विशेष
संजीव साबडे
भारतातील सर्वात मोठ्या इंडिगो या विमान कंपनीचे मालक दिल्लीहून बंगलोरला जात असताना विमानात चहामध्ये पार्ले-जी बिस्कीट बुडवून खात असून शेजारी बिस्कीटचा पाच रुपये किमतीचा पुडा आहे, असा एक फोटो मध्यंतरी सर्वत्र व्हायरल झाला होता. इंडिगोची वार्षिक १७ हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे आणि देशातील हवाई वाहतुकीत त्या कंपनीचा ६६ टक्के हिस्सा आहे. त्या कंपनीचा मालक पार्ले-जीचं बिस्कीट आणि तेही चहात बुडवून खाईल, यावर विश्वासच बसेना. म्हणून खातरजमा केली, तर ते खरंच निघालं. देशात असंख्य प्रकारची व महागडी बिस्किटं असली तरी गरीब व श्रीमंत यांनी कधी ना कधी ते बिस्कीट खाल्लेलं असतं वा ते ती बिस्किटं खातात, याची खात्री झाली.
पूर्वी पश्चिम उपनगरांतून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करत असताना ट्रेन अंधेरी सोडून पुढे गेली की पार्ले ग्लुकोज बिस्किटांचा वास येई. बिस्किटं भाजली जात असल्याचा तो दरवळ गाडीभर पसरे अनेकांची भूक खवळून उठायची. गाढ झोपेत असलेला प्रवासीही या बिस्किटांच्या घमघमाटाने जागा व्हायचा. किती वर्षे तरी मुंबईकरांनी रेल्वेने येता-जाता त्या वासामुळे मनातल्या मनात ती बिस्किटं खाल्ली असतील. पूर्वी तर बिस्कीट म्हणजे पार्ले-जी असंच वाटायचं. तेव्हा पार्ले ग्लुकोज म्हणून ती ओळखली जात. पुढे १९८० वा ८२ च्या दरम्यान ती पार्ले-जी झाली. जी म्हणजे जिनियस, प्रतिभावान. खरं तर त्या बिस्किटाचा आणि प्रतिभावान असण्या वा होण्याचा संबंध नाही. तरीही पार्ले-जी हे सुटसुटीत नाव लोकांच्या तोंडी बसलं.
खोटं वाटेल, पण देशात प्रत्येक सेकंदाला ४५०० पार्ले-जी बिस्किटं खाल्ली जातात आणि रोज ४० कोटी बिस्किटं तयार होतात. देशातील प्रत्येक शहरात आणि कानाकोपऱ्यातील मोठ्या-छोट्या ५० लाखांहून अधिक दुकानांत ही बिस्किटं विक्रीसाठी ठेवलेली असतात. भारताखेरीज अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दुबई, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान अशा असंख्य देशांमध्ये मिळतात आणि खाल्ली जातात. यावरून या बिस्किटांची लोकप्रियता लक्षात यावी. देशात खाल्ल्या जाणाऱ्या बिस्किटांमध्ये पार्ले-जीचा वाटा एकेकाळी ६५ टक्क्यांच्या वर होता. भारतातील १२९ फॅक्टरीजमध्ये रोज या बिस्किटांचं उत्पादन होतं. सर्वात स्वस्त म्हणून ओळखलं जाणारं हे बिस्कीट कुठेही तयार होऊ देत, पण नावात मात्र 'पार्ले' असणारच. कारण या बिस्किटांचा जन्मच झाला आहे विलेपार्थ्यांच्या पूर्व भागातील एका छोट्याशा कारखान्यात.
आणखी तीन वर्षांनी म्हणजे २०२९ साली पार्ले प्रोडक्ट या कंपनीला १०० वर्षे पूर्ण होतील. कंपनी पार्व्यात म्हणूनच नाव पार्ले प्रोडक्ट ठेवलं गेलं. मालक मोहनलाल चौहान यांनी १९२९ साली पार्त्याच्या पूर्वेकडील एक बंद कारखान्याची जागा विकत घेतली आणि तिथं टॉफी व मिठाई बनवणं सुरू केलं. सुरुवातीची काही वर्ष तिथं बिस्किटं बनत नव्हती. जेमतेम १३ कामगार तिथं काम करायचे. त्यांनी १९३८ साली बिस्किटांचं उत्पादन सुरू केलं आणि १९३९ साली पार्ले ग्लुको या नावाने बिस्किटं बाजारात आणली. असं म्हणतात की, हे पहिलं भारतीय बिस्कीट. तोपर्यंत ब्रिटिश कंपन्यांची बिस्किटंच बाजारात होती आणि इराणी रेस्टॉरंटमध्ये तयार केलेली बिस्किटं फक्त तिथंच विकली जात. आज दरवर्षी सुमारे सात ते आठ हजार कोटी रुपयांची ही बिस्किटं विकली जातात. याखेरीज क्रॅकजॅक, मोनॅको, हाइड अँड सीक, मेलडी, पॉपिन्स, न्यूट्रीक्रंच, पार्ले रस्क वगैरे उत्पादनंही त्याच कंपनीची. पण नुसतं पार्ले म्हटलं की आठवतं ते आयताकृती ग्लुकोज बिस्कीट. खरं तर पार्ले-जी बिस्किटात फारशी पोषक तत्त्व नाहीत. आहे मैदा, साखर, पाम तेल आणि थोडंसं दूध. साखर व कार्बोहायड्रेट्स असल्याने बिस्कीट खाल्ल्यावर शरीराला थोडी ताकद मिळते. पण ६८ टक्के मैदा व त्यातील साखर यांमुळे वजन वाढण्याची आणि मधुमेह होण्याची शक्यता अधिक. पण भारतासारख्या गरीब देशातील लाखो, करोडो लोकांना सकाळी नाश्ताही परवडत नाही. त्यामुळे एक चहा आणि पाच रुपयांचं पार्ले-जीचं पाकीट याद्वारे ते सकाळची न्याहारी आटोपतात. ही बिस्किटं लोकप्रिय असण्याचं कारण त्यांची कमी किंमत हे आहे.
आता हे सर्व आठवण्याचं कारण विलेपार्ले पूर्वेला जिथं ही बिस्किटं तयार व्हायची, त्या फॅक्टरीचं बांधकाम तोडायला सुरुवात झाली आहे. सुमारे १५ एकर जागेवर आतापर्यंत २१ बांधकामं होती. त्या जागेत उत्पादन, पॅकिंग, कार्यालय असं सारं होत असे. ती बांधकामं खूप जुनी झाल्यानं पडण्याची परवानगी कंपनीनं सरकारकडे मागितली होती. येथील बिस्किटांचं उत्पादन तर कंपनीने दहा वर्षांपूर्वी, २०१६ सालीच थांबवलं होतं. तेव्हाच या फॅक्टरीच्या जागी उंच इमारती येणार, इथं पुन्हा कधीही बिस्किटं तयार होणार नाहीत, हे कळलं होतं. तिथं पाच इमारती बांधायला राज्य व केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या जागेचा वापर अर्थातच व्यावसायिक वापरासाठी होणार आहे. फॅक्टरीच्या जागेत वेगवेगळी किमान १२५ झाडं होती. ती तोडली जाणार असून त्या जागी जपानी पद्धतीची मियावाकी झाडं लावली जाणार आहेत. आज बिस्कीट फॅक्टरी तरी येता-जाता दिसते. तीही काही वर्षांनी इतिहास बनून जाणार.
आधी मुंबईतल्या कापड गिरण्या बंद पडल्या, मग इंजिनिअरिंग उद्योग बंद झाले, छोट्या सिल्क गिरण्या दिसेनाशा झाल्या, अनेक इंडस्ट्रियल इस्टेट बंद पडल्या, एमआयडीसीमध्ये उद्योग राहिले नाहीत, आग्रा रोडच्या औषध कंपन्या नाहीशा झाल्या आणि आता जगभर विलेपार्त्याचं नाव पोहोचवणारी कंपनीही नाहीशी होत आहे. लोक यापुढेही पार्ले-जी खात राहतील. पण पालेंचं महत्त्व राहिलं नसेल.
ज्येष्ठ पत्रकार