समाजचिंतन
जगदीश काबरे
- गीतेश गजानन शिंदे
कवी-समाजसुधारक नारायण सुर्वे (1926–2010) हे मराठी साहित्याला कामगार वर्गाचे प्रगल्भ प्रतिनिधित्व देणारे महान कवि होते. त्यांच्या कवितांनी दैनंदिन संघर्ष, माणुसकी आणि सामाजिक न्यायाचा संदेश रसिकांच्या काळजात कोरला. नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा विशेष लेख-
साहित्य अकादमी व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आयोजित आशियातील सर्वांत मोठ्या 'साहित्योत्सवात' निमंत्रित कवी म्हणून मी गेल्या वर्षी बहुभाषिक कविसंमेलनात रविंद्र भवन, दिल्ली येथे कवितावाचन केले. माझ्या सत्रात बोडो, कन्नड, उर्दू, हिंदी भाषेतील कवी सहभागी झाले होते. मराठीचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ज्येष्ठ तेलुगु कवी एस. वी. सत्यानारायण हे सत्राध्यक्ष होते. मी कविता सादर करण्यापूर्वी त्यांनी माझा परिचय करून देताना म्हटले की, "युवा कवी गीतेश शिंदे हे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या भूमीतून आले आहेत. नारायण सुर्वे हे कामगार कवी होते आणि कष्टकर्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटलेलं दिसतं. सुर्वे जेव्हा जेव्हा हैद्राबादला येत तेव्हा आमची भेट होत असे." अशा सुंदर आठवणींनी माझा परिचय करून दिला गेला.
मीही तोच धागा पकडत माझ्या कवितावाचनाची सुरुवात केली ती कविश्रेष्ठ नारायण सुर्वेंच्या स्मरणानं. कारण सुर्वे आणि मी एका समान धाग्यानं बांधले गेलोत. सुर्व्यांनी कामगारांचं अलक्षित दु:खं त्यांच्या कवितेतून टिपलं आणि मीही एका सर्वसामान्य कामगार वडील असलेल्या कुटुंबात जन्मलेलो. माझ्या वडिलांनी चाळीस वर्षं कामगार म्हणून कंपनीत हाडं झिजवलीत. डबल शिफ्ट काम करत कुटुंबाला आधार दिला. तो संघर्ष मी जवळून अनुभवलाय. म्हणूनच सुर्व्यांची 'चार शब्द' ही कविता मला नववीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला होती तेव्हा ती अधिक जवळची वाटायची. ही कविताच इतकी दमदार आहे की म्हणताना जोश येतो. सुर्वे लिहितात,
रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे.
माझे वडीलही मला त्या वेळी तळपत्या तलवारीसारखेच वाटायचे. कारण जगण्याच्या रणभूमीत त्यांचे युद्ध सुरूच असायचे. ९८-९९ साली व्हॉलेंटरी रिटायरमेंटची एक लाट मुंबई, ठाण्याच्या एमआयडीसींमध्ये आली होती. 'व्हॉलेंटरी' हा गोंडस शब्द जरी असला तरी ती एकप्रकारे सक्तीचीच निवृत्ती होती. त्यात कशीबशी वडिलांची नोकरी वाचली. पण त्यादरम्यानची त्यांची कुत्तरओढ मी जवळून अनुभवली आहे. सोबतीला सुर्व्यांचे 'चार शब्द' होतेच. कामगार म्हणून फाटका आतलं विश्व नरकयातना देणारं असलं तरी जगण्यासाठी ते अपरिहार्य असतं हा पहिला धडा मी तेव्हा शिकलो होतो. म्हणूनच वडिलांना कधी मी कंपनीत चाकरी करावी असं वाटायचं नाही. त्या उलट मी शिकून मोठं व्हावं याकरता हवं ते देण्याची व प्रसंगी डबलशिफ्ट मध्ये सोळा-सोळा तास काम करण्याची त्यांची तयारी असायची.
