अजब निसर्ग
मकरंद जोशी
निसर्गातील वात्सल्याचे रंग विलक्षण आहेत. माणसांप्रमाणे आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून निसर्गातील आई-बाबा पिल्लांना वाढवत नाहीत. पिल्लेही म्हाताऱ्या आईबाबांसाठी काही करत नाहीत. पण आईच्या नैसर्गिक प्रेरणा तिला आपल्या अंडी-पिल्लांची काळजी घ्यायला प्रवृत्त करते. त्यामुळे निसर्गातील माया-ममता ही माणसांच्या जगापेक्षा वेगळी नक्कीच आहे पण त्यातील वात्सल्याचा ओलावा मात्र तसाच आहे.
बिरबलाच्या त्या गोष्टीत स्वतःच्या जिवावर बेततं तेव्हा माकडीण आपल्या पिल्लाच्या अंगावर उभी राहून स्वतःचा जीव वाचवते असं दाखवलं आहे.बिरबलाच्या इतर गोष्टींमध्ये त्याचं बुध्दीचातुर्य आणि मानवी स्वभावाची पारख दिसत असली तरी या गोष्टीत मात्र गडबड आहे. एकतर कोणतीही आई स्वतःच्या पोटच्या मुलाचा बळी देऊन स्वतःचा जीव वाचवेल यावर विश्वास ठेवता येत नाही. माणसांमध्ये तर आईच्या हृदयाची ती सुप्रसिध्द गोष्ट आहेच की, ज्या मुलाने आईचं हृदय आपल्या प्रेयसीच्या मागण्यावरुन कापलेलं असतं, तेच हृदय त्याला ठेच लागल्यावर विचारतं की ‘ बाळ लागलं तर नाही ना तुला ? ’यापेक्षा आईच्या प्रेमाची मोठी महती असूच शकत नाही. बरं बिरबलाने माकडाचं उदाहरण दिलंय म्हणाव तर माकडांमध्ये माणसांप्रमाणेच वात्सल्य, माया, ममता असते याची ग्वाही निसर्ग अभ्यासक देतात.एकूणच ‘आई’ हा मानवी जगातला जिव्हाळ्याचा विषय निसर्गातील इतर घटकांमध्ये तितकाच जिव्हाळ्याचा असतो का ? माणसांप्रमाणेच आई-मुलाच्याप्रेमाची, ममतेची, मायेची उदाहरणे निसर्गात पाहायला मिळतात का ? गोठ्यातली गाय आपल्या वासराला वात्सल्याने चाटताना बघायला मिळते पण वाघासारखा शिकारी प्राणी असो किंवा मगरीसारखा भितीदायक प्राणी, समुद्रातील मासे असोत किंवा हवेत उडणारे किटक यांच्यात हे ‘मातृहृदय’ असतं का ? या प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं देता येत नाही. माणसांना जसं आपल्या अपत्याबद्दल उपजत प्रेम,ममता,वात्सल्य वाटत असतं आणि त्यामुळेच माणसे जशी आपल्या अपत्यांचे संरक्षण,संगोपन,लालन-पालन करतात तसेच अनेक पशु-पक्षी ही करताना दिसतात.पण तरीही निसर्गातील वात्सल्य हे माणसांमधील वात्सल्यापेक्षा जरा वेगळंच असतं,काही जीवांमध्ये ते ठळकपणे पाहायला मिळतं तर काहींमध्ये त्याचा अभाव आहे असं वाटतं- तरीही ते आपल्या अपत्यांची काळजी घेत असतातच.
निसर्गात वात्सल्याची भावना सर्वात प्रबळ स्वरुपात पाहायला मिळते ती सस्तन प्राण्यांमध्ये. सस्तन प्राण्यांच्या गटात समुद्रातील व्हेल माशांपासून ते जमिनीवरील महाकाय हत्ती-गेंड्यांपर्यंत प्राणी जसे आहेत, त्याच प्रमाणे फक्त ऑस्ट्रेलियातच आढळणारे ‘मार्सुपियल्स’ (बाहेर गाभणी) प्रकारातले कांगारूसारखे प्राणीही आहेत. त्यामुळे प्रत्येक फॅमिलीच्या वैशिष्ट्यांनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार सस्तन प्राण्यांमधील पिल्लांची अवस्थाही बदलताना पाहायला मिळते. चितळ-सांबर अशा हरीणांमध्ये किंवा हत्ती-गेंड्या सारख्या प्राण्यांमध्ये जन्माला आलेली पिल्ले अवघ्या काही मिनिटात आपल्या पायांवर चालायला सुरवात करतात. रोडन्टस म्हणजे उंदीर, खार अशा प्राण्यांची तसेच कांगारूची पिल्ले जन्माला आल्यावर बराच काळ अगदी असहाय, दुर्बल असतात. या प्राण्यांच्या पिल्लांचा आकारही अगदी लहान असतो, ही पिल्ले दृष्टीहिन असतात, त्यांना ऐकूही येत नसते आणि त्यांचा मेंदूही संपूर्ण कार्यरत झालेला नसतो. कांगारू हा सगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात वेगळा आहे. कांगारूच्या माद्यांना पोटाजवळ एक कातडी पिशवी असते, जिचा त्यांना पिल्लू वाढवायला उपयोग होतो. कांगारूचे पिल्लू जन्माला येते तेंव्हा जेमतेम पाच-सहा सेंटिमीटर असते,त्याच्या अंगावर केस नसतात आणि त्याला दिसतही नसते.ते जन्मल्याबरोबर आईच्या अंगावरील केसांचा आधार घेऊन ,आईच्या पोटावरच्या पिशवीत जाऊन बसते.पुढच्या १९० दिवसात त्याची झपाट्याने वाढ होते आणि ते त्या पिशवीच्या बाहेर डोकावू लागते.त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत २३५ दिवस ते आईच्या पोटावरील पिशवीतच राहाते.
हत्तींसारख्या कळपाने राहाणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये लहान पिल्लांची काळजी त्याच्या जन्मदात्या आईबरोबर कळपातील इतर मावश्या,आत्या,काकूही घेताना पाहायला मिळतात.हत्तीण जेंव्हा पिल्लाला जन्म देणार असते तेंव्हा बाकीच्या माद्या तिच्या भोवती फेर धरून उभ्या राहतात आणि तिला संरक्षण देतात.पिल्लू लहान असताना,त्याला सोपे जावे म्हणून कळपाची प्रमुख असलेली मादी कळपाचा चालण्याचा वेग कमी करते,शिवाय चालताना अगदी लहान पिल्लांना सगळ्या माद्या चारही बाजूंनी झाकून संरक्षण देतात. माकडांच्या कळपातही पिल्लांना असेच सामूदायिक पध्दतीने वाढवले जाते.माकडांमध्ये कळपात नवे पिल्लू जन्माला आल्यानंतर ते आळीपाळीने सगळ्या माद्यांच्या हातातून फिरते,ज्यामुळे त्याला त्यांचा स्पर्शही ओळखीचा होतो. दुर्दैवाने त्याची जन्मदाती आई मरण पावलीच तर बाकीच्या माद्या त्याला वाढवू शकतात.
मात्र सस्तन प्राण्यांमध्ये जशी माणसांसारखी वात्सल्याची, मातृत्वाची भावना ठळकपणे दिसते तशी इतर गटांमध्ये दिसत नाही. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे,उभयचर आणि जलचर हे आपल्या पिल्लांचं रक्षण करतात ते बहुतेकवेळा आपला वंश टिकावा या नैसर्गिक प्रेरणेनं, त्यांच्या मेंदूचा विकास माणसासारखा झालेला नसल्याने माय-ममता-वात्सल्य या भावना त्यांच्यात निर्माण होत नाहीत. पण अंतःप्रेरणेनं ते आपल्या पिल्लांचा बचाव करताना पाहायला मिळतात.वेगवेगळ्या प्रकारचे ( जमिनीपासून ते पाण्यापर्यंत सर्वत्र राहाणारे) प्राणी ज्या गटात आढळतात तो गट म्हणजे रेप्टाइल्स. यातले साप आणि सरडे आपल्या अंड्यांच्या,पिल्लांच्या बाबतीत तसे बेफिकीरच असतात.कुठल्यातरी खड्ड्यात किंवा झाडाच्या ढोलीत अंडी घालून निघून जातात, उबवायलाही थांबत नाहीत.पण याच गटातला मोठा अपवाद म्हणजे किंग कोब्रा हा भारतातील सर्वात लांब विषारी साप ( जाता जाता -- याला किंग कोब्रा म्हणत असले तरी हा खरा कोब्रा म्हणजे नाग नाही बरं का !) .किंग कोब्राची मादी मात्र एखाद्या ममतामयी मातेसारखी आपल्या अंड्यांची काळजी घेते.त्यासाठी ही मादी जमिनीवर पानांचा उंचवटा तयार करुन वर्तुळाकार ( साधारण ५० ते ५५ इंच व्यासाचे) घरटे तयार करते आणि त्यात अंडी घालून त्यांच्या भोवती वेटोळे घालून त्यांचे रक्षण करते. अंडी उबवताना मादी दिवसातून एकदाच घरटे सोडून,पाणी प्यायला जाते.६० ते १०५ दिवसांनंतर अंडी उबवून होतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात.
अंड्यांची-पिल्लांची सर्वात जास्त काळजी घेतलेली पाहायला मिळते ती पक्ष्यांच्या राज्यात.बुलबुल,नाचण,टिकल्स ब्लू फ्लायकॅचर,चष्मेवाला असे पक्षी गवत,काटक्या,झाडाची मुळे,फांद्या मिळून सुरेख वाटीसारखे घरटे तयार करतात,शिवाय त्याच्या काटक्या पिल्लांना टोचू नयेत म्हणून त्याला आतून कोळ्याच्या जाळ्याचे तलम अस्तरही लावतात.सुतार,तांबट सारखे पक्षी हलक्या लाकडाच्या फांद्यांना भोकं पाडून त्यात आपलं घरटं थाटतात तर किंगफिशर म्हणजे खंड्या चक्क मातीत,नदीकाठच्या दरडीत बिळ खोदून त्यात आपली पिल्ले वाढवतो.अत्यंत सुंदर घरटे म्हणजे सुगरणीचा खोपा.विव्हर बर्ड म्हणून इंग्रजीत ओळखल्या जाणाऱ्या बाया पक्ष्याचे लटकते, झुलते घरटे दिसायला नाजूक वाटले तरी ते अतिशय भक्कम असते.कितीही जोराने वारा आला तरी या घरट्यातून अंडी वा पिल्ले बाहेर पडण्याची भिती नसते. महत्वाची गोष्ट म्हणजे गवताची पाती जोडून जोडून हे लटकते,मोहक घरटे करण्याचे कौशल्य फक्त नरांनाच अवगत असते आणि ते ही निसर्गदत्त.
फुलपाखरांपासून ते गांधीलमाशीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सदस्यांनी नटलेल्या किटकांच्या जगात आईच्या मायेचं वेगळंच रुप पाहायला मिळतं.किटकांमध्ये आपली पुढची पिढी बघायला आई-बाबा दोघेही जिवंत राहात नाहीत,पण आई मरण्याआधी पिल्लांच्या भरण-पोषणाची कशी काळजी घेते ते पॉटर वास्प म्हणजे कुंभारमाशीकडे बघितल्यावर कळतं. ओलसर माती जमा करुन कुंभाराप्रमाणे मातीचे मडके तयार करुन ही माशी त्यात आपली अंडी घालते.आता त्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात तेंव्हा तर त्यांची काळजी घ्यायला त्यांची आई हयात नसते मग ? पण निसर्गाने दिलेल्या जन्मजात शहाणपणामुळे कुंभारमाशी मरण्यापूर्वी आपल्या पिल्लांसाठी तरतूद करुन ठेवते. जेंव्हा ती मातीच्या मडक्यात अंडी घालते तेंव्हा ते बंद करण्याआधी ती त्यात फुलपाखराची अळी किंवा अन्य किटक अर्धमेले करुन आणून ठेवते.त्यामुळे काही दिवसांनी तिच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात तेंव्हा त्यांना ताजे अन्न जवळच उपलब्ध होते. आईने बेशुध्द करुन आणून ठेवलेल्या अळीवर ताव मारुन या माशीची पिल्ले मोठी होतात आणि मग ते मातीचे मडके फोडून उडून जातात. किटकांपेक्षा थोडे वेगळे असलेले संधिपाद गटातील कोळी आपल्या अंडी आणि पिल्लांची काळजी घेताना दिसतात. वूल्फ स्पायडरसारखे काही कोळी आपल्या अंड्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या भोवती पिशवीसारखे आवरण तयार करतात आणि ही एग सॅक ते आपल्याबरोबर वागवतात. या पिशवीतील पिल्ले बाहेर यायची वेळ झाली की कोळी ती फाडतो आणि मग पिल्ले बाहेर येऊन आपल्या आईच्या पाठीवर चढून बसतात.काही प्रकारचे कोळी आपल्या पिल्लांसाठी शिकार करुन आणतात तर काही प्रकारांमध्ये कोळी भक्ष्य मारून,ते अर्धवट चावून मग पिल्लांना भरवताना पाहायला मिळतात.विंचवांमध्येही माद्या आपल्या पाठीवर असंख्य पिल्लांचे लेंढार सांभाळताना पाहायला मिळते.
निसर्गातील वात्सल्याचे रंग हे असे आहेत. माणसांप्रमाणे आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून निसर्गातील आई-बाबा पिल्लांना वाढवत नाहीत. पिल्लेही म्हाताऱ्या आईबाबांसाठी काही करत नाहीत.पण आईच्या नैसर्गिक प्रेरणा तिला आपल्या अंडी-पिल्लांची काळजी घ्यायला प्रवृत्त करते.त्यामुळे निसर्गातील माया-ममता ही माणसांच्या जगापेक्षा वेगळी नक्कीच आहे पण त्यातील वात्सल्याचा ओलावा मात्र तसाच आहे.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com