जगतवारी
मेधा आलकरी
एका प्रवासात रेल्वे, बोट आणि बस... पण प्रत्येक वळणावर निसर्गाचा नवा चमत्कार! कधी डोंगराच्या पोटातून जाणारी रेल्वे, कधी दुधासारखा कोसळणारा धबधबा, तर कधी फ्यॉर्डच्या खोल निळ्या पाण्यात हरवून जाण्याचा अनुभव. नॉर्वेच्या ‘इन अ नटशेल’ सफरीत प्रत्येक क्षण जणू निसर्गाने खास सजवलेला!
उत्तर युरोपातील स्कॅन्डेनेव्हियन देश हे वैविध्यतेने नटलेले! काही देशांचे भाग तर आर्क्टिक वर्तुळाच्या आत वसलेले. प्रत्येक देशातील निसर्गाचं रुपडं वेगळं. नॉर्वेमधील फ्यॉर्ड हा असाच एक नयनरम्य देखावा. हे भूरूप हिमनदीने डोंगर कापून तयार झालेल्या अरुंद आणि खोल खाडीसारखं असतं. दोन्ही बाजूंनी उंचच उंच डोंगरकडे असलेल्या त्या समुद्राच्या अरुंद फाट्यातून केलेला नौकाविहार हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील पर्यटन केंद्रात आम्हाला ‘नॉर्वे इन अ नटशेल’ नावाच्या खास निसर्गप्रेमींना आवडेल अशा टूरचं पत्रक मिळालं. सुरुवातीला ट्रेन, मग डोंगरातली झुकझुक गाडी, नंतर फ्यॉर्डमधून जाणारी बोट आणि शेवटी डोंगरांना प्रदक्षिणा घालणारी बस अशा वाहनांमधून नॉर्वेचं रम्य सृष्टीसौंदर्य पाहायला मिळणार होतं. पाचशे किलोमीटर अंतर कापणाऱ्या ‘बर्गन रेल’चा जवळजवळ शंभर किलोमीटरचा मार्ग डोंगरावरील जंगलातून जातो. पूर्व पश्चिम धावणाऱ्या या ट्रेनमधून प्रवास करताना आम्हाला सर्वप्रथम रानातील खेड्यापाड्यांचा प्रदेश दिसला आणि नंतर दिसली मन मोहून टाकणारी शांत, स्वच्छ, पारदर्शक गोड्या पाण्याची सरोवरं! निळसर पाण्यात पडणारं हिरव्या डोंगरांचं प्रतिबिंब अप्रतिम दिसत होतं. जंगलातून पायी किंवा सायकल रपेट हा नॉर्वेतील नागरिकांचा आवडता छंद आहे. १२२२ मीटरवर असलेलं ‘फिन्स’ हे या मार्गावरील सर्वोच्च ठिकाण! येथील ७८ चौरस किलोमीटरचा घुमटासारखा दिसणारा ग्लेशियर १७ मे या राष्ट्रीय दिवशी एका अनोख्या वार्षिक सोहळ्याचा मूक साक्षीदार असतो. परंपरागत पोशाख परिधान करून काही उत्साही आबालवृद्ध त्यावरून स्कीईंग करतात. पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी पोशाख घातलेली माणसं घसरताना पाहणे ही नयनांना एक मेजवानीच असेल नाही?
पुढचं स्टेशन मिरडील. इथे उतरून आम्हा ‘नटशेल’वाल्यांना आता झुकझुक करत, रमतगमत जाणाऱ्या ‘फ्लाम’ रेल्वेत बसायचं होतं. बोगद्यातून वाट काढत ही गाडी ८६७ मीटर उंचीवरून समुद्रसपाटीला असलेल्या फ्लाम या गावी आपल्याला घेऊन जाते. इतका उभा चढउतार करणारी रेल्वे खोदणं हे एक आव्हानच होतं. या प्रवासातील वीसपैकी अठरा बोगदे कामगारांनी हाताने खोदून काढले आहेत. १९४४ साली ती प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. मिरडीलच्या पठारावरून खाली नेणाऱ्या या पन्नास मिनिटांच्या प्रवासात ही गाडी आपल्याला फ्लाम व्हॅलीचं मनोरम दर्शन घडवते. पहिलाच बोगदा हेअर पीन वळणाचा! डोंगराच्या गर्भातच तो १८० अंशाचा वळसा घेतो. बोगद्यातून बाहेर आलं की फिरत्या रंगमंचासारखा नवा देखावा!
कायोस्फोसेन (स्कॅन्डेनेव्हियातील प्रत्येक नावं उच्चारताना जिभेला व्यायाम घडतो.) धबधबा असलेल्या स्टेशनवर गाडी पाच मिनिटं थांबेल अशी घोषणा झाली आणि आम्ही सगळेच त्या शुभ्रदुधाळ प्रपाताचं जवळून दर्शन घेण्यासाठी खाली उतरलो. ९४ मीटर खाली कोसळणारा हा अप्रतिम धबधबा म्हणजे कमनीय, मुग्ध ललनेचा मुक्त संचार जणू! त्याचं सौंदर्य डोळ्यात टिपतोय तोवर अचानक सुरेल संगीत वाजू लागलं आणि लाल घेरदार वेशातली एक मुलगी धबधब्याजवळील एका पडक्या घराच्या भिंतीलगत असलेल्या सपाट जमिनीवर अतिशय मोहक पदन्यास करू लागली. तिचे संथ हेलकावे आणि गोल गोल गिरक्या संपताच आपले दोन्ही हात हवेत पसरून, लोकांकडे पाठ करून ती धबधब्यात उतरून नाहीशी झाली. जणू विरून गेली आणि ते संगीतही धिमं झालं. अचंबित झालेले आम्ही तो प्रकार आ वासून पाहतोय तोवर ती धबधब्याच्या खालच्या पातळीवरून उसळी मारल्यागत वर आली आणि ते संगीत अचानक थांबलं. आम्ही चक्रावलोच! तिनं कमरेत वाकून पर्यटकांना अभिवादन केलं. टाळ्यांचा कडकडाट होतोय तोच कंडक्टरची शिट्टी वाजली. बरोब्बर पाच मिनिटं झाली होती. भारावल्यागत गाडीत चढलो आणि विचारांती लक्षात आलं की त्या एकसारख्या बांध्याच्या, सारख्या केश-वेशभूषेतील दोन मुली असाव्यात. एका तीरावरून धबधब्यात विरून जाऊन दुसऱ्या तीरावरून वर आल्याचा तो केवळ आभास होता. पुढे वाचनात आलं की स्कॅन्डेनेव्हियन लोककथांमधील ‘हल्ड्रा’ नावाच्या भुरळ पाडणाऱ्या जंगलकन्येचं, हे मोहिनीस्वरूप आहे.
मिरडीलपासून एव्हाना चार टप्पे खाली आलेल्या या झुकझुक गाडीतील मोठ्या खिडकीतून मागे वळून पाहिलं असता हिरव्या पिवळ्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर आमची ही लाल फ्लाम रेल उठून दिसत होती. शिखरापाशी डोंगरातील घरांची कौलं अतिशय सुंदर दिसत होती. रेल्वेला समांतर धावणाऱ्या रस्त्यावरून एक हौशी एकला गडी सायकल दामटवत वर निघालेला बघितला. या मार्गावरील सर्वात मोठ्या बोगद्यातून बाहेर आलो आणि समोरच्या हिरव्यागार पठारावर शिस्तीत बकऱ्या चरताना दिसल्या. यांना मुद्दाम या उन्हाळी फार्मवर आणून भरपूर चारा देऊन, दिवसातून दोनदा दूध काढतात आणि त्याचा उपयोग उत्तम दर्जाचं चीज बनवण्यासाठी होतो.
फ्लामसेल्वा नदीला पार करून शेवटच्या टप्प्यातील फ्लाम स्टेशनवर पोहोचलो. इथली मऊसूत दिसणारी हिरवाई मन मोहून टाकते. फ्लाम शब्दाचा अर्थच मुळी ‘डोंगराच्या कुशीतलं हिरवं पठार’ असा आहे. किती सार्थक नाव!
रेल्वेतून उतरून शेजारच्या भाऊच्या धक्क्यावरून आम्हाला आता फ्यॉर्डमधून सफर घडवणारी बोट पकडायची होती. दोन तासांच्या या नौकाविहारात आम्ही पूर्ण वेळ डेकवर उभे होतो. गगनचुंबी कडे पाहावेत की समोर वाहणारं खोल गहिरं पाणी अशा संभ्रमात होतो. काळ्या पहाडावरून ओसंडणारे धबधबे तर पावलोपावली भेटत होते. त्यांचे तुषार असे उडत होते जणू वाऱ्यावर उडणारे पांढरे पारदर्शक पडदे! जगातील सर्वात लांब व खोल असा ‘सॉग्नेफ्यॉर्ड’ हा नॉर्वेमधील फ्यॉर्डचा राजा म्हणवला जातो. एकशेवीस मैल लांब आणि एका मैलापेक्षा अधिक खोल! काठावरील ‘आंद्रेडाल’ या टुमदार गावात त्यांच्या लोकसंख्येहून अधिक बकऱ्या आहेत. इथल्या प्रसिद्ध ‘गोट चीज’ला सोन्याचा मान आहे.
स्टिगन नावाच्या डोंगरावरील शेततुकड्याचा उभा कडा तीनशे मीटर उंच आहे. स्टिगन या नावामागे एक मजेदार कथा आहे. स्टिगनचा अर्थ शिडी. या शेतावर पोहोचण्यासाठी त्या उभ्या कड्यावर पायऱ्या खोदणं अशक्य होतं. त्यामुळे शिडी हा एकच पर्याय होता. पूर्वी चर्चचे अधिकारी या छोट्या छोट्या गावातून शेतीचा कर वसूल करण्यासाठी फिरत असत. स्टिगनमधील रहिवाशांना उंचावरून त्यांची बोट दिसली की ते कर चुकवण्यासाठी शिडी वर उचलून घेत असत. स्टिगन फार्मचा उंच कडा सोडल्यानंतर बोट नायरॉयफ्यॉर्डमध्ये पोहोचली. या अरुंद फाट्यातील प्रवास अतिशय चित्तथरारक होता. वीस किलोमीटर लांब असलेला हा फाटा एका जागी २५० मीटर इतका चिंचोळा होतो. २००५ सालापासून या नायरॉयफ्यॉर्डला युनेस्कोच्या विश्वठेवा यादीत स्थान मिळालं आहे. बोट धीम्या गतीनं पुढे जात होती. काठावरील गावात पिवळा पर्णसंभार असलेलं ‘लिंडन’ झाड दिमाखात उभं असलेलं दिसलं. १९३३ पासून हे वृक्ष नैसर्गिक ठेवा म्हणून जतन केले आहेत.
आणखी थोडा लांबावा असं वाटणारा हा जलप्रवास दोन तासांत संपला. रमणीय अशा गुडावांगेन बंदरापासून निघणाऱ्या बसमध्ये बसून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. थोडं अंतर गेल्यावर एक अल्लड धबधबा लागला. या धबधब्याविषयी एक दंतकथा सांगण्यात आली. फार पूर्वी म्हणे वर डोंगरात एक हिरवंगार कुरण आणि डेअरी फार्म होता. एकदा तेथील गवळ्याची पोर अंगणातील चुलीवर दूध उकळवून त्याचं चीज तयार करत असताना ते भांडं कलंडलं आणि उंच कड्यावरून गडगडत थेट गुडावांगेनपर्यंत पोहोचलं. हा शुभ्रप्रपात ओघळलेल्या दुधासारखा दिसतो खरा!
आता आमची बस एका अरुंद आणि चढ्या रस्त्यावरून तेरा हेअर पीन वळसे घेण्यास सज्ज झाली. दीड किलोमीटरचा हा वळणावळणाचा रस्ता म्हणजे चालकाची परीक्षाच असते. मी श्वास रोखून त्याचं कसब पाहत होते. एवढी लांब अवजड ती बस आणि हा पठ्ठा एका हातात स्टीयरिंग आणि दुसऱ्या हातात माइक धरून ती अगदी लीलया चालवताना वर आम्हाला माहितीही सांगत होता. १९९०पर्यंत हा मुख्य रहदारीचा रस्ता होता आणि समोरासमोरून वाहनं जात-येत होती हे ऐकून तर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. आता मात्र एक बोगदा खणला आहे. ज्यांना सृष्टीसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घ्यायला आवडतो अशा पर्यटकांसाठी चालणाऱ्या बससाठी हा नागमोडी रस्ता खुला ठेवला आहे. बाकी ये-जा त्या बोगद्यातून! ‘नॉर्वे इन अ नटशेल’चा हा प्रवास इथे संपतो. तसं पाहिलं तर नॉर्वे देशात पर्यटकांना भावतील अशा खूप गोष्टी आहेत; पण हा फ्लाम रेल्वेचा प्रवास खासच!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com