अजब निसर्ग
मकरंद जोशी
तब्बल ११३ वर्षे गायब असलेला पक्षी पुन्हा सापडतो... समुद्रात राहणारी ‘गाय’ चक्क गवत खाते... हे सगळं भारतातच घडतं! आपल्या देशातील जंगलं आणि समुद्र अशा अनेक भन्नाट वन्यजीवांनी भरलेले आहेत. चला, वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने या अद्भुत प्राण्यांची ओळख करून घेऊया!
हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते सागरकिनाऱ्यावरच्या खारफुटी रानापर्यंत आणि वाळवंटातल्या वाळूच्या टेकड्यांपासून ते सदाहरित दाट पर्जन्यवनांपर्यंत आपल्या भारताला लाभलेली निसर्गाची देणगी थक्क करणारी आहे.या वैविध्यपूर्ण निसर्गामुळेच अत्यंत अनमोल असा जैवविविधतेचा ठेवा भारताला मिळालेला आहे.ह्या वन्य संपत्तीचं संरक्षण,संवर्धन करण्यासाठीच भारतात दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर या काळात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.१९५२ साली भारतातील धोक्यात आलेल्या आणि दुर्मिळ होऊ लागलेल्या वन्यजींवांच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.तेव्हापासून दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देशभरात वन्यजीवांविषयी जागृती करणारे,वन संवर्धनाचे महत्व सांगणारे आणि जनसामान्यांना वन्यजीव संवर्धनात जोडून घेणारे अनेक उपक्रम आयोजित केले जातात.मग या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने भारतातील काही अतिशय अनोख्या वन्यजीवांची थोडक्यात ओळख करुन घेऊया.
फॉरेस्ट आऊलेट (रान पिंगळा)
वन्यजीवांच्या बाबतीत सर्वात मोठा धोका असतो तो नामशेष होण्याचा. अनेकदा त्या प्राण्याचा अधिवास म्हणजे राहाण्याला अनुकुल अशी नैसर्गिक परिस्थिती नष्ट झाल्यामुळे किंवा माणसाने केलेल्या बेबंद शिकारीमुळे तो प्राणी कायमचा नष्ट झालेला पाहायला मिळतो.आपल्या भारतातील आशियाई चित्ता हे याचं सगळ्यात भिषण उदाहरण आहे.पण भारतातल्या एका पक्ष्याच्या बाबतीत काही वेगळंच घडलं होतं.जो पक्षी सुमारे ११३ वर्षे नामशेष झाल्याचं मानलं जात होतं तोच पक्षी शतकभराने जणू पुन्हा अवतरला. तो पक्षी म्हणजे फॉरेस्ट आउलेट अर्थात रानपिंगळा. या पक्ष्याच्या बाबतीत वेगळाच घोटाळा झाला.तो काही नष्ट वा नामशेष झाला नव्हता पण त्याच्या रंगरुपाबद्दलची चुकीची माहिती नोंदली गेल्याने त्याची ओळखच पटली नाही आणि पक्षी निरिक्षकांसाठी तो जणू गायबच झाला. ब्रिटिशांच्या राज्यात भारतातील मध्य प्रदेशातून या पक्ष्याची पहिली नोंद झाली ती सन १८७२ मध्ये. त्यानंतर पुढच्या काही वर्षांमध्ये ओडिसा,महाराष्ट्र या राज्यातूनही रान पिंगळाची नोंद झाली. मात्र १९७२ मध्ये भरपूर शोध घेऊनही यातल्या कुठल्याच भागात रान पिंगळा न आढळल्याने तो बहुदा नामशेष झाला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला.मात्र १९९७मध्ये अभ्यासकांच्या लक्षात आले की जुन्या काळातली रान पिंगळ्याची चित्रे आणि खरा रान पिंगळा यात फरक आहे,त्यामुळे पुन्हा एकदा शोध मोहिम सुरू करण्यात आली आणि त्यात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा रानपिंगळा आढळला.
साधारण मैनेच्या आकाराचे असलेले हे घुबड त्याच्या रंगरुपामुळे अनेकदा स्पॉटेड आउलेट समजले जाते.मात्र या दोन्ही घुबडांच्यात काही फरक आहेत.रान पिंगळ्याचे डोके,कपाळ यावर ठिपके अजिबात नसतात.तसेच त्याच्या पंखांवर आणि शेपटीवर ठळक पट्टे असतात जे स्पॉटेड आउलेटवर नसतात.रान पिंगळ्याच्या पाठीचा राखाडी तर पोटाचा रंग पांढरा असतो.या घुबडाचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात आणि इतर सर्व घुबडांप्रमाणेच रानपिंगळाही आपली मान १८० अंशात फिरवू शकतो,त्यामुळे बसल्या जागीही त्याला पाठीमागे पाहाता येते.याची चोच शिकार पकडण्यासाठी आणि फाडण्यासाठी अगदी बांकदार असते.
