अक्षररंग

मातृशक्तीचा जागर

मातृशक्ती दुर्बल होते वा जिथे मातृसंस्कारांचा अभाव निर्माण होतो, तिथे लहरी, जुलमी हुकूमशाही प्रवृत्ती उदयाला येते. जगाला विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या या हुकूमशाही प्रवृत्तीवर मात करायची असेल, तर आज जागतिक 'मदर्स डे'च्या निमित्ताने गरज आहे ती मातृशक्तीच्या, मातृसंस्कारांच्या जागराची.

नवशक्ती Web Desk

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

मातृशक्ती दुर्बल होते वा जिथे मातृसंस्कारांचा अभाव निर्माण होतो, तिथे लहरी, जुलमी हुकूमशाही प्रवृत्ती उदयाला येते. जगाला विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या या हुकूमशाही प्रवृत्तीवर मात करायची असेल, तर आज जागतिक 'मदर्स डे'च्या निमित्ताने गरज आहे ती मातृशक्तीच्या, मातृसंस्कारांच्या जागराची.

आजच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या जगात चोहोबाजूंनी विळखा घातलेल्या समस्यांकडे पाहिले, तर मन अगदी विषण्ण होते. एकीकडे विज्ञानाने प्रगतीचे आकाश व्यापले आहे. दुसरीकडे हवामान बदलाचे गहिरे संकट दाटले आहे. तिसरीकडे युद्धाचे विनाशकारी ढग जमले आहेत. रशिया-युक्रेन, इराण-इस्रायल असो वा जगाच्या इतर कानाकोपऱ्यांमधील सत्तासंघर्षात निरपराध मानवी रक्ताचे पाट वाहताना दिसत आहेत. या जागतिक अशांततेमागे, असहिष्णूतेमागे, देशांतर्गत पसरलेल्या जाती-धर्माच्या वादंगांमागे एक प्रबळ कारण दडलेले आहे, ते म्हणजे दुर्जनांचा 'अहंकार', दुर्बलांवर वर्चस्व गाजवणाऱ्या या हुकूमशाही प्रवृत्ती जगाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहेत. ज्या समाजात स्त्री वर्गाच्या विचारांची कदर केली जात नाही किंवा त्यांच्यातील संयम आणि करुणेला डावलले जाते. तिथे हिंसेची बीजे अधिक जोमाने फोफावतात. जगाच्या आणि जगण्याच्या चिंतेचे मूळ कारण हेच आहे की, आपण सृजनाच्या शक्तीला विसरून विनाशकारी शक्तीच्या मागे फरफटत चालले आहोत. जेव्हा सत्तेची हाव आणि वर्चस्व गाजवण्याची वृत्ती उफाळून येते, तेव्हा माणुसकीची मूल्ये पायदळी तुडवली जातात. सध्याच्या दंगली, युद्धसदृश वातावरणातील भळभळणाऱ्या जखमांवर मायेची शीतल फुंकर घालू शकते, ती केवळ मातृशक्तीच.

आपल्या देशाचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर आज राष्ट्रपतीपदी महामहीम द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. तथापि, त्या ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्या जल, जंगल आणि जमिनीचे राखणदार असलेले आदिवासी बांधव आजही विस्थापितांचे जीवन जगत आहेत, मणिपूरसारख्या राज्यात होणारा वांशिक संघर्ष नाही तिचे अस्तित्ালনা असो किंवा देशात महिलांवर होणारे वाढते अत्याचार, हे सर्व आपल्या संस्कृतीच्या ढासळत्या व्यवस्थेचे निदर्शक आहेत.

लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेच्या किंवा भव्य मंदिरांच्या उद्घाटन सोहळ्यांना बडे उद्योगपती, बाबा-बुवा-महाराज आणि सेलिब्रिटींना मानाचे स्थान दिले जाते, पण त्याचवेळी देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींना डावलले जाते, तेव्हा घडते ते मनमानी मानसिकतेचे ओंगळवाणे दर्शन, ही मानसिकता व्यवस्थेमध्ये मुरलेली आहे, जिथे मातृसंस्कारांपेक्षा बाह्य डामडौलाला अधिक महत्त्व दिले जाते.

आईच्या मायेची आणि त्यागाची महती सांगणारी एक दुर्घटना नुकतीच मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडली. तेथील बारगी धरणात एक बोट उलटली, तेव्हा बचाव पथकाला आईच्या घट्ट मिठीत असलेला एक लहानगा सापडला. स्वतःचा जीव जात दिलेली ती घट्ट मिठी, हेच आईच्या असीम त्यागाचे सर्वोच्च प्रतीक आहे. असतानाही आपल्या बाळाला वाचवण्यासाठी कधी मुलगी, बहीण, पत्नी, सून, काकी, मामी, मैत्रीण, प्रेयसी असा काळजीवाहू नात्यांचा सुंदर मिलाप म्हणजे आई. आईला कुणी 'मदर' म्हणो, 'माँ' म्हणो किंवा 'अम्मा', त्या शब्दातील सुंदरता आणि ओलावा कधीच कमी होत नाही. आजच्या कृत्रिम बुद्धिवंतांच्या युगातही आपण 'मदरबोर्ड' शिवाय संगणकाची कल्पना करू शकत नाही. आई केवळ जन्मदात्री नाही, तर ती मानवी जीवनाचे पहिले 'ज्ञानपीठ' आहे. ती स्वतः अर्धपोटी राहून आपल्या बाळाला काऊ-चिऊचे घास भरवते. बाळाच्या निजसोहळ्यासाठी स्वतःच्या झोपेचा त्याग करते. स्वतःचे आजारपण आणि दुःख बाजूला सारून चंदनाप्रमाणे घरसंसारासाठी झिजते ती आई. ती असते दुसऱ्याच्या वेदनेने व्याकुळ होणारी कारुण्यमूर्ती. ती जात, धर्म, प्रांत आणि पंथाच्या पलीकडे असते; कारण तिच्या ठायी नसतो भेदभाव. आईचा दिवस सूर्योदयाआधी सुरू होतो आणि सूर्यास्त झाला तरी संपत नाही. तिचे अस्तित्व म्हणजे खळाळता उत्साह, परमोच्च आनंद आणि घराचे चैतन्य.

खरे तर, घर ही जगाची छोटी प्रतिकृती असते. आपले घर स्वच्छ, नीटनेटके आणि टापटीप ठेवायचे असेल, तर आपण आईकडेच पाहतो. घरात काय हवे, काय नको, आर्थिक नियोजन कसे असावे, सण-उत्सवांची पूर्वतयारी कशी असावी, या सर्व गोष्टींत आईचा शब्द अंतिम असतो. ती केवळ घरगाडा हाकत नाही, तर ती घराची 'आर्थिक आणि नैतिक कणा' असते. घराचे व्यवस्थापन एवढ्या कुशलतेने आई करू शकते, तर मग सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांत तिच्या जीवनमूल्यांचा अंतर्भाव का नसावा ? जिथे मातृसंस्कारांचा अभाव जाणवतो, तिथेच युद्धाची आणि संघर्षाची बीजे अंकुरतात. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना भांडताना पाहून त्यांना प्रेमाने एकत्र आणते, तशीच तिची सयंत, संयमी, सहनशील, सहानुभूती, सहिष्णुतेची सर्वसमावेशक भूमिका आज आजच्या काळातील माता अधिक 'स्मार्ट' झाल्या आहेत. एका हातात मूल्यसंस्कारांचे पुस्तक, दुसऱ्या हातात स्वयंपाकघर, तिसऱ्या हातात घरव्यवस्थापन आणि चौथ्या हातात कार्यालयीन कर्तव्ये पेलणारी ही अष्टावधानी आधुनिक दुर्गा आहे. ती आदिशक्ती आणि आदिमाया आहे. ती कोलमडली, तर संपूर्ण घर आणि समाज उन्मळून पडायला वेळ लागणार नाही. ती आजारी पडली की सारे घर हताश होते. ती हसली की संपूर्ण घराचाच होऊन जातो आनंदाचा सुखसोहळा.

स्वयंपाकघरापासून ते अंगणापर्यंत आणि कार्यालयापासून ते समाजापर्यंत सर्व काही स्थिरस्थावर करण्याचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही ती लीलया पेलते, म्हणूनच तिला 'घर व्यवस्थापन गुरू' मानले जाते. तिचे 'असणे' हेच आहे जगण्याची उर्मी जागवणारे.

आई म्हणजे समता, शुद्ध आचार-विचार, शिस्त व संस्कारांची मातृशाळा. नात्यांचा एकोपा. माया-ममता, समतेची मायबोली. जिद्द, परिश्रम, संघर्षाची गौरवगाथा. सेलिब्रिटींची सेलेब्रिटी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगण्याचे आत्मबळ देणारे टॉनिक. निस्सिम प्रेम, त्यागाची वात्सल्य मूर्ती. आनंद व सुखाची गॅरंटी.

ज्ञानेश्वर माऊलींचे विश्व कल्याणाचे पसायदान, जे 'मदर्स डे'च्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्षात उतरवता येऊ शकेल. 'मदर्स डे' हा केवळ वर्षातील एका दिवसाचा सन्मान नाही, तर तो स्त्रीच्या अभिव्यक्तीचा, सामर्थ्याचा आणि मार्गदर्शनाचा सातत्याने होणारा गौरव असायला हवा. आज जगाला गरज आहे ती घराप्रमाणेच देशाची आणि समस्त मानवजातीची काळजी घेणाऱ्या 'जगन्मातेच्या' विशालहृदयी दृष्टिकोनाची. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जेव्हा विरोधकांनी 'दुर्गा' म्हटले, तेव्हा त्यामागे मातृशक्तीची प्रेरणा होती. या अशा एक ना अनेक महिला नेत्यांनी भारतीय राजकारणाला नवा आयाम दिला आहे. आई ही संकल्पना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून ती समाज आणि राष्ट्राचा पाया आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत मातृशक्तीचे योगदान मोलाचे राहिले आहे. इतिहासाकडे वळून पाहिले तर लक्षात येते की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे किंवा महान कार्यामागे मातृशक्तीची प्रेरणा उभी होती. जेव्हा रयतेवर अत्याचार वाढले, तेव्हा राजमाता जिजाऊंनी शिवबांना घडवले आणि स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. जेव्हा वर्णसंघर्ष तीव्र झाला, तेव्हा पुतलीबाईंच्या संस्कारांनी महात्मा गांधींना सत्य-अहिंसेच्या मार्गाचे, सत्याग्रहाचे आत्मबळ दिले. चिमणाबाईंच्या संस्कारांनी महात्मा फुलेंना चिमणाबाईंच्या संस्कारांनी महात्मा फुलेंना शैक्षणिक व सामाजिक क्रांतीसाठी सिद्ध केले, तर भीमाईने आपल्या भीमाला माणुसकीने जगण्याची शिकवण देऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार केले. आई ही केवळ संघर्षाची जननी नाही, तर ती सहनशीलतेची शिरोमणी आहे. तिच्या आभाळमायेत दुर्दम्य आंतरिक शक्ती आणि मातृत्वाचा मुक्त आविष्कार आहे. ती उत्तुंग यशाचे प्रेरणास्थान आहे आणि मान-सन्मानाचे सर्वोच्च शिखरही. आईच्या उबदार कुशीत मानवी जीवनाचे सारे सुख सामावलेले आहे. एका दुर्गेने युद्ध जिंकले आहे, एका सावित्रीने शिक्षणाचे दार उघडले आहे आणि एका आईने जगाचा उद्धार केला आहे; म्हणूनच आई हे व्यक्तीचे नाव नसून, ते देवघरातील ईश्वराचे दुसरे नाव आहे. त्या मातृशक्तीला 'मदर्स डे'च्या निमित्ताने मनोमन प्रणाम !

prakashrsawant@gmail.com

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार