हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
स्किझोफ्रेनिया हा केवळ एक आजार नाही, तर तो संघर्ष आहे. या आजाराबाबत अनेक गैरसमज आहेत. अनेकदा त्याकडे कलंक म्हणूनच पाहिलं जातं. नुकत्याच झालेल्या जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाच्या निमित्ताने सामाजिक पातळीवर या आजाराविषयी प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे.
नवाचे मन हे एक अद्भुत, विशाल आणि गुंतागुंतीने भरलेले विश्व आहे. त्यात विचारांच्या नद्या वाहतात, आठवणींचे पर्वत उभे असतात आणि कल्पनांची आकाशगंगा चमकते. मानवी मन किती सक्षम आहे हे सर्वांनाच माहिती आहे. ते काहीही निर्माण करू शकते, कोणतीही समस्या सोडवू शकते आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची कल्पना करू शकते. पण कधी कधी या मनाच्या विश्वात अस्वस्थता, गोंधळ किंवा वेगळ्या प्रकारच्या भटकंतीचा अनुभव येतो. जेव्हा व्यक्तीचं मन व वास्तव यांच्यामधील सीमा धुसर होतात, तेव्हा त्या स्थितीला ‘स्किझोफ्रेनिया’ म्हणतात.
स्किझोफ्रेनिया ही मानसिक आरोग्याची एक जटिल अवस्था आहे. या अवस्थेत व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तन यांचा प्रवास वेगळा रंग घेऊ शकतो. हा आजार केवळ व्यक्तीला त्रास देत नाही, तर तिच्या कुटुंबासमोरही आव्हानं उभी करतो.
दरवर्षी २४ मे रोजी ‘जागतिक स्किझोफ्रेनिया दिन’ साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला या विकाराविषयी जागरूकता वाढवण्याची, त्यावरचा कलंक दूर करण्याची आणि रुग्णांप्रति आस्था निर्माण करण्याची आठवण करून देतो. स्किझोफ्रेनिया हा आजार कोणताही भेदभाव करत नाही. तो समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रभावित करतो. संगीतकार, शिक्षक, डॉक्टर, विद्यार्थी आणि नोबेल पारितोषिक विजेते असे कुणीही या आजाराने ग्रस्त होऊ शकतात. तो सर्व सामाजिक-आर्थिक गट, वयोगट आणि लिंगांपर्यंत पोहोचतो. स्किझोफ्रेनियाविषयी अनेक गैरसमज आणि मिथकं आहेत. अनेकांना वाटतं की, रुग्ण व्यक्ती ‘विभाजित व्यक्तिमत्त्वा’ची आहे. स्किझोफ्रेनिया असलेले लोक हिंसाचार करतात, हाही एक गैरसमज आहे. या आजाराविषयीच्या जुन्या सिद्धांतांनुसार ‘वाईट पालकत्व’ किंवा ‘आजारी समाज’ स्किझोफ्रेनियाला कारणीभूत ठरतो. यापैकी काहीही खरं नाही.
या आजाराविषयीचं नेमकं कारण अज्ञात असलं तरी, या आजाराविषयीच्या नवीन संशोधनातून असं दिसून आलं आहे की, अनुवांशिक, मानसिक आणि सामाजिक घटकांच्या एकत्रिकरणातून एखाद्या व्यक्तीमध्ये हा आजार विकसित होण्याची शक्यता जास्त असते. स्किझोफ्रेनियाच्या जैविक कारणांमध्ये मेंदूतील डोपामिन, ग्लूटामेट यासारख्या रासायनिक संदेशवाहकांचं असंतुलनही कारणीभूत असतं. मेंदूच्या संरचनेतील काही फरक, उदाहरणार्थ, मेंदूच्या विशिष्ट भागांचा आकार कमी असणं, हे देखील या आजाराला कारणीभूत ठरू शकतात. ही स्थिती अनुवांशिक असू शकते. म्हणजे कुटुंबात कोणाला स्किझोफ्रेनिया असल्यास इतर सदस्यांमध्ये तो होण्याची शक्यता वाढते.
स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?
स्किझोफ्रेनिया हा मेंदूचा एक गुंतागुंतीचा विकार आहे ज्याचा परिणाम व्यक्तीच्या विचारांवर, भावनांवर आणि वर्तनावर होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये याची लक्षणं वेगवेगळी असू शकतात आणि ती वेळोवेळी बदलूही शकतात. कोणीही सर्व लक्षणं एकाचवेळी अनुभवत नाही. हा विकार विविध लक्षणांमधून व्यक्त होतो. उदा. भ्रम, भास, मतिभ्रम, अव्यवस्थित विचारसरणी, भावना कमी होणं आणि सामाजिक एकाकीपणा. ही स्थिती प्रामुख्याने १६ ते ३० वर्षे या वयोगटात सुरू होते. पुरुषांमध्ये याची सुरुवात स्त्रियांपेक्षा लवकर होते. सुरुवातीला लक्षणं फारशी स्पष्ट नसतात. या टप्प्याला ‘प्रोड्रोम फेज’ असं म्हणतात. म्हणजेच व्यक्तीच्या वर्तनात, विचारसरणीत हळूहळू बदल होतो आणि त्याला स्वतःलाही समजत नाही की आपल्या आत काहीतरी गंभीर सुरू आहे.
स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीला काय वाटते?
या आजाराच्या तीव्र अवस्थेत, व्यक्तीला कल्पना आणि वास्तव यामधील फरक कळेनासा होतो. आपण जे पाहतो, ऐकतो, अनुभवतो ते खरंच आहे की भास आहे, हे या रुग्णांना समजत नाही. वयानुसार ही तीव्रता काही प्रमाणात कमी होते. काहीतरी चुकते आहे हे लक्षात आले तरी ते थकवा, तणाव किंवा झोपेच्या अभावामुळे आहे असं वाटतं. म्हणूनच या आजाराच्या बाबतीत लवकर निदान आणि उपचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे.
जाणवणारी लक्षणं
भ्रम (Delusions) :
भ्रम म्हणजे अशा विचारांची उपस्थिती जे वास्तवाशी विसंगत असतात. उदाहरणार्थ, कोणीतरी तुमच्या मागे आहे किंवा तुमच्या मागून कुणीतरी डोकावून पाहतोय, असं वाटत राहणं. छळ होत असल्याचा भ्रम वाटणं, कोणी आपल्यावर नजर ठेवतोय, आपले नुकसान करतोय असं वाटणं. टीव्ही, गाणी, बातम्या स्वतःसाठी सांगितल्या जात आहेत असं वाटणं किंवा शरीरात किडे पसरले आहेत, किरणोत्सर्गाने नुकसान झालं आहे, असं काहीतरी वाटणं. कधी एखादी सेलिब्रिटी आपल्यावर प्रेम करते आहे किंवा आपला जोडीदार आपल्याला फसवत आहे, अशी आपली आपणच अटकळ बांधणं. स्वतःला देवदूत समजणं किंवा आपल्याला सैतानाने ग्रासलं आहे, असं वाटणं. हे असे भ्रम होत राहतात.
भास (Hallucinations) :
ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत अशा गोष्टी ऐकू येणं, दिसणं, वाटणं किंवा वेगळे अनुभव येणं म्हणजेच भास होणं. ‘भास’ या प्रकारातले अनुभव हे बहुतेक वेळा ऐकण्याच्या कक्षेत येतात. उदा. कोणी आवाज आपल्याबरोबर बोलतोय, असं वाटणं. काहीवेळा डोक्यात आवाज ऐकू येतात. हे आवाज आज्ञा देणारे, रागीट किंवा कानाशी सतत बडबड करणारे असू शकतात. दिवे, आकृती, मृत व्यक्ती दिसणं, वाईट वास येणं, विचित्र चव आहे असं वाटणं, अंगावर काहीतरी चाललं आहे, कीटक रेंगाळत आहेत, असं वाटणं.
असमंजस विचार आणि असंबद्ध बोलणं :
या रुग्णांमध्ये आणखीही काही लक्षणं दिसतात. उदा. बोलताना वाक्य अर्धवट सोडणं, विचित्र शब्द वापरणं, विचार विस्कळीत असणं, बोलताना मध्येच विषय बदलणं, अचूक शब्द न सापडणं इत्यादी. यामुळे या अशा व्यक्तींशी संवाद साधणं कठीण होतं. लोकांमध्ये त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण होतात. संवाद अर्थहीन होतो.
विचित्र हालचाली (Abnormal Movements) :
सतत एकसारख्या हालचाली करणं किंवा तासन्तास एकाच स्तिथीत राहणं किंवा कुठेतरी डोळे लावून बसणं इत्यादी लक्षणंही दिसतात.
न जाणवणारी लक्षणं
या लक्षणांमध्ये सामान्य वागणुकीचा अभाव दिसतो.
आनंद मिळत नाही : आवडत्या गोष्टींचाही आनंद वाटत नाही.
न बोलणे : संवादात भाग घेत नाहीत.
भावनांचा अभाव : चेहऱ्यावर किंवा आवाजात आनंद, दु:ख यांसारख्या भावनांचा अभाव दिसतो. भावनात्मक प्रतिक्रियांची तीव्र कमतरता जाणवते.
एकटेपणा : सामाजिक व्यवहार टाळणं. मित्र, कुटुंब यांच्यापासून दूर राहणं, समाजापासून वेगळं होणं. इतर लोकांसोबत वेळ घालवण्याची इच्छा नसणं.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष : आंघोळ न करणं, स्वच्छ कपडे न घालणं.
उपक्रम न सुरू करणं : कोणतेही काम सुरू न करणं किंवा ते पूर्ण न करणं.
स्किझोफ्रेनियाची ही नकारात्मक लक्षणं उदासीनतेशी मिळतीजुळती असू शकतात.
बौद्धिक लक्षणं (Cognitive Symptoms)
या लक्षणांचा संबंध मेंदूच्या माहिती साठवण्याच्या आणि वापरण्याच्या क्षमतेशी असतो. कार्यस्मृतीत एका वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येते. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. निर्णय घेण्याची क्षमता कमी होते.
एका रुग्णाची कथा : मीरा
मीरा ही २५ वर्षांची एक मुलगी होती. तिचं कविता आणि संगीतावर खूप प्रेम होतं. ती हसतमुख, उत्साही आणि स्वप्नाळू होती. पण अचानकच तिच्या आयुष्यात काहीतरी बदल झाला. ती जेव्हा लोकांमध्ये जायची, तेव्हा तिला आवाज ऐकू येऊ लागले. काही वेळा गोड आवाज, पण जास्त वेळा त्रासदायक आणि भीतीदायक. तिला वाटू लागलं की, लोक तिच्याबद्दल बोलत आहेत, तिच्यावर नजर ठेवत आहेत. लोकांचं बोलणं तिला गूढ व विसंगत वाटू लागलं. तिच्या विचारांची साखळी तुटू लागली आणि ती स्वतःच्या मनाच्या गूढ जंगलात हरवू लागली. कुटुंबीय आणि मित्र हे तिच्या या बदललेल्या वर्तनाला समजू शकले नाहीत. त्यांनाही भीती वाटू लागली आणि काहींनी तिला टाळायला सुरुवात केली. पण मीरा अजूनही जगत होती, तिच्या मनाच्या त्या वेगळ्या दुनियेतही आशा ठेवत होती. ती लिहित राहिली, तिचे विचार कागदावर उमटत होते, जणू तिच्या अंतरंगातून बाहेर पडण्याचा एक मार्ग ती शोधत होती.
गैरसमज आणि कलंक (Stigma)
स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल समाजात अनेक चुकीचे समज आहेत. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना फार त्रास सहन करावा लागतो.
रुग्ण हिंसक असतात : ही कल्पना अगदीच चुकीची आहे. बहुतेक वेळा हे रुग्ण स्वतःच भीतीने व्यापलेले असतात. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाने हिंसक वर्तन करणं ही बाब फार कमी वेळा होते.
उपचार शक्य नाहीत : काही लोकांना वाटते की स्किझोफ्रेनिया हा आजार बरा होत नाही. प्रत्यक्षात, योग्य औषधोपचार आणि समुपदेशनाने रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात.
n दुहेरी व्यक्तिमत्त्व : स्किझोफ्रेनिया आणि ‘डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर’ यामध्ये फरक आहे. दोन्ही वेगळे मानसिक आजार आहेत. हे असे गैरसमज समाजातील कलंकाला चालना देतात. यामुळे रुग्णांना त्यांच्या समस्या मोकळेपणाने सांगता येत नाही. परिणामी त्यांना योग्य मदत मिळत नाही.
उपचार आणि पुनर्वसन : स्किझोफ्रेनिया या आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. प्रत्येक रुग्णासाठी योग्य उपचार निवडणं आणि त्यात सातत्य राखणं खूप महत्त्वाचं आहे.
औषधोपचार : अँटीसायकॉटिक औषधं जी भ्रम, भास, मतिभ्रम कमी करतात आणि मानसिक समतोल राखण्यास मदत करतात.
मनोचिकित्सा : मनोचिकित्सा व्यक्तीला जे अनुभव येत आहेत त्यांना तोंड कसं द्यायचं, त्यासाठी कोणती कौशल्यं वापरायची, हे सांगते. तसेच भावनिक आधार देते.
कौटुंबिक पाठबळ : कुटुंबाचं सहकार्य, समजूतदारपणा आणि प्रेम हा रुग्णाच्या पुनर्वसनातला महत्त्वाचा घटक आहे.
समाजाशी जोडलं जाणं : रुग्णांना सामाजिक जीवनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे.
या उपचारांनी रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो, शिक्षण घेऊ शकतो, नोकरी करू शकतो आणि सामान्यजनांसारखा जीवनाचा आनंद घेऊ शकतो.
सहानुभूतीचा संदेश आणि व्यक्त केलेल्या भावना (Expressed Emotions)
स्किझोफ्रेनिया हा फक्त एक आजार नाही, तर तो त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात एक संघर्ष निर्माण करतो. कुटुंबामध्ये व्यक्त केलेल्या भावना (Expressed Emotions) या आजारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, कुटुंबात जिथे अधिक टीकाटिपण्णी असते, तणावपूर्ण वातावरण असते, राग किंवा अतिगुंतलेपण असते, तिथे रुग्णाच्या लक्षणांत अधिक चढ-उतार होतात. अशा स्थितीत आजाराचं पुनरागमन (relapse) होण्याची शक्यता वाढते. उलट, जिथे कुटुंबात प्रेम, संयम, समजूतदारपणा आणि शांतीचा अनुभव येतो, तिथे रुग्णाची स्थिती सुधारण्यास मदत होते. आपल्या वाणीत, संवादात, वर्तनात सहानुभूती असावी; ती अशी, की जणू रुग्णाला आपल्या वेगळ्या भ्रामक जगातही सुरक्षित वाटेल. ‘वेगळ्या मानसिक प्रदेशात चालणारे’ हे लोक हरवलेले नाहीत. ते एक वेगळा प्रवास करतात, जो आपल्याला अजून पूर्णपणे समजलेला नाही.
नुकत्याच झालेल्या २४ मे च्या जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाच्या निमित्ताने, आपण एक पाऊल पुढे टाकूया. स्किझोफ्रेनिया म्हणजे केवळ एक मानसिक आजार नाही, तर ती एक लढाई आहे, जी अनेकजण शांतपणे, एकाकीपणे लढत असतात. जर समाजाने तिचा स्वीकार केला, आधार दिला आणि समजूत दाखवली, तर या आजारासोबत जगणारी व्यक्तीही स्वतःचं स्वतंत्र, उत्पादक आणि अर्थपूर्ण आयुष्य जगू शकते. प्रत्येक व्यक्तीचा उपचाराला मिळणारा प्रतिसाद वेगळा असतो. काही लक्षणमुक्त होतात, तर काहींना लक्षणं परत परत त्रास देतात.
आपण गैरसमजांचं सावट दूर करूया, सामाजिक कलंक मिटवूया आणि समाज म्हणून अधिक सहानुभूतीपूर्ण बनूया.
‘समजून घ्या, पाठिंबा द्या, मदतीचा एक हात पुढे करा. कारण, स्किझोफ्रेनिया असणाऱ्या व्यक्तीलाही तुमच्याइतकेच प्रेम, सन्मान मिळवण्याचे आणि आशा बाळगण्याचे हक्क आहेत.’
मनोचिकित्सक व वैद्यकीय रुग्णालयात अधिष्ठाता.