गुंतवणूक नियमानुसारच! अदानी-LIC बाबत अर्थमंत्र्यांचे संसदेत स्पष्टीकरण ANI
बिझनेस

गुंतवणूक नियमानुसारच! अदानी-LIC बाबत अर्थमंत्र्यांचे संसदेत स्पष्टीकरण

भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) गुंतवणूक निर्णयांबाबत वित्त मंत्रालय कोणतेही सल्ले किंवा निर्देश जारी करत नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) गुंतवणूक निर्णयांबाबत वित्त मंत्रालय कोणतेही सल्ले किंवा निर्देश जारी करत नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. सरकारी विमा कंपनीने अदानी समूहात केलेल्या गुंतवणुका संस्थेच्या स्थापित मानक कार्यपद्धतीनुसारच करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने अनेक वर्षांपासून विविध कंपन्यांमध्ये मूलभूत तत्त्वे आणि सखोल ‘ड्यू डिलिजन्स’ यांच्या आधारे गुंतवणुकीचे निर्णय घेतले आहेत. या प्रक्रियेचे पालन करून एलआयसीने अदानी समूहातील सहा सूचीबद्ध कंपन्यांमध्ये भागभांडवल खरेदी केले असून त्यांच्या पुस्तक मूल्यातील एकूण रक्कम ३८,६५८.८५ कोटी रुपये आहे. याशिवाय समूहाच्या कर्ज साधनांमध्येही ९,६२५.७७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

एलआयसी निधीच्या गुंतवणुकीसंबंधी वित्त मंत्रालय कोणतेही सल्ले अथवा निर्देश जारी करत नाही, असे त्यांनी लोकसभेत लेखी उत्तरात म्हटले. राज्य-स्वामित्वाच्या विमा कंपनीचे गुंतवणूक निर्णय एलआयीसद्वारे स्वतंत्रपणे, जोखीम मूल्यांकन आणि विश्वस्तीय निकषांचे पालन करून घेतले जातात, असेही त्या म्हणाल्या.

अशा निर्णयांना विमा अधिनियम, १९३८ व इर्डाई, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

ऑक्टोबरमध्ये ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका अहवालात, चालू वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूहावर वाढत्या कर्जाचा आणि अमेरिकेतील तपासाचा दबाव असताना वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी एलआयसीला अदानी समूहात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप करण्यात आला होता. या अहवालात एलआयसीने मे २०२५ मध्ये अदानी पोर्ट्स अँड एसईझेडमध्ये केलेल्या ५७० दशलक्ष डॉलर (५ हजार कोटी रुपये) गुंतवणुकीचा उल्लेख करण्यात आला होता.

स्पष्टीकरण देताना सीतारामन म्हणाल्या, एलआयसीने मे २०२५ मध्ये अदानी पोर्ट्स अँड एसईझेडने जारी केलेल्या सुरक्षित, अपरिवर्तित रोख्यांमंध्ये (एनसीडी) ५ हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. ही गुंतवणूक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणांनुसार आणि स्थापित मानक कार्यपद्धतीनुसार आवश्यक ड्यू डिलिजन्स केल्यानंतरच करण्यात आली आहे.

एलआयसीने एनएसई आणि बीएसईवरील आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून, त्यातील मोठा हिस्सा या कंपन्यांतील मोठ्या संस्थांमध्ये आहे, असेही त्यांनी नमूद केले.

३० सप्टेंबर २०२५ पर्यंत निफ्टी५० कंपन्यांमधील एलआयसीच्या गुंतवणुकीचे पुस्तक मूल्य ४,३०,७७६.९७ कोटी रुपये असून ते त्यांच्या एकूण समभाग गुंतवणुकीच्या ४५.८५ टक्के आहे. सेबीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सूचिबद्ध कंपन्यांनी १% किंवा अधिक भागभांडवल असलेल्या भागधारकांची नावे जाहीर करणे आवश्यक आहे.

एलआयसीचा सर्वाधिक हिस्सा अदानी-टोटल गॅसमध्ये

८,६४६.८२ कोटी रुपये - अदानी-टोटल गॅस

८,४७०.६० कोटी रुपये - अदानी एंटरप्रायझेस

५,७८७.७३ कोटी रुपये - अंबुजा सिमेंट्स

५,६८१.१० कोटी रुपये - अदानी पोर्ट्स अँड एसईझेड

३,७२९.६८ कोटी रुपये - अदानी एनर्जी सोल्युशन्स

३,४८६.१० कोटी रुपये - अदानी ग्रीन एनर्जी

२,८५६.८२ कोटी रुपये - एसीसी

...अशी आहे एलआयसीची खासगी गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीज - ४०,९०१.३८ कोटी रुपये

इन्फोसिस - ३८,८४६.३३ कोटी रुपये

टीसीएस - ३१,९२६.८९ कोटी रुपये

एचडीएफसी बँक - ३१,६६४.६९ कोटी रुपये

हिंदुस्तान युनिलिव्हर - ३०,१३३.४९ कोटी रुपये

एलआयसीचा कर्ज हिस्सा असा आहे...

एचडीएफसी बँक - ४९,१४९.१४ कोटी रुपये

रिलायन्स इंडस्ट्रीज - १४,०१२.३४ कोटी रुपये

आयसीआयसीआय बँक - १३,४३५ कोटी रुपये

श्रीराम फायनान्स - ११,०७५ कोटी रुपये

अदानी पोर्ट्स व एसईझेड - ९,६२५.७७ कोटी रुपये

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर