अक्षररंग

फुलांचा संगीतमय उत्सव

दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात भरलेला मुंबई पुष्पोत्सव हा निसर्ग आणि कलेच्या सुरेल संगमाचा अनुभव देतो. यंदा संगीतातील वाद्ये ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून साकारलेला हा रंगीबेरंगी उत्सव फुलांच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याची नवी, संवेदनशील दृष्टी देतो.

नवशक्ती Web Desk

विशेष

क्रांती गोडबोले-पाटील

दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात भरलेला मुंबई पुष्पोत्सव हा निसर्ग आणि कलेच्या सुरेल संगमाचा अनुभव देतो. यंदा संगीतातील वाद्ये ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून साकारलेला हा रंगीबेरंगी उत्सव फुलांच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याची नवी, संवेदनशील दृष्टी देतो.

फेब्रुवारीचा पहिला आठवडा मुंबईत काहीतरी बदल घडवतो. सकाळच्या थंडगार गारव्यातून, दुपारी कोवळ्या उन्हाच्या रेषांमध्ये, आणि संध्याकाळी मंद सुगंधाने भरलेल्या हवेतून, शहराच्या धावपळीच्या जीवनात थोडासा विराम घ्यावा असा संकेत मिळतो. मुंबईच्या लोकांसाठी हा बदल फक्त ऋतूच्या बदलाचा अनुभव नाही; तो एक संकेत आहे की, आता फुलांचा उत्सव सुरू होणार आहे. 'वसंत येतो तेव्हा फुलं येतात, असं पुस्तकात वाचलेलं; फुंलं येतात तेव्हा वसंत असतो, हे स्वतः पाहिलं' ही काव्यओळ इथे तंतोतंत लागू होते. कारण मुंबई पुष्पोत्सव, ज्याची रंगीतता, गंध, आणि संगीत केवळ दृश्य आणि श्रवण अनुभवापुरती मर्यादित नाही, तर ती अंतर्मनात खोलवर रुजते. तिथली फुलं त्यांचं रूप मनात रुंजी घालत राहतात. हा अनुभव मी या पुष्पोत्सवात घेतला. माझ्यासाठी फुलं म्हणजे उमेदीने जगायला शिकवणारी शाळा. आयुष्य छोटं का असेना पण ते भरभरून कसं जगायचं, स्वतःचा गंध दुसऱ्यांच्या मनात कायमचा कसा ठेवायचा आणि हसत हसत निरोप घ्यायचा. सुगंधी फुलं त्यांच्या गंधाने मोहून घेतात तशी काही फुलं ही त्यांच्या रंग-रूपाने आकर्षन घेतात.

दरवर्षी भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात हा पुष्पोत्सव भरतो. यंदाचा हा २९ वा मुंबई पुष्पोत्सव. हा पुष्पोत्सव केवळ फुलांचा मेळा नसून, एक कलात्मक प्रयोग आहे- जिथे निसर्ग, कला, आणि कल्पनाशक्ती एकत्र येतात. यंदा हा उत्सव संगीताच्या अद्वितीय स्वरूपात साकारला होता, जिथे बासरी, वीणा, तबला, पखवाज, हार्मोनियम, गिटार, सेक्साफोन अशा विविध वाद्यांचे रूप फुलांमध्ये वसलेलं होतं. आजवर बासरीचा स्वर ऐकला, वीणेची झंकार अनुभवली, तबल्याची ठेका-बद्ध लय मनात साठवली. पण या वाद्यांचा सुगंध आणि या फुलांचं नटणं अनुभवलं आहे का? असा प्रश्न हा पुष्पोत्सव पाहताना सहज मनात येतो. पाकळ्यांतील रंग स्वरांसारखा आणि गंध लयेसारखा अनुभव देतो. जणू संगीतमय फुलांच्या समुद्रात आपण डोकावलेलो आहोत असंचं वाटतं. इथे संगीत डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव फारचं सुखद आणि मनाला शांतता देणारा होता. नागरिक फुलांच्या या संगीत मैफिलीचा आनंद घेत होते. आज सकाळी पेपर वाचताना तुम्हांलाही हा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की जा.

मुंबई पुष्पोत्सवाची खरी जादू ही केवळ सजावटीत नाही, तर त्या मागच्या अथक परिश्रमांत दडलेली आहे. महिनोन्‌महिने रोपांची लागवड, त्यांची काळजी, योग्य प्रकाश, पाणी आणि पोषण यांचा समतोल राखत फुलांचा फुलोरा योग्य वेळी येईल यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मेहनत घेत असतात. गुलाब, जर्बेरा, पिटुनिया, डेहलिया, ऑर्किडसह अनेक देशी-विदेशी फुलांनी परिसर जणू रंगीत कॅनव्हास बनतो. फुलांचे मनमोहक ताटवे बघत राहवेसे वाटतात. ते फुलांचे गालिचे अंगावर ओढून त्यातच गुडूप व्हावं असंही वाटतं.

हा पुष्पोत्सव दरवर्षी एका थीमवर आधारलेला असतो. याआधी कार्टून, आमची मुंबई, डिस्ने लँड, जलजीवन, ॲक्वाटिक वर्ल्ड, ॲनिमल किंग्डम, भारताची राष्ट्रीय प्रतीके अशा संकल्पनांनी मुंबई पुष्पोत्सवाने नागरिकांची मनं जिंकली होती. त्या परंपरेला साजेसा आणि अधिक कलात्मक असा यंदाचा संगीताधारित पुष्पोत्सव शहराच्या सांस्कृतिक जीवनात आणखी एक सुरेल रंग भरतो आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांचा स्मृतीदिन, झाकीर हुसेन यांचा जन्मदिवस असल्याने ही वाद्यं आणि त्यांच्या गारगोटी छोट्या खड्यानी साकारलेली चित्रं आणि वाजणारं संथ संगीत आणि फुलांचे देखावे म्हणजे मुंबईत जणू स्वर्गचं खाली उतरला आहे असं वाटत होतं.

शहराच्या कोंडलेल्या रस्त्यांपासून, धावपळीच्या वेळापत्रकापासून थोडं दूर जाऊन, फुलांच्या सहवासात काही क्षण हरवायचे असतील तर त्यासाठी हा पुष्पोत्सव म्हणजे एक निवांत श्वास आहे. इथे फुलं फक्त उमलत नाहीत, ती गातात… आणि त्या गाण्याचा सुगंध मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. त्याचबरोबर विदेशी फुलांचे डेकोरेशन, अनेक भाज्या, फळं, औषधी वनस्पती, निवडुंगाचे प्रकार यांची रोपटी येथे पाहायलाही मिळतात आणि अनेक स्टॉलवर त्यांची खरेदीही करता येते. ज्याना बागकाम, फुलझाडं घरात लावण्याची आवड आहे त्यांच्यासाठी तर ही रंगीबेरंगी पर्वणीच आहे. हे सर्व पाहून मी तर फुलांच्या अनेक गुणांमध्ये रमून गेले. आणि मग हे सगळं मला सुचलं.

फुलांचा अनुभव केवळ दृश्य किंवा गंधापुरताच मर्यादित नाही. प्रत्येक फुलाची पाकळी, प्रत्येक पान, त्याचं दिसणं आपल्याला तात्विक आणि भावनिक अनुभव देतो. गुलाबाच्या लाल पाकळ्या प्रेमाची अभिव्यक्ती, मोगऱ्याचा मंद सुवास हळुवार आठवणींचा दरवळ, चाफ्याचा गूढ सुवास अंतर्मनातील गंभीर भावनांना जागा देतो. या सगळ्या अनुभवांचा संगम फुलांचं जगण्याची पद्धत दाखवत असतो. प्रत्येक फुलाचं सौंदर्य आपल्या अंतरंगाशी संवाद साधतं, जणू आपल्याला थांबायला, अनुभवायला, विचार करायला शिकवतं

फुलांचा गंध हा एक अद्वितीय अनुभव आहे. शब्द अपुरे पडतात, तर गंध सहज भावनांना पोहोचवतो. बालपणीच्या आठवणी, पहिल्या प्रेमाची कोमलता, विरहाची वेदना सर्व काही एका सुवासात जिवंत होतात. जसं एखाद्या गीताच्या सुराने मन मोहरतं किंवा गहिवरतं तसंच फुलांचे गंध आपल्या अंतःकरणाच्या तारा अलवारपणे छेडतात.

फुलं ही केवळ सौंदर्यप्रदर्शक वस्तू नाहीत; ती जीवनाचा दर्पण आहेत. प्रत्येक फुलाचं जीवन क्षणभंगुर आहे, परंतु त्याचा परिणाम शाश्वत आहे. कळी कोमेजते, पाकळ्या सैल होतात, पण त्या आठवणींमध्ये, आपल्या मनाच्या कोपऱ्यांत जिवंत राहतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर फुलं आपल्यासोबत असतात.

भावनिक स्तरावर, फुलं आपल्या मनातील भावना जागवतात. एखाद्या मोगऱ्याचा सुवास अचानक बालपणातल्या देवघरात घेऊन जातो, चाफ्याचा गूढ दरवळ विरहाची आठवण करून देतो, गुलाबाचा प्रेमळ गंध पहिल्या प्रेमाचा स्पर्श देतो. फुलांचा गंध हा आपल्याला स्मृतींच्या खोल वारीवर घेऊन जातो, जिथे शब्द अपुरे पडतात, आणि फक्त अनुभव पुरेसा असतो. फुलं ही शब्दांशिवाय भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहेत. प्रेम व्यक्त करायला गुलाब, आदर व्यक्त करायला कमळ, कृतज्ञता व्यक्त करायला साधा रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ. सर्व काही सहज आणि स्वाभाविकपणे होते. शब्द जिथे अपुरे पडतात, तिथे फुलं पोहोचतात, हेच त्यांचं अद्वितीय सामर्थ्य आहे.

साहित्यिक दृष्ट्या, फुलं नेहमीच प्रेरणेचा स्रोत राहिली आहेत. कवितेत, कथेत, आणि चित्रकलेत फुलांचा उपयोग रूपक म्हणून केला जातो. कळी म्हणजे आशा, फूल म्हणजे अभिव्यक्ती, कोमेजणं म्हणजे स्वीकार—अशा तिन्हींच्या प्रवासातून मानवी जीवनाचं गहन स्वरूप उलगडतं. मुंबई पुष्पोत्सवात ही साहित्यिक आणि कलात्मक प्रेरणा थेट आपल्या दृष्टीस आणि इंद्रियांसमोर उभी राहते.

धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनातही फुलांचं विशेष स्थान आहे. देवाला अर्पण केलेली फुलं केवळ पूजा नाहीत; ती माणसाच्या नम्रतेची, अहंकाराची सोय, आणि विश्वाशी साधलेला शांत संवाद आहे. फुलांच्या पाकळ्या आणि सुवासातून मनःशांती मिळते, ज्यामुळे मन, शरीर आणि आत्मा या तिन्हींचा अनुभव सुसंगत होतो.

फुलांचा उपयोग जन्माच्या आनंदात, यशाच्या क्षणी, विवाहसोहळ्यात, किंवा अंतिम निरोपाच्या वेळीही होतो. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरही मृत्यूसमयी अर्पण केलेली फुलं दुःखाची नाहीत, तर शांतता, कृतज्ञता, आणि आदर व्यक्त करतात. कोमेजलेली कळी मातीमध्ये मिसळते आणि नव्या जीवनाला जन्म देते- हा चक्राकार प्रवास जीवनाच्या तत्त्वज्ञानाचं प्रतीक आहे. फुलांचा हा प्रवास आपल्याला जीवनाची नश्वरता, सौंदर्य, आणि अर्थ शिकवतो.

घराच्या अंगणात, बाल्कनीत, टेबलावर ठेवलेली फुलदाणीही थेरपीसारखी कार्य करतात. ताणतणावात, दैनंदिन धावपळीच्या मध्यभागी, फुलं मनाला आधार देतात. ती आपल्याला फक्त अस्तित्वासाठी उमलायला शिकवतात— कोणत्याही अपेक्षा न ठेवता, कोणत्याही तक्रारीशिवाय, फक्त असण्याचा आणि देण्याचा संदेश देतात.

मुंबई पुष्पोत्सव हा केवळ एक सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नाही; तो आपल्याला फुलांमार्फत जीवनाचे खरे मूल्य समजावतो. त्यात रंग, गंध, आकार, संगीत आणि मांडणी यांचा संगम असा आहे की, आपण फुलांच्या सान्निध्यात आपल्या स्वतःच्या अंतरंगाशी संवाद साधतो. या संवादातून मिळणारी शांतता, आनंद, आणि संवेदना जीवनाच्या प्रत्येक क्षणात गहन अर्थाने उतरते.

तात्विक, भावनिक, आणि ललित दृष्ट्या, फुलं आपल्याला शिकवतात की, आयुष्याचं सौंदर्य त्याच्या लांबीत नाही, तर त्याच्या गहनतेत आहे. गंध आणि रंग फक्त सौंदर्य नाहीत; ते स्मृती, भावना, आणि आत्मिक अनुभव आहेत. मुंबई पुष्पोत्सव या अनुभवाला एक जीवंत मंच देतो.

अशा प्रकारे, फुलं नुसती उमलत नाहीत; ती आपल्या जीवनात गातात, आठवणींचा सुवास देतात, आणि अंतरंगाशी संवाद साधतात. मुंबई पुष्पोत्सव हा अनुभव फुलांच्या या अद्वितीय संवादाचं प्रतीक आहे—जिथे प्रत्येक पाकळी, प्रत्येक सुवास, प्रत्येक रंग आणि प्रत्येक संगीताची लय आपल्या जीवनात गहन अर्थाने उतरते. या उत्सवातून शिकण्यासारखे हेच जीवनाचं तत्त्वज्ञान आहे: झटपट मिळवायचं नाही; हळूहळू उमलायचं, अनुभवायचं, आणि प्रत्येक क्षणाचा अर्थ जाणून घेउन जगायचं.

krantip183@gmail.com

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा