अक्षररंग

आवाजाच्या गर्दीत हरवलेली शांतता

नवीन वर्ष आले, पण शहरातील वाढता गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण आपल्या कानांवर प्रहार करत आहे; आता माणसाला नव्या कानांचीच गरज भासू लागली आहे.

नवशक्ती Web Desk

पडघम

अवधूत परळकर

नवीन वर्ष आले, पण शहरातील वाढता गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण आपल्या कानांवर प्रहार करत आहे; आता माणसाला नव्या कानांचीच गरज भासू लागली आहे.

होय. नवीन कान हवे आहेत.
ध्वनी प्रदूषणापासून समर्थपणे रक्षण करू शकतील अशा क्षमतेचे नवे कान हवे आहेत.

गोंगाट वाढत चालला आहे. तुम्ही आम्ही सर्व पाहत आहोत, .. सॉरी .. ऐकत आहोत. .. आवाज राजकारणी नेत्यांच्या संसदेतल्या भाषणांचा आणि अलीकडचा निवडणुकीतल्या घोषणांचा. घोषणा असेनात का पोकळ, आवाज खूप मोठा, देशभर दुमदुमणारा.

तसे या शहरात आणखीही खूप आवाज फिरताहेत आसपास. दोन कानांनी काय काय ऐकायचं. चाळी, जुने वाडे, इमारती सगळ्याची पाडापाड चालू आहे.

काल परवापर्यंत आमच्या सोसायटीच्या शेजारी उभी असलेली इमारत. सकाळी उठून पाहतो तो धुळीचा लोट. धूळ खाली बसली की धुळीने भरलेली का होईना इमारत दिसेल वाटलं.

इमारत आपल्या जन्मापासून दिमाखात उभी राहून आपल्याला सोबत करणारी. भर उन्हात तिची मोठाली सावली पडायची. त्या सावलीत टेनिस बॉलने क्रिकेट खेळता यायचं.

शक्यतो ग्राउंड शॉट मारायला लागायचे. सिक्सर मारणं अलाउड नव्हतं. तरी अधूनमधून अनवधानाने सिक्सर मारल्या जायच्या. मग फुटलेल्या काचा बसवून देणं आलं. सॉरी वर भागत नसे. वर्गणी काढून नुकसानाची रक्कम भरून द्यावी लागायची. काच बसवणाऱ्या कारागिराला देखील रक्कम द्यायला लागायची.

गेले ते दिवस. आवाजी दिवस आलेत आता.

धूळ विरळ होत होत खाली बसली. समोर पाहतो तो मोकळं मैदान! जादू झाल्याप्रमाणे इमारत अदृश्य. आदल्या दिवशीच्या खास कार्यक्रमामुळे सर्वांना झोपा लागल्या की काय. कुणालाच कसा हा चमत्कार दिसला नाही. आणि तिथली माणसे गेली कुठे. असो.

इथवर संपलं नाही.

काही दिवसांनी पुन्हा धडामधुडूम सुरू झाले. बुलडोझर नावाचा अक्राळ विक्राळ प्राणी मैदानातली जमीन खात चालला होता. चित्रविचित्र आवाज सर्व बाजूने यायला लागले. आसमंत पुन्हा धुळीने भरून गेला. कुणीतरी म्हणाले हा विकासाचा आवाज आहे.

कुणाला कशातून कसले भास होतील. विकास आवाजाचा होत चालला आहे.

शहरात दिवसेंदिवस आवाजाने थैमान घातलं आहे. शहरातल्या इमारतीची अशी धूळदाण चालू असताना बुलडोझरचे कर्णकटू आवाज सर्व बाजूने येत राहिलेत. डायनासोर सारखे अक्राळ विक्राळ दिसणारे बुलडोझर इमारतींच्या भिंतीवर आक्रमण करून धडका देत पाडापाड करताहेत अशी दृश्ये आता रस्त्यांतून जागोजागी फिरताना दिसू लागली आहेत.

हे सगळं सहन करण्यासाठी इयर प्लग उपयोगाचे नाहीत. नवे कान हवेत. न्यू इयर.

नव्या वर्षी शहरात नवनवे आवाज येऊन दाखल होताहेत.

पूर्वी फटाके फक्त दिवाळीत वाजायचे. आता फटाके वाजवायला खास निमित्त लागत नाही. लग्नाच्या वरातीत फटाके. कर्मचाऱ्यांना बोनस मिळाले की दोनचार मिनिटे आसमंत भरून जाईल असा फटाक्याचा दणदणाट. चक्क मशीनगन चालवल्यासारखे आवाज.

गल्लीतला कोणी लीडर निवडून आला की विजयी मिरवणुकीत फटाक्याचा उत्सव. अंत्ययात्रेला फटाके आणि धार्मिक सणांच्या यात्रांमध्ये देखील वाद्यसंगीतासोबत फटाके. फटाके आणि तेही ऍटम बॉम्ब आवाजी फटाके. फटाक्यासारखा धूमधडका केल्याशिवाय लग्न सोहळा पूर्ण होत नाही.

फटाकेप्रेमी आता घटस्फोटाच्या स्वाक्षऱ्या करताना देखील फटाके वाजवतील असा मी एकदा जोक केला. तर शेजारचा मित्र म्हणाला हा जोक नाही लेका, आमच्या फॉरेन रिटर्न चुलत भावाने खरोखरच डिव्होर्स घेताना फटाके लावले होते. आणि तेही तमाम वऱ्हाडी लोकांच्या साक्षीने.

काय बोलावं.

डोळे बंद करता येतात तसे कान बंद करता येत नाहीत. हाच खरा प्रॉब्लेम आहे. आलिया भोगासी... म्हणून भोवतालचे सर्व आवाज ऐकावेच लागतात.

आवाजी वातावरणामुळे आजची सिनेमा थिएटरे छळछावण्या होऊन गेली आहेत. थिएटरमध्ये सिनेमे पाहणे हा “आ बैल मुझे मार” सारखा प्रकार होऊन बसला आहे. सिनेमाच्या मूळ ध्वनीमुद्रणाच्या पाच पट ध्वनी थिएटरमध्ये ऐकायला मिळतो.

खास करून सिनेमात भरपूर गाणी असली तर काय बोलावं. बटण फिरवून व्हॉल्यूम कमी-जास्त करता येईल असा कान जो कुणी शोधून काढेल त्याला नोबेल देऊया.

शहरात सतत ट्रॅफिक जॅम. समोरचा ड्रायव्हर गाडी पुढे रेटत नाही म्हणून मागच्या गाडीतला ड्रायव्हर हॉर्न वाजवून त्याला आलेला राग व्यक्त करतो. त्याच्या मागचा ड्रायव्हर देखील त्याचाच धडा गिरवतो.

एकूण मोटारींच्या हॉर्नचा ऑर्केस्ट्रा. गाड्यांचा गोंधळ आणि आवाजाचा सुकाळ.

खिडक्या बंद करून घरी बसावं तर लोकप्रिय टीव्ही मालिकांचा सुकाळ. उच्च स्वरात बोलल्याशिवाय आपली प्रॉडक्ट कोण घेणार या चिंतेने ग्रासलेल्या जाहिरात कंपन्या. पिसाळलेला कुत्रा अंगावर यावा अशी त्यांची शब्द फेक.

जाहिरात सुरू होताच क्षणी अशी सुविधा असलेले कान लाभलेली जन्मजात पिढी जन्माला येण्याची वाट पाहावी लागणार.

आपली पिढी फक्त शांतपणे प्रार्थना करू शकते — विश्वातील आवाजाचा हा वाढता कल्लोळ कमी होऊ दे. किंवा तो सहन होऊ शकेल असे कान आम्हाला दे.

ढोलताशे, टाळ वाजवल्याशिवाय, उच्च स्वरात आळवणी केल्याशिवाय प्रार्थना ऐकेल असा देव कुठे असेल तर कळवा.

ज्येष्ठ लेखक

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा