वॉशिंग्टन/नवी दिल्ली
अब्जाधीश गौतम अदानींना लक्ष्य करून जागतिक स्तरावर लक्ष वेधले आणि त्यांच्या समूहाच्या कंपन्यांच्या बाजारमूल्यांमधून अब्जावधी रुपयांची घट केलेल्या हिंडेनबर्ग रिसर्च ही कंपनी बंद होणार असल्याचे संस्थापक नाटे अँडरसन यांनी गुरुवारी जाहीर केले. विशेष म्हणजे हिंडेनबर्गची सुरुवात २०१७ मध्ये करणाऱ्या ४० वर्षीय अँडरसन यांनी ही घोषणा ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीच्या काही दिवस आधी केली.
कामाच्या अत्यंत तीव्र आणि काही वेळा सर्वसमावेशक स्वरूपामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. परंतु टीकाकारांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय हा जॉर्ज सोरोस आणि तथाकथित ‘डीप स्टेट’शी असलेल्या संबंधांशी जोडले आणि येणाऱ्या ट्रम्प प्रशासनाकडून प्रचंड दबाव असल्याचे म्हटले.
अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी ‘एक्स’वर ‘कितने गाजी आये, कितने गाजी गये’ अशा शब्दात प्रतिक्रिया पोस्ट केली.
सामान्यतः, अँडरसनसारखे शॉर्ट-सेलर्स, जे इतरांचे पैसे व्यवस्थापित करत नाहीत तर स्वतःचेच पैसे वापरतात, त्यांनी गैरव्यवस्थापन किंवा फसवणूक/घोटाळ्यात गुंतलेल्या कंपन्यांवर सट्टा लावला. शॉर्ट-सेलर्स एखादे स्टॉक विकण्याकरिता उधार घेतात, किंमत कमी होईल असा अंदाज बांधून, आणि नंतर पुन्हा खरेदी करतात आणि फरक जाहीर करतात. उलट झाले तर त्यांना तोटा होतो.
जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्गने एक अहवाल प्रकाशित केला, ज्यात अदानी समूहावर ‘कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठ्या फसवणुकीचे आरोप’ लावण्यात आले. या अहवालामुळे समूहाच्या शेअर्सच्या मूल्यांमध्ये १५० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त घट झाली. अदानी समूहाने या सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले. दशकांपासून उघड्या फसवणूक आणि लेखापरीक्षण घोटाळ्यांच्या योजनांमध्ये गुंतलेले असल्याचे आरोप आणि समूहाच्या शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी परकीय ‘टॅक्स हेव्हन’चा वापर केल्याचे आरोपही नाकारले.
हा अहवाल प्रकाशित होण्याच्या एक दिवस आधी व्यवसायिक अदानी हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. परंतु समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे त्यांची संपत्ती घटली. गुरुवारी ७५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या संपत्तीसह ते २० व्या स्थानावर होते, तर मुकेश अंबानी (९१.५ अब्ज अमेरिकी डॉलरसह) १७ व्या स्थानावर होते.
अदानी समूहातील बहुतांश समभाग तेजीत
अब्जाधीश गौतम अदानी यांना लक्ष्य करून त्यांच्या समूह कंपन्यांच्या बाजार मूल्यातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक अँडरसन यांनी व्यवसाय बंद करत असल्याचे जाहीर केल्यानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी वाढ झाली. ११ कंपन्या असलेल्या अदानी समुहाचे एकत्रित बाजारमूल्य वधारून १२.९२ लाख कोटी रुपये झाले, तर बीएसईवर एनडीटीव्हीचे समभाग ९.१५ टक्के, अंबुजा सिमेंट्स ३.८८७ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी ३.३५ टक्के, संघी इंडस्ट्रीज ३.३४ टक्के आणि अदानी पॉवर २.४५ टक्क्यांनी वाढले. अदानी पोर्ट्सचा समभाग २.०३ टक्के, अदानी टोटल गॅस १.७८ टक्के, अदानी एंटरप्रायझेस १.७४ टक्के, अदानी एनर्जी सोल्युशन्स १.५४ टक्के आणि एसीसी ०.७७ टक्के वाढला. अदानी विल्मारचे शेअर्स मात्र १.१९ टक्क्यांनी घसरले.