भारतातील आघाडीची कंपनी लार्सन अँड टुब्रो (L&T) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम (S.N. Subrahmanyan) काही दिवसांपूर्वी आठवड्यात ९० तास काम करण्याच्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. या विधानानंतर त्यांना अनेक स्तरांवर टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, आता सुब्रमण्यम यांनी त्यांच्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने (८ मार्च) त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
महिलांना दर महिन्याला मासिक पाळीची रजा
मुंबईतील पवई कार्यालयात ३५० महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुब्रमण्यम यांनी, कंपनीतील सर्व महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस ‘पीरियड लीव्ह’ (menstrual leave) मिळेल, असे जाहीर केले. महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीची एक दिवसाची रजा देण्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
कोणत्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणार रजा?
संस्थेच्या ६०,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५,००० महिला कर्मचारी (एकूण कर्मचाऱ्यांच्या ९% ) आहेत. L&T ने स्पष्ट केले आहे की, 'पीरियड लीव्ह' ही सुविधा केवळ मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठीच लागू असेल. कंपनीच्या इतर बिझनेस युनिट्स किंवा वर्टिकल्समध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळणार नाही. कारण या क्षेत्रांमध्ये आधीपासूनच ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ‘फ्लेक्सिबल वर्क’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तथापि, वर्षातून १२ दिवस मासिक पाळीच्या रजेचे धोरण कसे अंमलात आणले जाणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.