आगळंवेगळं
संध्या नरे-पवार
मार्केट राख्यांनी सजलं आहे. त्यांची खरेदीही जोरात सुरू आहे. आपल्या लाडोबासाठी किंवा लाडूबाईसाठी चिकनच्या फ्लेवरची राखी घ्यायची की फिशच्या, याची चर्चा जोरात सुरू आहे.
दोन चकाकते डोळे, फेंदारलेल्या मिशा आणि नाकाचा गोड गुलाबी शेंडा...बाहेर काढलेल्या नख्यांसह पुढे केलेला हाताचा पंजा..लाडक्या बोकोबाच्या किंवा मनीमाऊच्या या पंजावर राखी बांधायची म्हणजे एक दिव्यच..पण ते दिव्य करायला अनेक हात उत्सुक असतात. या पंजावर राखी किती काळ राहील, याची काहीच खात्री नसतानाही.
याउलट लाडका डॉगी तर दिलेल्या सूचनेबरहुकूम पंजा पुढे करून थाटात उभा राहतो. लाड करून घ्यायला त्याला असंही आवडतंच. बांधलेली राखीही त्याला मिरवायची असतेच. आज आपल्याला काहीतरी स्पेशल ट्रिटमेंट मिळतेय हे त्याला उमगतं.
घरात असलेली ही चार पायांची दोस्त मंडळी आज मानवी भावविश्वाचा अविभाज्य भाग बनली आहेत. कोणासाठी ती दोस्त मंडळी आहेत, तर कोणासाठी पोटच्या मुलांसारखी आहेत, तर कोणासाठी भावंडंच आहेत. ज्यांच्या घरात ही दोस्त मंडळी असतात त्या मंडळींना प्रत्येक सण-उत्सव या शेपूटवाल्यांबरोबर साजरा करायचा असतो. मनीमाऊचं ते फुरफुरणारं नाक, डॉगीची सतत हलणारी शेपटी..प्रसंग कोणताही असो, स्वत:चं अस्तित्व ते अधोरेखित करत असतात. त्यांनाही आपल्या मानवी मित्रांबरोबर प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असतो. आपल्या ह्यूमन मदर, सिस्टर, ब्रदरसोबत लोळून मस्त धमाल करायची असते. माणूस आणि त्यांचे लाडके शेपूटवाले पेट यांच्यातलं हे अनोखं नातं मार्केटवाले ओळखणार नाहीत तर दुसरं कोण ओळखणार?
मार्केट जितकं ‘ह्यूमन्स’साठी वेगवेगळ्या रंगीबेरंगी राख्यांनी सजलं आहे, तितकंच ते या ‘पेट’साठीच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आणि रंगांच्या राख्यांनी नटलं आहे. पंजावर बांधलेली राखी थोड्याच वेळात पोटात जाणार हे गृहित धरून या राख्या चिकन, मटण, मासे यांच्या वेगवेगळ्या रंगीत मिश्रणांनी सजल्या आहेत. काही राख्या या खाऊच्या नसून नुसत्या रेशमी रिबिनींच्या पण आहेत.
अर्थात, या लाडोबांना नुसती राखीच कशी बांधणार? घरातल्या लाडक्या बंधुराजांना राखीसोबत मिठाई, खीर, पेढे, बर्फी भरवून त्याचं तोंड गोड केलं जातं. मग या शेपूटवाल्या भावांचंही तोंड गोड करायला हवं ना. म्हणून मग स्पेशल राखीसोबत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरचा आणि आकारातला खाऊही आला आहे. या सगळ्याच्या ऑनलाइन जाहिरातीही झळकू लागल्या आहेत एव्हाना.
तुमच्या घरी शेपूटवाला लाडोबा किंवा लाडूबाई असेल तर मज्जाअ च आहे. पण घरात नसेल, तर शेजारी किंवा आजूबाजूला एखादा लाडोबा किंवा लाडूबाई असेलच. फिर राखी तो बनतीही है...