समाजचिंतन
जगदीश काबरे
गोरेपणा वाढवण्यापासून केसांची घनदाट वाढ, दातांचे शुभ्रपण ते त्वचेचे तारुण्य टिकवण्यापर्यंत... सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये चमत्कारिक परिणामांचे दावे केले जातात. विज्ञानाचा मुलामा देऊन ग्राहकांच्या सौंदर्यविषयक आकांक्षांचा बाजार मांडला जातो. मात्र, या दाव्यांमागे किती विज्ञान आणि किती फसवेगिरी आहे, हा खरा प्रश्न आहे.
चेहरा गोरा करणारी क्रीम, काही दिवसांत घनदाट केस उगवण्याची हमी देणारे तेल, केसगळती थांबवणारा शाम्पू, त्वचेचा रंग बदलणारा साबण, पांढरेशुभ्र आणि चमकदार दात करणारी टूथपेस्ट, इ. शरीरातील दोष दूर करण्याचे दावे करणारी सौंदर्यप्रसाधने यांच्या जाहिरातींमध्ये विज्ञानाच्या नावाखाली अनेकदा दिशाभूल केली जाते. एखाद्या पदार्थाचे रासायनिक नाव सांगितले, प्रयोगशाळेतील उपकरणे दाखवली, पांढरा कोट घातलेली व्यक्ती उभी केली किंवा एखाद्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण हास्य आणले की, उत्पादनाला वैज्ञानिक विश्वासार्हता प्राप्त होत नाही. तरीही जाहिरातींच्या माध्यमातून असेच वातावरण निर्माण केले जाते. ग्राहकांच्या सौंदर्यविषयक आकांक्षा, वय वाढण्याची भीती, केस गळण्याची चिंता, त्वचेच्या रंगाविषयी असलेली सामाजिक न्यूनगंडाची भावना आणि आकर्षक दिसण्याची इच्छा या मानसिकतेचा व्यावसायिक फायदा उठवला जातो. या प्रक्रियेत विज्ञानाचा वापर सत्य शोधण्यासाठी न होता, उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी केला जातो. हीच जाहिरातींमधील छद्मवैज्ञानिक प्रवृत्ती जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे.
जाहिरात करणे हा व्यवसायाचा वैध भाग आहे. उत्पादकाला आपल्या वस्तूची माहिती देण्याचा आणि ग्राहकाला ती खरेदी करण्याचा अधिकार आहे. परंतु हा अधिकार ग्राहकांची दिशाभूल करण्याचा परवाना नाही. उत्पादनाचे गुणधर्म अतिशयोक्तीने सांगणे, सिद्ध न झालेल्या परिणामांना वैज्ञानिक मान्यता असल्याचे भासवणे, मर्यादित प्रयोगांचे निष्कर्ष सर्वांना लागू होतील असे दाखवणे किंवा उत्पादनामुळे निश्चित परिणाम मिळतील अशी हमी देणे या गोष्टी ग्राहकांच्या हिताच्या विरोधात जातात. एखाद्या उत्पादनाची जाहिरात आकर्षक असणे आणि ती तथ्याधारित असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आकर्षक सादरीकरणामुळे एखादा दावा खरा ठरत नाही. दाव्याच्या सत्यतेसाठी स्वतंत्र, विश्वासार्ह आणि योग्य पद्धतीने केलेल्या संशोधनाचा आधार आवश्यक असतो.
त्वचेचा रंग उजळवणाऱ्या क्रीमच्या जाहिराती हे याचे ठळक उदाहरण आहे. काही जाहिरातींमध्ये विशिष्ट क्रीम वापरल्यानंतर काही दिवसांत चेहरा उजळल्याचे दाखवले जाते. त्यानंतर नोकरीत यश, सामाजिक प्रतिष्ठा, विवाहासाठी पसंती किंवा आत्मविश्वास यांचा त्या बदलाशी संबंध जोडला जातो. अशा जाहिराती उत्पादनाच्या परिणामांबद्दल अतिशयोक्तीपूर्ण किंवा अप्रमाणित दावा करतात आणि गोरी त्वचा ही अधिक सुंदर, यशस्वी किंवा श्रेष्ठ असल्याचा सामाजिक पूर्वग्रह बळकट करतात. त्वचेचा नैसर्गिक रंग हा प्रामुख्याने आनुवंशिकता आणि मेलेनिन या रंगद्रव्याशी संबंधित असतो. काही घटक त्वचेवरील काळपटपणा किंवा रंगातील असमानता कमी करण्यास मदत करू शकतात; मात्र त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक रंग कायमस्वरूपी बदलतो, असा निष्कर्ष काढता येत नाही.
घनदाट केस उगवण्याचे दावे करणाऱ्या तेलांच्या आणि शाम्पूंच्या जाहिरातींमध्येही असाच प्रकार दिसतो. केसांना चमक येणे, ते मऊ होणे, तुटण्याचे प्रमाण कमी होणे आणि नवीन केसांची वाढ होणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे घडू शकते. एखादे तेल केसांचा कोरडेपणा कमी करू शकते किंवा केसांच्या बाह्य आवरणाचे संरक्षण करू शकते; पण त्यावरून ते टक्कल पडलेल्या भागात नवीन केस उगवते, असा निष्कर्ष काढता येत नाही. केसगळतीची कारणे आनुवंशिकता, हार्मोन्समधील बदल, काही आजार, पोषणातील कमतरता, औषधांचे दुष्परिणाम किंवा टाळूचे विकार अशी विविध असू शकतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या केसगळतीवर एकच तेल किंवा शाम्पू प्रभावी ठरतो, अशा दाव्याकडे संशयाने पाहिले पाहिजे. जाहिरातीतील आधीचे आणि नंतरचे छायाचित्र एवढाच पुरावा पुरेसा नसतो.
टूथपेस्टच्या जाहिरातींमध्येही विज्ञानाच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल होण्याची दाट शक्यता असते. काही जाहिरातींमध्ये दात मोत्यासारखे शुभ्र होण्याचे, पिवळेपणा नाहीसा होण्याचे, हिरड्या मजबूत होण्याचे, संवेदनशीलता थांबण्याचे किंवा तोंडातील सर्व हानिकारक जंतू नष्ट होण्याचे दावे केले जातात. यांपैकी काही परिणाम विशिष्ट घटक असलेल्या टूथपेस्टमुळे योग्य परिस्थितीत साध्य होऊ शकतात; परंतु प्रत्येक उत्पादनात हे सर्व गुणधर्म असतातच असे नाही. उदाहरणार्थ, फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट दातांचे आम्लामुळे होणारे नुकसान आणि किडण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. संवेदनशील दातांसाठी तयार केलेल्या काही टूथपेस्टमधील विशिष्ट घटक संवेदनशीलता कमी करू शकतात. मात्र त्यामुळे दातांचे सर्व आजार बरे होतात किंवा दात कायमस्वरूपी शुभ्र होतात, असे म्हणता येत नाही. काही टूथपेस्ट बाह्य डाग कमी करू शकतात; पण त्यामुळे दातांचा नैसर्गिक रंग अमर्यादितपणे बदलत नाही. तोंडाचे आरोग्य हे केवळ टूथपेस्टवर अवलंबून नसते. योग्य पद्धतीने नियमित दात घासणे, दातांच्या फटींची स्वच्छता, आहारातील साखरेचे प्रमाण आणि दंतवैद्यांकडून तपासणी या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. महागडी टूथपेस्ट वापरल्याने दातांचे सर्व प्रश्न सुटतील, अशी समजूत चुकीची आहे. उत्पादनाचे प्रत्यक्ष गुणधर्म आणि जाहिरातीतील अतिशयोक्ती यात फरक ओळखणे, हाच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.
जाहिरातींमध्ये वापरली जाणारी आणखी एक लोकप्रिय युक्ती म्हणजे वैज्ञानिक संज्ञांचा वापर करणे. नॅनो तंत्रज्ञान, सक्रिय रेणू, जैविक क्रिया, प्रगत सूत्र, खोलवर प्रवेश करणारे घटक, पेशींचे पुनरुज्जीवन अशा शब्दांचा उल्लेख करून उत्पादन अत्याधुनिक आणि परिणामकारक असल्याची छाप निर्माण केली जाते. एखादा पदार्थ प्रयोगशाळेत विशिष्ट जैविक क्रिया करतो, यावरून तो पदार्थ असलेली बाजारातील क्रीम माणसाच्या त्वचेवर तसाच परिणाम करेल, असे म्हणता येत नाही. प्रयोगशाळेतील निष्कर्ष आणि नियंत्रित चाचण्यांना चमत्कारिक परिणामांच्या हमीत रूपांतरित करणे ही छद्मवैज्ञानिक जाहिरातबाजी असते.
जाहिरातदार अनेकदा उत्पादनाच्या परिणामकारकतेपेक्षा तिची प्रतिमाच विकतात. प्रसिद्ध अभिनेत्याने उत्पादन वापरल्याचे सांगणे, डॉक्टरसारखी दिसणारी व्यक्ती त्याची शिफारस करणे किंवा प्रयोगशाळेचे दृश्य दाखवणे यामुळे प्रेक्षक उत्पादनावर विश्वास ठेवतात. मात्र, पांढरा कोट, सूक्ष्मदर्शक, प्रयोगशाळा किंवा आलेख दाखवणे हा उत्पादनाच्या परिणामाचा वैज्ञानिक पुरावा ठरत नाही. एखाद्या व्यक्तीला उत्पादनाचा चांगला अनुभव आला, तरी तो सर्व ग्राहकांना तसाच येईल असे नाही. निवडक ग्राहकांचे अनुभव दाखवून सार्वत्रिक परिणामाची छाप निर्माण करणे दिशाभूल करणारे ठरू शकते. महत्त्वाचे म्हणजे, कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जाहिरातीच्या तळाला लहान अक्षरांत दिलेली अट किंवा सूचना ग्राहक वाचतच नाहीत.
अशा जाहिरातींचा परिणाम आर्थिक नुकसानीपुरता मर्यादित नसतो. अपेक्षित परिणाम न मिळाल्यास महागड्या उत्पादनांवर पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाऊ शकतात. त्वचेच्या विकारांवर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी जाहिरातीतील उत्पादने वापरत राहिल्यास योग्य उपचारांना विलंब होऊ शकतो. काही उत्पादनांमधील धोकादायक घटकांमुळे त्वचेची जळजळ, ॲलर्जी किंवा इतर दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे जाहिरातींना बळी पडण्याऐवजी वैद्यकीय सल्ल्यानेच अशा वस्तू वापरणे योग्य ठरते.
लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com