अक्षररंग

एका साध्या माणसाची असाधारण गोष्ट - सदानंद वर्दे

माजी शिक्षण मंत्री ही प्रा. सदानंद वर्दे यांची ओळख असली ती त्यांचं राजकीय चरित्र आणि चारित्र्य तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. स्वच्छ राजकीय चारित्र्याचा आदर्श असलेले वर्दे हे आज दुर्मिळ असलेलं उदाहरण आहे. सन्माननीय इच्छामरणाचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता. ६ नोव्हेंबरला त्यांची जन्मशताब्दी झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त मागोवा.

नवशक्ती Web Desk

दखल

निळू दामले

माजी शिक्षण मंत्री ही प्रा. सदानंद वर्दे यांची ओळख असली ती त्यांचं राजकीय चरित्र आणि चारित्र्य तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. स्वच्छ राजकीय चारित्र्याचा आदर्श असलेले वर्दे हे आज दुर्मिळ असलेलं उदाहरण आहे. सन्माननीय इच्छामरणाचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता. ६ नोव्हेंबरला त्यांची जन्मशताब्दी झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त मागोवा.

काही माणसं आपल्यातून निघून गेली असली तरी त्यांची आठवण काढाविशी वाटते. त्यापैकी एक आहेत प्रा. सदानंद वर्दे. त्यांचे समवयस्क त्यांना अनु वर्दे या नावानं ओळखत. वर्देचं निधन २००७ साली झालं. आज ते जिवंत असते तर १०० वर्षांचे झाले असते.

वर्दे ओळखले जातील ते त्यांच्या 'सन्माननीय मरण' या विधेयकासाठी. जेव्हा उपचार उपयोगी पडत नाहीत अशा स्थितीत माणूस (अनेक वेळा वृद्धावस्थेत) असतो तेव्हा जर त्याने मृत्यूची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याला मरू द्यावं, अशा आशयाचं विधेयक वर्दे यांनी विधानसभेत मांडलं होतं.

खासगी विधेयक सामान्यतः मंजूर होत नसतं. असं विधेयक एखाद्या गंभीर विषयावर चर्चा व्हावी यासाठी मांडलं जातं. आताशा ब्रिटनमध्ये हेच विधेयक सरकारनं मांडलं असून डॉक्टर, न्यायाधीश या विषयावर चर्चा करत आहेत, कायदा करण्याचा त्या सरकारचा विचार आहे.

जेव्हा वर्दे यांनी हे विधेयक मांडलं तेव्हा असा विचार करायलाही माणसं घाबरत होती. अशा तऱ्हेचं मरण म्हणजे आत्महत्या असंच लोकांना वाटलं. आता लोकांचे डोळे उघडले आहेत. वैद्यकीय उपाय थकले असताना माणसाला जगवलं जातं तेव्हा त्या माणसाला सुख मिळत नसतं. तसंच नातेवाईकांनाही यातना व खर्चाला तोंड द्यावं लागतं. एका न वाचणाऱ्या माणसासाठी अनेक जिवंत माणसांचे आयुष्य बरबाद होत असतात. उपचार केले नाहीत तर जग काय म्हणेल, या चिंतेने नातेवाईक पाण्यासारखा पैसा व वेळ खर्च करतात. आज हे वास्तव ज्यांना दिसतंय त्यांना वर्दे यांच्या विधेयकाचं महत्त्व पटेल.

अर्थात हे मरण काळजीपूर्वक द्यावं लागेल. त्यात काळंबेरं असता कामा नये. वैद्यकीय काळजी महत्त्वाची असेल. तसा विचार आज जगात अनेक ठिकाणी सुरू झाला आहे.

स्वच्छ राजकीय चारित्र्य

वर्दे यांचा साधेपणा ही गोष्ट आज जगाला सांगणं आवश्यक आहे. हा साधेपणा म्हणजे 'स्वतःचे कपडे स्वतः धुणं' या प्रकारचा नाही. हा साधेपणा राजकीय चारित्र्याचा आहे. अनेक वर्षे मुंबई महापालिका या सोन्याची अंडी देणाऱ्या खुराड्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे वर्दे बोरीबंदरला पालिकेची बैठक आटोपून वांद्रयाच्या आपल्या घरी बसने जायचे. आज हे कोणाला सांगितलं तर ऐकणारा माणूस ही दंतकथा आहे, असं म्हणेल. वर्दे एका सरकारात एकदा मंत्री होते. ते सरकार पडलं. वर्दे लगोलाग मंत्रीबंगला सोडून टॅक्सीने घरी परतले.

बस, ट्रेन, टॅक्सीने वर्दे फिरत. कारण त्यांच्याकडे कार नव्हती. वर्दे प्राध्यापक होते, त्यांना कार नक्कीच परवडत होती. पण सार्वजनिक वाहनं असताना विनाकारण पेट्रोल जाळत का फिरायचं, असा त्यांचा प्रश्न होता. विधानसभेत समजा टॅक्सी वा बसने जायचं ठरवलं तर उशीर होऊ शकतो. पण मग आधी निघायला काय हरकत आहे? खरं म्हणजे डॉक्टर आणि बिकट परिस्थितीला तोंड द्यायला निघालेले पोलीस वा अन्य अधिकारी वगळता कोणालाही गाड्या, त्यासाठी वाहतूक अडवणं, अशी सवलत असू नये. मंत्री किंवा न्यायाधीश समजा उशिरा पोहोचला तर त्याने काय फरक पडतो? गाड्याघोडे हा सोयीचा भाग नसून फुसक्या प्रतिष्ठेचा भाग झाला आहे. वर्दे यांनी 'हा' साधेपणा त्यांचे गुरू एसेम जोशी यांच्याकडून घेतला. हा केवळ पैसे वाचवण्याचा मुद्दा नाही.

वर्दे पालिका आणि विधानसभा निवडणुका लढवत. मतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेत. प्रचारासाठी ते दारोदार जात. त्यांच्या मतदारांना वर्दे हा काय माणूस आहे हे लख्ख दिसत असे. त्यांचं घर ही एक सार्वजनिक जागा होती. मंत्री म्हणून बंगल्यावर गेले तेव्हा त्यांनी त्यांचं घर एका साप्ताहिकाला वापरायला (फुकट) दिलं. वर्दैना त्यांच्या अनेक दशकांच्या कारकीर्दीत मतदार, कार्यकर्ते, पत्रकार इत्यादी कोणालाही एक छदाम द्यावा लागला नाही. असा कोणताच पैसा खर्च करावा न लागल्याने तो पैसा वसूल करायची खटपट त्यांना करावी लागली नाही. शिक्षणाची गंगा स्वच्छ करणारा मंत्री

वर्दे शिक्षण मंत्री होते. महाविद्यालये म्हणजे पैसे मिळवण्याचा धंदा, हे गणित तेव्हा सुरू झालं होतं. महाविद्यालयाची परवानगी मिळाली की बांधकामं, शिक्षकांचे पगार, तसेच विद्यार्थ्यांकडून नाना वाटांनी पैसे मिळवणं सुरू होत असे. शिक्षण ही पैसे मिळवण्याची फालतू वाट होती. वर्दे शिक्षक असल्याने त्यांनी विचारपूर्वक ते खातं घेतलं. ते खातं ही समजा वाहती गंगा नसली, तरी वाहती कृष्णा तरी होती. वर्देकडे त्यांच्या पक्षातलेच होतकरू पुढारी कॉलेज मागायला येत. 'आपल्या कार्यकर्त्याचं' कल्याण करण्याची जबाबदारी तुमची आहे, असं हे पुढारी सुचवत. पण त्यांना कॉलेजं मिळाली नाहीत. प्राथमिक शाळेपासून आपण कामाला सुरुवात केली पाहिजे, असं वर्दे मंत्र्याच्या खुर्चीत बसून मास्तरांसारखं त्या पुढाऱ्याला समजावून देत. पुढारी कपाळावर हात मारून जात असे.

याला म्हणतात सार्वजनिक चारित्र्य. आपल्याला किंवा पक्षाला सत्ता मिळावी यासाठी गैरव्यवहार केले तर आर्थिक व्यवहार नीट कसे होतील ? कंत्राटदार कमी प्रतीचा माल वापरल्याशिवाय खर्च केलेली रक्कम कशी भरून काढणार ? रस्त्यावर सतत खड्डे असतात, विमानतळ गळत असते, हॉस्पिटलात ऑक्सिजन नसतो, कीटकनाशकांनी डास मरत नाहीत, डीजे लोकांचे कान फोडतात, रस्ते खणून उत्सव-लग्नं-बारशी साजरी होतात, पैसे वाटल्याशिवाय एकही काम होत नाही. हे सगळं कशामुळे?

राजकीय चारित्र्य नसेल तर जाहीरनामे आणि आश्वासनं पोकळ ठरतात. वर्दे ज्या काळात सार्वजनिक कार्यात होते त्याच काळात मधु दंडवते, फ्रेमा पिंटो, मृणाल गोरे, सोहनसिंग कोहली ही त्यांचीच सहकारी मंडळीही त्यांच्या सोबत होती.

वर्दे एक निष्णात प्राध्यापक होते. वर्दे लिहीत असत. वर्दे अभ्यास करत असत. प्रत्येक काम त्यांनी निरलसपणे कर्तव्य म्हणून पार पाडलं. म्हणून तर त्यांची आठवण काढायची. आठवण काढताना आपण स्वतःला चिमटा काढायचा आणि आपण स्वप्नात तर नाही आहोत ना, याची खात्री करून घ्यायची.

ज्येष्ठ पत्रकार

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका

एअर इंडिया विमान अपघात, तुमच्या मुलाचा दोष नाही; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट