जगतवारी
मेधा आलकरी
१८४७ साली एका साध्या गुरांच्या बाजारातून सुरू झालेला स्पेनचा ‘एप्रिल फेअर’ आज एका आधुनिक आणि वैभवशाली उत्सवात कसा रूपांतरित झाला ? जिप्सींच्या साध्या झग्यांपासून ते आजच्या फॅशनेबल वेशभूषेपर्यंतचा या जत्रेचा प्रवास आणि त्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन याबद्दल सविस्तर..
युरोपमध्ये वसंतात सृष्टी सर्वांगाने फुलते तशीच माणसंही प्रफुल्लित मनाने वासंतिक उत्सव साजरे करण्यासाठी सज्ज होतात. स्पेनमधील सेविया गावी ‘एप्रिल फेअर’ मोठ्या उत्साहाने साजरा होतो. ईस्टरनंतर पंधरवड्याने येणारा सप्ताह हा या सणाचा नियोजित काळ आहे. त्यामुळे कधी कधी नावात एप्रिल असलं तरी ही जत्रा मे महिन्यातही भरते.
स्पेनमधील या जत्रेचं आधुनिक रुपडं आपल्या गावरान जत्रेपेक्षा खूप वेगळं असलं, तरी तिचा आत्मा तोच आहे. १८४७ साली १८ एप्रिल या दिवशी ही जत्रा खरं तर गुरांचा बाजार म्हणून सुरु झाली. त्यावेळी बाजाराला जाणाऱ्या आपल्या ‘धन्या’बरोबर जत्रेतील मजा बघायला आणि किडुकमिडूक खरेदी करायला जिप्सी जमातीच्या बायका आपले पायघोळ झगे घालून जात असत. वर्षं सरत गेली तसं या जत्रेचं स्तोम अधिकच माजत गेलं, तोंडवळा बदलत गेला, इतकं की त्यातून गुरं बाद झाली आणि उरला फक्त उत्सवाचा जोश!
जिप्सी बायकांच्या पायघोळ गबाळ्या झग्याला आता टाचांपासून गुडघ्यापर्यंत एकावर एक चढणारी दाट नागमोडी चुण्याचुण्यांची झालर लागली. झगा अधिकाधिक तंग, गडद आणि फॅशनेबल होत गेला. (‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सिनेमातील सेनोरिताचा ड्रेस आठवा.) पुरुषांच्या पोशाखालाही ऐट आली. कमरेपर्यंत येणारे बिनबाह्यांचे कोट, शिकारीला घालतात तशा तंग विजारी, विजारीला धरून ठेवणारे इलॅस्टिकचे पट्टे, गोल पसरट हॅट, वरच्या खिशातून डोकावणारा रुमाल आणि आणि नृत्य करताना तालबद्ध आवाज निर्माण करण्यासाठी टाचेचे गमबूट!
हे खास पेहराव जणू या आधुनिक जत्रेचा गणवेश बनले आहेत. १८९३ साली या कात टाकलेल्या जत्रेची सुरुवात अवघ्या तीन तंबूंपासून सुरु झाली होती. आता दीड चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं हे जत्रेचं मैदान, बारा उभ्या आडव्या रस्त्यांवर उभारलेल्या हजार एक तंबूंनी भरून जातं. जत्रेमध्ये आपल्या मालकीचा तंबू असणं हे प्रतिष्ठेचं आणि ऐश्वर्याचं लक्षण! या तंबूंमध्ये आपले कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, सहकारी निमंत्रित असतातच; परंतु काही राजकारणी धेंडं आणि प्रसिद्धीच्या झोतातील सिनेतारका आल्या तर चारचौघात मालकाचा भाव वधारतो. तंबूमध्ये खानपान आणि मदिरापानाची लयलूट असते. मात्र या जत्रेचा प्राण असतो ‘सेवियाना’ नृत्य! संगीतासाठी आवश्यक ध्वनियोजना प्रत्येक तंबूत असते.
देशविदेशातून ही फेअर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी उसळत असली तरी फोटो काढणाऱ्या आणि कौतुकाने न्याहाळणाऱ्या विदेशी लोकांकडे ढुंकूनही न पाहता ही मंडळी आपल्यातच दंग होऊन नृत्य करत असतात. जत्रेच्या मैदानाचं भव्य प्रवेशद्वार विविध ढंगांनी सजवणं हे दरवर्षी एक नवीन आव्हान असतं. उंच कमान असलेलं हे ‘पोर्टाडा’ बावीस हजार छोट्या छोट्या दिव्यांनी शोभिवंत केलेलं असतं. रात्री बाराच्या ठोक्याला महापौरांच्या हस्ते या जत्रेचं उद्घाटन होताच हे सारे दिवे क्षणार्धात उजळून निघतात. प्रेक्षकांच्या साक्षीने टाळ्यांच्या कडकडाटात आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची नांदी होते आणि शेवटच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीने होते त्याची सांगता !
