नवी दिल्ली : स्वस्त गॅसचा पुरवठा एका महिन्यात दुसऱ्यांदा कमी केल्यानंतर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड सारख्या सिटी गॅस कंपन्या सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा विचार करत आहेत. परंतु सरकारी अधिकारी म्हणतात की, किरकोळ गॅस विक्रेत्यांनी दरवाढीचे समर्थन करण्यासाठी खर्चाचा ‘ब्रेकअप’ करणे आवश्यक आहे.
सरकारने १६ नोव्हेंबरपासून जुन्या क्षेत्रातून शहरातील गॅस किरकोळ विक्रेत्यांकडे होणाऱ्या कमी किमतीच्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात २० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या २१ टक्क्यांच्या कपातीनंतर दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.
सिटी गॅस किरकोळ विक्रेते आयजीएल, जे राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये सीएनजी किरकोळ विक्री करते, महानगर गॅस लिमिटेड जे मुंबईत सीएनजी विक्री करते, आणि गुजरात आणि इतरत्र कार्यरत असलेल्या अदानी टोटल गॅस लिमिटेड यांनी नियामक फाइलिंगमध्ये पुरवठा कपात झाल्यामुळे नफ्यावर परिणाम झाल्याच्या चिंतेने किंमत वाढीचे संकेत दिले.
मात्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील अधिकारी मात्र कंपन्यांच्या म्हणण्याने प्रभावित झाले नाहीत कारण त्यांना वाटते की, किरकोळ विक्रेत्यांना मोठा नफा मिळत आहे आणि त्यांना नवीन विहिरी किंवा आयात केलेल्या किंचित जास्त किमतीच्या एलएनजी गॅसमुळे त्यांचा खर्च काही प्रमाणात वाढत असला तरी त्यांना मिळत असलेल्या नफ्यावर मोठा परिणाम होणार नाही.
नफ्याचे प्रमाण जास्त
आयजीएलला ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात जवळपास १६ हजार कोटी रुपयांच्या महसुलावर १,७४८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. नफ्याचे हे प्रमाण तब्बल ११ टक्क्यांनी वाढले. एमजीएलला ७ हजार कोटींच्या महसुलावर सुमारे १,३०० कोटी रुपये नफा झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणता रिटेल विक्रेता नफा कमावतो? असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. सरकार नफा कमावणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात नाही पण जर त्यांना कमी किमतीचे इनपुट (जुन्या फील्डमधील गॅस) हवे असतील तर त्यांनी अंतिम उत्पादनाच्या (सीएनजी) किंमतीचे विभाजन देखील जाहीर करावे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील गॅस किरकोळ विक्रेत्यांच्या सूत्रांनी सांगितले की, तुटवडा भरून काढण्यासाठी महागड्या गॅसचा पुरवठा केल्याने सीएनजीच्या किमतींमध्ये चार ते सहा रुपये प्रति किलो दरवाढ होऊ शकते. अदानी टोटल गॅस लिमिटेडने एका वेगळ्या फाइलिंगमध्ये सांगितले की त्यांच्या पुरवठ्यात १३ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.