विचारपान
संदीप प्रधान
मयंक लोहार या तरुणाची रोशन सुवर्णा या व्यक्तीने चाकूने वार करुन हत्या केली. पोटाकरिता नोकरी करणारे हे दोघेही एका व्यवस्थेच्या चरकात सापडलेले होते. बारा तास नोकरी, चार तास प्रवास आणि जेमतेम पाच तासांची झोप असे आयुष्य जगणे किंवा जेलमध्ये सडणे यात फारसा फरक नाही. त्यामुळे मग धक्का लागला किंवा लोकलचा दरवाजा बंद केला तरी कायदा हातात घ्यायला अनेकांना काहीच गैर वाटत नाही.
मयंक लोहारचे वय २२ वर्षे त्याच्यावर धावत्या लोकलमध्ये चाकूने सपासप वार करणारा रोशन सुवर्णाचे वय ३० वर्षे दोघेही या मुंबई शहरात आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याकरिता धडपडणारे. दोघांमध्ये शत्रूत्व असण्याचे काही कारण नव्हते. मात्र धो धो पाऊस पडत असताना लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून उभयतांमध्ये वाद झाला. सुवर्णाच्या बँगेत भलामोठा चाकू होता. त्याने तो काढून मयंकवर वार केले आणि त्याला ठार केले. सुवर्णाच्या पोटात दारु होती. मनात आग होती. बँगेत चाकू होता. योगायोगाने तेथे मयंक होता. कदाचित सुवर्णाला दुसऱ्याच कुणाला संपवायचे असू शकते. सुवर्णा कशामुळे तरी अस्वस्थ होता. अन्यथा त्याला चाकू बाळगण्याचे कारण काय होते? पोलिसांनी जेव्हा त्याला पकडले तेव्हा त्याने त्यांना मयंक जिवंत आहे की नाही हाच प्रश्न केला. म्हणजे सुवर्णाने आँनलाइन खरेदी केलेला चाकू विशिष्ट उद्देशाने खरेदी केला होता. भांडणाला सरसावलेला मयंक एैकत नाही म्हटल्यावर आपण खरेदी केलेला चाकू किती तीक्ष्ण आहे हे पडताळून पाहण्याची तीव्र इच्छा सुवर्णाला झाली आणि त्याने मयंकवर वार केले. सुवर्णाकडे चाकू आहे, याची पुसटशी कल्पना असती तरी मयंकने कदाचित वाद वाढवला नसता. जानेवारी महिन्यात आलोक कुमार सिंह या तरुण प्राध्यापकाचीही किरकोळ वादामुळे हत्या झाली होती. मुंबईच्या लोकलमधील वाद नवे नाहीत. रोज सकाळी आणि सायंकाळी लक्षावधी प्रवासी लोकलला लटकून प्रवास करतात. डब्यात इतकी दाटीवाटी असते की, श्वास घेणे मुश्कील असते. पण कुणाची बँग कुणाला लागली किंवा पायावर चुकून पाय पडला तरी अर्वाच्च शिव्या व त्या गच्च गर्दीतही शर्टाची कॉलर धरायला अनेकजण मागेपुढे पाहत नाहीत. काही प्रवासी फुटबोर्डवर पाऊल ठेवतात आणि दरवाजाच्या वरच्या खाचेत बोटं अडकवून प्रवास करतात. मृत्यू त्यांचा सतत पाठलाग करत असतो. त्यामुळे त्यांच्याकरता मृत्यूचे भय संपलेले असते. अशांना स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जिवाची पर्वा वाटत नाही. मयंक लोहार आणि रोशन सुवर्णा याच चरकात पिळवटून काढणाऱ्या व्यवस्थेचे शिकार होते. चहुबाजूने कोंडी करणारी ही व्यवस्था जीव घ्या किंवा जीव द्या हेच जणू मोठमोठ्याने मुंबईकरांना ओरडून सांगत असते.
मुंबई हे शहर कष्टकऱ्यांचे शहर असले तरी येथे कष्ट करणारा आयुष्यभर कष्ट करत राहतो. जुगाडू, वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन धोका पत्करणारा आणि व्यवस्थेला गुंगारा देणारे येथे अब्जाधीश झाले आहेत. एकदा का तुम्ही श्रीमंत, अतिश्रीमंत मुंबईकर झालात की मग तुमचे जीवन आडवेतिडवे बदलून जाते. इथला पोलिस, तलाठी, आमदार, खासदार पैशाच्या जोरावर तुम्ही खिशात घालता. त्यामुळे मुंबईतील मॉलमध्ये सेल्समन असलेला किंवा एखाद्या कंपनीत अकाऊंटस विभागात नोकरी करुन १५ हजारांपासून ४० हजारांपर्यंत वेतन घेणाऱ्या प्रत्येकाला मुंबईत अंबानी होण्याची इच्छा असते. नव्या पिढीच्या अनेकांना त्याकरिता कुठलाही मार्ग पत्करण्यात गैर वाटत नाही हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे. एकेकाळी या मुंबईत गिरण्या, कंपन्यांत युनियन होत्या. दत्ता सामंत, जॉर्ज फर्नांडिस, आर. जे. मेहता, गुलाब जोशी वगैरेंच्या युनियन होत्या. कामगार काहीवेळा गुंडगिरी करायला धजावत कारण संघटीत होते. जागतिकीकरणानंतर कामगार कायद्यांवर वरवंटा फिरवला गेला आणि व्यवस्थापनांच्या मनमानीचे दुसरे टोक आपण गाठले. आता १२ ते १४ तास काम करायचे. देशाची लोकसंख्या १४० कोटी असल्याने कुठलेही काम करायला हजारो लाखो तयार असतात. परप्रांतातून येणारे तर अगदी कमीत कमी वेतनात काम करायला तयार होतात. मग काय मॉल असो की, डॉक्टर, वकील असो की सीए, कारखानदार असो की हॉटेल मालक अत्यल्प वेतनात जास्तीत जास्त तास कामगार, कर्मचाऱ्याला रगडून घेणे हीच कार्यसंस्कृती बनलेय. दोन काय तीन तीन पदव्या, पदविका घेतल्यानंतरही मनाजोगा पगार मिळत नाही. पगार तुटपुंजा असल्याने स्वतःचे घर, लग्न, संसार, स्थैर्य हे शब्द जीवनाच्या शब्दकोषातून बाद झालेत. एकीकडे जगण्याचे हे वास्तव रोज बोचत असताना लोनवर घेतलेल्या मोबाईलमधील इन्स्टाग्राम उघडले की, त्यावर श्रीमंत कशी मजा मारतात, बॉलिवुड अभिनेत्री कशा तोकडे कपडे घालून पंचतारांकित हॉटेलातील पार्ट्यात मिरवतात, नवीन महागडी गँजेटस कुठली आलेत, महिलांचे कंबर लचकत काढलेले व्हीडिओ, राजकीय नेत्यांचे कोट्यवधीचे झोल अशी हवी-नको असलेली माहिती मिळत राहते. पोर्न फिल्म तर विनामूल्य किती हव्या तेवढ्या पाहता येतात. चांगल्या चुंगल्या घरातील मुली- महिला कँमेरासमोर स्वमर्जीने कपडे उतरवतात. त्यामुळे आपल्याखेरीज सर्व जग सर्व सुखांचा उपभोग घेतेय, अशी भावना या तरुणांत ठासून भरली जातेय. मग मला हवी असलेली सुखं मी सहज मिळणार नसतील तर ओरबाडून मिळवणारच, ही भावना मेंदू, मनाचा ताबा घेते. त्यामुळे मग रेल्वेच्या डब्यात जागा पकडताना एखाद्याचा धक्का लागला तर काढ त्याला बुकलून, दरवाजात उभे राहण्यावरून वाद झाला उचल हात, पार्टी करुन आलेली मुलगी ओलात बसली तर घेऊन टाक तिचा उपभोग. मागचापुढचा विचार न करता आपल्याला हवे ते हिसकवायचे. पोलिस, कायदा याच्या कचाट्यात आपण अडकलो तर काय परिणाम होतील, याचा विचार करण्याची क्षमता काही लोक हरवून बसलेत. किंबहुना आता मी जे जीवन जगतोय तेच एखाद्या जेलपेक्षा वेगळे नाही. बारा तास काम करतो, चार तास त्रासदायक प्रवास करतो जेमतेम चार-पाच तास झोप घेतो. त्यामुळे आपण बाहेर असेच कष्टप्रद जीवन जगत राहिलो काय आणि जेलमध्ये गेलो काय काय फरक पडतो, अशा भावनेनी एक मोठा वर्ग ग्रासलेला आहे. दुसरा एक वर्ग आहे. खासगी बँका, आयटी कंपन्यांत मोठी पँकेज घेणारा. पण त्याचे तर कामाचे तास जराही निश्चित नाहीत. त्याने टॉवरमध्ये फ्लँट घेतलाय, महागड्या मोटारी खरेदी केल्यात. त्याचे ईएमआय तो भरतोय पण त्याचा उपभोग तो घेऊ शकत नाही. कार्यालय, वाहतूक कोंडी आणि वर्क फ्रॉम होम यात तो पिचलाय. त्यामुळे एका अर्थाने तोही एका वेगळ्या व्यवस्थेच्या जेलमध्येच आहे. त्यामुळे त्याच्याही भावनेचा उद्रेक कधीकधी पाहायला मिळतो. अभावग्रस्त नसलेल्या अशा सधन कुटुंबातील एकुलती एक मुले लाडात वाढवलेली असतात. त्यांना कुणी ओरडलेले किंवा चापट दिलेली त्यांच्या पालकांना आवडत नाही. मुलांच्या कुठल्याही गोष्टीला पालक नकार देत नाहीत. अशी मुले जेव्हा संरक्षित कोषातून बाहेरच्या जगात येतात तेव्हा नकार एैकल्याने मानसिकदृष्ट्या खचतात किंवा किरकोळ कारणास्तव वाद घालून हाणामारीचे संकट ओढवून घेतात. शिवाय आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना आयडेंटीटी क्रायसिस छळत आहे. प्रत्येकाला ओळख निर्माण करायचेय. लाईक्स, फॉलोअर्स गोळा करायचे. कारण यशाची फुटपट्टी आता तीच झालेय. त्यामुळे मग कुणी धोकादायक कड्यावर उभे राहून रिल काढतो किंवा चाकू हातात घेऊन आपले वेगळेपण ठसवण्याकरता धडपडतोय.
सोशल मीडियावर आपण सारेच आहोत. माझे पाच हजार फेसबुक फ्रेंड आहेत. ट्विटवर मी पोस्ट केली की, त्याला शेकडो लाईक्स मिळतात. व्हॉटसअँपच्या ४० ग्रुपमध्ये मी आहे. मला वाढदिवसाला तुफान शुभेच्छा मिळतात. पण आँफिसमध्ये माझा बॉस पाणउतारा करतो त्याच्याबद्दल विश्वासानी बोलायला मला कोण आहे? उत्तर नाही. माझा बॉयफ्रेंड मला लॉजवर घेऊन गेला आणि माझा लैंगिक संबंध करताना व्हीडिओ काढून मला ब्लँकमेल करतोय. हे मन मोकळे करायला मला कोण आहे? उत्तर नाही. त्यामुळे मग एकाकीपणातून आत्महत्या करायला अनेकजण मागेपुढे पहात नाहीत. अगदी सधन कुटुंबातील मुले-मुली किरकोळ कारणास्तव आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. संपलेला संवाद हा तर गरीब, मध्यमवर्ग आणि श्रीमंत या सर्वच वर्गांना जडलेला गंभीर आजार आहे. एकेकाळी रेल्वेच्या डब्यांत भजने गायली जायची, पत्ते कुटले जायचे, अंताक्षरी खेळली जायची, वेगवेगळी वृत्तपत्रे घेऊन येणारे परस्परांशी बातम्यांबाबत चर्चा करायचे. राजकीय नेतृत्व व व्यवस्थेला शिव्या घालून मन मोकळे करायचे. आता रेल्वेच्या डब्यात जो तो आपल्या मोबाईलमध्ये बसून कुणी वेबसिरीज पाहतो तर कुणी रिल्स, कुणी युट्युब व्हीडिओ तर कुणी व्हॉटसअँप मेसेज. प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता आहे. चीड आहे. आक्रोश आहे. पण तो कुणाला सांगायचा? मोबाईलमध्ये तो पाहतो की, धुरंधर चित्रपटात अक्षय खन्ना भररस्त्यात हातगाडीवरील लोखंडी वजन घेऊन ते एकाच्या डोक्यावर आपटून त्याचा चेंदामेंदा करतोय. अगदी हे अस्सचं करायची इच्छा मनात प्रबळ होत असताना अवकाश असतो तो धक्का लागण्याचा किंवा मनाविरुद्ध लोकलचा दरवाजा बंद करण्याचा...
pradhansandeep19@gmail.com