अक्षररंग

हिवाळ्यातील फेरफटका

सकाळी चालताना मिळणारी शीतलता आणि शांतता मन प्रसन्न करतात. सावधगिरी घेतल्यासच हा अनुभव आरोग्यदायी ठरतो.

नवशक्ती Web Desk

खुमासदार

डाॅ. प्रमोद बेजकर

सकाळी चालताना मिळणारी शीतलता आणि शांतता मन प्रसन्न करतात. सावधगिरी घेतल्यासच हा अनुभव आरोग्यदायी ठरतो.

बघा हो यांना काय झालंय? सकाळी फिरायला म्हणून गेले तर घरी आल्यावर शिंकांची सेंच्युरीच मारली आहे.” साठ्यांच्या बायकोने दवाखान्यात आल्या आल्या नेहमीसारखी सरबत्ती सुरू केली. साठे बाजूला निमूट बसून होते. डोळे लालसर, सर्दटलेला चेहरा आणि मधूनच येणारं नाकातलं आणि डोळ्यातलं पाणी पुसत बसलेले साठे आजारी आणि वैतागलेले वाटत होते.

“काय झालं हो!” विचारल्यावर ते म्हणाले, “नवीन वर्ष सुरू झालंय ना, तर मी संकल्प केला की, सकाळी उठून फिरायला जायचं. शुभस्य शीघ्रम म्हणत आजच सकाळी बाहेर पडलो. कधी नव्हे ती आपल्याकडे थंडी पडली आहे. मस्तच वाटत होतं चालताना! पण हळूहळू डोळे चुरचुरायला लागले. डोळ्यांतून पाणी, नाकातून पाणी, शिंका असा भडीमारच चालू झाला. मग काय, आलो अर्ध्यातूनच परत.”

“तरी मी सांगत होते. मफलर गुंडाळा, नाहीतर कानटोपी घाला, पण ऐकतील तर हे कसले!” बायको सांगेल ते निमूट करणारे साठे हे पण निमूटपणे ऐकत बसले.

“हे बघा, विशेष काही झालं नाही आहे. ही सगळी ॲलर्जीची लक्षणं आहेत. औषधाने होईल ठीक आणि एक लक्षात ठेवा, थंडी आहे तोवर सकाळी लवकर फिरायला जाऊ नका.”

“पण सकाळी फिरणं, तब्येतीला चांगलं असं म्हणतात ना! आणि दिवसाची सुरुवात हेल्दी होते, छान मूड तयार होतो, हृदयाला व्यायाम होतो, असं बरंच वाचलंय की!”

“हे सगळं खरं असलं तरी हिवाळ्यात सकाळी लवकर फिरायला जाण्याने त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात जमिनीलगतची हवा थंड म्हणजे जड असते. हवेतले धूलीकण, मोटारी, कारखाने यातून निघणारे विषारी वायू हे सगळे त्या जड झाकणाखाली जणू दाबले जातात. त्यामुळे त्यांचं हवेतलं प्रमाण वाढलेलं असतं. हे सगळे सूक्ष्म कण फुफ्फुसात जाऊन ॲलर्जी, दमा, ब्राँकायटीस यांचं प्रमाण वाढू शकतं.”

“वा, हे छान सांगितलंत तुम्ही डाॅक्टर! आता उद्यापासून नेहमीसारखा दुलईत गुरफटून झोपायला मी मोकळा.”

“या थंडीत सकाळी लवकर फिरायला जाऊ नका एवढंच डॉक्टर म्हणताहेत. नंतर जाऊ शकता की! हो ना डॉक्टर?” बाई म्हणाल्या.

“तुम्ही म्हणता ते खरं आहे” म्हणत मी त्यांना दुजोरा देत म्हटलं की, “उशिरा म्हणजे १० नंतर फिरायला जाऊ शकता. सूर्यकिरणांमुळे जमिनीजवळची हवा तापली की विरळ होऊन वर जाते. त्याबरोबरच हवेतले दूषित घटकही जात असल्याने त्यांचं हवेतलं प्रमाण तेव्हा कमी होतं. सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी फिरायला गेलात तरी चालेल. पण कधीही बाहेर पडलं तरी हवेचं प्रदूषण आहेच. त्यामुळे मास्क लावून बाहेर पडणं हे नेहमीच उपयुक्त असतं.”

“डॉक्टर, मला तर हवा आता देखील मस्तच वाटते आहे. मग कसं कळायचं प्रदूषण वाढलंय ते!”

साठे, “शिंका, खोकला, घसा खवखवणे असा त्रास अचानक सुरू झाला तर आपल्याला लगेच जाणवतं की हवा प्रदूषित आहे. पण असा त्रास जाणवला नाही तरी अशा हवेमुळे ब्राँकायटीस, दमा असे श्वसनसंस्थेचे रोग होऊ शकतात. काही जणांच्या फुफ्फुसाची ऑक्सिजन धरून ठेवायची क्षमता हळूहळू कमी होत जाते.”

“PM हे हवेतल्या धुळीकण मोजायचं परिमाण आहे. PM जितके कमी तितके कण सूक्ष्म आणि अधिक घातक. अडीच PM आकारमानाचे कण केसाच्या तिसाव्या भागाइतके सूक्ष्म असतात. ते मोटारीच्या आणि कारखान्याच्या धुरातून निघतात. हे कण खोलवर फुफ्फुसात आणि रक्तात जातात. २.५ PM चे कण हवेत असतील तर सिगारेट ओढल्याने जितकी हानी होते तितकीच हानी या हवेत राहिल्याने होते. १० PM चे कण हे रस्त्यावरच्या धुळीत किंवा परागकणात असतात. ते कण नाकात आणि घशात अडकतात आणि ॲलर्जी निर्माण करतात.”

“हे सगळं खरं असलं तरी हवेची गुणवत्ता आपल्याला कशी समजणार?” साठ्यांनी त्यांच्या बसक्या आवाजात विचारलं.

“त्यासाठी AQI हा हवेची गुणवत्ता दाखवणारा निर्देशांक उपयोगी आहे. त्यातून PM कणांचा आकार, कार्बनडाय ऑक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड यांची माहिती मिळते. हा निर्देशांक पन्नासपर्यंत चांगला आणि शंभरपर्यंत ठीक असतो. तो जेवढा जास्त तितकं प्रदूषण आणि त्याचे वाईट परिणाम अधिक. मुंबईत सध्या दीडशेच्या वर आणि दिल्लीत तर २८० इतक्या भयंकर लेव्हलला हा निर्देशांक आहे.”

“म्हणजे घराच्या बाहेरच पडायला नको.”

“असं करून कसं चालेल साठे.. बाहेर तर जायलाच लागतं सगळ्यांना. त्यासाठी काही काळजी घ्यायला हवी. जसं की थंडीत सकाळी फिरू नये. AQI ची पातळी आपण मोबाईलवर बघू शकतो. ती दीडशेच्या वर असेल तर बाहेर जाणं टाळा. जास्त रहदारीचा रस्ता आणि वेळ शक्य तेव्हा टाळा. आतल्या रस्त्याने किंवा बागेतून जाणं जमलं तर करावं. कारमध्ये देखील काचा बंद ठेवाव्यात. घरातल्या खोल्या ओल्या कपड्याने पुसाव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी बाहेर जाताना मास्क वापरला पाहिजे. N95 mask हा सगळ्यात चांगला मास्क आहे. त्यामुळे प्रदूषित हवेपासून आपला चांगला बचाव होतो.”

“खरं आहे डॉक्टर, रोगाला प्रतिबंध करणं हे रोगाचा उपचार करण्यापेक्षा केव्हाही चांगलं.” शाळेत मराठी शिकवणाऱ्या साठे बाई म्हणाल्या.

“अहो नुसतंच चांगलं नाही तर स्वस्त देखील. Prevention is not only better but cheaper also” मी हसत म्हणालो. n

लेखक आणि पेडिट्रिशियन pramodbejkar@gmail.com

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती