

मुंबई : मुसळधार पावसात धावत्या लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२३) रात्री घडली. अंधेरी ते बोरिवली स्थानकांदरम्यान चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर आरोपी लोकल थांबण्यापूर्वीच फरार झाला असून, शासकीय रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
प्रथम श्रेणीच्या डब्यात झाला वाद
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मृत तरुण मयंक लोहार हा मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत होता. अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याचा दुसऱ्या एका प्रवाशासोबत वाद झाला.
वाद वाढल्यानंतर पोटात चाकूने वार
हा वाद वाढल्यानंतर आरोपीने मयंकच्या पोटात चाकूने वार केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात मयंक गंभीर जखमी झाला. रात्री सुमारे ११ वाजून ०४ मिनिटांनी लोकल बोरिवली स्थानकात पोहोचली. मात्र, गाडी पूर्णपणे थांबण्यापूर्वीच आरोपीने तेथून पळ काढला.
आरपीएफ आणि जीआरपीकडून तातडीची मदत
लोकल बोरिवली स्थानकात दाखल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि शासकीय रेल्वे पोलिसांचे कर्मचारी काही मिनिटांत संबंधित डब्यात पोहोचले. तेव्हा मयंक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
त्याला डब्यातून बाहेर काढण्यासाठी तातडीने स्ट्रेचर आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्याला बोरिवली स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आले.
शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मयंकला पुढील उपचारांसाठी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे तपासासाठी ताब्यात
पश्चिम रेल्वे प्रशासनाने घटनेशी संबंधित सीसीटीव्ही चित्रफीत आणि इतर पुरावे ताब्यात घेऊन तपास यंत्रणांकडे पाठवले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रभर या घटनेवर लक्ष ठेवले होते.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, जखमी प्रवाशाला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने प्राधान्य दिले.
आरोपीचा शोध सुरू
शासकीय रेल्वे पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनेच्या वेळी डब्यात उपस्थित असलेल्या प्रवाशांचे जबाब नोंदवले जात असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.