नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत भारतीय कुटुंबांच्या बचत पद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत. कुटुंबांच्या पारंपरिक बँक ठेवींमध्ये होणारी गुंतवणूक आता मुदतठेवींऐवजी म्युच्युअल फंड आणि जीवन विम्याकडे वळत आहे, असे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे. २०२१ मध्ये ४७.६ टक्के असलेला बँक ठेवींमधील घरगुती बचतीचा हिस्सा २०२३ मध्ये ४५.२ टक्क्यांवर घसरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, लाइफ इन्शुरन्स फंडातील घरगुती गुंतवणुकीत वाढ झाली आहे, ती २०२१ मधील २०.८ टक्क्यांवरून २०२३ मध्ये २१.५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. घरगुती बचतीमधील म्युच्युअल फंडाचा हिस्साही वाढला आहे, जो २०२१ मध्ये ७.६ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ८.४ टक्क्यांवर गेला आहे.