जगतवारी
मेधा आलकरी
किंगकाँगच्या पडद्यावरील प्रतिमेपासून ते रवांडाच्या जंगलातील प्रत्यक्ष भेटीपर्यंतचा पर्वतीय गोरिलाचा प्रवास थक्क करणारा आहे. विरुंगा पर्वतरांगांमध्ये केलेल्या ट्रेकमध्ये या दुर्मीळ आणि शांत जीवांच्या जगाचा जवळून घेतलेला हा अनुभव.
आमच्या लहानग्या वयात आम्ही किंगकाँग सिनेमात आठ फुटांचा गोरीला पाहिला होता. दोन पायांवर चालत, वळलेल्या मुठींनी छाती बडवत तो गर्जना करायचा. लहानपणी मनात ठसलेली ही प्रतिमा त्या महाकाय गोरिलाला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा उजळून निघाली. रवांडा या देशातून हा गोरिला ट्रेक केला तेव्हा त्याच्याबद्दल खूप वेगळी आणि मौलिक माहिती मिळाली होती.
पर्वतीय गोरिला हा मर्कट जातीतला एक अनोखा प्राणी! जगभरात फक्त हजाराच्या आसपास उरलेल्या या प्राण्यांचं वास्तव्य पूर्व आफ्रिकेतील उत्तर रवांडा, युगांडा आणि कांगो या तीन देशांच्या सीमाप्रदेशात असून त्यातील जवळ जवळ अर्धे गोरिला रवांडा येथील ‘वोल्कॅनो नॅशनल पार्क’मध्ये आढळतात. तिथे जाऊन विरुंग नावाचा पर्वत चढून, बांबूच्या वनात विसावलेल्या या गोरिलाच्या कुटुंबाला पाहणं हा एक मुलखावेगळा अनुभव आहे.
या प्रवासाची तयारी मात्र खूप आधीपासून करावी लागते. गोरिलाभेटीचे परवाने मर्यादित संख्येत असल्यामुळे त्याची शाश्वती असल्याशिवाय प्रवासास निघूच नये. हे परवाने रवांडा डेव्हलपमेंट बोर्डाकडून दिले जातात. रवांडातील ट्रॅव्हल एजंटही ते तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतात. हे सगळे सोपस्कार वेळेआधीच आटोपून आणि तनमनाला या भेटीसाठी तयार करून आम्ही रवांडा गाठलं. वोल्कॅनो नॅशनल पार्क हे एक मोठं जंगलच आहे. गोरिलांची आठ कुटुंबं तिथे वास्तव्यास आहेत. पैकी पाच कुटुंबांना पर्यटक भेट देऊ शकतात. बाकी तीन कुटुंब संशोधनासाठी राखीव आहेत. प्रत्येक कुटुंबाची संख्या वेगळी. काही अगदी पर्वताच्या शिखराशी वास्तव्य करून आहेत तर काही मध्यावर. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग हा कमी-अधिक अंतराप्रमाणे सुकर वा दुर्गम होत जातो. गोरिलांच्या ‘उमुबानो’ कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्हाला तब्बल अडीच तासांचा दमछाक करणारा ट्रेक करावा लागला. नॅशनल पार्कच्या पर्यटन केंद्रातून आपल्याला एक निष्णात रेंजर गाइड दिला जातो. आपल्या पेशात पदवीधर आणि निपुण अशा या गाइडवरच आपली सारी भिस्त असते. प्रत्येक ग्रुपमध्ये फक्त आठ जण असतात, याचा अर्थ दर दिवशी फक्त चाळीस पर्यटक गोरिला भेटीला जाऊ शकतात. माणसांच्या सान्निध्यामुळे गोरिलाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे ही दक्षता घेतली जाते.
टेकडी चढायला सुरुवात केली तेव्हा वाट धुक्यात हरवली होती. गुलाबी गारवा होता. मात्र जसजशी उंची गाठत गेलो तसतसे घामाने भिजलेले कपडे पाठीवरच्या बॅगेत कोंबायला सुरुवात केली. भुसभुशीत जमिनीचा अंदाज घेत, काठ्यांवर भार देत, झाडांच्या बुंध्यांवरून लोंबकळत, लोंबत्या वेलींचा गुंता सोडवत, कधी मोकळ्या तर कधी घनदाट जंगलातून आमची चढउतार चालू होती. आमचा गाइड वाटेतील वृक्षवल्लींबद्दल, वनचरांबद्दल उपयुक्त माहिती पुरवत होता. गोरिला तर त्याचा अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय! त्याने प्रथम गोरिलांसमोर वावरताना काय काय काळजी घ्यायची ते सांगितलं आणि त्याही आधी काय करायचं नाही हे अतिशय विनोदी पद्धतीनं सांगितलं.
खास या भेटीसाठी लांबलांबून आलेल्या उत्सुक पर्यटकांना तो कळकळीची विनंती करत होता की तुम्ही या शांत प्राण्याला अजिबात घाबरू नका. त्यांच्या नैसर्गिक निवासात त्यांना पाहायचा पुरेपूर आनंद लुटा. पर्वतीय गोरिला हा खरं तर शांतताप्रिय, कुटुंबवत्सल आणि अनाक्रमक स्वभावाचा प्राणी. मात्र त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेला धोका असल्याची नुसती शंका जरी त्याला आली तरी तो चवताळून ‘मी काय करू शकतो’ याची एक झलक दाखवतो. म्हणूनच त्याच्यात आणि तुमच्यात सात मीटरचं सुरक्षित अंतर हवं. या त्याच्या कानमंत्राला विनोदी टिपण्णी जोडत तो पुढे म्हणाला, पण हा नियम गोरिलाला लागू नाही. हे त्याचं घर आहे. स्वागतासाठी जर तो पुढे आला तर घाबरून पळू नका; मात्र स्वतःहून त्याच्या मार्गात आडवे जाऊ नका. त्याची वाट सोडा. सिनेमातील किंगकाँग माणसं खायचा; परंतु प्रत्यक्षात गोरिला हे पाला खाणारे शाकाहारी जीव आहेत आणि काही आणीबाणी उद्भवली तर ‘मैं हूँ ना!’
हो आणि म्हणे गोरिलासमोर शिंकायचं नाही. का बुवा? हा एवढा अगडबंब प्राणी माणसाच्या शिंकेला घाबरतो की काय? की लाल फडकं दाखवलं की ‘घेतलं शिंगावर’ करत चाल करून येणाऱ्या बैलासारखा पिसाळतो? आणि नेमकी त्याचवेळी शिंक आली तर? ती काय कुणाच्या हातात आहे? अशा अनेक ‘शिंका’-कुशंकांचं निरसन त्याने एका वाक्यात केलं. “मनुष्यापासून होणारा जंतुसंसर्ग गोरिलांसाठी घातक असल्यामुळे शिंक द्यायचीच झाली तर ती चेहरा फिरवून रुमालात द्यावी.”
गोरिलाला म्हटलं, “बरं बाबा, नाही जाणार तुझ्या वाटेला आणि नेमकी माशी शिंकली म्हणायची संधीही नाही देणार.”
मजल दरमजल करत आम्ही गोरिलांच्या कबिल्याजवळील जागेवर पोहोचलो. गाइडनं सांगितल्याप्रमाणे बांबूचं वन दिसू लागलं होतं. आता कुठल्याही क्षणी गोरिलाचं प्रथम दर्शन होण्याची शक्यता दाट झाली. “हे कुटुंब नेहमी एकाच जागेवर वस्ती करून राहतं का?” या माझ्या प्रश्नाला मला अतिशय आश्चर्यकारक उत्तर मिळालं. गोरिलांना म्हणे रोज रात्री घरासाठी नवी जागा लागते. ‘कशासाठी? पोटासाठी!’ करत करत ही मंडळी दिवसभरात चाळीस चौरस किमी इतकं अंतर तुडवतात. त्यांचं आवडतं खाद्य आहे नेटल नावाची काटेरी वनस्पती आणि बांबूचे कोवळे कोंब. बांबू खाताना तो हातात धरून त्याची टणक व कडवट साल दातांच्या सहाय्यानं सोलून आतला फक्त कोवळा कोंबच ते मटकावतात. मानव उत्क्रांतीकडे अग्रेसर हे त्यांचं पहिलं पाऊल असावं. सत्तर प्रकारच्या वनस्पती आणि कंदमुळं खाणारे गोरिला पाणी पीत नाहीत. वाहत्या पाण्याला ते घाबरतात. त्यांना पावसाचंही वावडं आहे. मुळापासून उन्मळून पडलेलं, पाण्याचा भरपूर अंश असलेलं झाडाचं कुजलेलं खोड चघळून किंवा पाणी साठवणाऱ्या वनस्पती खाऊन ते आपली पाण्याची तहान भागवतात. तहान-भूक करत दिवसभर अशी पायपीट झाली की संध्याकाळी बांबूच्या बनातली सपाटशी जागा बघून, पालापाचोळ्यांची शय्या बनवून हे कुटुंब निद्राधीन होतं. दुपारच्या वामकुक्षीसाठीही असाच एखादा निवारा मिळाला की ते लगेच आडवे होतात. संशोधक मंडळींच्या अभ्यासात ही त्यांची घरकुलं फार महत्त्वाची ठरतात. त्यांचा आकार, संख्या व घराबाहेरील विष्ठेचा अभ्यास करून गोरिलांच्या वयाचा अंदाज लावला जातो.
उत्साह आणि उत्सुकतेने आम्ही पाचच मिनिटं चाललो असू नसू, आम्हाला पहिल्या गोरिलाचं दर्शन घडलं. अकराचा सुमार असावा, भरपेट नाश्ता करून स्वारी मस्त लोळत पडली होती. गाइडने परवलीचे शब्द वापरून त्याला जागं केलं. बहुदा ‘अरे काय रे? आत्ता कुठे आडवा झालो होतो’ अशी गुरकावणी करत, डोळे किलकिले करून त्याने आमच्याकडे पाहिलं आणि अंग झटकून आमच्यासमोर फतकल मारून बसला. गोरिलांची भाषा गाइडला अवगत होती. महाराज कधी रागवलेत, कधी वैतागलेत आणि कधी आनंदात आहेत हे सगळं त्याच्या रेकण्यातून, गुरकावण्यातून आणि गर्जनांमधून व्यक्त होतं. अशा भावना दाखवणारे पंचवीस आवाज अभ्यासकांनी शोधून त्याची नोंद करून ठेवली आहे.
जवळून घेतलेलं ते गोरिलाचं प्रथम दर्शन होतं. चकचकीत गोट्यांसारखे पिंगट रंगाचे भावपूर्ण डोळे, फेंदारलेलं वाटावं असं थोडं वर उचललेलं नाक, केसाळ काया, हातापायाचे पंजे अगदी मनुष्यासारखे, नखंही तशीच. हस्तरेखाही स्पष्टपणे दिसत होत्या. गोरिलाने जवळच पडलेली नेटलची कांडी उचलली आणि निर्विकारपणे ती खाऊ लागला. नेटल ही एक काटेरी वनस्पती आहे. जंगलातून चालताना तिचा स्पर्श जरी झाला तरी मेंदूत झिणझिण्या जातात. विंचवाच्या डंखाएवढा वेदनादायी स्पर्श असतो तो. कातडीवर पित्तासारख्या लाल गांध्या येतात आणि त्याची प्रचंड आग होते. त्या आगीला शांत करणारी दुसरी एक वनस्पती तिथेच उपलब्ध आहे. लांब बाह्यांचे शर्ट घातले होते तरी या नेटलने आम्हाला एक दोनदा आपला हिसका दाखवला. अशी ही खतरनाक वनस्पती हातांनी सोलून हा पठ्ठ्या खात होता. त्याच्या अंगावरील जाड केसाळ कातडीपुढे हे नेटलच नांगी टाकत असावेत. पर्वतीय गोरिलांची कातडी ही त्यांच्या इतर भाईबंदांपेक्षा अधिक जाड व राठ असते. बहुदा थंडीपासून बचाव म्हणून ती ईश्वराने बहाल केली असावी. पहिला गोरिला नजरेस पडला तेव्हा गाइडनं आपलं घड्याळ सेट केलं. त्या सेकंदापासून पुढे एक तास आम्हाला गोरिलांच्या सान्निध्यात मिळणार होता. एकसष्टाव्या मिनिटाला त्यांचा निरोप घ्यायचा होता. तो निरोप घेणं इतकं जड जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com