मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या ‘आयमोबाईल’ ॲॅपवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या बँकेच्या ग्राहकांना दुसऱ्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डाची माहिती दिसत असल्याची तक्रार उघड झाली आहे. यामुळे ‘आयमोबाईल ॲॅप’ वापरणाऱ्या ग्राहकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. आयसीआयसीआय बँक ही देशातील मोठी खासगी बँक आहे. या बँकेने ‘आयमोबाईल ॲॅप’ ग्राहकांसाठी तयार केले. हे ॲॅप वापरणाऱ्या ग्राहकांना अन्य ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचे तपशील दिसू लागल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले. मात्र, बँकेने तातडीने पावले उचलल्यामुळे अन्य ग्राहकांना आता क्रेडिट कार्डचे तपशील दिसणे बंद झाले.
आयसीआयसीआय बँकेने सांगितले की, ग्राहकांची सुरक्षितता ही आमच्यासाठी सर्वात मोठा प्राधान्यक्रम आहे. गेल्या काही महिन्यांपासून १७ हजार नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले. या क्रेडिट कार्डचा डेटा चुकीच्या पद्धतीने मॅप करण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही तत्काळ सर्व कार्ड ब्लॉक केले. आता ते नव्याने जारी केले जाणार आहेत. ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. या कार्डांचा गैरवापर झालेला नाही. ग्राहकांचा कोणताही आर्थिक तोटा झाला असल्यास त्याची भरपाई केली जाईल, असे बँकेने सांगितले.
सुमंता मंडल यांनी या घटनेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून उघड केली. त्यांनी आयसीआयसीआय बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही ‘टॅग’ करून लक्ष घालण्यास सांगितले. अनेक ग्राहकांनी तक्रार केली की, ते त्यांच्या ‘आयमोबाईल ॲॅप’वर अन्य ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती पाहू शकत आहेत. यात क्रेडिट कार्डचा संपूर्ण क्रमांक, कार्ड संपण्याची तारीख आणि सीव्हीव्ही दिसत आहे.