प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
जिच्या हातच्या घासात माया, शिस्त, संस्कार आणि निःस्वार्थ प्रेमाची चव मिसळलेली असते, ती आपल्या आयुष्याची सर्वात मोठी अन्नपूर्णा असते. मदर्स डेच्या निमित्ताने, आईच्या हातच्या त्या अविस्मरणीय चवींची ही आठवण…
नास्ति मातृसमा छाया,
नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राणं,
नास्ति मातृसमा प्रिया।।
आज मदर्स डे, आपल्या उदरात गर्भाचा नऊ महिने सांभाळ करून, पुढे जन्म झाल्यापासून लेकरू आपल्या पायावर उभं राहीपर्यंत जी निःस्वार्थ प्रेमाची, मायेची, शिस्तीची, संस्कारांची आणि उदरभरणाची सावली धरते ती आई. आपण मात्र नेहमीच तिला गृहित धरतो, अनेकदा तिच्या महत्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतो. अगदी एखाद्या दिवशी जरी आपल्या पानात आवडीचा पदार्थ नसला तरी वैतागतो.
आज मदर्स डेच्या निमित्ताने, मी या साप्ताहिक खाद्यस्तंभाच्या माध्यमातून माझ्या आईच्या हाताच्या चवीबद्दल लिहिणार आहे. अर्थात प्रत्येक पुरुषाला आपल्या आईच्या हाताची चव(बायको येईपर्यंत)जगात एक नंबर वाटत असते. माझी आई सुद्धा अगदी सुगरण होती. तिचा हात अन्नपूर्णेचा होता. तिने रांधलेला साधा आमटी भातही चवदार व्हायचा, कारण निगुतीने केलेल्या तिच्या स्वयंपाकाला अमृताची चव असे.
मला आठवतंय, दिवाळी आठ दिवसांवर आली की आईचा साग्रसंगीत फराळ सुरू व्हायचा. तीन प्रकारचे लाडू , चकली, करंज्या, अनारसे, कडबोळी, शेव असा सगळा फराळ ती न कंटाळता बनवायची. परंतु त्या फराळात तिने बनवलेली बाकरवडी म्हणजे काय सांगू महाराजा? आमचे अनेक नातलग, मित्रमंडळी, परिचित आईच्या हाताच्या या खुसखुशीत, तिखट (सोबत चहाचा घोट) बाकरवडीचे जबरदस्त फॅन होते. तिच्यानंतर या बाकरवडीची कृती ना कुणी लिहून ठेवली, ना
कुणी करण्याचा प्रयत्न केला. खरच सांगतो, आईच्या हाताच्या या बाकरवड्या जर मार्केटमध्ये विक्रीसाठी आल्या असत्या तर नक्कीच खवय्यांनी त्या डोक्यावर घेतल्या असत्या.
संकष्टी चतुर्थीला आईचा सोवळ्याने स्वयंपाक व्हायचा. आईचा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आम्हा कुणालाही किचनमध्ये प्रवेश नसे की आईला स्पर्श करता येत नसे. पूजा आरती होऊन चंद्रोदय झाल्यावर देवाला आणि चंद्राला नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसायचो. केळीच्या पानावर वाढलेल्या त्या दिवशीच्या जेवणाला एक वेगळीच चव असायची. सोबत उकडीचे मोदक, डाळीची आमटी, पिकलेल्या केळयाचं दह्यातील मिरची लावलेलं गोड रायतं, वरण भात त्यावर साजूक तुपाची धार, पंचामृत, पोळी भाजी असा साग्रसंगीत स्वयंपाक असायचा. हा सगळा स्वयंपाक शिवराख म्हणजे कांदा लसूण शिवाय केलेला असे. त्या दिवशीच्या आईच्या हाताच्या जेवणाला एक वेगळीच चव यायची. ते सुंदर वाढलेलं केळीचं पान, पाटावर बसलेली आमची पंगत आणि अगदी प्रेमाने वाढणारी आई हे चित्र आजही माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे.
