दिवाळी अंक २०२६ : ओवाळणी 
अक्षररंग

दिवाळी अंक २०२६ : ओवाळणी

ओवाळणीच्या ताटात भावाने ठेवली एक चिठ्ठी! पण ती उघडताच वैष्णवीला मिळालेला आनंद काही औरच होता. काय होती ती अनोखी भेट?

नवशक्ती Web Desk

एकनाथ आव्हाड

ओवाळणीच्या ताटात भावाने ठेवली एक चिठ्ठी! पण ती उघडताच वैष्णवीला मिळालेला आनंद काही औरच होता. काय होती ती अनोखी भेट?

“वैष्णू... अगं, सकाळीच काय नाचणं चाललंय तुझं! आज भाऊबीज... दिवाळीचा पाचवा दिवस. बाळूला ओवाळायचंय ना तुला! सकाळीच आपला टीव्ही लावून दिलास आणि त्या टीव्हीकडे पाहत हातवारे काय करतेस, नाचतेस काय! तो टीव्ही बंद कर बरं आधी.”

आई असं बोलताच गाण्यावर थिरकणारी वैष्णवीची पावलं थांबली.

तिने काहीशा नाराजीनेच आधी टीव्ही बंद केला आणि ती आईला म्हणाली, “अगं आई, टीव्हीवर भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सुरू होतं ना! तेच पाहून पाहून करत होते मी. आई, तुला माहीत आहे... भरतनाट्यम ही तमिळनाडूमधील सर्वाधिक लोकप्रिय अशी भारतीय नृत्य-नाट्यशैली आहे, असं आमचे इतिहासाचे भांगरे सर सांगत होते.

“अगं, आपल्या पुढच्या कलानगर चाळीतली माझ्या वर्गातली ती रूपाली नाही का, ती जाते या भरतनाट्यमच्या क्लासला. आई... अगं, या रूपालीने गेल्या वर्षी शाळेच्या गॅदरिंगमध्ये भरतनाट्यम नृत्य सादर केलं. केवढ्या टाळ्या पडल्या! पूर्ण शाळा तिचं ते नृत्य पाहण्यात गुंग झाली होती. त्यावेळी गॅदरिंगला आलेल्या प्रमुख पाहुण्यांनीसुद्धा तिच्या नृत्यकलेचा आवर्जून उल्लेख करून तिचं कौतुक केलं. तेव्हा ते प्रमुख पाहुणे म्हणाले होते, ‘प्रत्येक माणसाने जिवापाड जपावी एखादी कला. एखादी कलाही अनेक माणसांना जोडते, आनंद देते.’

“त्यांचं ते वाक्य ऐकून आणि रूपालीची ती भरतनाट्यमची अभिनव नृत्य-नाट्यशैली पाहून आपणही भरतनाट्यम ही नृत्यशैली जोपासावी, असं मनापासून वाटलं मला. म्हणूनच मी रविवारच्या सुटीच्या दिवशी मुद्दाम रूपालीच्या घरी जाते. मग शिकवते मला ती ही नृत्यशैली!

“पण आई, आता ती म्हणते, ‘तुला आणखी चांगलं शिकायचं असेल, तर तू आमच्या नृत्यालयात ये. म्हणजे तुला नृत्याच्या रीतसर परीक्षाही देता येतील.’ पण त्या नृत्यालयाची मासिक फी ५०० रुपये आहे, आई. ती आपल्याला कशी परवडेल? मी रूपालीला स्पष्ट सांगून टाकलं, ‘आम्हाला नाही जमणार बाई वर्षाचे सहा हजार रुपये भरायला. आई-बाबा कुठून आणतील गं एवढे पैसे!’ मला सारं ठाऊक आहे. बाबांच्या महिन्याच्या तुटपुंज्या पगारातच घरखर्चाची मिळवामिळव करताना तुझे किती हाल होतात ते! आणखी वर हा नृत्यप्रशिक्षणाचा खर्च! त्यापेक्षा नकोच ते प्रशिक्षण.”

आई आपल्या मुलीकडे टक लावून पाहत होती. परिस्थितीने आपल्या मुलीत केवढा समजूतदारपणा आणला आहे, याची जाणीव झाली तिला. तिने आपल्या मुलीला पोटाशी घेतलं आणि म्हणाली, “वैष्णू, तुझी नृत्याची आवड माहीत आहे मला. बघ, तुझे बाबा नक्की तुझ्यासाठी काहीतरी करतील. पण आज भाऊबीज... चल बरं, पटकन तुझी तयारी कर. बाळूला ओवाळायचं तबकही तयार करायला घे.”

हा बाळूसुद्धा सकाळीच कुठे बाहेर गेलाय देव जाणे! ‘कुठे चाललास रे?’ असं विचारताच ‘एका मित्राने बोलावलंय. येतो पटकन जाऊन.’ हे उत्तर! मी म्हटलं त्याला, ‘अरे, आज भाऊबीज!’ तर तोंड वर करून म्हणाला, ‘हो, मला माहीत आहे आज भाऊबीज आहे ती.’

“वैष्णू, चल बरं आत. बाळू घरी यायच्या आत सारी तयारी करून ठेव बघ. मी थोड्याशा गरमागरम करंज्या करते. आवडतात ना तुला!”

“हो!” वैष्णवीने मोठ्याने होकार भरला आणि तिने तयारी करायला सुरुवात केली.

आईने तिच्यासाठी घरीच शिलाई मशीनवर शिवलेला घोळदार फ्रॉक तिने परिधान केला. मस्त वेणीफणी केली. आईच्या मदतीने बाळूला ओवाळायचं तबक तयार केलं. किती छान दिसत होती ती त्या नव्या फ्रॉकमध्ये! ती आता सर्व तयारीनिशी बाळूची वाट पाहत बसली. पण बराच वेळ झाला, बाळूचा पत्ताच नव्हता. मित्रांसोबत तो कुठे गेला होता, कुणास ठाऊक!

तिने आईला विचारलं, “आई, कुठल्या मित्राकडे गेलाय गं बाळू? किती वेळ झालाय. बहीण इथे ओवाळण्यासाठी खोळंबलीय आणि भाऊरायाचा पत्ताच नाही. हे बरं दिसतं का?”

आई हसून म्हणाली, “हो का आजीबाई! अगं, सकाळपासूनच तो ओवाळून घ्यायच्या तयारीत आहे बरं! तुझ्यासारखा नाही काही मी सांगितल्यावर तयारीला लागला.”

“बरं बाई, माझंच चुकलं. अगं, टीव्हीवर भरतनाट्यम लागलं आणि त्यातच रंगून गेले मी. वेळेचं भानच राहिलं नाही. पण आता मी अगदी तयारीत आहे बरं भाऊरायाला ओवाळायला!”

ती आता दाराशीच बाळूची वाट पाहत उभी राहिली. खरेदीला गेलेले बाबा सामान घेऊन आले, पण बाळू काही आला नाही. तिचं मन खट्टू झालं! वाट पाहणं मोठं कठीण काम आहे, असं तिला यावेळी वाटलं. बिचारी कितीतरी वेळ हातावर हात ठेवून बसली!

तब्बल दोन तासांनी बाळू जवळजवळ धावतच घरी आला. वैष्णवीकडे बघत आल्या-आल्या म्हणाला, “वैष्णू, सॉरी बरं का! थोडा उशीरच झाला. बरं, चल! ओवाळ मला पटकन.”

नाक फुगवून वैष्णवी म्हणाली, “अरे दादा, कुठे होतास इतका वेळ? किती वाट पाहायला लावलीस आज!”

बाळू पाटावर बसत म्हणाला, “सांगतो सारं काही, पण ते नंतर. आधी तू मला पटकन ओवाळ बघू.”

बाबांनी त्यांच्या डोक्यावरची पांढरी टोपी बाळूच्या डोक्यावर चढवली. बाळूचं ध्यान आता छानच दिसायला लागलं. वैष्णवीने हातात आरतीचं तबक घेऊन बाळूला मनोभावे ओवाळलं. औक्षण झालं आणि आता ओवाळणीसाठी तिने बाळूकडे उत्सुकतेने पाहिलं.

बाळूने एक पांढरी चिठ्ठी तिच्या ताटात टाकली. तिचं कुतूहल वाढलं. आरतीचं तबक खाली ठेवून तिने घाईनेच चिठ्ठी उघडली, तर ती चिठ्ठी नव्हतीच मुळी... ती तर पैसे भरल्याची पावती होती! वैष्णवीने पावती काळजीपूर्वक वाचली, तर तिच्या नावाने भरतनाट्यम प्रशिक्षणासाठी सहा महिन्यांचे तीन हजार रुपये भरल्याची ती पावती होती!

वैष्णवीने आनंदाने आणि आश्चर्याने बाळूकडे पाहिलं.

बाळू म्हणाला, “अगं, नृत्यकला तुला खूप आवडते, हे माहीत आहे मला. तुझी मैत्रीण रूपालीकडूनही कळलंय मला सारं. टीव्हीवरसुद्धा नृत्याचे कार्यक्रम किती आवडीने पाहतेस तू! मग मी मनाशी पक्कं ठरवलं, तुझी नृत्याची आवड जोपासण्यासाठी भाऊ म्हणून आपण काहीतरी केलंच पाहिजे. तुला या दिवाळीत कसंही करून भरतनाट्यमच्या क्लासला त्या रूपालीसोबत घालायचंच, याच विचाराने मी तळमळत होतो. म्हणूनच मी मागच्या उन्हाळ्यापासून सुटीत सकाळीच लवकर उठून पेपरची लाइन टाकायला लागलो. सुटीत एका दुकानातही काम केलं. मिळालेले पैसे गुपचूप बचत करून ठेवले. पण बघ... आज त्या पैशांचा किती छान उपयोग झाला तो! माझी वैष्णू ताई आता तिची आवडती भरतनाट्यम नृत्यकला शिकेल, याचा मला खूप आनंद होतोय.”

बाळू आनंदाने सहजगत्या हे बोलत होता.

वैष्णवीला काय बोलावं, काही वेळ सुचलंच नाही. म्हणून बाळू म्हणाला, “वैष्णू, कुठे हरवलीस गं! नाही आवडली का तुला माझी भाऊबीजेची ओवाळणी!”

बाळूचं हे बोलणं ऐकताना मात्र तिचे डोळे पाण्याने भरून आले. तिने भरल्या डोळ्यांनी बाळूकडे, आपल्या लाडक्या दादाकडे पाहिलं. पाण्याच्या पातळ पडद्याआडून बाळूचा चेहरा तिला आज खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होता. कारण त्याच्या सुंदर मनाचं प्रतिबिंब आज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं, असं तिला वाटत होतं.

बहिणीची आवड लक्षात घेऊन भावाने भाऊबीजेच्या दिवशी दिलेली ही आगळीवेगळी ओवाळणी तिला मनापासून आवडली. आपल्या भावाने भरतनाट्यमचं एक कलादालन आपल्यासाठी आज मोकळं करून दिलंय, या विचाराने ती भारावली. नकळत तिच्या तोंडून अत्यानंदाने शब्द फुटले, “थँक्यू दादा... थँक्यू!”

भावा-बहिणीचं हे अतूट प्रेम पाहून आई-वडिलांचेही डोळे आता पाणावले होते. आई म्हणाली, “बरं, चला आता. गरमागरम करंज्या खाऊन एकमेकांचं तोंड गोड करा आधी!”

सगळ्यांचे चेहरे आता आनंदाने फुलले... दिवाळीतल्या हसऱ्या, मंद प्रकाशासारखे!

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित