निळाईतील थरार (Photo-oceans-research)
अक्षररंग

निळाईतील थरार

महासागरात नवजात ओर्का 'बीटा'ला पहिला श्वास मिळवून देण्यासाठी मेगाआजीने दिलेल्या थरारक झुंजीची ही रंजक गोष्ट !

नवशक्ती Web Desk

कथा

डाॅ. मानसी राजाध्यक्ष

महासागरात नवजात ओर्का 'बीटा'ला पहिला श्वास मिळवून देण्यासाठी मेगाआजीने दिलेल्या थरारक झुंजीची ही रंजक गोष्ट!

आणि ‘मेगा’आजीने सुटकेचा निश्वास टाकला! तिचा जवळपास साठ वर्षांचा अनुभव आज कसाला लागला होता! पस्तीसजणांच्या कळपाची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर होती आणि ती ती नेहमीच लीलया पार पाडत असे. पण आज काही क्षणांपुरती का होईना, ती थोडी भांबावली! पण क्षणिकच! तिचा स्वतःच्या अनुभवावर तर विश्वास होताच, पण त्याचबरोबर तिचा विश्वास होता.. आजूबाजूला पसरलेल्या अथांग आणि शांत निळाईवर! शांत, लयबद्ध हालचाल करत, असंख्य छोट्या-मोठ्या जीवांना आपल्या पोटात सामावून घेणारा हा भव्य जलसंचय... प्रशांत महासागर!! त्याच्या संथ, मुलायम हालचालींचा तिला नेहमीच आधार वाटायचा. तोच नेहमी तिला संकटातून वाट दाखवणार याची तिला खात्री असायची.

ओर्का म्हणजेच देवमाश्याची एक प्रजाती, ’हत्यारी’ देवमासे म्हणून ओळखली जाणारी! मेगाआजी अशाच एका ओर्का कळपाची प्रमुख होती. ओर्का प्रजातीला शोभेल अशी बुद्धिमान आणि खूप अनुभवी असलेल्या मेगाआजीने, आजवर अनेक लहान-मोठ्या संकटांतून आपल्या कळपाला वाचवलं होतं.

आज आपला सर्व कुटुंबकबिला घेऊन ‘मेगा’ प्रशांत महासागराच्या थोड्याशा उथळ भागात येऊन पोहोचली होती. अलगदपणे फिरून, हीच जागा ‘निरा’च्या बाळंतपणासाठी योग्य आहे ना, याची तिने चाचपणी केली. खाली निळ्या-हिरव्या प्लवक आणि शेवाळाचा जणू गालीचाच पसरला होता. पाण्याच्या थरातून झिरपत येणारे, सोनेरी चमचम निळसर पाण्याला बहाल करणारे सूर्यकिरण! त्याच अंधुक प्रकाशात शांतपणे हालचाल करणारं पाणी आणि त्यात अलगद तरंगणारे जेलीफीश! खाली एका खडकाच्या आजूबाजूने पोहत असलेलं पाणकासव आणि त्याचं, लुकलुकत्या पण विस्फारलेल्या डोळ्यांनी देवमाश्यांच्या या भल्या मोठ्या कळपाकडे बघत, आपल्या आईजवळ सरकणं! खूपच शांत आणि प्रसन्न जागा!

आपल्या ‘निरा’च्या तान्हुल्याला जन्म घेण्यासाठी हीच उत्तम जागा! मेगाआजीची खात्री पटली. अगदी दूरवर तिला, निळ्या देवमाश्यांच्या कुळातली ‘अना’ही दिसली. “हं.., अनाही बाळ जन्माला घालायला आलेली दिसतेय!”, मेगाआजीला दूर असूनही ‘अना’च्या हालचाली लक्षात आल्या होत्या. आत्ता ‘अना’ मेगाच्या कळपापासून लांब होती. तेव्हा दोघींच्या बाळंतपणांचा एकमेकींना काहीही संपर्क होणार नव्हता. मेगाने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे सारं लक्षात घेतलं.

‘क्लक क्लक’ आवाज करत, तिने आपल्या कळपातल्या दोन अनुभवी भाच्यांना, ‘किरा’ आणि ‘मिसा’ यांना निराच्या आसपास राहायला सांगितलं. आता त्या तिघीजणी त्या क्षणाची वाट पाहू लागल्या. कळपातली बाकीची मंडळीही आजूबाजूलाच पसरली होती. मध्येमध्ये काही आवाज काढत, निराजवळून हलकेच फेरी मारत, किरा, मिसा या दोघी बहिणी आणि मेगा तिला धीर देत होत्या... बस आता काहीच मिनिटं!, मग तू मोकळी होशील.. त्या कुजबुजल्या! काही क्षण नीरव शांततेत गेले!

