रत्नागिरीतील दडलेलं रत्न नाटे (Photo-@tripadvisor)
अक्षररंग

रत्नागिरीतील दडलेलं रत्न नाटे

रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले असून येथील नाटेश्वर मंदिर, मुसाकाजी बंदर आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. शांतता आणि निवांतपणा शोधणाऱ्या भटक्यांसाठी हे एक उत्तम ऑफबीट ठिकाण.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले असून येथील नाटेश्वर मंदिर, मुसाकाजी बंदर आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. शांतता आणि निवांतपणा शोधणाऱ्या भटक्यांसाठी हे एक उत्तम ऑफबीट ठिकाण.

रत्नागिरी जिल्ह्याच्या एकदम दक्षिणेला गेलं की खाडीकाठी वसलेलं 'नाटे' नावाचं एक अत्यंत सुंदर गाव आहे. भरपूर आंब्याच्या बागा, जुन्या काळातील बंदर, जुनी मंदिरे आणि समुद्रकिनारा अशी सुंदरता या गावाला लाभली आहे. मागच्या वर्षी मी या गावाची भटकंती केली. इथे मी एका ऍग्रो टुरिझममध्ये मुक्कामाला होते. चारी बाजूने आंब्याची बाग आहे आणि त्याच्या अगदी मध्यभागी हे ऍग्रो टुरिझम आहे. एकदम शांत आणि निवांत परिसर! तिथल्या मचाणीवरून तर सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही अप्रतिम दिसतात. सूर्योदय खाडीच्या बाजूने होतो आणि सूर्यास्त समुद्राकडे... या मचाणीवरून दिसणारी दृश्यं खरोखरच रमणीय आहेत. तिथे राहून नाटे गाव बघणं हा एक खूपच आनंददायी अनुभव होता.

या गावातील कोणती ठिकाणे बघायची ते सांगते. निसर्गकोंदणात नाटे गावच्या ग्रामदैवत नाटेश्वरांचे मंदिर आहे. मंदिराच्या आजुबाजूला भरपूर वृक्षराजी आणि हिरवागार असा सभोवतालचा परिसर आहे. अशा वातावरणात हे प्रशस्त कौलारू मंदिर दिमाखात उभं आहे. मंदिराला नगारखाना असलेले प्रवेशद्वार आहे आणि याच्याजवळ एकाच ठिकाणी ७ दीपमाळ उभ्या आहेत. पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केल्याक्षणी वातावरणातल्या प्रसन्नतेने मन व्यापले जाते. मंदिर जसं बाहेरून सुंदर आहे तसंच आतूनही देखणं आहे. लाकडी तुळ्या आणि लाकडाचेच खांब आतमध्ये आहेत; या चित्रांची रंगसंगती आणि बारीक काम तर बघतच रहावं असं आहे. गाभाऱ्यात महादेवाची पिंडी आहे, तिथे आम्ही मनोभावे दर्शन घेतलं. हे एक जागृत देवस्थान आहे. इथले ग्रामस्थ देवाच्या कृपाशीर्वादाची एक गोष्ट सांगतात की, या गावात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. कधी कधी पाऊस हुलकावणी देतो, तेव्हा पीक लोंब्या यायच्या आधीच सुकायला लागतं. अशा वेळी मंदिराच्या बाजूला असलेल्या या कुंडातून सोवळ्याने घागरीने पाणी आणून गाभाऱ्यात भरलं जातं आणि लगेच पावसाला सुरुवातही होते. संपूर्ण भातशेती पावसात न्हाऊन निघते. खरंच, या मंदिराचे वातावरण प्रसन्नतेने आणि चैतन्याने भरलेले आहे हे तिथे गेल्यावर जाणवतं.

नाटेश्वर मंदिरापासून जवळच नवलाई देवीचेही मंदिर आहे. नवीन बांधकाम असलेले हे प्रशस्त मंदिर असून गाभाऱ्यात नवलाई देवी, रवळनाथ आणि निनाईदेवी विराजमान आहेत. इथे खूप मोठा उत्सव असतो. त्यानंतर मुसाकाजी बंदर बघण्यासारखं आहे, या बंदराची रचना मला विशेष आवडली. हिरव्यागार टेकड्यांच्यामध्ये हे बंदर दडलं आहे. उजव्या टेकडीच्या पलीकडे समुद्र आहे आणि टेकड्यांच्या पायथ्याशी नदी-समुद्राचा संगम होऊन खाडी तयार झाली आहे. याच खाडीकाठी आणि समुद्रानजीक हे बंदर आहे. बंदराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि खाडीत घुसलेला एक मोठा रॅम्प आहे. या बंदराच्या बाजूला मोठमोठ्या खडकांचा भागही पुष्कळ आहे आणि दोन्ही बाजूला छोटासा किनाराही आहे. मुंबई-गोवा बोटीने जेव्हा प्रवासी वाहतूक व्हायची, तेव्हा हा एक थांबा असायचा. खडकाळ भाग असल्यामुळे पडावे लांबवर थांबायची, लोक मग छोट्या बोटीत उतरून बंदराकडे यायचे आणि पुढील प्रवासाला लागायचे. आता हे बंदर कार्यरत नाही, पण तिथे थांबल्यावर इतिहासातील या घटना डोळ्यापुढे तरळतात. बॅकवॉटर बघत निवांत वेळ घालवायला हे खूप सुंदर ठिकाण आहे.

मुसाकाजी बंदर बघून गोडवणे किनारा बघता येतो, हे अंतर साधारण १५ ते २० मिनिटांचे आहे. साधारण ४:३० वाजता मुसाकाजी बंदरावर पोहोचून ५:३० पर्यंत तिथे वेळ घालवून गोडवणे किनाऱ्याला जायचं. सूर्यास्त बघण्यासाठी हा मस्त किनारा आहे. मी गेले होते तेव्हा ओहोटीमुळे समुद्राचे पाणी आत गेले होते, त्यामुळे किनारा बराच मोकळा दिसत होता. सोनेरी वाळूचा मोठा चंद्रकृती असा हा किनारा आहे, जिथे फक्त चालतच रहावं असं वाटतं. हे ठिकाण फार कमी परिचित असल्यामुळे किनाऱ्यावर अजिबात गर्दी नसते.

सूर्यास्त बघण्यासाठी अजून एक सुंदर ठिकाण म्हणजे आंबोळगड जवळील कडा. ऍग्रो टुरिझमपासून गाडीनेच १० मिनिटांचा प्रवास करून तिथे पोहोचता येतं. समुद्रकाठी असणारा हा कडा असून इथून पार क्षितिजापर्यंत दृश्य दिसतात. मी या कड्यावर उभी राहिले आणि तो खारा वारा केसात शिरू दिला. खालचा लाटांचा खेळ बघतच राहिले. एखादी मोठी लाट आली की खालच्या दगडावर फुटून तिचे पाण्याचे तुषार पार आमच्यापर्यंत पोहोचायचे! तिथून समुद्रावर स्वार झालेल्या होड्यांची दृश्य तर अफलातून दिसतात. समुद्रावर सूर्यास्ताचे रंग पसरलेले बघणं खूप सुखद असतं.

आंबोळगडच्या कड्यावरून परतताना एक कौलारू घरासारखे बांधकाम दिसते, तिथे परमपूज्य गगनगिरी महाराज यांचा मठ आहे. हा मठ खूप सुंदर असून तिथे कौलारू बांधकाम आणि शेणाने सारवलेली जमीन आहे. तिथे महाराजांचे फोटोज आणि माहिती फलक लावले आहेत, तिथले वातावरण अगदी चैतन्यमय आहे. मठाच्या बाजूने समुद्राकडे जाणाऱ्या काही पायऱ्या उतरल्या की कातळात खोदलेली गुहा दिसते. या गुहेत महाराज साधनेला आणि तपस्येला बसत असत अशी माहिती मिळाली. इथे थांबल्यावर समुद्राची धीरगंभीर गाज कानावर पडत राहते.

नाटे गावात थांबल्यावर आंबोळगड आणि यशवंतगड पण नक्की बघावेत. सागरी तटाचे रक्षण करणारे हे दुर्ग आहेत. जैतापूरच्या खाडीतील व्यापारावर आणि सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या गडांची निर्मिती झाली असे समजते. जर तुम्ही रत्नागिरी ते सिंधुदुर्ग असा प्रवास करत असाल, तर नाटे आणि आंबोळगड ही ठिकाणे मध्ये थांबण्यासाठी ठेवू शकतो. अल्प परिचित अशी ही गावं असल्याने इथे अजिबात वर्दळ किंवा गजबज नसते. ज्यांना शांतता हवी आहे आणि समुद्रकिनारी वेळ घालवायचा आहे, त्यांच्यासाठी ही ठिकाणे अगदी उत्तम आहेत. तिथल्या ऍग्रो टुरिझममध्ये राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था अगदी चोख आहे, त्यामुळे भटकंतीचा मनमुराद आनंद घेता येतो. रत्नागिरीची ठरवून ऑफबीट भटकंती करण्यासाठीही हे ठिकाण उत्तम आहे, त्यामुळे नक्की भेट द्या.

  • जवळचे बसस्थानक - राजापूर आणि रत्नागिरी

  • जवळचे रेल्वे स्टेशन - रत्नागिरी, राजापूरपासून २६ किमी, तर रत्नागिरीपासून ५३ किमी साधारण अंतर आहे.

  • स्वतःच्या गाडीने प्रवास केल्यास उत्तम राहील.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

Mumbai : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ड्रोन शो; शिवाजी पार्क परिसरातील 'हे' रस्ते आज राहणार बंद, वाचा सविस्तर

LIC स्वतःच पुनर्विकास करण्यास इच्छुक; धोकादायक इमारतींबद्दल म्हाडाबरोबर झाली बैठक

कुंभमेळाप्रकरणी व्यापक आरोग्य यंत्रणा उभारणार; घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये खाटांमध्ये वाढ

Mumbai : ऑरेंज गेट टनेल प्रकल्पाला वेग; २५० मीटर भूमिगत बोगद्याचे खोदकाम यशस्वीरीत्या पूर्ण

महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांची चव न्यारी; BMC च्या कार्यालयात दोन दिवस 'वाळवण महोत्सव'