अक्षररंग

शेकोटी - आठवणींचा प्रकाश

थंडीच्या दिवसांत पेटलेली शेकोटी केवळ उब देत नाही, तर माणसांना जवळ आणते, आठवणी जागवते आणि क्षणभर तरी मनाला निवांत करते. त्या धगधगत्या ज्वालांभोवती फिरणारी ही अनुभूतीच या लेखाचा केंद्रबिंदू आहे.

नवशक्ती Web Desk

हिवाळी अनुभव

मुक्ता नार्वेकर

थंडीच्या दिवसांत पेटलेली शेकोटी केवळ उब देत नाही, तर माणसांना जवळ आणते, आठवणी जागवते आणि क्षणभर तरी मनाला निवांत करते. त्या धगधगत्या ज्वालांभोवती फिरणारी ही अनुभूतीच या लेखाचा केंद्रबिंदू आहे.

थर्मामीटर मधला आकडा जसा जसा खाली उतरू लागतो तशीच संध्याकाळ सरून रात्रीचं आगमन होतं, थंडी वातावरणावर राज्य करू लागते तशी माझ्यातली आदीम प्रेरणा जागी होते आणि मन कुजबुजू लागतं - आता शेकोटी करायला हवी. आणि या थंडीच्या दिवसात माझा प्रवास सुरू असेल तर त्यावेळी माझ्या मनाचं ऐकते आणि शेकोटीचा आनंद घेतेच.

एक किस्सा सांगते, कधी काळी सिनेमात बघितलं होतं की, समुद्रकिनारी अशी धगधगती शेकोटी पेटवली आहे आणि तरुण मुलं मुली शेकोटी भोवती बसून गाणी गात आहेत. ते वातावरण मला इतकं आवडलं की, मोठं झाल्यावर अशा कॅम्पिंगला जायचं असं तेव्हा ठरवूनच टाकलं. पण शिक्षणात इतकी गर्क झाले की, ही गोष्ट मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात पडूनच राहिली. पण पुढे प्रवासच माझं करिअर बनलं. तेव्हा समुद्रकिनारी कॅम्पिंग करण्याची जाहिरात मला सोशल मीडियावर दिसली. त्यावर चित्र होतं - मोकळा समुद्रकिनारा, त्यावर लावलेले नीट टेन्टस आणि मध्ये पेटलेली उंच शेकोटी. कुठलाही भपकेबाज Led lightsचा झगमगाट नाही. फक्त शेकोटीचा आणि पिवळ्या बल्बच्या माळेचा मंद प्रकाश. ही जाहिरात पाहिल्यावर मनाच्या कोपऱ्यात दडून राहिलेली ती सिनेमातील गोष्ट शेकोटीची धग पेटावी तस तशी उजळू लागली, ठळक दिसू लागली आणि आम्ही कोकणातल्या या समुद्रकिनारी कॅम्पिंग करायचं असं ठरवलही. तिथे प्रत्यक्षात जाऊन जे काही अनुभवलं ते सिनेमातल्या सीनपेक्षा सुंदर, अविस्मरणीय होतं. शुभ्र वाळूच्या किनाऱ्यावर सूर्यास्ताच्या उजेडात आम्ही आमचे टेंन्टस् लावले. काळोख थंडीला सोबत घेऊन अलवार पसरू लागला, तशी आम्ही शेकोटीसाठी लाकडे रचून ठेवली. बारबेक्यू करण्यासाठी कोळसे पेटवले. नंतर कॅम्पिंग चेअरवर येऊन निवांत बसले. वर आकाशाकडे नजर टाकली तर चांदण्याच्या छताखाली बसल्याचा आभास मला खरखुरा वाटत होता. चांदण्या डोईवर चमचमत होत्या. समुद्राची गाज तर कान सुखावत होती. एकीकडे मॅरीनेट केलेलं चिकन बारबेक्यूवर भाजलं जात होतं, त्याचा गंध पसरत होता. थंडी वाढत आहे असं जाणवलं तेव्हा शेकोटी पेटवली आणि आहाहा!! काय सुंदर वातावरण तयार झालेलं.. शेकोटीच्या उजेडात आमचे टेन्टस, आमचे चेहर उजळले होते.

शेकोटीने कॅम्पिंगमधल्या सर्व सदस्यांना एकत्र आणलं होतं. तिच्या भवती उब घेत बसायला आमंत्रणच दिलं होतं. शेकोटीच्या सहवासात प्रत्येक मंडळींचे किस्से, गमतीजमती, कविता कान देऊन ऐकल्या जात होत्या आणि तिच्या भोवतीचं वातावरण आमच्या गप्पांनी आनंदमय झालं होतं. माझ्या मनातली ती दडून राहिलेली गोष्ट मी आनंदाने प्रत्यक्षात जगत होते. शेकोटीकडे एकवार पाहिल तर ती धगधगतच होती. जणू काही आमचा आनंद सरू नये असं तिलाही वाटत होतं. तिच्या उजेडात अनोळखीपणाची रेष पुसून आम्हा सर्वांमध्ये मैत्र तयार झाले होते. तिच्या बाजूला बसूनच बारबेक्यूचा आस्वाद घेतला आणि प्रत्येकाच्या मुखातून नकळत आहाहा!! असा स्वर निघाला.. बारीकसारीक गोष्टींचा आनंद तिच्या उजेडात घेऊ वाटत होता. मंद सुरात भावगीतं लावली होती. त्यांच्यातली आर्तता आधिकच जाणवू लागली. रात्र सरत जाऊ लागली तसा शेकोटीचा उजेड मंद मंद होत गेला. डोळ्यावर झोप रेंगाळू लागली, तसे आम्ही आपापल्या टेन्टसमध्ये जाऊन झोपलो पण शेकोटीची उब मात्र आमच्या सोबतच राहिली. ती कायमचीच.

स्वतःसाठी शेकोटी करण्यात जसा आनंद आहे ना तसाच दुसऱ्यांना शेकोटी करताना बघण्यातही आहे. रात्रीच्या वेळी अंगावर स्वेटर घालून मी कोकणातल्या एका गावातून सहज फेरफटका मारत होते. तिथेच एक टुमदार घर दिसलं. दारात रातराणी होती. तिचा गंध माझ्यापर्यंत पोहोचत होता. उत्साही तरणी मुलं लाकडे गोळा करून अंगणात शेकोटी रचत होती. लहान मुलंही अगदी जेवणं पटापट आटपून, इटूकली पिटूकली स्वेटर घालून घरच्या अंगणात येऊन बसली होती. बायकाही शाल अंगभर गुंडाळून सावरून बसल्या होत्या. आजोबाही स्वेटर आणि कानटोपी घालून निवांत दात कोरत बसले होते. शेकोटी पेटल्यावर त्या सगळ्यांचे चेहरे उजळले. तरण्या मुलांच्या डोळ्यांत शेकोटी पेटवल्याचं समाधान होतं. लहान मुलांच्या कोवळ्या डोळ्यात तर नितळ आनंद चमकत होता. बायकांचे पैंजण घातलेले पाय आणि बांगड्या भरलेले हात उब घ्यायला शेकोटीकडे सरसावले होते. आजोबाही खुर्ची सावरत पुढे येऊन बसले होते. दीर्घकाळ एक गोड शांतता घरात होती. प्रत्येकजण शेकोटीच्या उबेचा स्पर्श अनुभवत होता. त्या कुटुंबात तयार झालेली ती उब माझ्यापर्यंत पूर्णतः पोहोचली होती.

या कुडकुडा आणणाऱ्या थंडीच्या दिवसांत मला कधी कधी शांतता हवी असेल तर मी घरीच शेकोटी करायचा घाट घालते. घराच्या अंगणात आंब्याची दोन झाडं असल्यामुळे कायम पाने, छोट्या मोठ्या काटक्या, सुकलेल्या फांद्या पडत असतात. पानांचे खत होतं पण काही मोठ्या फांद्या आम्ही जपून ठेवतो. आणि थंडी पडू लागल्यावर शेकोटी करतो. घरची शेकोटी मला जास्त मनःशांतीकडे घेऊन जाते. शेकोटी पेटल्यावर लाकूड जळताना जो आवाज येतो त्याचे मला आकर्षण आहे. एकटी किंवा नवरा सोबत असला तरी एकमेकांच्या शांतीचा मान ठेवून आम्ही शेकोटीचा आनंद घेतो. लाकूड जळण्याचा आवाज कान देऊन ऐकते, ज्वालेची विविध रूपं बघण्यात मग्न होउन जायला होतं. हा अनुभव माझ्यासाठी अगदी ध्यानस्थ होऊन मनाला शांत करणारा असतो. कधी कधी आम्ही पुस्तकांचे वाचनही तिच्या उजेडात करतो.

माझ्यासाठी शेकोटी म्हणजे माणसांमधली परकेपणा दूर करणारी, तिच्याभोवती फेर धरायला लावणारी मोठी ज्योत आहे, तेवढ्याच उजेडाच्या परिघात चालू क्षणाचा आनंद देणारी प्रकाशाचा स्रोत आहे, चटचट जळणारा तिचा आवाज शांतीचा अनुभव देणारा आहे.

थंडीच्या दिवसातील ही शेकोटी आनंद देणारी, जोडणारी आणि सर्वांना उब देणारा एक सुंदर अग्नी आहे.

ट्रॅव्हल व्लॉगर

AI समिटमध्ये मोठी नाचक्की! चिनी रोबोटला स्वतः डेव्हलप केल्याचं सांगितलं; 'तात्काळ एक्स्पो स्थळ सोडा' - गलगोटिया विद्यापीठाला आदेश

मोठी बातमी! EC कडून राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा: महाराष्ट्रात सर्वाधिक ७ जागा, १६ मार्चला मतदान

Thane : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनचालकांना दिलासा; साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर खुला

Mumbai : स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समितीसाठी आज अर्ज दाखल होणार

Mumbai : रस्ते खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना ३७ कोटींचा दंड; वसुली केवळ १६ कोटींची