रान पिंगळा आर्द्र पानगळी राने,मोकळी अरण्ये, नदीकाठची झाडे इथे आढळतो.पश्चिम खानदेश,डांगचे अरण्य, सातपुडा, मेळघाट तसेच मध्यप्रदेश,ओडीसा या भागातच पाहायला मिळतो. इतर घुबडांसारखा हा फक्त रात्रीच वावरत नाही तर दिवसा उजेडीही वावरताना दिसतो.सकाळी १० नंतर याच्या हालचाली कमी होतात.मात्र दिवसा वावरत असल्यानेच याची शिकार होते.त्यामुळेच यांची संख्या अतिशय कमी झाली आहे आणि ‘धोक्यात आलेली प्रजाती’ म्हणून हा नोंदलेला आहे.शिकार करण्यासाठी रान पिंगळा त्याच्या ठरावीक फांदीवर शांतपणे बसून राहातो आणि आपले भक्ष्य दिसले की झडप घालतो.प्रामुख्याने सरडा,सापसुरळी यावर ताव मारणारा हा पक्षी त्याबरोबरच उंदीर-घुशी, छोटे पक्षी,बेडूक,किटक यांचाही समाचार घेतो.झाड्याच्या ढोलीत आपले घरटे थाटून त्यात अंडी घातल्यावर नर,अंड्यांवर बसलेल्या मादीला अन्न आणून भरवतो.तर असा ११३ वर्षांनंतर प्रकटलेला रान पिंगळा खरोखरच अनोखा पक्षी आहे.
डुगॉन्ग (समुद्री गाय)
आपल्या भारताला पूर्व आणि पश्चिमेला मिळून एकूण ११००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा समुद्र किनारा लाभलेला आहे.मात्र तरिही तुलनेनं सागरी जीवांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते.हॉर्स शू क्रॅबसारखा लाखो वर्षांपूर्वीचा खेकडा भारताच्या किनाऱ्यावर आढळतो आणि ऑलिव्ह रिडले जातीची समुद्र कासवे दरवर्षी हजारोंच्या संख्येनं भारताच्य किनाऱ्यावर अंडी घालायला वर्षानुवर्षे येतात.या सगळ्या सागरी जिवांमधला सर्वात अनोखा जीव म्हणजे ‘डुगॉन्ग’ अर्थात ‘समुद्री गाय’.जगभरात जे मोजके सागरी सस्तन प्राणी आढळतात त्यापैकी हा एक आहे.भारताच्या संदर्भात सांगायचं तर भारताच्या सागर किनाऱ्यांवर आढळणारा हा एकमेव सागरी सस्तन प्राणी आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कच्छच्या आखातात,तसेच पूर्व किनाऱ्यावरील मन्नारच्या आखातात,पाल्कच्या सामुद्रधुनीत आणि अंदमान-निकोबार बेटांच्या आसपास हा प्राणी आढळतो.मात्र त्यांची संख्या तिनशेपेक्षाही कमी आहे.डुगॉन्गचं मुख्य अन्न हे समुद्रतळाशी उगवणारं गवत असतं,त्यामुळेच त्यांना समुद्री गाय म्हटलं जातं.संपूर्ण शाकाहारी असलेले डुगॉन्ग दिवसाला साधारण ३० किलो समुद्री गवत खाऊ शकतात.त्यांना दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे,नैसर्गिक अवस्थेत ते ७० वर्षांपर्यंत जगतात.मात्र त्यांचा प्रजनन दर अत्यंत संथ असतो.आकाराने डुगॉन्ग तब्बल १० फुटांपर्यंत वाढतात आणि त्याचे वजन ४०० किलोपर्यंत असतं.एखाद्या सिलेंडर सारखं लंबुळक शरीर,पुढच्या पायांचे वल्ह्यात झालेलं रुपांतर आणि व्हेलसारखी शेपटी हे याचं वैशिष्ट्य म्हणता येईल.याचे डोळे -कान शरीराच्या मानाने फारच लहान असतात,तर नाक जरा चपटच असतं.मात्र हा सस्तन प्राणी असल्याने तो याच नाकाने श्वास घेतो.श्वास घेण्यासाठी त्याला वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतं.एकदा श्वास घेतला की मग पुढची सहा मिनेट तो पाण्याखाली राहू शकतो.हजारो वर्षांपासून डुगॉन्गची शिकार त्याच्या मांसासाठी आणि त्याच्या चरबीपासून मिळणाऱ्या तेलासाठी केली जात आहे.समुद्री परिसंस्थेचं संतुलन राखण्यात डुगॉन्ग महत्वाची कामगिरी बजावतात.त्यांच्या सततच्या गवत चरण्यामुळे समुद्रतळाचे गवताळ प्रदेश निरोगी राहातात.आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने डुगॉन्ग हे धोक्यात आलेल्या प्राण्यापैकी एक म्हणून जाहीर केले आहेत.त्यांच्या संरक्षणासाठी तमिळनाडूतल्या पाल्कच्या सामुद्रधुनीत भारताचे पहिले डुगॉन्ग संवर्धन क्षेत्र निर्माण करण्यात आलं आहे.
भारतातल्या आगळ्या वेगळ्या प्राण्यांची यादी भरपूर मोठी आहे,त्यामुळे पुढच्या भागात आपण आणखी काही अशाच अनोख्या भारतीय वन्यजीवांची ओळख करुन घेऊया.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com