सामिष पदार्थही आई तितकेच चविष्ट बनवायची. आम्ही गौड सारस्वत ब्राह्मण म्हणजे मासेप्रेमी. मंगळवार, गुरुवार, शनिवार हे वार सोडून राहिलेल्या वारांना, नेहमीच नाही पण अधून मधून आई स्वतः मासळी बाजारात जाऊन मासे घेऊन येत असे. आईला चांगल्या ताज्या माशांची परीक्षा उत्तम होती. घरात एक मी सोडलो तर सगळेच मासे खाणारे. आईच्या हाताची नारळाचा रस घालून केलेली दूरदूरीत चवदार माशांची किंवा कोळंबीची आमटी, बांगड्यांची उडदामेथी, चुरचुरीत तळलेलं पापलेट, सरंगा खाणं म्हणजे ब्रम्हानंद होता.
आमचं कुलदैवत लक्ष्मी नृसिंह. कुलदैवताचा वार शनिवार, त्यामुळे श्रावण महिन्यात दर शनिवारी आमचा उपास असायचा आणि तो सोडताना काकडीचं धोंडस, अळुवड्या, खीर, तळणीचे मोदक, असं आईच्या हातचं एक गोड पक्वान्न जेवणात असायचंच. मुळात आईला विविध पदार्थ बनवायला आणि ते घरच्या मंडळींसोबत इतरांनाही खाऊ घालायला मनापासून आवडायचं.
माझ्या लहानपणी आमच्या लहानशा घरात, अनेकदा पाहुणे, नातलग अगदी हक्काने राहायला यायचे, आणि आईच्या पाहुणचाराला अगदी ऊत यायचा. त्या काळात प्रायव्हसी या शब्दाचा जन्म झालेला नव्हता, त्यामुळे आपली स्वतःची स्पेस, माझी रूम असं काहीच नव्हतं. आलेले पाहुणे आनंदात राहून जायचे, आणि त्यांचा पाहुणचार आईच्या हाताखाली अगदी साग्रसंगीत व्हायचा. थोडक्यात तेव्हा घरं लहान होती पण मन आणि हृदय विस्तारलेली होती. माणसांची असोशी होती.
आई शाकाहारी स्वयंपाक उत्तम करायची पण तिला स्वतःला मांसाहारी पदार्थ आणि त्यातही मासे बनवायला, खाऊ घालायला आणि खायला मनापासून आवडायचं. अगदी आयुष्याच्या उत्तरार्धात ती कॅन्सरने आजारी असताना तिला फारशी खाण्या जेवण्याची इच्छा होत नसे, पण तब्येत जरा बरी असली आणि माशाची आमटी भात एखादा तळलेला माशाचा तुकडा असला की दोन घास जायचे पोटात.
लहानपणी मी प्रचंड आईवेडा होतो. मी आईच्या हातचा मार खाल्ला तेव्हढा वडिलांच्याही हातचा खाल्ला नाही. ती एक उत्तम शिक्षिका होती...म्हणजे तिची शिकवण्याची पद्धत फार छान होती. माझा माध्यमिक विभाग म्हणजे अगदी सातवीपर्यंत तीच अभ्यास घ्यायची. .तिच्याशिवाय माझं पान हलत नसे.
माझे मनोरुग्ण असलेले आणि वडिलांनी सगळे उपचार करूनही आयुष्यभर त्याच स्थितीत राहिलेले सख्खे काका आमच्याच घरी होते. भावाला माणसात आणायचं,या वडिलांच्या ध्यासाला माझ्या आईने तशीच साथ दिली म्हणून ते सगळं निभावून नेऊ शकले. वेड्या भावासाठी भावाने आयुष्यभर केलं हे मोठं आहेच, पण आपल्या नवऱ्याचा प्रामाणिक हेतू जाणून , काहीही तक्रार न करता त्याला तितकीच खंबीर साथ देणारी आणि या सगळ्यात आम्हा मुलांची जराही आबाळ होऊ न देणारी माझी आई त्याहून मोठी.
आमचं संपूर्ण घर, कुटुंब निगुतीने सांभाळणारी आई आजही डोळ्यांसमोर तशीच उभी आहे. कॅन्सरच्या उपचारांनी तिच्या शरीराची पार दैना होऊन गेली. अर्थात आजार लक्षात आला तेव्हाच तो अँडव्हान्स स्टेजला गेलेला होता.
आयुष्यभर पदर खोचून खंबीरपणे, उत्साहाने, हसतमुखाने उभी राहिलेली आई त्या अखेरच्या जीवघेण्या आजारातच मी झोपलेली आणि पार कंटाळून, कोलमडून गेलेली पाहिली.
kprasad1959@gmail.com