आता वाटतं बरं झालं सुर्व्यांची कविता पौगंडावस्थेतील त्या जाणीवशील वयात अभ्यासाला होती. कारण त्यांच्या कवितेनं परिस्थितीबद्दलचं आत्मभान जागृत केलं. शब्दांच्या हाती खड्ग देणारा हा कवी. स्वत:च्या जगाची राजमुद्रा घडवण्याची किमया त्यानं केली. चुकत, मुकत ते शिकले; जसे जगले तसेच कवितेत उतरले. त्यामुळे सुर्व्यांना अधिकाधिक जाणून घेण्याच्या ध्यासानं महाविद्यालयात असतानाच त्यांचे सर्व कवितासंग्रह वाचून काढले.
मला आठवतंय, बारावीत असताना माझ्या एका कवितेला नारायण सुर्वेंच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळालं होतं. त्यानिमित्तानं पहिल्यांदा सुर्वे मास्तरांना मी जवळून पाहिलं. साधासा इन न केलेला फिक्कट फूल शर्ट आणि काळ्या रंगाची पॅण्ट. डोळ्यांवर मोठ्या काचांचा जाडसर चष्मा. गाल आत गेलेले. पण नाक तरतरीत. वागण्या-बोलण्यात कुठेही बडेजाव नाही. दंभ नाही. वावर साधासाच. तेव्हा त्यांची शाबासकीची पाठीवर पडलेली थाप अजूनही रोमांचित करते. त्या उबदार स्पर्शात कित्ती मोठ्ठा आशीर्वाद दडला होता हे आता जाणवतंय. त्यानंतर आणखी दोनदा त्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं. त्याचं कौतुक त्यांना होतं. भाषणातून तसा उल्लेखही त्यांनी केला होता. अर्थात तो काळ मोबाईल फोनचा नसल्यानं त्या भाषणाचा व्हिडियो माझ्यापाशी नाही. पण आमच्या जुन्या कोडॅक कॅमेरानं सुर्वे मास्तरांसोबत काढलेले फोटो मात्र आजही आठवणींच्या कप्प्यात मी जपून ठेवलेत.
तळकोकणातील वैभववाडी येथे राहणारे गंगाराम कुसाजी सुर्वे हे चाकरमानी चिंचपोकळी, मुंबई येथे पोटापाण्यासाठी इंडिया वुलन मिलमध्ये स्पिनिंग खात्यात साचेवाले म्हणून नोकरीला होते. १५ ऑक्टोबर १९२६ चा तो दिवस होता. रात्रपाळी करून घरी परतत असताना फूटपाथवर त्यांना रडणारं एक नवजात मूल नजरेस पडलं. कुठलाही विचार न करता त्यांनी त्याला उचलून थेट घरी आणलं. त्यांच्या पत्नी काशीबाईंसोबत त्या मुलाचं संगोपन केलं. त्याला आपलं सुर्वे हे आडनाव देत; त्याचं नाव ठेवलं- नारायण! या नारायणाची जडणघडण एका सामान्य गिरणी कामगाराच्या कुटुंबात झाली. आजूबाजूला पसरलेली कामगार वस्ती. त्यातीलच एक छोटीशी अंधारी खोली. समोरचा फूटपाथ, कामगारांचे सणवार, जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष, भांडणतंटे, नगरपालिकेच्या दिव्याखाली जागवलेल्या रात्री हेच या नारायणाचं भावविश्व बनलं. याविषयी सुर्वे लिहितात, 'अगदी लहानपणीच स्पिनिंग, रोव्हिंग, भुळेर, कपडाखाते, बाईंडिंग खात्याशी माझा परिचय होत होता. मी घडवला जात होतो. मी माझ्या 'मुंबई' या कवितेत लिहिलेय-
कळू आले तेव्हापासूनच डबा घेऊन साच्यावर गेलो
घडवतो लोहार हातोड्याला तसाच घडवला गेलो
शिकलो तार कशी लावावी; बाबीण कशी भरावी घोट्यात
वेळ आलीच तर हक्कासाठी; केव्हा करावी आऱ्या खात्यात
म्हणजेच हक्कांसाठी दाद मागण्याचा लढवय्या बाणा सुर्व्यांना या गिरणगावानंच दिला आहे. घरात अठराविश्वं दारिद्र्य असतानाही नारायणाला चार अक्षरं लिहिता-वाचता यावीत म्हणून वडिलांनी त्यांना दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातलं. त्यांनी नारायणाला चौथीपर्यंत शिक्षण दिलं. पुढील शिक्षण मात्र नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलं. कारण नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले. तेव्हा समोर होता मुंबईचा विशाल महासागर आणि आपल्या मेहनतीनं फोडायचा होता काळाचा प्रचंड पर्वत. मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी नारायण सुर्वे कधी एका सिंधी कुटुंबात घरगडी म्हणून तर कधी हॉटेलात कपबशा धुणारा, टेबल पुसणारा पोऱ्या म्हणून काम करू लागले. कधी कुणाचं कुत्रं, तर कधी मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा अशी अनेक छोटीमोठी कामं करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत बॉबीनही भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. पण शिकण्याची जिद्द मात्र त्यांनी सोडली नाही. आणि त्याचंच फलित म्हणून १९६१ मध्ये शिपायाचं रूपांतर शिक्षकात झालं. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. तेव्हापासून ते गिरणगावचे 'सुर्वे मास्तर' झाले.
शिक्षणाविषयी सुर्वे मास्तर त्यांच्या मनोगतात लिहितात, "केवळ चौथी इयत्ता शिकलेला असल्यामुळे व्यवहारी जगात हे शिक्षण दीनदमडीचे होते. त्याला अर्थच नव्हता. सांगायला जात नाही, धर्म नाही, पालकमंडळी किंवा नात्यागोत्यातले एखादे कुणी उभे राहते का पाहावे तर तसेही काहीच नाही. ह्या देशात थोडी मान उंच करून चालायचे असेल तर वरील गोष्टींपैकी एखादी तरी सांगायला असावी लागते. मला अशांपैकी एखादेही काही सांगायला नसल्यामुळे काही प्रसंगी फारच कटू अनुभव घ्यावे लागले. परंतु एक बरे झाले; जात व धर्म ह्यांपैकी सांगण्यासारखे नेमके काहीच नसल्याने माझा तोटा झालाच नाही. उलट फायदाच झाला. मी माणूस ही एकच जात ओळखू लागलो. मी 'माझे विद्यापीठ' ह्या कवितेत म्हटलेच आहे की,
भेटला हरेक रंगात माणूस,
पिता, मित्र, कधी नागवणारा होऊन
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत
पायांचे तळवे होरपळून
तरीही का कोण जाणे;
माणसाइतका समर्थ सृजनात्मा
मला भेटलाच नाही
सुर्व्यांनी या कवितेतून माणसाला 'सृजनात्मा' असा एक सुंदर पर्यायी शब्द दिला आहे. सुर्वे १९५६ पासून म्हणजेच वयाच्या तिसाव्या वर्षापासून कविता लिहू लागले. त्या 'युगांतर', 'नवयुग', 'मराठा' ह्या नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होत्या. अभिनव प्रकाशनाकडून १९६० साली त्यांचा 'ऐसा गा मी ब्रह्म' हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याला कविवर्य कुसुमाग्रजांची प्रस्तावना लाभली. ह्या संग्रहाची जुळवाजुळव करताना सुर्व्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काही कविता मुद्दाम गाळल्याचे दिसते. अभिनव प्रकाशनाचे वा. वि. भट हे डाव्या चळवळीतील सुर्वे यांचे सहप्रवासी. त्यांनी हा संग्रह प्रकाशित केला. परंतु नारायण सुर्वे यांनी विपुल काव्यलेखन केले आहे असे मुळीच नाही. 'ऐसा गा मी ब्रह्म' (१९६२) 'माझे विद्यापीठ' (१९६६) 'जाहीरनामा' (१९७५) आणि 'नव्या माणसाचे आगमन' (१९९५) असे चारच कवितासंग्रह सुर्वे यांच्या नावावर आहेत. हे चारही संग्रह तसे छोटेखानीच आहेत. या संग्रहांमध्ये संकलित झालेल्या कवितांची संख्या १४५ एवढीच आहे. याशिवाय 'नारायण सुर्वे यांच्या गवसलेल्या कविता' हा प्रा. विजय तापस यांनी संपादित केलेल्या कवितांचा एक संग्रह १९९५ मध्येच प्रकाशित झाला आहे. सुर्वे यांच्या काव्यसंग्रहांत समाविष्ट न केलेल्या त्यांच्या १५ रचना व हिंदीतून सुर्वे यांनी अनुवादित केलेल्या ४२ कवितांचा या संग्रहात समावेश आहे. हे सर्व गृहीत धरले तरी सुर्वे यांच्या नावावरील रचनांची संख्या २०२ एवढीच होते. पण तरीदेखील 'सुर्वे' ही नाममुद्रा मराठी रसिकजनांच्या काळजावर कोरली गेली ती त्यातील थेट भिडणार्या व अलक्षित असणार्या सामान्य माणसांवरील रचनांमुळे. माणसंच सुर्व्यांचं विद्यापीठ होतं. म्हणूनच 'माझे विद्यापीठ' या कवितेतील याकूब नालबंदवाला, चंद्रा नायकीण, आफ्रिकनचाचा, 'पोस्टर' कवितेतील पोस्टरे डकविणारी मुले, 'पाणी घे' कवितेतील वेश्या, 'पोर्टरची स्वगतं' मधला पोर्टर, 'मनिआडर' कवितेतील कुटुंबवत्सल वेश्या अशा सुर्वे यांच्या कवितेतील कितीतरी व्यक्ती आपल्या आठवणीत राहतात त्या केवळ त्यांच्या लकबींमुळे नव्हे तर त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या मानवी भावभावनांमुळे. त्यामुळेच कदाचित सुर्व्यांच्या कविता मंचावरून सादर करताना त्यात एक नाट्य उभं राहतं. काही वर्षांपूर्वी मी 'जाहीरनामा सुर्व्यांचा' हा त्यांच्या कविता अभिवाचनाचा प्रयोग सादर करायचो. त्यातील सर्वात लक्षवेधी कविता होत्या त्या 'मनीआडर' आणि 'तुमचंच नाव लिवा'. या दोन्ही कवितांवर माझी अभिनेत्री मैत्रीण अस्मिता बोरकर एकपात्री अभिनय सादर करायची तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावायच्या. कारण नकळतपणे अस्मिता सुर्व्यांच्या कवितेतील एक पात्रंच होऊन जायची. हे सर्व श्रेय सुर्व्यांच्या खणखणीत कवितेचं होतं. ते लिहितात,
आन् हे बगा...
असंबी लिवा,
का मी खुस हाय;
आंग ठनाकतंय पर म्हनावं,
गावापक्षा बरं हाय.
ढगावानी माणूस येतो आन्,
म्हामूर होतो बगा...
पन बबडी डूक धरल्यावानी परतेकाला इचारते,
'माज्याकडं येन्याआदी
कितीजनीकडं गेलता!'
फोरस रोड, कामाठिपुरा हा भाग सुर्व्यांच्या पायाखालून गेला असणार. तेव्हा त्यांनी फक्त माणसं पाहिली नाहीत, तर ती वाचलीदेखील. या हाडामांसामध्ये असणार्या मन नावाच्या गुंतागुंतीचा शोध मास्तरांची कविता घेते. या आणि इतर कवितांमधून स्त्री-मनाचा शोध त्यांनी घेतला आहे. म्हणूनच मला त्यांची कविता फक्त कामगार वर्गापुरतीच मर्यादित राहिलेली न वाटता स्त्री-पुरुषांमधील माणूसपणाचा शोध घेणारी वाटते. सुर्वे यांच्या कवितेत स्त्री ही उपभोग्य वस्तू म्हणून न येता जीवनसंघर्षातील सहकारी, एक आश्वासक शक्ती म्हणून येते. ती आपले माणूसपण कधी हरवत नाही. गोड अनुभव देणारी सुंदर शोभेची वस्तू, उदात्त देवता किंवा अलौकीक शक्ती यांसारखे स्त्रीकडे पाहण्याचे तथाकथित दृष्टिकोन टाकून सुर्वे यांचं कविमन स्त्रीकडे केवळ माणूस म्हणून पाहतं. इतकंच नव्हे तर पुरुषाच्या मनातील हळवा कोपराही सुर्वे त्यांच्या कवितेतून उजागर करतात. उदा. मुलाला मारल्यानंतर 'आपण असे कसे दगड झालो' याचा विचार करणारा, आपल्या मुलांना 'कृष्णफुले' म्हणून त्यांच्या भविष्याविषयी चिंतीत होणारा बाप सुर्वे यांच्या 'दगड', 'मुंबई' या कवितांमधून आपल्याला भेटतो. तर 'क्षण माघारी गेले', 'थांब' या कवितांमधून स्त्रीविषयक मृदू भावना, शृंगाराच्या गोड कल्पना मनात जपणारा प्रियकर त्यांच्या कवितेत भेटतो. 'गलबलून जातो तेव्हा', 'सत्य' अशा कवितांमधून स्त्रीपुरुष प्रीतीची, सहजीवनाची, परस्पर सामंजस्याची मधुर रूपं अनुभवयास मिळतात.
'डोंगरी शेत' हे सुर्व्यांचं पहिलं गाजलेलं गीत. तो काळ होता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा. या काळात विविध राजकीय, सामाजिक घडामोडी अवतीभवती घडत होत्या. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, गवाणकर यांच्या लोकनाट्य चळवळीच्या परंपरेचा प्रभाव व स्वत:ला व्यक्त करण्याच्या उत्कट जाणिवेतून सुर्व्यांनी हे गीत लिहिले. कष्टप्रद शेतकरी जीवनाचं असं यथार्थ चित्रण क्वचितच सापडतं -
डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती
आलं वरीस राबून मी मरावं किती
कवळाचे भारे बाई ग घेऊन चढावं किती
आडाचं पाणी बाई ग पाणी वडावं किती
घरात तान्हा माझा ग तान्हा रडंल किती
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती
नारायण सुर्वे यांच्या संदर्भात त्यांचं समाजवादी विचारसरणीचं असणं हा एक मोठाच चर्चेचा विषय मराठी साहित्यक्षेत्रात झाला होता. सुर्वे यांच्या कवितेच्या मर्यादा दाखविण्यासाठी सुर्व्यांच्या मार्क्सवादी श्रद्धांचा वारंवार व वेगवेगळ्या प्रकारे इतका उल्लेख त्या काळी केला गेला की, 'सुर्व्यांच्या कवितेवरची सर्व समीक्षा 'कम्युनिस्ट' या एकाच सूर्याभोवती फिरते आहे,' असं ज्येष्ठ समीक्षक नरहर कुरुंदकर यांनी त्या वेळी म्हटलं होतं. या समीक्षेची प्रतिक्रिया म्हणूनच जणू, 'माणूस सुर्वे कम्युनिस्ट असतील, पण कवितेत जो कवी दिसतो त्याचा या तत्त्वज्ञानाशी काही अपरिहार्य संबंध नाही,' असे म्हणून कुरुंदकरांनी सुर्वे यांच्या कवितेच्या संदर्भात मार्क्सवाद अप्रस्तुत ठरविला होता. याविषयी सुर्वे असं लिहितात, "सुरुवातीलाच समूहमन आणि व्यक्ती ह्यांच्यातील महत्त्व सांगणारी व आधी तू स्वतः अंतर्बाह्य बदललास तरच मग बाहेरचे जग बदलवता येईल हा मूलार्थ देणारा एक वैज्ञानिक दृष्टिकोन मला लाभला. पंडितांच्या व पढिकांच्या पोथ्यांपेक्षा हे तत्त्वज्ञान मला वस्तुनिष्ठ दिशा दाखवणारे ठरले. त्याचे नाव मार्क्सवाद-लेनिनवाद. हा तिसरा नेत्र घेऊनच पुढे मी वावरू लागलो. वस्तुस्थितीला सरळ जाऊन भिडणे आणि आकलन झालेल्या भागाशी, अनुभवाला आलेल्या सर्वच प्रश्नांची संगती लावून स्वतः बदलणे आणि समोरच्या बदल मागू पाहणाऱ्या निकराच्या झुंजीतील एक कार्यकर्ता म्हणून भाग घेणे मला जमते ते ह्यामुळेच."
त्यामुळेच मास्तरांची कविता अधिक चिंतनशील झाली आहे. 'कबुतर्या' ही मला त्यांची आवडणारी आणखी एक कविता. विजेच्या खांबांवर जीव मुठीत घेऊन चढणा-उतरणारा लाईनमॅन यात कुबतराशी हृदगत साधताना भेटतो. एकप्रकारे आत्मसंवाद किंवा मोनोलॉग वाटावा इतक्या ओघवत्या व नाट्यमय शैलीत सुर्वेंनी ही कविता रंगवली आहे. शेवटाकडे ते लिहितात,
पण कबुतऱ्या तुझी शप्पथ;
आपण केव्हातरी गाणं लिहिणार
हां - लिहिणारच.
आणि साल्यांना, दाखवून देणार.
पण कबुतऱ्या, आपलं हे मन छापणार रे कोण?
माझा पेपर म्हणजे ही धरती,
आणि तुझा - वरचं आभाळ.
अगदी खरंय, या नारायणाचा पेपर म्हणजे गिरणगावातले ते फूटपाथ. ज्यावर त्यांनी आपल्या संवेदनेच्या शाईनं कवितेचं नवं विस्तृत आभाळ मराठी साहित्याला दिलं. सुर्व्यांची कविता सर्वसामान्यांना आपलीशी वाटणारी, त्यांचा दबलेला आवाज, भावभावना मोकळ्या करणारी वाटते. त्यामुळेच कदाचित तीन वर्षांपूर्वी नेरळ येथील सुर्व्यांच्या घरी जेव्हा एका चोरानं चोरी केली व त्याला समजलं की, हे कवी नारायण सुर्वेंचं घर आहे, तेव्हा त्यानं चोरी केलेल्या सर्व वस्तू त्या पवित्र वास्तूत परत आणून ठेवल्या. इतकंच नव्हे तर पत्राद्वारे आपल्या कृत्याबद्दल माफीदेखील मागितली. त्यामुळे एक कवी त्याच्या कवितांमुळे सामान्यांच्या मनावर काय परिणाम घडवू शकतो याचं हे मोठं उदाहरण आहे. म्हणजेच विचारांसोबतच हृदयपरिवर्तनाची ज्योत पेटवणारी मास्तरांची कविता आहे. सुर्व्यांच्या नेरळ येथील याच घरात मला काही वर्षांपूर्वी कविता सादर करण्याची संधी मिळाली होती. त्यानिमित्तानं त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार व इतर मानसन्मान डोळेभरून पाहता आले होते. मास्तरांची सावली म्हणजेच त्यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांच्यासमोर नतमस्तक होता आलं होतं. माझ्या पिढीलाही आपलीशी वाटणारी आणि जणू काही मित्रत्वाच्या नात्यानं खांद्यावर हात ठेवत लढायला बळ देणारी सुर्व्यांच्या कवितेची ही ताकदच म्हणावी लागेल.
'सनद' संग्रहातील आपल्या मनोगतात मास्तरांनी लिहिलंय की, 'मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन.' आज आपल्या कवितेद्वारे नारायण सुर्व्यांनी नुसतंच आपलं नाव रसिक वाचकांच्या काळजावर कोरलं नाही, तर सुर्वे मास्तरांचं एक स्वतंत्र विद्यापीठ कवितेत निर्माण झालेलं आहे हे निश्चित!
geeteshshinde@gmail.com
लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत