

मुंबई : बुधवारी (दि. २४) सकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे बाहेर पडल्या होत्या. यावेळी त्यांच्या समोरच एक सफाई कर्मचारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या महापौरांनी संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेत कठोर शब्दांत सुनावले. शहरात कोणताही मॅनहोल उघडा आढळल्यास त्या वॉर्डातील जबाबदार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
नैऋत्य मोसमी पावसाचे मंगळवारी मुंबईत आगमन झाले. नेहमीच्या आगमनाच्या तारखेपेक्षा जवळपास दोन आठवडे उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने शहरात जोरदार हजेरी लावली. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले, वाहतूक विस्कळीत झाली आणि काही ठिकाणी नुकसानही झाले. शहरात भिंत कोसळण्याची घटनाही घडली.
महापौर रितू तावडे यांनी दादर, हिंदमाता आणि गांधी मार्केट परिसरात सकाळी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान बीएमसीशी संबंधित एक सफाई कर्मचारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला. या घटनेनंतर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला. कोणताही मॅनहोल उघडा आढळल्यास निलंबनासह कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कचरा काढण्यासाठी मॅनहोलचे झाकण हटवले होते
या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाल्या की, नाल्यातील कचरा काढण्यासाठी मॅनहोलचे झाकण हटवण्यात आले होते.
"त्या व्यक्तीने 'खबरदारी'चा फलकही वाचायला हवा होता आणि मॅनहोलभोवती लावलेले बॅरिकेड्सही पाहायला हवे होते. फलकावर स्पष्टपणे 'खबरदारी घ्या' असे लिहिले असताना नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी. मुंबईकरांनी बीएमसीकडून लावण्यात येणाऱ्या सूचना आणि फलक वाचावेत, असे माझे आवाहन आहे," असे तावडे म्हणाल्या.
रस्त्यांवरील साचलेले पाणी काढण्यासाठी अनेक पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच नाले तुंबवणारा कचराही काढला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. "बृहन्मुंबई महानगरपालिका युद्धपातळीवर काम करत आहे," असेही त्या म्हणाल्या.
१२ तासांत अतिवृष्टीची नोंद
मंगळवारी रात्री ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या १२ तासांत शहरातील राम मंदिर, कुलाबा आणि सांताक्रूझ या तीन केंद्रांवर अतिवृष्टीची नोंद झाली. २०४.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास त्याला अतिवृष्टी मानले जाते.
कुलाबा येथे सर्वाधिक २४७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ राम मंदिर येथे २३८ मिलिमीटर, तर सांताक्रूझ येथे २२४.८ मिलिमीटर पाऊस झाला.
सायन, विक्रोळी, विद्याविहार, टाटा पॉवर चेंबूर, भायखळा आणि वांद्रे येथे ११५.६ ते २०४.४ मिलिमीटरदरम्यान अतिजोरदार पावसाची नोंद झाली.
विक्रोळीत भिंत कोसळली, कारवर झाड पडले
मुसळधार पावसामुळे विक्रोळी पश्चिम येथील एका निवासी इमारतीलगतची भिंत कोसळली. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील सन सिटी कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली. तर शहरातील अन्य एका भागात कारवर झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.