‘अन्नाची किंमत’ शिकवते… ती ‘क’ शिकवत नाही, पण ‘कष्टाचं सौंदर्य’ शिकवते… ती ‘म’ शिकवत नाही, पण ‘माणूसपण’ जगून दाखवते…

मी अनेक वर्षे ऊसतोड कामगारांच्या लेकरांसोबत काम करताना असं असंख्य वेळा पाहिलं आहे. पहाटे चार वाजता उठणारी आई… चुल पेटवते… भाकरी थापते… लहान लेकराला कडेवर घेते… मोठ्याला शाळेत पाठवते… आणि स्वतः उसाच्या फडात निघून जाते… स्वतःच्या पायात चप्पल नसते, पण लेकराच्या वहीसाठी ती दोन दिवस जास्त मजुरी करते. तिला ‘शिक्षणाचा अधिकार’ माहीत नसतो, पण 'माझं लेकरू माझ्यासारखं राहू नये' ही तिची जिद्द असते.

रामनगर तांड्यावरची आमची काजल…आज डॉक्टर होण्याच्या स्वप्नाच्या अगदी जवळ उभी आहे. गरीब घर… असंख्य अडचणी…संसाराचा भार… पण तिच्या आईच्या डोळ्यांत मात्र नेहमी एकच स्वप्न होतं - 'माझी लेक डॉक्टर व्हावी…' तिने स्वतःच्या इच्छा मारल्या. नवीन साडी टाळली. उत्सव टाळले. पण मुलीच्या शिक्षणाबाबत कधी तडजोड केली नाही. काजलच्या प्रत्येक यशामागे तिच्या आईचा घाम आहे… तिच्या उपाशी राहिलेल्या रात्री आहेत… आणि तिच्या न बोललेल्या प्रार्थना आहेत. आज काजल डॉक्टर बनण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, पण खरं तर तिच्या आईचंच स्वप्न पांढरा कोट घालणारं आहे.

ममता… हीसुद्धा तांड्यावरचीच लेक. तिची आई आजही कष्टाची परिसीमा गाठत आहे. दिवसभर मजुरी… रात्री संसार… आणि प्रत्येक श्वासात एकच वाक्य -'माझी ममता मोठी डॉक्टर झाली पाहिजे…' ती स्वतः थकते, पण मुलीला थकू देत नाही. ती स्वतः अंधार सहन करते, पण मुलीच्या आयुष्यात उजेड हवा म्हणून झगडते.

आईचं हे स्वप्न किती निःस्वार्थ असतं ना… स्वतःसाठी काहीच नाही, सगळं लेकरासाठी.

कल्याणीची आई… मुंबईत हाताला मिळेल ते बिगारी काम करते. सिमेंट, वीट, वाळू, धूळ… या सगळ्यात दिवस घालवते. तिच्या हातांवर चिरा आहेत, पण मनात आशेची फुलं आहेत. ती म्हणते - “मी आयुष्यभर विटा उचलल्या गुरुजी… पण माझ्या लेकरीने पुस्तकं उचलावीत…”

किती मोठं वाक्य आहे हे! तिच्या हातात शिक्षणशास्त्र नाही, पण शिक्षणाचं खरं तत्त्वज्ञान आहे. ती स्वतः उन्हात जळते, पण मुलीच्या भविष्यासाठी सावली बनते. एकदा एका आईने मला सांगितलं - “गुरुजी, मला सही करता येत नाही… लोकांसमोर अंगठा द्यावा लागतो… माझ्या पोरीच्या हातात पेन द्या… तिच्या नशिबात अंगठा नको…” त्या एका वाक्यात संपूर्ण शिक्षणाचा अर्थ सामावला होता. प्राथमिक शिक्षणात आईची भूमिका फक्त मुलाला शाळेत पाठवण्यापुरती नसते… ती मुलाच्या मनात शाळेविषयी विश्वास निर्माण करते.

“जा रे शाळेत… गुरुजी आहेत…” या एका वाक्यात आई मुलाला भीतीतून विश्वासाकडे नेत असते. ती अभ्यास घेत नाही, पण अभ्यासासाठी वेळ जपते. ती गृहपाठ तपासत नाही, पण गृहपाठासाठी दिवा जपते. घरात अंधार असला, तरी मुलाच्या भविष्यात उजेड असावा, ही तिची प्रार्थना असते.

आदिवासी पाड्यावरची एक आई मुलाला रोज शाळेत पाठवताना त्याच्या खिशात एक छोटा दगड ठेवायची. मी विचारलं, “हे कशासाठी?”

ती म्हणाली - “गुरुजी, हा दगड नाही… ही आठवण आहे… वाईट वाटलं की हातात धर, आई सोबत आहे असं वाटेल…” त्या दिवशी मला समजलं - शिक्षण फक्त मेंदूचं नसतं, ते भावनांचंही असतं.

आज आपण मातृदिन साजरा करतो. फोटो लावतो… शुभेच्छा देतो… स्टेटस ठेवतो… पण तांड्यावरची आई मदर्स डे साजरा करत नाही… ती तो रोज जगते. तिच्या हातावर मेंदी नसते, फोड असतात. तिच्या गळ्यात दागिने नसतात, जबाबदाऱ्या असतात. पण तिच्या डोळ्यांत एकच स्वप्न असतं - “माझं लेकरू शिकावं…” ही आई फक्त मुलाला जन्म देत नाही… ती त्याच्या भविष्यासाठी स्वतःला पुन्हा जन्म देते. शाळेच्या उंबरठ्यावर जेव्हा एखादं लेकरू पहिलं पाऊल टाकतं, तेव्हा खरं तर आईचंच स्वप्न वर्गात प्रवेश करत असतं. म्हणूनच शिक्षक म्हणून मला नेहमी वाटतं.

प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असतो - हे खरं आहे… पण त्याही आधी एक आई असते… जी स्वतः अंधारात उभी राहून लेकरासाठी उजेड जपते. आणि म्हणूनच आई ही फक्त पहिली गुरु नसते… ती मुलाच्या शिक्षणाची पहिली शाळा असते....

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत.

yuvrajmane892@gmail.com

Mumbai : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ड्रोन शो; शिवाजी पार्क परिसरातील 'हे' रस्ते आज राहणार बंद, वाचा सविस्तर

LIC स्वतःच पुनर्विकास करण्यास इच्छुक; धोकादायक इमारतींबद्दल म्हाडाबरोबर झाली बैठक

कुंभमेळाप्रकरणी व्यापक आरोग्य यंत्रणा उभारणार; घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये खाटांमध्ये वाढ

Mumbai : ऑरेंज गेट टनेल प्रकल्पाला वेग; २५० मीटर भूमिगत बोगद्याचे खोदकाम यशस्वीरीत्या पूर्ण

महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांची चव न्यारी; BMC च्या कार्यालयात दोन दिवस 'वाळवण महोत्सव'