भाष्य
हिनाकौसर खान
उघडपणे अल्पसंख्यांकांचा द्वेष करणारा, समाजवादी विचारांची हेटाळणी करणारा राष्ट्राध्यक्ष अमेरिका या बलाढ्य देशाला लाभलेला असताना त्याच्याविरोधात होय, मी मुस्लिम आहे, होय, मी समाजवादी आहे, असं सांगत उभं राहणं हे सोपं नक्कीच नव्हतं. पण एका तरुणाने पुढाकार घेतला आणि सजग लोकांनीही त्याला पाठिंबा देत आपलं मत त्याच्या पारड्यात टाकलं. ही वाटचाल एका नव्या पर्वाच्या दिशेने होणारी ठरो, याच भावना आज जगभरातल्या सजग, समतावादी लोकांच्या मनात आहेत.
Hope is alive... असा जयघोष करणारे जोहरान ममदानी हे नाव आज अमेरिकेच्या राजकीय इतिहासात एक नवं पर्व ठरत आहे. न्यूयॉर्कसारख्या बहुसांस्कृतिक शहराने २०२५ मध्ये पहिल्यांदा एका मुस्लिम, दक्षिण आशियाई वंशाच्या तरुण नेत्याला महापौरपदी निवडून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. जोहरानचा विजय ही केवळ एक राजकीय बाब नसून सर्वसामान्य जनता द्वेषाला नकार देऊ पाहत आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे.
४ नोव्हेंबर २०२५ रोजी जेव्हा न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, तेव्हा जोहरान ममदानींनी माजी गव्हर्नर अँडू क्युमो आणि रिपब्लिकन नेते कर्तीस स्लिवा यांना पराभूत करून इतिहास रचला. ब्रुकलिनच्या मुख्यालयात भाषण करताना ते म्हणाले, "आज रात्री आपण इतिहास घडवला आहे. हा विजय माझा नाही, हा आपला आहे. या शहरात काम करणाऱ्या सर्व लोकांचा, स्थलांतरितांचा, कामगारांचा आणि सामान्य नागरिकांचा हा विजय आहे. न्यूयॉर्क हे नेहमीच स्थलांतरितांनी घडवलेले शहर आहे आणि आज त्या शहराचं नेतृत्वही एका स्थलांतरिताकडे आलं आहे. हेच लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे."
चौतीस वर्षांचे जोहरान यांचा जन्म युगांडात झाला, पण त्यांचं कुटुंब भारतीय मूळ असलेलं. त्यांचे वडील महमूद ममदानी हे आफ्रिकेतील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, तर आई मीरा नायर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपट दिग्दर्शिका आहेत. अशा बौद्धिक आणि कलात्मक वातावरणात वाढलेल्या जोहरानने सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समानतेचे मूल्य लहानपणापासून आत्मसात केले. ते त्यांच्या एकूणच वावरात दिसते.
न्यूयॉर्कच्या महापौरपदाची ही काही पहिलीच निवडणूक नव्हती. तरीही ती इतकी चर्चेची का ठरत आहे? जगभर इस्लामोफोबिया वाढलेला आहे. त्याचं ठळक रूप अजूनही गाझामधील नरसंहारातून दिसत आहेच. त्यातच अमेरिका कट्टर इस्लामोफोबिक, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसारखे नेते उघडपणे मुस्लिम द्वेष्टे, स्थलांतरित द्वेष्टे असताना एक मुस्लिम उमेदवार सामान्य न्यूयॉर्कवासीयांचा पाठिंबा मिळवून बलाढ्य श्रीमंत उमेदवारांच्या विरोधात लढतोय, हे विशेष आहे. न्यूयॉर्क शहरात ज्यू नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. इथले मोठे उद्योग त्यांच्या ताब्यात आहेत आणि तरीही इस्रायलविरोधी भूमिका घ्यायला जोहरान अजिबात कचरत नाही. इस्त्रायल गाझामध्ये जे करते आहे तो वंशविच्छेद आहे आणि तेथील पंतप्रधान जर आमच्या शहरात आले तर आम्ही त्यांना अटक करू, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध खटला चालला पाहिजे, हे तो स्पष्टपणे बजावतो आणि तरीही बरेच ज्यू नागरिक देखील त्याच्यासोबत उभे राहतात. जोहरान अमेरिकेच्या वर्तमान अध्यक्षांना खुलेआम हुकूमशहा म्हणतात. जे योग्य ते योग्य, जे चुकीचे ते चुकीचे. मतपेटी चुचकारण्यासाठी जोहरान कुठेही बोटचेपी भूमिका घेत नाही.
जगभर धर्माभिमानी, सत्तांध आणि द्वेष पसरवणारे हुकूमशाहीवादी नेते मनमानी पद्धतीने वावरत असताना, त्यांच्या विरोधात सर्वसमावेशक, कामगारांची बाजू घेणारे आणि द्वेषाविरुद्ध लढण्याची भाषा करणारे जोहरान लोकांना आपलेसे वाटत आहेत. इस्लामोफोबियाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या मुस्लिम ओळखीची ते लाज वा भीती वाटून घेत नाहीत. उलट त्याचा उघड स्वीकार करत सर्वांना सोबत घेऊन सर्वांसाठी सरकार चालवण्याचा विचार ते मांडतात आणि हेच या निवडणुकीचे आणि जोहरान यांचे वैशिष्ट्य.
शिवाय त्यांची 'न्यूयॉर्क सर्वांसाठी', 'सरकार हे लोकांसाठी असतं', अशा प्रकारची विधानं सुद्धा महत्त्वाची आहेतच, पण त्याचबरोबर या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जोहरान ममदानी जगाला समाजवादी आशा देत आहे. त्यांनी मोठ्या कंपन्यांविरोधात उघडपणे आवाज उठवला, घरांच्या वाढत्या भाड्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली, सार्वजनिक वाहतूक स्वस्त आणि सर्वांसाठी सुलभ करण्याचा आग्रह धरला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, शहराचं प्रशासन हे फक्त श्रीमंतांचं नव्हे, तर कामगार, स्थलांतरित आणि वंचित लोकांचंही असलं पाहिजे. त्यांचा प्रचार जमिनीस्तरावर पोहोचला. लोकांना वाटलं की, हा उमेदवार वेगळा आहे-फक्त बोलणारा नाही, तर ऐकणारा आहे. वेल्फेअर स्टेटचे मोडीत निघालेले मॉडेल तो पुन्हा मांडतो आहे. त्यातून त्यांना 'सामान्यांचा नेता' म्हणून ओळख मिळाली, पण त्याचबरोबर ते व्यापार वर्गाच्या आणि पारंपरिक राजकारण्यांच्या रडारवर आले. न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी त्यांनी उमेदवारी जाहीर केली तेव्हा काहींनी त्यांची थट्टा केली, "तो खूप तरुण आहे, अनुभव नाही," असं म्हटलं गेलं.
धर्माधारित विरोध
प्रचाराच्या काळात आणि निवडणुकीनंतरही त्यांना मोठा विरोध सहन करावा लागला. हा विरोध काही ठिकाणी राजकीय स्वरूपाचा होता, तर काही वेळा उघडपणे धर्माधारित होता. प्रचारादरम्यान सोशल मीडियावर इस्लामविरोधी अफवा आणि द्वेषपूर्ण पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर पसरवल्या गेल्या. "मुस्लिम मेयर म्हणजे शरियाचा कायदा लागू होणार", "तो अमेरिकाविरोधी आहे" असे संदेश काही उजव्या विचारसरणीच्या गटांकडून पसरवले गेले. रॉयटर्सच्या अहवालानुसार त्यांच्या विजयानंतरच्या २४ तासांत सहा हजारांहून अधिक मुस्लिमविरोधी पोस्ट्स सोशल मीडियावर आल्या. काही ठिकाणी त्यांच्या पोस्टर्सची तोडफोड झाली आणि वैयक्तिक धमक्या देण्यात आल्या. ९/११ नंतर मुसलमानांविषयी निर्माण झालेला संशय अजूनही काही समाजघटकांच्या मनात घट्ट बसलेला आहे. जोहरानच्या विरोधकांनी त्याच भावनेचा राजकीय वापर केला. त्यांच्यावर 'परकीय', 'अमेरिकन नसलेला' असा ठपका ठेवण्यात आला.
प्राऊड ऑफ जोहरान
त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं, "रोज सकाळी मला माझ्या धर्मावर आधारित द्वेषपूर्ण संदेश वाचावे लागतात, पण त्याचवेळी हजारो लोकांचा मला आधारही मिळतो. तेच माझं बळ आहे." जोहरानने हा सगळा विरोध शांतपणे घेतला आणि लोकांशी थेट संवाद साधण्याचं धोरण स्वीकारलं. त्यांनी आपल्या ओळखीचा बचाव करण्यापेक्षा आपल्या कामावर भर दिला. त्यांच्या सभांमध्ये मुस्लिम, ज्यू, कृष्णवर्णीय, स्थलांतरित- सगळ्याच समाजघटकांनी सहभागी होत एकतेचं प्रतीक निर्माण केलं. सोशल मीडियावर #ProudOfZohran हा हॅशटॅग ट्रेंड झाला, न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर "हेट इज नॉट अवर आयडेंटिटी" अशी घोषणा देत लोक बाहेर पडले आणि त्यांच्या रागाचं मतांमध्येही रूपांतरित झालं.
त्यांच्या विरोधकांनी कितीही आरोप केले, कितीही भीती पसरवली, तरी ममदानींनी दाखवून दिलं की लोक अजूनही प्रामाणिक, संवेदनशील आणि धाडसी नेतृत्वाला स्वीकारतात. धर्म, वर्ण किंवा वंश यांच्या पलीकडे माणूसपणाला प्राधान्य देणारा नेता आज अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शहराचे नेतृत्व करणार आहे.
जोहरान यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
मी तरुण आहे. मी मुसलमान आहे. मी भारतीय वंशाचा आहे आणि या सगळ्याबद्दल मला अभिमान आहे. मी माझ्या ओळखीबद्दल कधीही माफी मागणार नाही, कारण ती माझी ताकद आहे, कमजोरी नाही.
आपल्यावर जेव्हा अन्याय झाला, तेव्हा आपण आवाज उठवला. आपण विसरले गेलो, तरी आपण थांबलो नाही. म्हणूनच आजचा दिवस तुमचा आहे -भाडेकरूंचा, शिक्षकांचा, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा, स्थलांतरितांचा आणि त्या सगळ्यांचा, ज्यांना अनेकदा व्यवस्थेने मागे ठेवले.
न्यूयॉर्कला पुन्हा कामगारांच्या हातात द्यायचं आहे. हे शहर प्रत्येकासाठी असलं पाहिजे, फक्त काही श्रीमंतांसाठी नाही. आम्ही भाडे गोठवू, सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ करू आणि सर्वासाठी घर ही सुविधा नव्हे, तर हक्क बनवू.
आपल्या शहरात द्वेष, भीती आणि विभागणीला जागा नाही. आपण विविधतेतून शक्ती मिळवतो. आपण ज्या पद्धतीने एकत्र आलो आहोत, त्याच पद्धतीने आपण शहर उभारू.
आज मी सांगू इच्छितो - हा विजय कोणत्याही एका धर्माचा नाही, कोणत्याही एका गटाचा नाही. हा विजय त्या लोकांचा आहे ज्यांनी विश्वास ठेवला की राजकारण वेगळं असू शकतं. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सहानुभूती या मूल्यांवरही सत्ता मिळवता येते - हे आपण सिद्ध केलं आहे.
आपण एकत्र आलो आहोत म्हणूनच हे शक्य झालं. पुढची वाट सोपी नसेल, पण आपण तयार आहोत. आपण हे शहर अशा रुपात बदलू, जिथे प्रत्येकाला जगण्याचा आणि प्रेम करण्याचा अधिकार असेल.
साहित्यिक व अल्पसंख्यांक प्रश्नाच्या अभ्यासक