अजब निसर्ग
मकरंद जोशी
कल्पना करा, जंगलात फिरताना अचानक काळा बिबट्या दिसला, झाडावर पांढरा मोर बसलेला दिसला किंवा पांढऱ्या रंगाचा वाघ समोर आला तर? तुम्ही आश्चर्यचकित व्हाल ना? पण निसर्गाच्या रंगपेटीत असे काही रंगही आहेत, जे अगदी क्वचितच पाहायला मिळतात. एकाच प्रजातीतील काही प्राणी आपल्या भावंडांपेक्षा वेगळ्या रंगाचे कसे होतात? या रंगबदलामागे दडलेलं आहे निसर्गाचं एक भन्नाट रहस्य!
पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांमध्ये आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वरचढ ठरलेल्या माणूस नावाच्या प्राण्याचा काही काही बाबतीत मात्र तोल ढळलेला पाहायला मिळतो. जगाच्या इतिहासात वेगवेगळ्या कालखंडात माणसाने दुसऱ्या माणसाला केवळ कातडीच्या रंगावरून तुच्छ, कमी दर्जाचा ठरवून त्याला चक्क गुलाम म्हणून विकलं, वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत. या वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवणारे महात्मा गांधी किंवा नेल्सन मंडेला यांच्यासारखे कणखर नेते निर्माण झाले म्हणून निदान हा वर्णभेद बऱ्याच अंशी कमी झाला. याच्या उलट निसर्गात मात्र ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ हाच न्याय असला तरी त्याचा त्वचेच्या रंगाशी काहीही संबंध नाही. आता खरं तर माणसांमध्ये जसे त्वचेचे वेगवेगळे रंग बघायला मिळतात, तसे निसर्गात एकाच प्रजातीत वेगवेगळे रंग सहसा नसतात. पण नियम म्हटला की अपवाद आलाच, मग हे अपवाद कोणते आणि कशामुळे निर्माण झाले ते जाणून घेऊयात.
निसर्गाने पशु-पक्ष्यांना त्यांच्या बचावासाठी जी वेगवेगळी साधने (का हत्यारे?) दिली आहेत, त्यातलं एक म्हणजे सरूपता. अनेक पशु-पक्ष्यांची रंगसंगती भोवतालच्या परिसराशी मिळती-जुळती असते, ज्यामुळे ते सहज लपू शकतात. रंगसंगतीबाबतचा निसर्गातील आणखी एक सर्वसाधारण नियम म्हणजे एकाच प्रजातीच्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे रंग एकसमान असतात. कावळे असतील तर सगळे काळेच असतात किंवा जिराफ असतील तर सगळे पिवळट-तपकिरी रंगाचेच (प्रजातीनुसार कदाचित अंगावरील नक्षीचा आकार वेगळा असू शकतो) असतात किंवा सगळे हत्ती करड्या-काळ्या रंगाचेच असतात. काही जातींचे कावळे पिवळे किंवा आफ्रिकेतले हत्ती काळे आणि आशियातले निळे असा फरक बघायला मिळत नाही. जो माणसांमध्ये आढळतो, वेगवेगळ्या वंशाच्या माणसांच्या त्वचेचा रंग वेगवेगळा असतो.
याचं अतिशय लोकप्रिय उदाहरण म्हणजे कर्नाटकातील काबिनी, नागरहोळे, दांडेली, तमिळनाडूमधील मदुमलाई आणि महाराष्ट्रातील ताडोबा या राष्ट्रीय उद्यानांमध्ये दिसणारा ब्लॅक पॅन्थर अर्थात काळा बिबट्या. सर्वसाधारण बिबट्या हा मार्जार कुळातील शिकारी प्राणी त्याच्या पिवळ्या अंगावरील काळ्या ठिपक्यांमुळे ओळखला जातो. मात्र कर्नाटक, तमिळनाडू किंवा अन्यत्रही जिथे असे नैसर्गिक रंगांचे बिबटे आहेत, त्याच जंगलांमध्ये काळ्या रंगाचे बिबटे पाहायला मिळतात. आता हे असे वेगळ्या रंगाचे बिबटे म्हणजे बिबट्यांची वेगळी प्रजाती नाही, तर शास्त्रीय परिभाषेत यांना ‘मेलॅनिस्टिक लेपर्ड’ म्हटले जाते. मेलॅनिझम म्हणजे एखाद्या प्राण्याच्या त्वचेतील काळ्या रंगद्रव्यांचं प्रमाण वाढणं आणि त्यामुळं त्याला काळा रंग प्राप्त होणं. हे कशामुळे होतं? तर शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार बिबट्यांमध्ये (आणि त्यांचे चुलत भाईबंद असलेल्या अमेरिकेतील जग्वारमध्येही) काही विशिष्ट जीन्सच्या म्युटेशनमुळे अर्थात उत्परिवर्तनामुळे मेलॅनिझम घडते. आफ्रिका, थायलंड, जावा, श्रीलंका येथे आढळणाऱ्या बिबट्याच्या उपप्रजातींमध्येही हे उत्परिवर्तन झालेले पाहायला मिळते, त्यामुळे या देशांमध्येही काळे बिबटे आहेत. काळ्या बिबट्यांचं वैशिष्ट्य हे आहे की जरी त्यांचा रंग काळा झालेला असला तरी सर्वसाधारण बिबट्याच्या अंगावर जे ठिपक्यांचे पॅटर्न असते ते या काळ्या बिबट्यावरही पाहायला मिळते. रुडयार्ड किपलिंगच्या ‘जंगल बुक’मधील ‘बगिरा’ हा असाच मेलॅनिस्टिक लेपर्ड आहे. बिबट्यांप्रमाणेच काही कासवे, सरडे, साप, मगरी यांच्यातही मेलॅनिझम पाहायला मिळते.
बिबट्यांमध्ये जे होतं त्याच्या बरोबर उलट गोष्ट पट्टेरी वाघांमध्ये घडते आणि आपल्याला ‘पांढरा वाघ’ बघायला मिळतो. काळा बिबट्या ही जशी स्वतंत्र प्रजाती किंवा उपप्रजाती नाही, त्याचप्रमाणे व्हाईट टायगर अर्थात पांढरा वाघ हीदेखील वेगळी जात नाही. बिबट्यांमध्ये मेलॅनिझममुळे काळा रंग गडद होतो, तर पट्टेरी वाघांमध्ये ‘ल्युसिझम’मुळे मूळचा रंग फिकट होऊन पांढरा झालेला पाहायला मिळतो. ल्युसिझममध्ये शरीरातील रंगद्रव्ये तयार करणाऱ्या पेशींचा अभाव असतो किंवा त्या अतिशय कमकुवत असतात. त्यामुळे त्या प्राण्याचा रंग फिकट होतो. मग असे पट्टेरी वाघ पिवळ्यावर काळे पट्टे असे न दिसता पांढऱ्यावर काळे पट्टे असे दिसतात. भारतात मध्य प्रदेशमधील बांधवगडच्या जंगलात रेवाच्या महाराजांना वाघाचे पांढरे पिल्लू दिसले, असा काळा-पांढरा वाघ प्रथमच बघितल्याने त्यांनी ते पिल्लू पकडून आपल्या प्राणिसंग्रहालयात ठेवले. त्याचे नाव ‘मोहन’ ठेवण्यात आले. सध्या भारतातील वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालयांमध्ये जितके पांढरे वाघ आहेत, त्यांचा हा ‘मोहन’ पूर्वज आहे. पांढऱ्या नर वाघाची जोडी पांढऱ्याच वाघिणीबरोबर जमली तर त्यांची सगळी पिल्ले मात्र काळी-पिवळी म्हणजे ‘नॉर्मल’ रंगाची होतात. पण पांढऱ्या वाघाचा जोडीदार काळा-पिवळा वाघ असेल तर मात्र होणाऱ्या पिल्लांमध्ये काळे-पांढरे पिल्लू नक्की जन्माला येते. बांधवगडला जंगलात सापडलेल्या त्या ‘मोहन’नंतर मात्र भारतात निसर्गात पांढरा वाघ कधी दिसलेला नाही.
भारतात जसे काळे बिबटे, पांढरे वाघ आहेत, त्याप्रमाणे साऊथ आफ्रिकेतील ‘तिम्बावती’ पार्कमध्ये पांढरे सिंह आहेत. पांढरे सिंह किंवा वाघ हे अल्बिनो नसतात. जीन्सच्या उत्परिवर्तनामुळे त्यांचा रंग फिकटलेला असतो. काही जातीच्या पक्ष्यांमध्ये ल्युकिझम पाहायला मिळते. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेला आणि झळाळत्या रंगसंगतीमुळे लक्ष वेधून घेणारा मोरही काही वेळा याच कारणामुळे पूर्ण पांढऱ्या रंगात पाहायला मिळतो. रंग काळा झालेला असो किंवा पांढरा, आपल्या इतर भाईबंदांपेक्षा असा पूर्ण वेगळा रंग घेऊन आयुष्य काढणं या पशु-पक्ष्यांसाठी खरंच कठीण असतं. त्यामुळे अशा भिन्न वर्णामुळे वेगळे पडलेले आणि शिकार मिळवायला, स्वतःचा बचाव करायला कमी पडणारे प्राणी-पक्षी बहुदा ‘रंग माझा (का) वेगळा?’ असाच विचार करत असतील. निसर्गातील ‘वर्णभेद’ हा एक नैसर्गिक अपघात आहे. त्यामुळे या अपघातामधून जन्माला येणाऱ्या पशु-पक्ष्यांची संख्या अगदी मर्यादित आहे. या अल्पसंख्यांक प्राण्यांमुळे दिसणारा निसर्गातला वर्णभेद माणसांनी केलेल्या वर्णभेदासारखा जाचक नाही.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com