दिवाळी अंक २०२६ : वळणांच्या शुभ्र नोंदी 
अक्षररंग

दिवाळी अंक २०२६ : वळणांच्या शुभ्र नोंदी

माझ्याजवळ कुठलाही पत्ता नाही. वळणांच्या काही शुभ नोंदी आहेत...

नवशक्ती Web Desk

संकेत म्हात्रे

माझ्याजवळ
कुठलाही पत्ता नाही.
वळणांच्या काही शुभ नोंदी आहेत :

१.

पुढचा रस्ता
दिसत नसला
तरीही तो असतो
वळणा आड.
तुम्हाला फक्त
चालत राहायचे असते.

२.

अलीकडे जे आहे
तो रस्ता आहे.
पलीकडे जे आहे
तो ही रस्ताच आहे.
केवळ एका वळणामुळे
अवघ्या रस्त्याची व्याख्या
बदलून कशी चालेल?

३.

जे आयुष्यभर शोधत होतो
ते कुठेही गाव नाही
होते केवळ वळण.
तेव्हा कळले
आपण वळणापुरते आहोत.
आपण वळणापुरते आहोत.

४.

असे होईल का
की माझे बाहू होत जातील
अखंड रस्ते
आणि त्या डोंगरांना
कवेत घेतील
एकदाचे?

५.

अशी फणी हवी
ज्याने ढगांच्या शिखरांवरचे
दाटीचे केस विंचरता येतील.
किंवा स्वतःजवळ
जिव्हाळी फुंकर.

६.

देवदाराच्या झाडांना
पाठीला दप्तर लावले
तर रांगेत उभ्या
शाळकरी मुलांसारखे
दिसतील, नाही?

७.

वळणं जितकी मोठी
शब्द तितके छोटे.
मला काळजी-
आपल्या हृदयाच्या कवितेत
सामावतील का ही वळणं?

तेव्हा रस्ता गुंडाळून घेतो स्वतःला
सहज येतो शब्दांच्या सुरळीत
वळणांचे सारण भरत.

८.

आभाळाने पहाटे उठून
नेहमीच्या शेकऱ्याण्या केल्या.
पण हा निळा फराळ
कुणासाठी?

९.

ह्या टोकाला जिथे
आभाळाचे हृदय टेकते
त्या रस्त्याला काज लावले
की त्याचे घडघडणे ऐकू येते.

१०.

बरं झालं
रस्ता चुकलो!
शब्दांना
नवे वळण मिळाले.

११.

कवितेलाही वाटत नाही
रस्ता संपावा.
म्हणून की काय
ओठ संपल्यावरही
थांबल्यासारखे
वाटत नाही.
अथांग.

Mumbai: फटाके बंदीचा बार फुसका; दोन दिवसांत आगीच्या ८९ घटना, फटाक्यांमुळे २८ ठिकाणी अग्निभडका, एकाचा मृत्यू; तीन जखमी

'ई-फेरफार'द्वारे होणार आता पीक पाहणी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

अरे व्वा! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; साताऱ्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम

Mumbai : स्वयंचलित दरवाजांची विना-एसी लोकल दाखल; लवकरच नव्या सुरक्षा चाचण्या

मुंबईत पाणीकपात वाढणार? BMC ची राखीव पाण्यासाठी फिल्डिंग, ७ धरणांत फक्त ८२.४७ टक्के पाणी, ६ महिने आधीच राज्य सरकारला पत्र