नाणेघाटाचा ऐतिहासिक वारसा 
अक्षररंग

नाणेघाटाचा ऐतिहासिक वारसा

सह्याद्रीच्या कातळातून कोकणाकडे उतरणारी नाणेघाटाची वाट आज निसर्गप्रेमींना आकर्षित करते; पण या दगडी पायवाटेने कधीकाळी व्यापारी तांडे, संपत्ती आणि राजसत्तेचा इतिहास वाहून नेला होता. त्या झिजलेल्या कातळात आजही दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राची कहाणी दडलेली आहे.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

शंतनु परांजपे

सह्याद्रीच्या कातळातून कोकणाकडे उतरणारी नाणेघाटाची वाट आज निसर्गप्रेमींना आकर्षित करते; पण या दगडी पायवाटेने कधीकाळी व्यापारी तांडे, संपत्ती आणि राजसत्तेचा इतिहास वाहून नेला होता. त्या झिजलेल्या कातळात आजही दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राची कहाणी दडलेली आहे.

जुन्नरच्या पश्चिमेस सह्याद्रीची उंच रांग अचानक कोकणाकडे उतरत जाते. या डोंगरभिंतीतून देश आणि कोकण यांना जोडणारी जी प्राचीन वाट खाली उतरते, ती म्हणजे नाणेघाट. आज नाणेघाट म्हटले की पावसाळ्यातील ट्रेक, उभा कातळ, दगडी पायवाट आणि घाटाच्या माथ्यावरून दिसणारा कोकण यांचे चित्र डोळ्यांसमोर येते. पण साधारण दोन हजार वर्षांपूर्वी या ठिकाणी उभे राहिलो असतो, तर दृश्य वेगळे दिसले असते. पाठीवर माल लादलेली जनावरे, व्यापाऱ्यांचे तांडे, देशावरून बंदरांकडे जाणारा माल, कोकणातून वर चढणाऱ्या व्यापारी वस्तू आणि या साऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणारी राजसत्ता-नाणेघाटाचा इतिहास या व्यापारी प्रवाहाशी जोडलेला आहे.

पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे आणि दख्खनच्या आतील बाजारपेठा यांना जोडणाऱ्या घाटवाटांपैकी नाणेघाटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नोंदींमध्ये सातवाहनकालीन जुन्नर हे प्रारंभीच्या ऐतिहासिक काळातील महत्त्वाचे नागरी केंद्र म्हणून समोर येते; नाणेघाटाच्या लेखात ‘जीर्णनगर’शी संबंधित उल्लेख आढळतो. जुन्नरच्या आर्थिक संघटनेचा अभ्यास करताना नाणेघाटाचा विचार अपरिहार्य ठरतो.

या मार्गाची निवड योगायोगाने झालेली नव्हती. कोकणातील कल्याणसारखी बंदरे आणि दख्खनच्या आतील प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण, तगर म्हणजे तेर आणि पुढील व्यापारी केंद्रांना जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे प्राचीन महाराष्ट्रात विकसित झाले होते. पश्चिम घाटातील अशा मार्गांमुळे किनारपट्टीवर येणारा माल अंतर्गत प्रदेशात पोहोचत असे आणि दख्खनमधील उत्पादन पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत जात असे. अलीकडच्या व्यापारविषयक संशोधनातही नाणेघाटासारख्या घाटमार्गांचा उल्लेख व्यापारी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधांच्या संदर्भात केला आहे.

‘नाणेघाट’ या नावाची लोकप्रिय व्युत्पत्ती येथे व्यापाऱ्यांकडून नाण्यांच्या स्वरूपात शुल्क घेतले जात असे, याच्याशी जोडली जाते. घाटातील मोठ्या दगडी रांजणाचा संबंधही अनेकदा या जकात व्यवस्थेशी जोडला जातो. मात्र अशी नाणी गोळा करून रांजणात खरंच जमा करत असावेत का, याबद्दल विशेष पुरावे उपलब्ध नाहीत. घाट हा व्यापार नियंत्रणासाठी वापरला जात असावा, हे त्याच्या स्थानावरून आणि प्राचीन व्यापारी व्यवस्थेवरून स्वाभाविक वाटते; पण आज दाखविला जाणारा प्रत्येक अवशेष नेमका कोणत्या प्रशासकीय उपयोगासाठी होता, हे निश्चित सांगता येत नाही.

नाणेघाटाचे खरे ऐतिहासिक महत्त्व मात्र त्याच्या गुहेतील ब्राह्मी लेखामुळे वाढते. हा लेख सातवाहन राजघराण्याशी निगडित असून राणी नागनिकाशी संबंधित आहे. प्रारंभिक सातवाहन इतिहास समजून घेण्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे राजघराण्यातील व्यक्ती, त्यांच्या वंशसंबंधांचा आणि केलेल्या वैदिक यज्ञांचा उल्लेख मिळतो. त्यामुळे हा लेख केवळ दानलेख नाही; तो सातवाहन राजसत्तेने स्वतःला कोणत्या धार्मिक आणि राजकीय चौकटीत मांडले, याचाही दस्तऐवज आहे.

नागनिकेने आपला पती सातकर्णीच्या संदर्भात नोंदविलेल्या यज्ञांची यादी विशेष लक्षवेधी आहे. अश्वमेधासारख्या मोठ्या वैदिक यज्ञाचा उल्लेख येथे आढळतो. राजसूयासह इतर श्रौतविधींचे संदर्भही लेखात येतात. या यज्ञांकडे फक्त धार्मिक कर्मकांड म्हणून पाहणे अपुरे ठरेल. प्राचीन भारतीय राजकारणात मोठा यज्ञ करण्याची क्षमता म्हणजे संपत्ती, संसाधने, ब्राह्मणवर्गाशी संबंध आणि व्यापक राजकीय अधिकार यांचे प्रदर्शन होते. एका राजाला अश्वमेध करण्याचा अधिकार प्राप्त होणे ही त्याच्या सार्वभौमत्वाची राजकीय भाषा होती.

या ठिकाणी नागनिकेची भूमिकाही महत्त्वाची ठरते. भारतीय प्राचीन इतिहासातील स्त्रियांचे राजकीय अस्तित्व अनेकदा साहित्यिक उल्लेखांतून अस्पष्टपणे दिसते; परंतु नाणेघाटातील लेख एका राजघराण्यातील स्त्रीचे नाव थेट दगडावर नोंदवतो. ती फक्त राजाची पत्नी म्हणून उल्लेखिली गेलेली नाही. यज्ञ, वंशपरंपरा आणि राजकीय स्मरण यांची मांडणी करणाऱ्या लेखाच्या केंद्रस्थानीच तिची उपस्थिती आहे. त्यामुळे सातवाहनकालीन राजघराण्यातील स्त्रीच्या स्थानाच्या अभ्यासासाठी नाणेघाटाचा लेख विशेष महत्त्वाचा ठरतो.

गुहेत एकेकाळी राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमाही असाव्यात, असे तेथील अवशेष आणि नामपट्टीकांवरून मानले जाते. आज त्या मूर्ती शाबूत नाहीत; पण त्यांची नावे नोंदविण्याची व्यवस्थाच त्या जागेचे स्वरूप स्पष्ट करते. व्यापारी घाटावरील ही गुहा केवळ प्रवाशांच्या मुक्कामासाठीची जागा नव्हती. येथे राजघराण्याची स्मृती, वैदिक यज्ञांची नोंद आणि राजकीय अधिकार यांचे प्रदर्शन केले गेले होते.

यातून नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट्य समोर येते. व्यापार आणि राजसत्ता या दोन गोष्टी येथे वेगळ्या नाहीत. व्यापारी मार्गावर नियंत्रण म्हणजे महसूल, पण त्याचबरोबर लोकांच्या आणि वस्तूंच्या हालचालींवर प्रभाव. अशा मार्गावर राजघराण्याचे लेख आणि प्रतिमा निर्माण करणे म्हणजे वाटसरूंना राज्यकर्त्याची उपस्थिती सतत जाणवून देणे होय. नाणेघाटात अर्थकारण आणि राजकीय प्रतीकात्मकता यांची सांगड घातलेली दिसते. परिसरात सातवाहनकालीन वस्तीचे पुरावे, मृद्भांडी आणि इतर वस्तुसामग्री आढळली असून जुन्नर हे त्या काळातील महत्त्वाचे केंद्र होते. सातवाहनांच्या काळात दीर्घ पल्ल्याच्या व्यापारमार्गांना जोडणाऱ्या अनेक बाजारकेंद्रांचा विकास झाला होता, असे महाराष्ट्रातील इतर उत्खननांतूनही स्पष्ट झाले आहे.

नाणेघाटाला म्हणून केवळ ‘दोन हजार वर्षांपूर्वीचा टोल नाका’ म्हणणे त्याचे महत्त्व कमी करणारे ठरेल. तो व्यापारी घाट होता, हे खरे; पण त्याचबरोबर तो सातवाहनांच्या राज्यसत्तेचे सार्वजनिक प्रदर्शन करणारा एक महत्त्वाचा मार्ग होता. येथे व्यापाऱ्यांचा माल गेला, नाणी दिली गेली, सैन्याची हालचाल झाली आणि त्याच दगडावर राजघराण्याने आपल्या वंशाची व यज्ञपरंपरेची नोंद करून ठेवली. आज घाटाच्या माथ्यावर उभे राहून कोकणाकडे पाहिले, तर समोर फक्त निसर्ग दिसतो. पण त्या कड्यांच्या मधून गेलेल्या प्राचीन वाटेवरून महाराष्ट्राचा आर्थिक इतिहासही चालत गेला आहे आणि गुहेतील झिजलेल्या ब्राह्मी अक्षरांत त्या इतिहासाचा आवाज अजूनही ऐकू येतो.

sdparanjpe@gmail.com

ज्येष्ठांना हेलपाटे मारायला लावू नका! उच्च न्यायालयाने बँकेला खडसावले

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

गरीब मुलांना शिक्षणाच्या पुरेशा संधी मिळत नाहीत; ज्येष्ठ पटकथा लेखक-गीतकार जावेद अख्तर यांची खंत

Mumbai : गोवंडीत इमारतीला आग; एक वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

तेव्हाही लढलो, आताही तेच करणार : रोहित पवार