मुंबई : विदेशी गुंतवणूक संस्थांकडून सतत निधी काढून घेणे आणि जागतिक बाजारातील कमकुवत कलामुळे कॅलेंडर वर्ष २०२४ च्या अंतिम सत्रात- मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. २०२४ मध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदार तब्बल ७७.६६ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७७,६६,२६०.१९ कोटी रुपयांनी वाढून ४,४१,९५,१०६.४४ कोटी रुपये (५.१६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर) झाले.
सलग दुसऱ्या दिवशी घसरण होऊन, बीएसईचा सेन्सेक्स १०९.१२ अंकांनी किंवा ०.१४ टक्क्यांनी घसरून ७८,१३९.०१ वर बंद झाला. दिवसभरात तो ६८७.३४ अंकांनी किंवा ०.८७ टक्क्यांनी घसरून ७७,५६०.७९ वर आला होता. अशाच प्रकारे एनएसई निफ्टी ०.१० अंकांनी घटून २३,६४४.८० वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत टेक महिंद्रा, झोमॅटो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे समभाग मंगळवारी मोठ्या प्रमाणात घसरले, तर कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्सचे शेअर्स वधारले.
बीएसई स्मॉलकॅप ०.७१ टक्क्यांनी आणि मिडकॅप निर्देशांक ०.१३ टक्क्यांनी वाढला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बीएसई फोकस्ड आयटी १.४७ टक्के, आयटी १.२९ टक्के, टेक १.०२ टक्के, रियल्टी ०.३६ टक्के आणि वित्तीय सेवा ०.२९ टक्के घसरले, तर भांडवली वस्तू १.३१ टक्के, औद्योगिक १.१४ टक्के, ऊर्जा १ टक्के, धातू ०.८५ टक्के आणि ऊर्जा ०.४७ टक्के वाढले.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी १,८९३.१६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, असे एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार दिसून येते. आशियाई बाजारांमध्ये शांघाय नकारात्मक तर हाँगकाँग सकारात्मक क्षेत्रात संपले. नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी टोकियो आणि सेऊलमध्ये बाजारपेठा बंद होत्या. युरोपियन बाजार दुपारपर्यंत सकारात्मक व्यवहार करत होते. जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.४६ टक्क्यांनी वाढून ७४.३४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.
बीएसईचा ३० शेअर्सचा बेंचमार्क सोमवारी ४५०.९४ अंकांनी घसरून ७८,२४८.१३ वर तर निफ्टी १६८.५० अंकांनी घसरून २३,६४४.९० वर बंद झाला.
वर्षभरात सेन्सेक्स ५,८९८.७५, तर निफ्टी १,९१३.४ अंकांनी झेपावला
संपूर्ण २०२४ मध्ये, सेन्सेक्सने ५,८९८.७५ अंक किंवा ८.१६ टक्क्यांनी झेप घेतली आणि निफ्टी १,९१३.४ अंकांनी किंवा ८.८० टक्क्यांनी वाढला.
बीएसई सेन्सेक्सने या वर्षी २७ सप्टेंबर रोजी ८५,९७८.२५ चे विक्रमी शिखर गाठले आणि त्याच दिवशी एनएसई निफ्टीने २६,२७७.३५ हा आजीवन उच्चांक गाठला होता.