जत्रेच्या दिवसांमध्ये स्थानिकांनी मैदानावर यायचं ते पारंपरिक वेषातच! त्या नागमोडी झालरींचा झगा तर असतोच; पण त्याबरोबर डोक्यावर अगदी शिरोस्थानी एक मोठं फूल माळून, केसात कोरीव काम केलेला लाकडी कंगवा खोचून, मोठे वर्तुळाकार डूल घालून आणि हाती नाजूक जपानी पंखा घ्यायचा असतो. या सरंजामाबरोबरच पाठीवर त्रिकोणी घडी येईल असा, झिरमिळ्या असलेला स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळून त्या सेव्हियन ललना आणि त्यांच्याचसारखी वेशभूषा केलेल्या त्यांच्या गोड गोबऱ्या मुली दुपारी साधारण एकच्या सुमारास मैदानावर पोहोचून परिवारासहित बग्गीत बसून तिथल्या रस्त्यांवर रपेट मारतात. त्यांना आमंत्रित केलेल्या तंबूसमोर ही वरात बग्गीतून उतरते. काही अमीर-उमराव ही वरात पार आपल्या घरापासून काढतात; तर काही स्वप्नील तरुण, तुकतुकीत कांतीच्या आणि पीळदार स्नायूंच्या घोड्यावर आपल्या प्रेयसीला बसवून,
एखाद्या राजकुमारासारखी भररस्त्यावरून घोडदौड करत ऐटीत जत्रेला येणं पसंत करतात. मागे बसलेल्या तरुणींसाठी रोमहर्षक असलेली ही घोडदौड त्या तरुणांसाठी रोमांचक असते.
आम्ही मात्र आमच्या दोन पायांवर रपेट करत ही सारी जत्रासराई पाहत होतो. प्रवेशद्वारापाशीच काही वयस्कर महिला आपल्या ठेवणीतल्या झग्यांमध्ये वावरत होत्या. अचानक एकमेकांसमोर उभं राहून एक हात वर आणि दुसरा कंबरेमागे घेऊन, चुटक्या वाजवत अथवा लाकडी टिपरी वाजवत त्या सेवियाना नृत्य करू लागल्या. संगीतावर थिरकणारे हे दोनच मिनिटांचे तुकडे. त्याचा सामूहिक शेवट ‘ओले’ या आरोळीने होतो. थोड्याच वेळाने पुन्हा नव्या जोशात नृत्याला सुरुवात होते. घोळक्याघोळक्यानं येणारे नवीन परिवार या समूहात सामील होत होते. गळ्यात गळा घालून त्यांचे स्वागत होई आणि पुनश्च नृत्याचा एक तुकडा सादर होई. टाळ्यांच्या ठेक्यात आणि नृत्याच्या ठुमक्यात ही मंडळी तंबूजवळ येऊन पोहोचली. खाजगी तंबूंमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण आवश्यक असलं तरी जनसामान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी नगरपालिकेतर्फे जत्रेत सात सार्वजनिक तंबूंची सोय केलेली असते. आतील स्टॉलवरून खाद्यपदार्थ विकत घेऊन सेवियाना नृत्याचा आस्वाद कुणीही घेऊ शकतं.
हे सारे तंबू आतून खूप सुंदर सजवलेले असतात. जाळीदार शुभ्र पडदे, नक्षीदार टेबलक्लॉथ, आणि फुलांची मनमोहक आरास! कुतूहलापोटी आम्ही एखाददोन तंबूत डोकावून पाहिलं. महालासारखा सजवलेला हा तंबू खचितच कुणा धनिकाचा असावा. कोरीव खांब, कमानी आणि आलिशान झुंबरं ! दक्षिण स्पेन बराच काळ मूरिश अधिपत्याखाली असल्यामुळे आलिशान मुसलमानी सजावटीची छाप येथे निदर्शनास येते. सगळ्या तंबूंमध्ये व्यवस्थित लावलेल्या टेबल खुर्च्या आणि खाण्यापिण्याची जय्यत तयारी होती.
बग्गीची रपेट आणि तंबूंची शोभा स्वच्छ सूर्यप्रकाशात पाहून जत्रेचा खरा जल्लोष पाहण्यासाठी आम्ही रात्री दहाच्या सुमारास पुन्हा या मैदानात आलो. दुरूनच छोट्या दिव्यांनी सुशोभित पोर्टाडा नजरेस पडला. रात्रीच्या अंधारात लुकलुकणाऱ्या त्या दिव्यांमुळे ते प्रवेशद्वार फारच आकर्षक दिसत होतं. पांढऱ्या रंगावर लाल अथवा हिरवे पट्टे असलेले तंबू प्रखर दिव्यांच्या प्रकाशात झगमगत होते. रस्त्यावर ओळीने लावलेल्या दिव्यांभोवती कागदी कंदील लावण्याची प्रथा खूप जुनी, पार १८७७ पासूनची. त्याचा मंद प्रकाश जत्रेतील धुंद वातावरणात भर घालत होता.
सकाळची घोडागाडी परेड म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेचा आणि वैभवाचा विलास होता. रात्री मात्र सगळं चित्र पालटलं होतं. गर्दी लोटत होती. सामान्य तसेच वलयांकित माणसांचे लोंढेच्या लोंढे त्यात सामावून जात होते. तंबूत गप्पांचा फड जमला होता. हास्याची कारंजी उडत होती. सकाळच्या मानानं आता तरुणाई फुलून आलेली दिसली. प्रत्येकाच्या हातात मदिरापात्र होतं. ER ७७ नंबराच्या तंबूत तर वाईनची एक कृत्रिम विहिरीच तयार केली होती. बादलीने दारू ओढून ती लोकांना पाजली जात होती. या दारू बरोबर ‘तपा’ खाणं चालू होतं. तपा म्हणजे खाण्याचे छोटे छोटे प्रकार. ही स्पेनची खासियत. एकच पदार्थ भरपूर खाण्यापेक्षा वेगवेगळ्या चवींचे छोटे छोटे चिमणे घास पोटात घालायचे. स्पेनमध्ये असे तपा बार असतात. दारुसमवेत असे तपा देणाऱ्या बारची लोक रात्रभर वारी करतात.
तंबूमध्ये आणि बाहेरही एका ओळीत स्त्री पुरुष समोरासमोर उभं राहून नाचत होते. झग्यांची चुण्याचुण्यांची झालर प्रत्येक गिरकीबरोबर मस्त सळसळून जायची. सकाळी बायकाच आपापसात नृत्य करत होत्या. आता मात्र जोडपी दिसत होती. सेवियाना हा नृत्यप्रकार रोमँटिक असला तरी या नृत्यात स्त्री पुरुष एकमेकांना स्पर्शही करत नाहीत. दोन मिनिटं धुंद नाचून, ओलेच्या पुकारानंतर एकदाच फक्त पुरुष स्त्रीच्या कंबरेत हात घालून नृत्य संपवतो. फ्लेमिंगो पक्ष्याचं प्रियाराधन हा सेवियाना नृत्याचा गाभा! आर्जवं करकरून जोडीदाराणीस आकृष्ट करून घेणारा हा नाच आहे. फार पूर्वी जेव्हा तरुणांच्या प्रेमावर, भेटीगाठींवर वडीलधाऱ्यांची करडी नजर असे, खिडकीच्या गजाआडून नजरेनं प्रेमालाप होत असे, त्यावेळी हा जत्रेचा सप्ताह त्यांच्यासाठी पर्वणी ठरत असावा. स्पर्शसुख नसलं तरी भरपूर दृष्टिसुख लाभत असे आणि सरतेशेवटी ओलेची वाट पाहत वडिलधाऱ्यांसमोर समोर का होईना होणाऱ्या प्रियेच्या ओझरत्या स्पर्शासाठी हे तरुण आसुसलेले असत. आजच्या आधुनिक काळात तसा विधिनिषेध नसला; तरी सेव्हियना नृत्यातील शृंगार अजून कायम आहे. त्यात कुठेही बीभत्सपणा आलेला नाही. तिशीतल्या एका जोडप्याचा नाच मी पाहत होते. त्या स्त्रीच्या हालचालीत, हावभावात कमालीची मोहकता होती. पांढऱ्याशुभ्र झग्यावर लाल टिपके, लाल झालर, त्याच रंगसंगतीचं फूल, डूल, बूट सगळं कसं नेटकं आणि देखणं. नवराही कौतुकानं ओथंबलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत तिला नृत्यात साथ देत होता. त्यांच्या दोन गोड छोकऱ्या शेजारीच बसल्या होत्या. जणू तिच्या प्रतिकृती ! टाचा आपटून केलेल्या वेगवान नृत्यामुळे ती थकून खुर्चीवर पाय पसरून अंग सैलावून बसली. नवऱ्यानं हळूच तिच्या पायातले बूट काढून, हलक्या हाताने तिची पावलं चेपून दिली. त्याच्याकडे पाहून ती छानसं हसली आणि संगीत सुरु होताच पुन्हा बेभान नाचू लागली. मला त्यांचं ते प्रेम, शृंगार आणि नाचण्यातला आनंद खूप भावाला. एकंदरच आबालवृद्धांचं आत्ममग्न होऊन नृत्यात रममाण होणं, त्याद्वारे आपल्या भावना व्यक्त करणं फारच विलोभनीय!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
पुढच्या लेखात जाऊया हॉलंडमधील ट्युलिपच्या बागेत.