मेगाने श्वास रोखून धरलाच होता. किरा आणि मिसाही तयारच होत्या. बाळ जन्माला आल्याआल्या त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर घेऊन जायची जबाबदारी त्या दोघींवर आणि निरावर होती. त्याशिवाय बाळ पहिला श्वास घेऊ शकणार नव्हतं. पाण्यात राहून सस्तन वर्गात मोडणारे आणि कल्ले नसल्यामुळे, नाक आणि फुफ्फुसांच्या द्वारे श्वास घेणारे देवमासे, नेहमी पाण्यावर येऊनच श्वास घेतात.

अखेर तो क्षण येऊन ठेपला आणि निराच्या शरीराच्या खालच्या भागातून एक छोटी शेपटी बाहेर डोकावली. जन्माला आल्याआल्या पाण्यात वाहून जाऊ नये, म्हणून निसर्गाने केलेली ही व्यवस्था! शेपटीपाठोपाठ, साधारण एक छोटासा जीव पाण्यात दाखल झाला मात्र...

त्याचक्षणी एक विचित्र आवाज, एका यंत्राची घरघर समुद्रात चोहीकडे पसरली. पाणी वेगळ्याच प्रकारे जोरात हलायला लागलं. मेगा आणि मेगाचा कळप घाबरले, हे काय होतंय! पाणकासव आणि त्याच्या पिल्लाने आपले अवयव आवरून घेतले आणि ते खडकाखाली लपले. जेलीफिश घाबरून इतस्ततः पांगले. मेगाच्या लक्षात आलं, वरून माणसाचं जहाज येतंय. अरे बापरे!

मेगा काळजीने ग्रासली. पण तिला गडबडून चालणार नव्हतं. तिच्या मार्गदर्शनाशिवाय कोणीच काही करू शकणार नव्हतं. तिने आपली तीक्ष्ण नजर चहूबाजूने फिरवली. क्षणाक्षणाने जवळ येणाऱ्या बोटीच्या वेगाचा अंदाज घेतला. समुद्राच्या पाण्याच्या हालचालींची जाण आणि आपला अनुभव तिने पणाला लावला. जहाज हळूहळू पुढे सरकत होतं आणि त्याच्या धक्क्याने हलणाऱ्या समुद्रातून वाट काढत मेगा निराला पुढे जायच्या सूचना देत होती.

“त्वरा करा, लवकर, अजून काही सेकंदात बाळाने श्वास घेणं गरजेचं आहे. माझ्यामागून या पटकन्‌!” अनेक प्रकारचे आवाज काढत मेगा सूचना देत होती. सपासप पाणी कापत, जहाज येऊन पोहोचण्याआधीच पाण्यावर जाता येईल असा रस्ता शोधत होती. “चला मुलींनो, आता फक्त काही सेकंद! पटकन वर पोहोचून श्वास घेऊन, आपल्याला बाळाला घेऊन खाली खोलवर जायला हवं!” बोट पाण्याखालीही बऱ्याच अंशी असते, हेही मेगाला ठाऊक होतं. म्हणून तर तिची सगळी लगबग होती.

किरा आणि मिसा जीवाच्या आकांताने बाळाला पाण्यात वरच्या दिशेने ढकलत होत्या. निरा बाळाच्या खालच्या बाजूने त्याला वर जायला आधार देत होती. मेगा त्यांना पाण्यातली वाट दाखवत होती आणि ...व्वूफ्फ.. बाळाने पाण्याबाहेर नाक काढलं, एक मोठा श्वास घेऊन खूप सारा ऑक्सिजन फुफ्फुसात भरून घेतला आणि त्या तिघींच्या देखरेखीत, क्षणार्धात पाण्यात खोलवर सूर मारला. त्यांच्या डोक्यावरून बोटीची सावलीही हळूहळू पुढे सरकली आणि मेगाने सुटकेचा निश्वास सोडला.

अत्यंत बुद्धिमान आणि शूर अशा ‘बीटा’चा जन्म झाला होता! पृथ्वीवरच्या ‘झेन बीटा’च्या युगात जन्म झालेल्या आणि त्याची माहिती असलेल्या मेगाआजीने बाळाचे नाव ‘बीटा’ ठेवले! जहाजात आरामात बसून, समुद्राच्या लाटा निरखण्यात मग्न असलेल्या माणसांना, समुद्राच्या अंतरंगात चाललेल्या या ‘खळबळजनक’ घटनेची सुतराम कल्पना नव्हती!!

विज्ञान लेखक आणि प्रसारक

manasi.milind@gmail.com

माल पोहोचल्याची आता डिजिटल नोंद; ई-वे बिल पोर्टलवर सुविधा सुरू

पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ

...तर पॅरोल नाकारणे घटनाबाह्य! मुंबई उच्च न्यायालयाचा कैद्यांच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा

Pune : नसरापूर अत्याचारप्रकरणी २८ मे रोजी दोषारोप ठेवणार